सध्या मराठा मूक मोच्र्यानी सबंध महाराष्ट्र ढवळून निघतो आहे. मराठा समाजावरील अन्यायांचे परिमार्जन करण्याची मागणी प्रामुख्याने त्याच्या केन्द्रस्थानी आहे. या मोच्र्याशी समांतर असे दलित समाजाचेही ‘अ‍ॅट्रोसिटी’ कायद्याच्या समर्थनार्थ प्रचंड मोर्चे निघत आहेत. या सगळ्या सामाजिक घुसळणीचा मथितार्थ काय, याचा ऊहापोह करणारा लेख..

हे याच्या आधी कधीही घडलेले नाहीये. अनेक पक्ष, समूह, जाती यांनी वेगवेगळे उद्देश घेऊन मोच्रे काढलेले आहेत. मराठय़ांनी कधी ते केल्याचे ऐकिवात नाही. निदान मला तरी माहीत नाही. आणि हे सगळे मूक मोच्रे आहेत. आणि ते प्रचंड संख्येने निघालेले आणि शिस्तबद्ध आहेत. अमुक एका जिल्ह्य़ाच्या ठिकाणचा मोर्चा इतक्या इतक्या संख्येचा होता असा अहवाल आल्यास आपल्याकडे त्यापेक्षा अधिक संख्येचा काढायचा अशी इरीशिरी- म्हणजे वीरश्रीसुद्धा यात दिसते. ती विदर्भ, मराठवाडय़ात दिसली आणि नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर या मराठाबहुल पट्टय़ात साहजिकच अधिक प्रकर्षांने दिसली. अगदी ठाणे, रत्नागिरी या मराठय़ांची संख्या तुलनेने कमी असलेल्या भागातसुद्धा दिसली. या सगळ्या मोच्र्याचे नियोजन उत्तम असल्याचे दिसते. मोच्र्यात मराठा स्त्रिया, तरुण मुले आणि मुली यांची संख्या भरघोस आणि लक्षणीय होती. मुस्लिमांसकट अनेक जाती-धर्माच्या लोकांनी त्याला पािठबा आणि क्रियाशील सहकार्य केल्याचेही दिसते. मराठय़ांच्या आरक्षणाच्या मागणीमुळे ज्यांच्या हितसंबंधांना बाधा येऊ शकते अशा माळी, वंजारी, धनगर या प्रमुख जाती या मोच्र्यात नाहीत. ते साहजिक आहे. दलित आणि इतर पिछडय़ा जातींचा मराठय़ांच्या आरक्षणाच्या मागणीला विरोध नाही, कारण त्यामुळे त्यांना काहीच फरक पडत नाही. प्रकाश आंबेडकर किंवा रामदास आठवले यांनी मराठय़ांच्या आरक्षणाच्या मागणीला पािठबाच दर्शवलेला आहे; पण ‘अ‍ॅट्रॉसिटी’चा कायदा रद्द करावा, या मोच्र्यातील मराठय़ांच्या मागणीला त्यांचा विरोध आहे. आपल्या मागण्या काय आहेत, हे मराठय़ांना नीट फ्रेम करता आलेय असे मात्र म्हणता येत नाहीये. त्यांच्यात पुरेशी सुस्पष्टता नाहीये आणि नेमकेपणाही नाहीये. याउलट, परवा नांदेडला जो अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या समर्थकांचा मोर्चा निघाला, त्यात त्यांनी आपल्या मागण्या नेमक्या आणि सुस्पष्ट मांडल्या आणि तसे निवेदन दिले. याउलट, मराठे इतके सुजन आहेत, की त्यांना भोळसटसुद्धा म्हणता येईल. आपल्याला काय हवे, हेदेखील त्यांना नेमकेपणे म्हणता आलेले नाहीये. त्यांच्या ताकदीने किंवा तिच्या प्रदर्शनाने प्रस्थापित भाजप सरकारसकट बरेच समाजघटक घाबरून गेलेले आहेत. आणि यांना आपल्याला काय हवे, हे साधे नीट मांडता आलेले नाहीये. हा टिपिकल मराठा स्वभाव आहे. राक्षसासारखे काम करणे आणि त्याच्यासारखेच मूकपणे बळी जाणे. बटू वामनाने तीन पावले मागून त्यांच्या राजाला पाताळात लोटले. असे निमूटपणे पाताळात जाणे पिढय़ान् पिढय़ा चालू आहे. अन् तरीही कुणब्यांच्या बाया म्हणताहेत की, ‘इडापिडा टळू आन बळीचं राज्य येवू.’ इरावती कर्वे यांच्या एका लेखात ‘गौराई आमची बाळाई आणि सकरुबा आमचा जावाई’ असे म्हणताना मराठा जातीच्या संकोची आणि न बोलण्याच्या, मागे मागे राहण्याच्या स्वभावावर उत्तम भाष्य आलेले आहे. त्याची आठवण यानिमित्ताने होते.

