सहा दशकं अविरतपणे लेखन करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक विजया राज्याध्यक्ष यांची प्रामुख्यानं ओळख आहे ती कथालेखिका आणि समीक्षक म्हणून. १९६५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘अधांतर’ या पहिल्या कथासंग्रहानंतर त्यांचे तब्बल १९ कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. त्यांची कथा प्रामुख्यानं मध्यमवर्गीय परिवेषातलं स्त्रीजीवन चित्रित करण्यावर भर देते. हे वैशिष्टय़ सांगण्याचं कारण- त्यांचं ‘तीन प्रहर’ हे पुस्तक.. ज्यात दोन लघु-कादंबऱ्या आहेत. ‘बंदिश’ आणि ‘आयुष्य : पहिलं की तिसरं?’ सातत्यानं साठ र्वष कथा- आणि त्यातही प्रामुख्यानं स्त्रीकेंद्रित कथालेखनानंतर ‘बंदिश’ ही त्यांची पहिलीच कादंबरी मात्र पुरुषकेंद्रित आहे.
विष्णू लिमये हा मध्यमवर्गीय घरातला मुलगा. वडिलांचा स्वभाव हट्टी. मुलांची त्यांच्यापुढे मान वर करून बोलायची टाप नाही. विष्णूचा ओढा शास्त्रीय संगीताकडे आहे. तो गाण्याच्या क्लासला जातो तेही आईच्या संमतीनं; पण वडिलांच्या नकळत. जेव्हा त्यांना हे कळतं, तेव्हा ते ‘‘गाणं चालू ठेवायचं असेल तर कॉलेज शिकता येणार नाही. आणि जे काही करायचं ते स्वत:च्या कमाईतून..’’ असा दम देतात. पुन्हा आई पाठीशी उभी राहते आणि त्याला गाणं सुरू ठेवायचा सल्ला देते. बाबांचे मित्र शामकाका त्याला मदतीचा हात पुढे करतात. स्वत:च्या घरी घेऊन जातात. त्याचं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला गाणं शिकण्यासाठी दुसऱ्या ज्येष्ठ गुरूंकडे घेऊन जातात. हे गुरू संगीत क्षेत्रात अत्यंत नामवंत असले तरी अतिशय अहंकारी.. शिष्यांवर हुकमत गाजवणारे! विष्णूची गाण्यात प्रगती होत असली तरी गुरूच्या विक्षिप्तपणाचा त्याला त्रास होत राहतो. मोठय़ा वृक्षाखाली आपली वाढ होणार नाही, हे त्याला जाणवत राहतं. पण या वृक्षाची छाया सोडण्याची हिंमत पुन्हा एकदा त्याचे शामकाकाच त्याला देतात. गुरूंचा निरोप घेताना मनात अस्वस्थता दाटून आलेली. आपण ज्या गुरूकडून ज्ञान घेतलं ते परत भेटणार नाहीत- ही कल्पना विष्णूला विषण्ण करणारी असते. पण त्याशिवाय पर्याय नसतो. विष्णूला स्वतंत्र कार्यक्रम, यश, कीर्ती मिळत जाते. दुसऱ्या गुरूंकडून विद्या प्राप्त होते. प्रगतीचा आलेख उंचावत असताना कौटुंबिक आयुष्यही बहरत असतं. त्याला साथ देणारी पत्नी भेटते. मुलगा होतो. वडिलांच्या अखेरच्या दिवसांत त्यांना आपली चूक कळते आणि त्या नात्यातला दुरावाही मिटतो. र्वष सरतात. विष्णू लिमये मोठे गायक म्हणून प्रसिद्ध होतात. त्यांचा शिष्यवर्ग वाढत जातो. पहिल्या गुरूंनी मात्र आपलं हे स्थान मान्य केलेलं नाही, ही भावना त्यांना छळत राहते. अखेर त्यांच्या शिष्यांचा एक कार्यक्रम त्यांची पत्नी घडवून आणते. त्यानंतर विष्णू गायला बसणार तोच समोरून गुरू येताना दिसतात. त्यांचा आशीर्वाद मिळतो आणि सारं काही मिळवल्यासारखं वाटून जातं. शांत. निरामय. शास्त्रीय संगीताच्या ध्यासानं पुष्कळ सोसल्यानंतर मिळणारं हे समाधान! ‘‘आयुष्य सपाट कधीच नसतं. त्यात चढ-उतार असणारच. आरोह आणि अवरोह. पण दोन्ही मिळूनच आयुष्याची बंदिश तयार होते नं!’’
