कवी व चित्रपट गीतकार साहिर लुधियानवी यांच्यावरील अक्षर मनवानी लिखित ‘साहिर लुधियानवी- द पीपल्स पोएट’  या चरित्रपर पुस्तकाचा ‘लोककवी साहिर लुधियानवी’ हा मिलिंद चंपानेरकर यांनी केलेला अनुवाद रोहन प्रकाशनतर्फे प्रकाशित होत आहे. या पुस्तकातील अनुवादकाचे संपादित मनोगत..

साहिर एक लोकाभिमुख कवी होते. त्यांच्यासारखे सशक्त सामाजिक-राजकीय जाणीव असलेले कवी-गीतकार त्या काळातही कमी होते. आणि आज तर अगदीच अपवादापुरते आहेत. त्या काळात साहिर यांनी सातत्याने श्रमजीवी, दलित, शोषित व स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडली आणि सांप्रदायिकता व युद्धखोरीविरोधातही उघडपणे भूमिका घेतली. साहिर यांचा मृत्यू १९८० मध्ये झाला आणि त्यानंतर केवळ दहा वर्षांनी जागतिकीकरणाचा, आíथक उदारीकरणाचा काळ आला. त्यानंतर नव्या आíथक व्यवस्थेत जनसामान्यांचे प्रश्न अधिकाधिक व्यामिश्र होत गेले आहेत. इतकंच नाही, तर ‘नाही रे’ वर्ग जणू चर्चाविश्वातून हद्दपार झाल्याचंच चित्र आहे. त्याचप्रमाणे सत्तेचं राजकारण यापूर्वी कधी नव्हे इतकं आक्रमक सांप्रदायिकतेभोवती फिरत असल्याचं दिसून येत असून, सांप्रदायिक समस्यांचं स्वरूप आज अधिक तीव्र आणि व्यापक झालेलं आहे. परंतु उपरोधाची गोष्ट अशी, की असं असूनही साहिर यांच्यासारखे जनसामान्यांच्या शोषणाविरोधात उभे राहणारे आणि धर्मनिरपेक्षतेचा आवाज बुलंद करणारे बंडखोर कवी-गीतकार जवळपास नसल्यागतच परिस्थिती आहे. जे आहेत, त्यांचा आवाज क्षीण ठरत असल्याचं चित्र आहे. म्हणूनच खरं तर आज एक नाही, तर अनेक ‘साहिरां’ची आवश्यकता आहे. सुमारे पन्नास वर्षांपूर्वी लिहिलेलं त्यांचं काव्य भविष्याच्या हाका ऐकणारं होतं, हेसुद्धा अनेक संवेदनशील कवी-लेखकांना लक्षात येईल.

loksabha election 2024 Peoples issues banished from campaigning in Vidarbha
विदर्भात जनसामान्यांचे प्रश्न प्रचारातून हद्दपार
light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
Loksatta explained Due to the continuous increase in mustard production, the discussion of yellow revolution is starting
विश्लेषण: देश पिवळय़ा क्रांतीच्या दिशेने..
lokmanas
लोकमानस: दांभिक नवनैतिकवाद्यांकडून अपेक्षा निरर्थक