मराठय़ांचे प्रश्न आहेत की नाहीत? ते आहेतच. शंभर वर्षांआधी त्र्यंबक नारायण आत्रे यांनी लिहिलेल्या ‘गावगाडा’ नामक ग्रंथात जे मराठय़ांच्या स्थितीचे विदारक चित्र मांडले आहे त्यात काळानुसार काही बदल झालेले आहेत. पण सामान्य मराठय़ांच्या शोषणाचे जे चित्र त्यांनी मांडले त्यात तपशिलाच्या अंगाने काही बदल झाल्याचे जे आज वाटते, त्यात गुणात्मकदृष्टय़ा काही फरक पडलेला आहे असे मला वाटत नाही.

हे सगळे कसे सुरू झाले आणि पडद्यामागे याचे सूत्रधार कोण आहेत, याच्याविषयी चर्चा आहेतच. महाराष्ट्रात वेगळे काही घडले, घडत असले की शरद पवार याच्यामागे असतील अशी मांडणी करण्याची एक आधुनिक पद्धत आहे. आणि कावळा बसायला आणि फांदी मोडायला गाठ पडणे म्हणतात तसे याबाबतीतही घडले असे म्हणता येईल. शरद पवार कोपर्डीच्या घटनेबाबत बोलले, की बाबा जे घडले ते निर्घृण आणि निंदनीय आहे आणि ‘अ‍ॅट्रॉसिटी’च्या कायद्याचा पुनर्वचिार होणे गरजेचे आहे. आणि त्यानंतर काही दिवसांतच हे मोर्चा प्रकरण सुरू झाले. साहजिकच पडद्यामागे राहून पवारांनी हे सुरू केले असे बोलले जाऊ लागले. अजितदादा आणि सुनील तटकरे यांच्यावर अ‍ॅक्शन घ्यायचा विचार करायची हिंमत करणार असाल तर याद राखा, आमची ताकद ही ही आणि अशी अशी आहे, असे त्यांना भाजप सरकारला दाखवायचे आहे, असे कुजबुजीच्या रूपात सुरू झाले. त्यात पुन्हा त्यांचे विरोधक राधाकृष्ण विखे-पाटीलसुद्धा या मोच्र्यात उघड उघड सामील झाले. म्हणजे पुन्हा- अशोक चव्हाणांना आदर्श घोटाळ्यात जास्त अडकवणार असाल तर बघा, आमची ताकद अशी आहे, असेही. कारण विखे-पाटील आणि चव्हाण यांच्यातले सख्य सगळ्यांना माहीत आहे. पण प्रत्यक्ष मोच्र्यात अजितदादा काय किंवा राधाकृष्ण विखे-पाटील काय, यांना या मोच्रेकऱ्यांनी ठळक होऊ दिलेले नाहीये. त्यांच्याकडून पसा कदाचित घेतलासुद्धा असेल; पण त्यांना मोच्र्याचा ताबा घेऊ दिलेला नाहीये. तिकडे सांगलीत भाजपचे निकटवर्ती संभाजीराव भिडे गुरुजी यांनी या मोर्चाना पािठबा जाहीर केलाय. मोर्चामध्ये भाजपशी संबंधित अनेक मराठे सामील आहेत. यात आपण काय समजायचे? शरद पवारांनी हे सुरू केलेय असे मला वाटत नाही. त्यांनी तसे करून असा प्रतिसाद त्यांना मिळाला असता तर ते खूशच झाले असते. एकेकाळी त्यांच्यात ती क्षमता होती. आज तशी परिस्थिती नाहीये. आणि समजा, त्यांनी हे केले असेल तर ते मी फार दुर्दैवी मानीन. मतपेटीच्या राजकारणाचा विचार दुय्यम स्थानी ठेवून ज्या नेत्याने मराठवाडा विद्यापीठाचे नामांतरण ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असे केले आणि त्याचा फटका त्यांना नंतरच्या निवडणुकांत कायम बसत राहिला, त्या नेत्याने इतक्या साध्या कारणासाठी- म्हणजे अजितदादा, सुनील तटकरे यांना वाचविण्यासाठी- हे सुरू केले असेल तर ते दुर्दैवी नाही तर काय म्हणायचे?

