प्रख्यात नाटय़चित्रपटदूरचित्रवाणी लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांनी लिहिलेले सयहे त्यांच्या प्रदीर्घ कलाप्रवासाचा वेध घेणारे आत्मकथन राजहंस प्रकाशनातर्फेप्रसिद्ध होत आहे. या पुस्तकातील एक प्रकरण..

तीन तरुण. कॉलेजात शिकणारे म्हणण्यापेक्षा कॉलेजात उनाडक्या करणारे. गच्चीवरच्या एका छानशा खोलीत तिघे मिळून राहतात. सिगारेटी फुंकण्यात (म्हणून ‘धुवाँ धुवाँ’) आणि दिवास्वप्नं रंगवण्यात तिघांचा वेळ जातो. आपल्या आयुष्यात काही नाजूक गुंतागुंत व्हावी अशी तिघांचीही मनोमन इच्छा असते. पण कुणाच्यातही तशी धमक नसल्यामुळे तोंडची वाफ दवडण्यापलीकडे कुणाची मजल पुढे जात नाही. एकदा तिघं गच्चीवरून खाली रस्त्यावरून जाणारी एक छानशी मुलगी पाहतात. तिघांच्यात पैज लागते. कोण आधी तिच्याशी ओळख करून घेऊन पुढे दोस्ती करणार? मग तिघांचे केविलवाणे प्रयत्न चित्रित केले जातात. एकेक करून तिघंही प्रेमवीर सपशेल तोंडघशी पडतात. पण घरी (म्हणजे खोलीवर) येऊन इतर दोघांना आपली फजिती सांगायची कशी? मग तिघंही एकेक कपोलकल्पित कथा रचून सांगतात. रोमँटिक, भावपूर्ण, भन्नाट. कुठल्याही हिंदी चित्रपटात शोभतील अशा- किंबहुना, हिंदी सिनेमातूनच तद्दन चोरलेल्या. त्या साहसकथा साग्रसंगीत सांगून तर होतात; पण पुढे काय? अशी थापाथापी पुढे कायम थोडीच चालवता येणार होती? मग तिघं एक सोयीस्कर ठराव पास करतात. ती उठवळ मैना आपल्या तिघांशीही एवढय़ा सलगीनं वागली, तेव्हा ती निश्चित चांगल्या चालीची नसणार. उगाच आपल्या मैत्रीत बाधा यायला नको. मग ते प्रेमवीर तिथल्या तिथे आपल्या प्रेमपात्राला रजा देतात आणि आपली आपली सिगारेट शिलगावतात. धुराच्या वलयांमध्ये स्वप्नसुंदरी विरून जाते.

nagpur woman filed rape charges against future husband
तरुणीची भावी पतीविरुद्ध बलात्काराची तक्रार…साक्षगंध होताच……
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?

गुलला कल्पना आवडली. पण एक अडचण होती. ‘‘तिघंही दोस्त सडेफटिंग, भणंग आहेत. कुचकामी. त्यांच्यातला एक तरी हीरो हवा. त्याची प्रेमकहाणी खरी खरी हवी. आपल्याला व्यावसायिक सिनेमा करायचा आहे. कसं?’’ गुलच्या म्हणण्यात तथ्य होतं. ‘‘ठीक आहे,’’ मी म्हटलं, ‘‘मी विचार करून सांगते.’’ यावर थोडय़ा काळजीयुक्त स्वरात गुलनं विचारलं, ‘‘कधी सांगशील?’’ तिघांपैकी एकाला सरळ मार्गावर आणणं काहीच अवघड नव्हतं.  एक महिन्याची मुदत मागितली. ‘‘ठीक आहे. मुंबईला परतल्यावर मी बरोबर अमुक अमुक तारखेला तुला फोन करीन.’’