स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे- १९४० च्या दशकाच्या पूर्वार्धातच साहिर यांना ‘प्रगतिशील लेखक चळवळी’तले एक क्रांतिकारी कवी म्हणून मान्यता प्राप्त झाली होती. आणि १९५० च्या दशकापासून गीतकार म्हणून कारकीर्द घडवण्यास सुरुवात केल्यावर अल्पावधीतच त्यांना पुरोगामी विचारांचा पुरस्कार करणारे संवेदनशील गीतकार म्हणून लौकिक प्राप्त झाला. महत्त्वाचं म्हणजे प्रस्थापितविरोधी सूर व्यक्त करणारी आणि समतेचा पुरस्कार करणारी त्यांची गाणी कमालीची लोकप्रिय ठरली. त्यामागचं एक कारण हे होतं, की त्यातून वास्तवदर्शन साधलेलं होतं, समाजातील अंतर्वरिोधावर नेमकं बोट ठेवलं गेलं होतं. आणि दुसरं म्हणजे त्यातून समाजाभिमुखता आणि काव्यात्मकतेचा अभूतपूर्व मिलाफ साधला गेला होता. ‘प्यासा’ (१९५७) चित्रपटातील ‘जिन्हे नाज़ है हिंद पर वो कहाँ है?’ आणि ‘ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है?’, ‘वो सुबह कभी तो आएगी’ (‘फिर सुबह होगी’- १९५८) ही आणि यासारखी त्यांची अनेक गाणी आजच्या पिढीलाही मनाला भिडणारी का वाटतात? कारण त्यातून मानवी मूल्यांच्या घसरणीविरोधात, शोषणाधारित व्यवस्थेविरोधात धारदार भाष्य केलेलं होतं. ते भाष्य त्याकाळी लागू होत होतं; आणि आज तर ते अधिकच प्रकर्षांने लागू होतं. समाजाभिमुख गाण्यांप्रमाणेच त्यांनी संवेदनशीलतेने लिहिलेली ‘अभी ना जाओ छोडकर’ (‘हम दोनो’- १९६१), ‘चलो इक बार फिर से अजनबी बन जाये हम दोनो’ (‘गुमराह’- १९६३), ‘तुम मुझे भूल भी जाओ कोई हक है तुम को’ (‘दीदी’- १९५९), ‘संसार से भागे फिरते हो, भगवान को तुम क्या पाओगे’ (‘चित्रलेखा’- १९६४) यांसारखी भावपूर्ण प्रेमगीतंही रसिकांना भावणारी ठरली आणि आजही ती तितकीच लोकप्रिय आहेत. कारण प्रियकर-प्रेयसी वा स्त्री-पुरुष नात्यातील अनेक सूक्ष्म पदर आणि मानवी नात्यांची समज त्यातून अभिव्यक्त होत होती. आणि ती स्वाभाविकच मनाला भिडणारी आणि इतरांच्या तुलनेत वेगळी ठरत होती. एकंदरीतच मानवी संवेदना अस्सलतेने अभिव्यक्त झाल्यामुळेच साहिर यांच्या विविध प्रकारच्या गीतांनी वर्षांनुर्वष जनसामान्यांच्या हृदयाचा ठाव घेतला आणि त्यांच्या गीतांनी व काव्याने त्यांना विचारप्रवृत्तही केलं.

१९४३-४४ मध्ये म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात जेव्हा ‘तल्खियाँ’ हा साहिर यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला तेव्हा साहिर यांचं वय अवघं २३ होतं. परंतु त्या वयातही त्यांची सामाजिक जाणीव किती सखोल होती, त्यांची संवदेनशीलता किती तीव्र होती आणि जागतिक स्तरावरील घडामोडींचं त्यांचं भानही किती व्यापक होतं, ते दिसून येतं. एका जमीनदाराच्या पोटी जन्मलेल्या साहिर यांनी आपले वडील जनसामान्यांवर आणि आपल्या आईवर किती जुलूम करत होते, ते जवळून पाहिलं होतं आणि त्यांच्या संवेदनशील मनातील शोषणाधारित व्यवस्थेविरुद्धच्या रोषाचा उगम त्यातच होता. विद्यार्थीदशेत असतानाच मिर्झा गालिब ते मीर यांच्यासारख्या कविश्रेष्ठांच्या काव्याचा त्यांचा अभ्यास सुरू होताच; पण त्याचसोबत त्यांचा पुरोगामी विद्यार्थी चळवळीशी आणि प्रगतिशील लेखक चळवळीशी संबंध आल्याने तरुण वयातच त्यांच्या सर्जनशीलतेला धुमारे फुटले आणि बंडखोर स्वभावाला वैचारिक बठकही प्राप्त झाली. या सर्व प्रक्रियेचा मागोवा या पुस्तकातून मोठय़ा बारकाईने घेतलेला असल्याने ‘तल्खियाँ’सारख्या प्रगल्भ जाण व्यक्त करणाऱ्या कवितासंग्रहाची निर्मिती त्यांना अगदी तरुण वयात कशी साध्य झाली असेल, त्याचं कोडं उलगडतं.