माध्यमांतील काही जाणकारांच्या मते, असे घडलेले नाहीये. प्रत्यक्षात जे घडले त्याची सुरुवात अगदी साध्या पद्धतीने झाली. औरंगाबाद येथील चार मराठा तरुण एकत्र आले. म्हणाले, ‘‘अरे! कोपर्डीला मराठा मुलीवर अत्यंत निर्घृण पद्धतीने अत्याचार झाला, त्याचे काय करायचे?’’ मग त्यांनी ‘व्हॉट्सअ‍ॅप’ आणि ‘फेसबुक’वर काही निवेदने टाकली. ‘तुम्हाला काय वाटते?’, ‘याचा निषेध झाला पाहिजे की नाही?’, ‘आपण त्यासाठी एकत्र आले पाहिजे की नाही?’ याला प्रतिक्रिया आल्या. अनपेक्षितपणे जोरदार प्रतिक्रिया आल्या. बठका झाल्या. आणि त्यातून मूक मोर्चाचा जन्म झाला. नंतर निद्रिस्त हत्ती जागे व्हावेत तसे झाले. हत्ती लेकराबाळांसकट मूकपणे चालू लागले आणि सगळे अस्वस्थ होऊ लागले. कोपर्डीची घटना हे निमित्त. तिच्यामुळे एका अस्वस्थतेला वाचा फुटली. खरे म्हणजे वाचासुद्धा नाही. शब्द नाहीतच. ते मूकपणे निषेध करू लागले. आपण कशाचा आणि कशासाठी निषेध करत आहोत, हे नीट न समजता ते एकत्र चालू लागले.

मराठय़ांतून नव्याने निर्माण झालेला आणि चलाखपणे नेतृत्वस्थानी आलेला अत्यंत चतुर आणि अतोनात शक्तिशाली असा एक नवा शोषक निर्माण झाला. तो राजकारण करताना जातीय आवाहन करून त्यांच्या मतपेटीचा गठ्ठा बांधतो आणि स्वत:चे स्थान भक्कम करतो. बाकी त्याला या गरीब आणि हलाखीत जगणाऱ्या मराठय़ांशी काहीही देणेघेणे नाहीये.

