कवयित्री संगीता अरबुने यांचा ‘स्वत:ला आरपार ओवताना’ हा तिसरा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. पुरुषसत्ताक व्यवस्थेमध्ये स्त्रियांच्या वाटय़ाला येणारे दुय्यम स्थान आणि निव्वळ उपभोगवस्तू म्हणून मिळणारी उपेक्षा या संदर्भात आत्मभान जागृत झालेल्या स्त्रीचे उद्गार या कवितासंग्रहात आढळतात. १९७५ आणि १९९० नंतरच्या कवयित्रींच्या कवितेत दिसणाऱ्या पारंपरिक मूल्यांना विरोध आणि आत्मशोध या काव्यप्रेरणांचा प्रत्यय या कविता वाचताना येतो. मात्र ही कविता पारंपरिकतेचा पगडा पूर्णपणे झुगारून देत नाही. रूढीबद्ध जगण्यामध्ये काही सुटकेचे क्षण ती वेचते आणि त्या क्षणांनी बदललेल्या जाणिवांचा झाडा घेताना दिसते.

संसाराच्या महावस्त्रात ‘स्वत:ला आरपार ओवताना’ धाग्याधाग्यात एकरूप होणाऱ्या परंपराधीन स्त्रीमनापासून स्वत:ची प्रकाशवाट शोधणाऱ्या मनस्विनीपर्यंतचा संयत संवेदनप्रवास इथे ठळक होत जातो. या संग्रहात स्त्री-पुरुषसंबंधांमधली भक्ती, प्रीती, परिणीती, एकरूपता, अनोळखी वाटांवरचे बोचणारे काटे, बेसावध क्षणी बसलेला हादरा, वास्तवाचं भान, संवेदनांचा लाव्हा, कल्लोळ, वादळाशी दोन हात करण्यासाठी गोळा केलेलं धर्य आणि सूर्याच्या कक्षेबाहेर जाऊन स्वत:चा अवकाश शोधण्याचा निर्धार अशी विविध वाटावळणे भेटतात. या वाटावळणांमधून जात असताना कवितागत ‘मी’च्या जगण्याविषयीच्या, स्त्री-पुरुषसंबंधांविषयीच्या, प्रेमाविषयीच्या कल्पनांना जीवनानुभूतीचा स्पर्श लाभतो आणि वास्तवाची धग तिला जाणवू लागते. क्रमाक्रमाने येणारं हे भान कवयित्रीने नेमकेपणाने व्यक्त केलं आहे. ती लिहिते –

March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?
mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips
MPSC मंत्र : भूगोल मूलभूत अभ्यास
kamal nath
भाजपात जाण्याच्या चर्चांवर कमलनाथांची रोखठोक भूमिका, प्रसारमाध्यमांवर संताप व्यक्त करत म्हणाले…

‘आताशा तो धुराची वलयं सोडतो

तेव्हा माझ्यातूनच आल्यासारखी वाटतात ती मला’

इतकी नात्यातली एकरूपता कवितागत स्त्री अनुभवते. ‘लेखणीची बासरी करून’ ती मधुराभक्तीत रमते, पायांत घुंगरू बांधून कालिंदीच्या तीरावर थिरकते. केसांत भरलेलं प्रीतीचं उधाण वारं झेलून कृष्णाची राधा होऊ पाहते. परंतु, ‘द्वापारयुगासारखं सोपं नाही रे कलियुग’ ही जाणीव तिला चौकट मोडण्यापासून रोखते. व्यवस्थेच्या वर्तुळात त्रिज्या बनून वर्तुळाला सावरून धरणारी ती कधी बंदिस्तपणाच्या वर्तुळातून बाहेर पडून जगाचं दर्शन घेण्यास उत्सुक होते, पण-

‘आणि एका अमर्याद प्रतलावरचा

फक्त एक रेषाखंड होऊन राहिली’

असा अनुभव स्त्रीला पुन्हा व्यवस्थाशरण बनवतो. आधाराचे काटकोन त्रिकोण शोधण्यातली अपरिहार्यता तिला अस्वस्थ करते. घुंगरू शृंखला बनून स्वत:त जखडून टाकतात. कालांतरानं लक्षात येतं की,

‘या अनोळखी वाटांचं काही खरं नाही

त्यापेक्षा वादळाशी दोन हात का बरं करू नये?’