उपरोक्त ‘जिन्हे नाज़ है हिंद पर वो कहाँ है?’, ‘चलो इक बार फिर से अजनबी बन जाएँ हम दोनो’ ते अगदी त्यांच्या अखेरच्या काळातील ‘कभी कभी मेरे दिल में खयाल आता है’ ही गाणीसुद्धा मुळात त्यांच्या ‘तल्खियाँ’तील कवितांवरच आधारित होती. १९२१ मध्ये लुधियाना इथे जन्मलेले साहिर महाविद्यालयीन दिवसांमध्ये पुरोगामी चळवळीत सक्रिय होते. आणि प्रस्थापित शिक्षणसंस्थांचा रोष ओढवून घेण्यास त्यांची ही सक्रियताच एक महत्त्वाचं कारण ठरली होती. त्यामुळेच त्यांना शिक्षण अर्धवट सोडून द्यावं लागलं होतं. ऐन विशीत लुधियाना सोडून ते त्या काळात ‘प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशन’चं महत्त्वाचं केंद्र असलेल्या लाहोर इथे गेले. (पाकिस्तानच्या सर्वसामान्य जनतेचा हासुद्धा इतिहास आहे आणि तिथे अजूनही अशा प्रागतिक विचारांचा वारसा पुढे नेणारा घटक आहे, हे आज अनेकजण सोयीस्करपणे ‘विसरताना’ आढळतात!) तिथे ‘इन्क़लाबी शायर’ म्हणून त्यांना लौकिक प्राप्त झाला आणि तिथल्या वास्तव्यातच त्यांचा ‘तल्खियाँ’ संग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर १९४६ मध्ये गीतकार म्हणून कारकीर्द घडवण्याची अदम्य इच्छा मनी बाळगून ते मुंबईत येऊन वसले. इथे महत्त्वाचं हे की, स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश साम्राज्यवादाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या साहिर यांच्या डोळ्यासमोर स्वातंत्र्योत्तर भारताचं एक विशिष्ट असं चित्र होतं. आणि ते काय होतं, त्याची कल्पना पुरेशा स्पष्टतेने या पुस्तकातून प्राप्त होते. त्या काळाची त्यांची ‘व्हिजन’ आजही अनेक अर्थाने आपले डोळे उघडणारी ठरते.

साहिर यांना प्रामुख्याने समताधारित आणि सांप्रदायिक विचारांपासून मुक्त असा भारत अभिप्रेत होता. त्यामुळेच फाळणीपूर्व काळात सांप्रदायिक हिंसाचाराचा आगडोंब उसळल्याच्या पाश्र्वभूमीवर १५ ऑगस्ट १९४७ रोजी- अर्थात पहिल्या स्वातंत्र्यदिनी सर्वत्र उत्सव सुरू असताना साहिर मात्र उद्विग्न होते. त्या दिवशी लिहिलेल्या ‘मफ़ाहमत’ या आपल्या कवितेत ते म्हणतात-

‘ये जश्न, ये जश्ने-मसर्रत नही, तमाशा है

नये लिबास में निकला है रहज़्‍ानी का जुलूस

शम्अे-अख़ुवत बुझा के चमके है

ये तिरंगी के उभारे हुए हसी फ़ानुस

 

ये शाखे-नूर जिसे जुल्मतों मे सींचा है

अगर फली तो शरारों में फूल लाएगी

न फल सकी तो नई फ़स्ले-गुल के आने तक

ज़्‍ामीरे-अर्ज़ में इक जहर छोड जाएगी’

..अर्थात हा उत्सव आनंदोत्सव नाही, तमाशाच आहे. डाका टाकणाऱ्यांची मिरवणूक निघालीये नवा परिवेश करून. समानतेचा मार्ग दर्शवणारे हजारो दिवे विझवून लखलखाट निर्माण केला गेला आहे- या काळोखातच उभारलेल्या (बेगडी) दिव्यांनिशी. या काळोखाच्या गर्भातच प्रकाशाच्या एका (आशादायी) फांदीचं पोषण झालेलं आहे; जर ती फळली तर सर्वत्र (क्रांतीची) लाल फुलं उगवतील. आणि वसंत ऋतूतील उष:कालापूर्वी ती फळूच शकली नाही, तर या मायभूमीच्या मातीत (सांप्रदायिकतेचं) विष पेरून जाईल.