यानिमित्ताने अनेक गोष्टी मनात येतात. मराठय़ांचे प्रश्न आहेत की नाहीत? ते आहेतच. शंभर वर्षांआधी त्र्यंबक नारायण आत्रे यांनी लिहिलेल्या ‘गावगाडा’ नामक ग्रंथात जे मराठय़ांच्या स्थितीचे विदारक चित्र मांडले आहे त्यात काळानुसार काही बदल झालेले आहेत. पण सामान्य मराठय़ांच्या शोषणाचे जे चित्र त्यांनी मांडले त्यात तपशिलाच्या अंगाने काही बदल झाल्याचे जे आज वाटते, त्यात गुणात्मकदृष्टय़ा काही फरक पडलेला आहे असे मला वाटत नाही. गावगाडय़ातील अलुतेदार-बलुतेदार हे आपल्यासाठी आहेत आणि आपण त्यांचे पोिशदे आहोत, अशी जी पाटलाची आणि कुणब्यांची भावना असे, त्या धारणेत बदल झाला आहे. बाकी लोकांनी काळ बदलला तसे स्वत:ला बदलले. मराठय़ांना ते जमले नाही. कारण- त्यांचा स्वभाव. आपण सगळ्याला जबाबदार. आपण शेतीत बुडालो याला आपणच जबाबदार. आपण चुकलो, आपण जगायला लायक नाही. आपण आपला इहलोकीचा काळ आटोपलेला बरा. आत्महत्या. भोवतालच्या बदलाला आपणच फक्त जबाबदार, दुनियेची काहीच चूक नाही, असे मानणारे हे सुजन भोळसट लोक आहेत. म्हणूनच कुणब्याचे शोषण संपले आहे असे म्हणता येत नाही. त्याला वेगळे आयाम मिळाले आहेत. मराठय़ांच्या तुलनेत इतर समाजघटक किती चलाख असत, हे आत्रे यांनी नमूद करून ठेवलेले आहे. आपल्या अस्तित्वासाठी असे चलाख असणे या घटकांना गरजेचेच होते. त्याविषयी आक्षेप घेता येणार नाही. बदलत्या परिस्थितीत स्वत:ला बदलत या बाकी समाजघटकांनी हुशारीने आपले व्यवसाय आणि त्यांचे स्वरूप बदलत नेले. तेही योग्य आणि स्वाभाविकच. पण मराठा मात्र आहे तिथेच आणि आहे तसाच राहिला. त्यांच्यातून नव्याने निर्माण झालेला आणि चलाखपणे नेतृत्वस्थानी आलेला अत्यंत चतुर आणि अतोनात शक्तिशाली असा एक नवा शोषक निर्माण झाला. तो राजकारण करताना जातीय आवाहन करून त्यांच्या मतपेटीचा गठ्ठा बांधतो आणि स्वत:चे स्थान भक्कम करतो. बाकी त्याला या गरीब आणि हलाखीत जगणाऱ्या मराठय़ांशी काहीही देणेघेणे नाहीये. त्यांनी गरीब मराठय़ांच्या शोषणात प्रचंड भर टाकली. असे शोषक मराठा पुढारी आणि त्यांचे निकटवर्ती, नातेवाईक असा एक वेगळाच नवा डौलदार वर्ग तयार झाला आहे. जुन्या काळातील जहागीरदार वा तत्सम यांच्यापेक्षा हे लोक कैकपटीने शक्तिशाली आहेत. साखर कारखाने आता नामधारी सहकारी राहिले आहेत. पद्मश्री विखे-पाटील यांनी सहकाराचे आणि सहकारातून समृद्धीचे जे स्वप्न पाहिले होते, त्याचा फायदा त्या, त्या ठिकाणी नेतृत्वाच्या स्थानी असलेल्या नेत्यांनी घेऊन स्वत:च्या जहागिरी उभारल्या आहेत. हे लोक आता बेदिक्कत स्वत:चे खासगी कारखाने काढत आहेत. अशाच एका सहकारमहर्षीच्या नातवासमोर मी ही वस्तुस्थिती मांडली असता अत्यंत गुळगुळीत आणि माफक मुलायम, चरबीयुक्त स्वरात ते म्हणाले, ‘‘मग? कारखाने फक्त अंबानी आणि टाटा, गोदरेज यांनी काढायचे? आणि आम्ही मराठा शेतकऱ्यांच्या मुलांनी कायम मातीत राबतच राहायचं असं तुम्हाला म्हणायचंय काय?’’ तिथे त्यांचे चमचे हजर होते. त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. हे फार चलाख, मग्रूर आणि चरबीयुक्त लोक आहेत. आपण मध्यमवर्गीय लोक त्यांच्यावरून समस्त मराठय़ांविषयी कल्पना करतो. सुमारे तीस वर्षांआधी मुंबईत जन्मलेल्या आणि वाढलेल्या ब्राह्मण ज्ञातीतील एका महिलेसोबत मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या दारात गप्पा करत असताना माझ्याकडून माझे मराठा असणे अधोरेखित झाले. त्या म्हणाल्या, ‘‘तुम्ही त्या लोकांसारखे दिसता; पण तुम्ही ते नसाल याची मला खात्री आहे. मराठे तर जुलमी आणि क्रूर लोक असतात ना!’’ यावर काय बोलणार? त्या काळातील शहरी मराठी पांढरपेशा लोकांच्या करमणुकीच्या अपेक्षा ध्यानात घेऊन कथा बेतणारे चलाख ग्रामीण लेखक, तमाशापट केंद्रस्थानी असणारे मराठी सिनेमे, त्यातील पाटील आणि सरपंच यांची बाईबाजी आणि दारूकाम यांनी त्यांच्या मनातील ही प्रतिमा घडवलेली होती. आणि मी तर बहात्तरच्या दुष्काळात गावातल्या सगळ्या लोकांसोबत गावचा पाटीलही दुष्काळी कामावर येताना पाहिलेला होता. त्यात इष्कबाजीला सवड कुठून मिळणार?