मायदेशी परतल्यावर नवीन पटकथा लिहिण्याच्या बाबतीत मी काहीसुद्धा केलं नाही. चित्रपटसृष्टीच्या मायावीपणाची आणि तोंडदेखलेपणाची मी एवढी वर्णनं ऐकली होती, की गुलचा प्रस्ताव कितपत भक्कम असेल याबद्दल मला शंका वाटली. आपण कष्ट घेऊन लिहिण्याची उस्तवारी करायची आणि त्याचा फोनच नाही आला तर सगळी मेहनत फुकट जायची, असं वाटून मी एक ओळही लिहिली नाही. ठरल्या दिवशी गुलचा फोन आला. मी खजील झाले. काहीतरी थातुरमातुर कारण सांगून मी आणखी दहा दिवसांत काम फत्ते करण्याचं (पुन्हा एकवार) कबूल केलं. या खेपेला मात्र मी फोन खाली ठेवला आणि पेन उचललं. नवी संहिता तीन दिवसांत लिहून झाली. गुलनं आणखीही काही भर सुचवली होती. तो हाडाचा ‘सिने’धंदेवाईक होता. प्रेक्षकांची नाडी त्यानं अचूक ओळखली होती. ‘पटकथा झकासच झाली आहे..’ त्यानं पावती दिली, ‘पण..’ या ‘पण’मध्ये बरंच काही सामावलं होतं. बरेचसे आडाखे होते. आताची आहे या स्वरूपातली कथा ही केवळ तरुणांसाठी आहे. पण आपल्याला फक्त कॉलेजकुमारच नाही, तर त्यांचे आई-वडील, काका-मामा, आजोबा-आजी पण हवे आहेत. मग गोष्टीत नायिकेचे वडील, मोठा भाऊ, आजी आणि मोहल्ल्यामधला एक इरसाल पानवाला अशी पात्रं जोडण्यात आली. त्या सर्वच पात्रांनी पुढे सिनेमात आपापला ठसा छान उमटवला. पण ही ‘मागणीबरहुकूम’ गोष्ट लिहिताना मी बरीच कुरकुर केली- ‘‘मला लेखिका नाही, तर वाणी झाल्यागत वाटतं आहे. कागदात माल भरून पुडा बांधणारा.’’ मग गुलनं हे गणित कौशल्यानं मांडून त्यातून कथा फुलवायची हेच तर खरं कसब आहे, असं सांगितलं. मला ते नक्की जमेल, असाही विश्वास प्रकट केला. मग हरभऱ्याच्या झाडावर बसून मी योग्य ते बदल केले. ते सगळे अचूक ठरले, असं मी इथे नमूद करते.

गुल धूर्त आणि व्यवहारचतुर होता. संधीचा पुरेपूर फायदा घेण्यात कमालीचा कुशल होता. ‘स्पर्श’मध्ये सगळीच ‘बोलाचीच कढी, बोलाचाच भात’ होता. एक ओळदेखील पांढऱ्यावर काळी केली गेली नव्हती. इथे गुलनं व्यवस्थित करारपत्र केलं आणि प्रत्येक हप्ता ठरल्याप्रमाणे तो वेळच्या वेळी देत गेला, एवढा फरक होता. बाकी याही बाबतीत मी व्यवहारात अगदी अडाणी ठरले. आर्थिक भाषेत बोलायचं तर पुढे सिनेमानं खोऱ्यानं पैसे ओढले आणि माझ्या पदरी ढीगभर चिंचोके जेमतेम आले. एकदा केव्हातरी गप्पांच्या ओघात गुलनं कुठल्याशा परदेशी फिल्मच्या केवळ कल्पनेसाठी एक लाख रुपये आपण मोजले होते असं सांगितलं. पुढे माझ्या कथेचा मोबदला म्हणून तो हजारांची भाषा बोलू लागला तेव्हा मी उसळले. ‘‘नुसत्या कल्पनेला तू लाख रुपये मोजलेस, आणि माझ्या तयार पटकथेची तू अशी किंमत करतोस?’’ असं ठणकावून विचारल्यावर तो हसला आणि माझ्या पटकथेची किंमत वाढवून दिली. ‘‘मला तू शब्दांत पकडलंस,’’ म्हणाला. आयुष्यात एकूण ज्या तीन-चारच (व्यावहारिक) चतुराईच्या चाली मी केल्या असतील, त्यांच्यात ही मोजायला हरकत नाही.