खरे तर, वाट ओळखीची की अनोळखीची हा मुद्दा नसतो; तर वाट कोणतीही असो, ती स्वत:ला वहिवाटीची हकदार समजू लागते, स्वामित्व गाजवू लागते, त्याचं काय करायचं, हा प्रश्न असतो. आणि याचे भान जगतानाच येऊ लागते. हे सगळं सोसणं आजच्या स्त्रीचं प्रातिनिधिक बनून संगीता अरबुने यांच्या कवितेतून अधोरेखित झालं आहे.

या संग्रहात प्रीतीच्या तृप्ततेच्या क्षणांचे झळझळीत रंग तरल काव्यात्मपणे उतरले

आहेत, ते विलक्षण वेगळे आहेत. उदा. अरबुने लिहितात –

‘ओंकारातून येऊ लागले चक्क बासरीचेच सूर’ किंवा ‘ओंकार’ या कवितेत –

‘तिच्याही गात्रांतून उमटेल मग तृप्तीचा हुंकार’

अशी स्त्रीसंदर्भात नेहमीच दुर्लक्षित राहिलेली अपेक्षा अरबुने संयमितपणे, पण धीटपणे व्यक्त करतात. तसेच स्त्रीमनाला हवं असणारं शरीरापल्याडचं मत्र, मनाचं एकरूपपण आणि पुरुषाची अपेक्षा यांतील अंतरायही कवयित्रीने अचूक दर्शविला आहे. स्त्री-पुरुष नात्यातले तणाव संगीता अरबुने यांनी टिपले आहेत. उदा. ‘जीवाश्म’ या कवितेत त्या म्हणतात,

‘तुझ्या माझ्या नात्याच्या मुळाशी

एक धगधगता ज्वालामुखी’

बायकांच्या कवितेला चारित्र्याच्या चष्म्यातून बघण्याच्या समाजाच्या विकृत दृष्टिकोनावरही ही कविता प्रहार करते. त्यामुळेच ‘कधी जाड कव्हरच्या डायरीमध्ये ती घेते स्वत:ला कोंडून’ असा स्त्रियांचा सार्वत्रिक अनुभव ती व्यक्त करते. ‘विहीर’ या कवितेत देहाच्या बाजारात खुडल्या जाणाऱ्या कोवळ्या कळ्यांची दाहक वेदना अरबुने यांनी मांडली आहे.

मात्र, ‘नाच गं घुमा’, ‘यू आर माय प्रॉपर्टी’ अशा शब्दांत स्त्रीला उपभोगाचे वस्तुरूप देणाऱ्या, तिला माणूस म्हणून न स्वीकारणाऱ्या पुरुषप्रधान व्यवस्थेचा आता स्त्रिया धिक्कार करू लागल्या आहेत. नात्यांत भरडल्या जाणाऱ्या स्त्रिया आता बदलतायत. राखेतून जन्म घेत त्या अवकाशात भरारी घेणार आहेत, असा इशाराही ही कविता द्यायला विसरत नाही. संगीता अरबुने यांच्या कवितेत अशी ग्वाही स्पष्टपणाने मिळते. एकूणच मराठी स्त्री-कवितेत काही अपवाद सोडले तर, स्त्रीवादी वैचारिक बठकीऐवजी कवयित्रींची भिस्त असते ती त्यातील पटकन जोडून घेता येणाऱ्या वैयक्तिक तरीही सार्वत्रिक अनुभवविश्वावर; आणि तेच अनुभवविश्व स्त्रियांच्या कवितेला जिवंत मानवी स्पर्श देतं. कवयित्रींच्या संघर्षांचा, जीवनानुभवाचा पट छोटा असेल, पण त्यातील त्यांचे मनस्वीपणाने झोकून देणे आणि स्वत:ला वादळातही चिवटजिवटपणे तगवून ठेवणे हा स्त्रीकवितेचाच नव्हे, तर स्त्रीजीवनाचा विशेष संगीता अरबुने यांच्याही कवितेत पाहायला मिळतो.

‘स्वत:ला आरपार ओवताना’- संगीता अरबुने, संवेदना प्रकाशन,

पृष्ठे – ९४, मूल्य – १०० रुपये