मराठा मुलीवर अत्याचार झाला. मराठे रस्त्यावर आले. खैरलांजी प्रकरणी का नाही आले? तिथे फक्त दलितांनी रस्त्यावर यायचे? नेवासा तालुक्यात सोनई इथे भंगी तरुणांचे भीषण हत्याकांड झाले? कोण रस्त्यावर आले? आमच्या पुरोगामी नगर जिल्ह्य़ातील किती नेत्यांनी त्याचा निषेध केला? ज्यांनी त्यांनी फक्त आपली आपली जात बघायची? अत्याचार करणाऱ्याला जात असते का?

बहुसंख्य मराठा आज हलाखीत जगतोय. शेती करणाऱ्या गरीब माळी, धनगर, वंजारी यांच्याइतकाच तोही विस्कटलेले जगतोय. या बाकीच्यांना सवलती आहेत. त्याची स्पर्धा मात्र काहीही विकत घेऊ शकणारे मातब्बर मराठे आणि शिक्षणाची दीर्घ परंपरा असलेले ब्राह्मण वा तत्सम यांच्याशी. तो तिथे कसा टिकाव धरणार? त्याला सवलती मिळाल्याच पाहिजेत. माझा मुलगा बारावीत होता तेव्हा म्हणाला, ‘आपण आपली जात कुणबी करून घेऊ. सगळे करताहेत.’ मी नकार दिला. तो म्हणाला, ‘का? शहाण्णव कुळी आड येते?’ म्हटलं, ‘नाही. यशवंतराव चव्हाणांच्या कृपेमुळे आíथकदृष्टय़ा दुर्बल असण्याची सवलत मी घेतलेली आहे. ती योग्यही होती. पण तू माझा- एका मध्यमवर्गीय प्राध्यापकाचा- मुलगा आहेस. तू स्पध्रेला तोंड दिले पाहिजे. आणि कुलीनत्वाचे काय? तुकोबांचे वंशज आपले- दूरचे का असेना- सोयरे आहेत. त्यांनी ‘बरे झाले देवा कुणबी केलो, नाही तर दंभे असतो मेलो’ असे म्हणून ठेवले आहे. महात्मा फुल्यांनी ‘शूद्र जोतिबा गातो पवाडा शूद्र शिवाजी राजाचा’ म्हटलेय. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या एका ग्रंथात शूद्र ही मुळात एक क्षत्रिय जात होती असे साधार दाखवून दिले आहे.’ मुलाने कुणबी लावून घेण्याचे माघारी घेतले. असो.