‘सिनेमा जर यशस्वी झाला तर मी तुला आपणहून एक रक्कम देईन,’ असं त्यानं कबूल केलं होतं. त्याप्रमाणे त्यानं आठवणीनं मला चेक दिला.

इतर तंत्रज्ञ आणि कलाकार या सर्वाची निवड गुलनं अतिशय चाणाक्षपणे केली. फारुख शेख आणि दीप्ती नवल अद्याप ‘सितारे’ झाले नव्हते. तेव्हा ते एका चांगल्या सिनेमात, चांगल्या दिग्दर्शकाबरोबर (!) काम करायला आनंदानं राजी झाले. तीच गोष्ट सईद जाफरीची. लंडनला वेस्ट एंडच्या नाटकांतून आणि बी.बी.सी.च्या सिनेमांमधून कामं करणारा हा गुणी नट भारतात जम बसवू पाहत होता. गुलनं हे हेरून त्याला जाळ्यात ओढलं. रवी बासवानी हा माझा दिल्लीचा दोस्त अणि अतिशय तुफानी कलाकार- माझ्या सांगण्यावरून टीममध्ये घेतला गेला. त्याला मेहनताना दिला अवघे रु. ३०००. ‘ब्रेक’ म्हणजे संधी देणं हा सिनेइंडस्ट्रीतला एक सर्रास प्रचलित प्रकार होता.. अजूनही आहे. होतकरू नटांच्या अगतिकतेचा फायदा घेऊन निर्माते त्यांना अत्यंत कमी मोबदल्यात (किंवा फुकट) सिनेमात घेतात. रवीला मी फारुखच्या एका इरसाल मित्राचं- जो जोचं काम दिलं. ‘रोमी’साठी गुलनं राकेश बेदी सुचवला. राकेश ‘एफटीआयआय’चा विद्यार्थी होता. वालचंद इंडस्ट्रीजचा चेअरमन विनोद दोशी हा माझा मित्र नाटकवेडा आणि सिनेशौकीन होता. त्यानं उत्साहानं दीप्तीच्या वडलांचं काम करायचं मान्य केलं. मला वाटतं की, दादीजींच्या भूमिकेसाठी लीला मिश्रा या सुप्रसिद्ध चरित्र अभिनेत्रीला मात्र गुलला तिचा नेहमीचा वाजवी मेहनताना द्यावा लागला. मला दुसरी कुणी दादी मंजूरच नव्हती. लीलाजी आपल्या फीच्या बाबतीत कडक असत. एकदा त्यांना सत्यजित रेंच्या ‘शतरंज के खिलाडी’साठी विचारायला म्हणून एक शिष्टमंडळ गेलं होतं. ‘कोण हे सत्यजित रे?’ त्यांनी विचारलं. ‘‘माझे दिवसाचे हजार रुपये देतील ना?’’

तंत्रज्ञांच्या गटामध्ये सर्वप्रथम कॅमेरामन म्हणून वीरेन्द्र सैनी दाखल झाला. त्यानं ‘स्पर्श’चं अप्रतिम छायांकन केलं होतं. ध्वनियंत्रणेसाठी गुलनं नरेन्द्र सिंहला नेमस्त केलं. हे दोघंही ‘एफटीआयआय’चे माजी विद्यार्थी होते आणि समांतर/ प्रायोगिक सिनेमाबद्दल दोघांना आस्था होती.