सांप्रदायिकतेचं विष आज किती पसरलेलं आहे, ते आज आपण पाहतच आहोत. आणि त्यामुळे साहिर किती द्रष्टे कवी होते, ते त्यावरून लक्षात येतं. मूळ इंग्रजी पुस्तकाचे लेखक अक्षर मनवानी हेसुद्धा उपरोक्त कवितेकडे लक्ष वेधताना म्हणतात की, ‘‘या कवितेद्वारे साहिर यांनी नि:संदिग्धपणे इशारा दिला होता, की सांप्रदायिकतेच्या बलीवेदीवर प्राप्त झालेलं स्वातंत्र्य खरं वाटत नाहीये. इतकी मोठी किंमत मोजून स्वातंत्र्य मिळवलेलं आहे. पण परिणामी त्यातूनच देशात सतत आणि वाढत्या क्रमाने मोठय़ा समस्या निर्माण होऊ शकतात.’’ अशी पोटतिडीक असल्यानेच साहिर यांनी ‘तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इन्सान की औलाद है इन्सान बनेगा’ (‘धूल का फूल’- १९६१) यांसारखी गाणी लिहून स्वार्थासाठी धर्माचा गरवापर करणाऱ्यांवर निडरपणे कोरडे ओढले आणि जनसामान्यांना मानवतेच्या व समानतेच्या मूल्यांना प्राधान्य देण्याचा संदेश दिला.

साहिर यांनी १९४५ मध्ये लिहिलेल्या ‘तरहे-नौ’ (नवा पाया- नवसमाजाचा) या कवितेचा दाखला देत मनवानी यांनी असंही म्हटलंय की, ‘‘आज जागतिकीकरणाचे लाभार्थी कोण, यावर वादविवाद होताना दिसतात. जमिनी बळकावणं आणि शोषण या मुद्दय़ांवरून कॉर्पोरेट आणि ग्रामीण भारत यामध्ये संघर्ष निर्माण झाल्याचं चित्र दिसून येतं आहे. याच मुद्दय़ांवरून पुढे मोठे उठाव होऊ शकतात, असा इशारा साहिर यांनी ‘तरहे-नौ’ या कवितेतून दिला होता.’’ याच संदर्भात मनवानी यांनी असंही मत नोंदवलं आहे की, ‘‘साहिर यांनी यासारख्या कविता लिहिल्यानंतर आज अनेक दशकं उलटून गेलेली आहेत आणि तरी आजच्या काळातदेखील त्या काल-सयुक्तिक ठरतात; आजच्या परिस्थितीशी निगडित वाटतात. पुढील काळात काय घडेल, याची अटकळ बांधण्याची यथार्थ क्षमता त्यांच्यात होती आणि तशा विचारप्रक्रियेतून जातच त्यांनी आपले विचार काव्यातून शब्दबद्ध केले.’’

धर्मनिरपेक्ष लोकशाहीवादी साहिर यांना कसा भारत अभिप्रेत होता, ते त्यांनी ‘आज और कल’ (१९६३) या चित्रपटातील एका गीतातून स्पष्ट केलं होतं-

‘तख्त न होगा, कल था लेकिन आज न होगा,

ताज न होगा

जिस में सब अधिकार न पाये

वो सच्चा स्वराज न होगा..

जनता का फर्मान चलेगा, जनता की सरकार बनेगी,

धरती की बेहक आबादी धरती की हकदार बनेगी

सामंती सरकार न होगी,  पूंज़्‍ाीवाद समाज न होगा

जिस में सब अधिकार न पाये

वो सच्चा स्वराज न होगा..’