मुळात ज्या जातींना सवलती आहेत त्या तरी त्यांच्यातल्या गरीबांपर्यंत कितपत पोहोचतात? सवलती खेचायलासुद्धा हल्ली ताकद लागते. ती गरीबांमध्ये नसते. उदाहरण सांगतो. मी संगणकाच्या दुकानात होतो. तिथे आणखी एक- ज्याचे दहाएक संगणक असलेला धंदा होता, तो दुकानदाराशी बोलत होता. कामाचे बोलून झाल्यावर म्हणाला, ‘‘चला, निघतो. कचेरीत जायचंय. गॅस सििलडर फुकट मिळताहेत. कागदपत्रांची पूर्तता करायचीय.’’ म्हटलं, ‘‘कसं काय?’’ तर म्हणाले, ‘‘पिवळी करड लागतात. माझ्याकडे आहेत तशी.’’ म्हटलं, ‘‘ती तर गरीबांसाठी असतात. तुम्ही तसे नाही आहात. हे अनतिक आहे.’’ तो इतका पोहोचलेला होता, की यावर तो चिडला नाही. म्हणाला, ‘‘तुमच्यासारखा विचार करून चालत नाही. जे मिळण्यासारखं आहे ते मिळवलं पाहिजे. तुम्हाला ते नको असल्यास नका घेऊ. आम्ही घेणार.’’

दलितांसाठीच्या राखीव जागांवर हक्क सांगून येणारे चारचाकीतून उतरतात. गरीब दलित तिथे कुठे पोहोचतो? क्रीमी लेअरमधले क्रीम गरजेपुरते सहज बाजूला करता येते अन् अ‍ॅट्रॉसिटीच्या कायद्याचा गरवापर जास्तकरून मातब्बर लोक दलित तरुणांचे गट पाळून एकमेकांविरुद्ध करत असतात, हेही लक्षात घेतले पाहिजे. मुळात कोपर्डीपासून हे सुरू झाले. मराठा मुलीवर अत्याचार झाला. मराठे रस्त्यावर आले. खैरलांजी प्रकरणी का नाही आले? तिथे फक्त दलितांनी रस्त्यावर यायचे? नेवासा तालुक्यात सोनई इथे भंगी तरुणांचे भीषण हत्याकांड झाले? कोण रस्त्यावर आले? आमच्या पुरोगामी नगर जिल्ह्य़ातील किती नेत्यांनी त्याचा निषेध केला? ज्यांनी त्यांनी फक्त आपली आपली जात बघायची? अत्याचार करणाऱ्याला जात असते का? सोनईप्रकरणी पीडित कुटुंबीयांना छोटी आíथक मदत देण्याचा कार्यक्रम डॉ. दाभोलकरांनी अहमदनगर येथे घेतला होता. मी आणि सदाशिव अमरापूरकर गेलो होतो. तिथे मारल्या गेलेल्याचा धाकटा भाऊ आलेला होता. साडेसहा फूट उंच. हॅण्डसम. फौजी. मुली अशा पुरुषांच्या प्रेमात नाही पडणार तर कोणाच्या? त्या तसे करताना जात थोडीच पाहतात? म्हणालो, हा खरा क्षत्रिय. तो सीमेवर लढतो. अन् इथे आपण त्याच्या भावाचे तुकडे करतो. पूर्वी एकदा राजारामशास्त्री भागवत म्हणाले होते, ‘ब्राह्मणांनो, मराठय़ांचा उरोभंग करून तुम्ही महाराष्ट्र धर्माचे नुकसान करत आहात.’ आज जातवार मोच्रे काढून आपण महाराष्ट्र धर्माचे नुकसान करत आहोत की नाही, याचा विचार सगळ्या जातींसकट मराठय़ांनीही करणे अगत्याचे झाले आहे. पाटील सगळ्या जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन गावगाडा हाकत असतो. गरीब मराठय़ांचे प्रश्न आहेत आणि त्यांची तड ही लागलीच पाहिजे. पण कुठेही कोणावरही अत्याचार झाला तर मराठय़ांनी पुढे आले पाहिजे. त्यातच महाराष्ट्र-धर्माचे भले आहे.

रंगनाथ पठारे rangnathpathare@gmail.com