संगीत ही सिनेमाची जमेची बाजू ठरणार होती. मी पुन्हा एकदा इंदू जैनकडे धाव घेतली. इंदूजी दिल्लीला इंद्रप्रस्थ कॉलेजात हिंदी विभागप्रमुख होत्या. त्यांना नुकतंच टोकिओ विद्यापीठाचं आमंत्रण आलं होतं. पाहुण्या प्राध्यापक म्हणून काही महिने त्या जपानला जाणार होत्या. ‘‘आमच्या गाण्यांचं कसं होणार?’’ गोड हसून इंदू जैन म्हणाल्या, ‘‘मी जाण्याआधी तू मला किती गाणी हवी आहेत, ते सांग. त्यांचे प्रसंग नीट समजावून सांग. पुढे टेलिफोन आहेच.’’ आणि खरोखरच आमचं गीतगोविदांचं चर्चासत्र दूरध्वनीवरून होऊ लागलं. त्या गाण्याच्या पंक्ती सांगत, मी उतरवून घेई. त्यांची सगळी गाणी त्यांच्यासारखीच सुंदर होती. ‘काली घोडी द्वार खडी’ आणि ‘कहा से आये बदरा’ ही भावपूर्ण गाणी त्या, त्या प्रसंगांची शोभा वाढवतात. राजकमल हे उभरते संगीतकार गुलनं शोधून काढले. आपल्या काटकसरीच्या धोरणाला अनुसरून गुलनं ही निवड केली, हे उघड होतं. मी काहीशी नाराज होते. ‘‘तू त्याला थोडा वाव तर दे. नाही चाली आवडल्या, तर आपण संगीत-निर्देशक बदलू शकतो.’’ पण राजकमलनं अतिशय नादमधुर चाली दिल्या. शास्त्रीय संगीताच्या बाजाचं ‘बदरा’ तर जाणकारांनी खूप वाखाणलं. गुलनं जरी कायम खर्च वाचवण्याचा विडा उचलला असला, तरी दर्जाच्या बाबतीत मात्र कधी तडजोड केली नाही. स्वस्त आणि मस्त हे त्याचं ब्रीदवाक्यच असावं.

सिनेमाच्या मथळ्यावरून आमचा वादविवाद झाला. माझ्या मते ‘धुवाँ धुवाँ’ हा मथळाच अतिशय अर्थपूर्ण होता. पण गुलला अर्थाशी फारसं देणंघेणं नव्हतं. ‘बॉक्स ऑफिस’ हा त्याचा खुदा होता. ‘‘धुवाँ’ हा शब्द ऐकताच डिस्ट्रिब्युटर बिथरणार,’ असं तो म्हणाला. ‘आमच्या पैशाचा धूर होणार असल्या अवलक्षणी नावामुळे,’ असं त्याचं म्हणणं. मग रोज नवनवीन नावं समोर येऊ लागली. पण त्यातलं कुठलंच कुणालाच आवडत नव्हतं. एके दिवशी आम्ही लिफ्टची वाट पाहत उभे होतो. एक लहान मुलगी आपल्या आईबरोबर तिथं आली. कुठल्याशा नाचाच्या कार्यक्रमासाठी ती नटली होती. कुणीतरी हसून म्हणालं, ‘वा! चष्मेबद्दूर!’ गुलनं आणि मी एकाच वेळी चमकून एकमेकांकडे पाहिलं. नाव ठरलं! काही र्वष आधी एका सिनेमात

‘चष्मे बद्दूऽऽर’ हे गाणं लोकप्रिय झाल्यामुळे हा वाक्प्रयोग लोकांच्या कानी पडला होता. भले त्याचा अर्थ नीट कळला नाही तरी. त्याचा अर्थ- ‘नजर (चष्म) वाईट (बदू) असलेल्यांनी दूर राहावं.’ थोडक्यात, इडा पिडा टळो! दुर्दैवानं बऱ्याच मराठी प्रेक्षकांनी त्याचा छान अपभ्रंश केला. ‘‘चष्मे-‘बहाद्दूर’ पाहिला,’ असं मला आवर्जून सांगत.