आज ‘जेएनयू’च्या कन्हैयाचा ‘आझादी’चा आक्रोश आणि त्याचं आक्रंदन ऐकून/ पाहून अनेकांना साहिर यांच्या यासारख्या कवितांची व त्यांच्या बंडखोरीची आठवण झाली असल्यास त्यात नवल ते काय! साहिर हे मार्क्‍सवादी विचारांचे होते. फैज़्‍ा अहमद फैज़, मजाज़ लखनवी आणि जोश मलिहाबादी या सर्वाचा त्यांच्यावर प्रभाव होता आणि हे सर्व उर्दू कवीही डावी विचारसरणी मानणारे होते. खरं तर इक़बाल यांच्या शैलीचाही त्यांच्यावर प्रभाव होता. परंतु जेव्हा इक़बाल यांचे दृष्टिकोन बदलले, तेव्हा साहिर यांनी इक़बाल यांच्या दोन कवितांचं विडंबन साधून मोठय़ा सर्जनशीलतेने त्यांचा प्रतिवाद केला. (चीनो-अरब हमारा, हिंदोस्ताँ हमारा, रहने को घर नही है, सारा जहाँ हमारा) कवी साहिर यांच्या सर्वात गाजलेल्या कविता म्हणजे ‘परछाइयाँ’ हे युद्धविरोधी दीर्घकाव्य आणि ‘ताजमहल’. साहिर यांच्या विरोधकांनाही या काव्यांचं मोल मान्य करावं लागलं. ‘ताज महल’मधील ‘इक शहनशाह ने दौलत का सहारा लेकर हम ग़रिबों की मोहब्बत का उडमया है मज़ाक़’ या पंक्ती तर आजतागायत संस्मरणीय ठरल्या आहेत.

एकंदरीत साहिर यांच्या साहित्याचा, चित्रपट कारकीर्दीचा, त्यांच्या जीवननिष्ठांचा, जीवनमूल्यांचा, त्यांच्या व्यक्तिविशेषांचा (व अवगुणांचाही) आणि समग्र जीवनप्रवासाचा मागोवा घेणारं आणि त्यांच्या उपरोक्त विविध पलूंचा साकल्याने एकत्रित विचार करण्यास प्रवृत्त करणारं असं हे पुस्तक आहे. पद्धतशीर संशोधनावर आधारित या पुस्तकात साहिर यांच्यावरील विविध प्रभावांचा आणि प्रेरणास्रोतांचाही मागोवा घेतला आहे आणि त्याचप्रमाणे अमृता प्रीतम व अन्य स्त्रियांच्या संबंधांचा त्यांच्या साहित्यावर काय प्रभाव पडला, त्याचाही या पुस्तकातून संवेदनशीलतेने वेध घेतलेला आहे.

साहिर यांनी आपल्या काव्याद्वारे जे योगदान केलं आहे त्याबाबत पूर्ण समाजानेच त्यांचे ॠण मानायला हवेत. आपल्या काव्यक्षेत्रातील योगदानाबाबत साहिर यांनी एका शेराद्वारे अत्यंत प्रांजलपणे म्हटलं होतं-

‘दुनिया ने तजुर्बातो-हवादिस की शक्ल में

जो कुछ मुझे दिया है, लौटा रहा हूँ मैं..’

आज बाजारीकरणाने सामान्यांची अवघी भावविश्वं निर्थक ठरवलेली असल्याचं चित्र असताना त्यांचा हा आशावादही आपल्याला बरंच काही सांगून जाईल..

‘माना कि अभी तेरे-मेरे अरमानों की क़ीमत

कुछ भी नहीं

मिट्टी का भी है कुछ मोल मगर इन्सानों की क़ीमत कुछ भी नही

इन्सानों की इ़ज्ज़्‍ात जब झूटे सिक्कों में

न तोली जाएगी..

वो सुबह कभी तो आएगी..’