याच पुस्तकातली दुसरी लघुकादंबरी म्हणजे ‘आयुष्य : पहिलं की तिसरं?’! वामनराव हे साठीच्या आसपासचे विधुर. त्यांच्यावर प्रेम करणारा मुलगा, सून, नातवंडं सगळे घरात असूनही एकटेपणा त्यांना सतावतोय. दिवसेंदिवस ते एकाकी होत जातात. मन कुठेच रमत नाही. सोबतीची आत्यंतिक निकड भासू लागल्यावर पुनर्विवाहाचा विचार त्यांच्या मनात घोळू लागतो. कुठलाही आडपडदा न ठेवता ते मुलगा-सुनेच्या समोर तो मांडतात. मुलगा-सून दोघंही समजूतदार. आईच्या आठवणी ताज्या असतानाही ते वडिलांची भावनिक गरज समजून या प्रस्तावाला होकार देतात. एवढंच नाही, तर वामनरावांच्या मित्राच्या मदतीनं वडिलांना सुयोग्य जोडीदार मिळवून देण्यासाठी प्रयत्नही करतात. लवकरच तो शोध संपतो. कोकणातली एक विधवा स्त्री वामनरावांशी लग्न करायला तयार होते.
लग्नानंतरही मुलगा-सून वडिलांच्या या नव्या बायकोचं चांगलं स्वागत करतात. त्या दोघांचं सहजीवन फुलण्यासाठी त्यांना पुरेसा एकांत देतात. त्यांना नाटक-सिनेमाला जाण्यासाठी उत्तेजन देतात. आपल्या मुलांना सांगतात, की या नव्या आजीशी गप्पा मारा. पण ही नवी बायको घरात आपलेपणानं वावरत नाही. ती, तिची खोली, तिचं वाचन यातच मग्न राहते. तिच्या पूर्वायुष्यात तिला न मिळालेल्या गोष्टी तिला भरपूर कराव्याशा वाटतात. टॅक्सीनं फिरावं, नाटकं बघावीत, खरेदी करावी, हॉटेलमध्ये जेवावं- एवढंच ती करू बघते. घरातली कामं, जबाबदाऱ्या उचलत नाही. साधा चहादेखील करत नाही. सुनेला हे वागणं खटकतं. पण सासऱ्यांच्या सुखासाठी ती गप्प राहते. वामनराव आजारी पडले तरी ती त्यांची सेवा करत नाही. तिच्या पहिल्या नवऱ्याची शुश्रूषा करून, संसाराच्या खस्ता खाऊन ती त्रासलेली आहे. आता या संसारात तिला पुन्हा गुंतायचं नाहीए. तिचा तो कोरडेपणा हळूहळू सर्वानाच खटकू लागतो.
अचानक ती सामानाची बांधाबांध करू लागते. आधीच्या संसारातले दागदागिने आपल्या मुलाला पाठवून देते आणि तिच्या मत्रिणीबरोबर घराबाहेर पडते. ‘‘माझ्या पहिल्या संसारात माझ्या सगळ्या हौशीमौजी अपुऱ्या राहिल्या. नवऱ्याची सेवा आणि संसाराचे कष्ट यातच गुरफटून गेले. वाटलं होतं, या संसारात सगळ्या हौशी पुरवून घेईन. असं हौसेनं जगणं मी मनात दडपलं होतं. ते दडपण संपलं. पण खरं म्हणजे त्या दडपणाखाली मी नव्हतेच. मला आता असं आयुष्य हवं आहे- जिथे कुणी कुणाचं नाही..’’ असं बोलून ती वृद्धाश्रमात निघून जाते. तिचं तिसरं आयुष्य सुरू करण्यासाठी!
इकडे वामनरावांचं जुनं आयुष्य पुन्हा सुरू होतं. त्यांचा मित्र त्यांची समजूत घालताना म्हणतो, ‘‘जगता जगता आयुष्याचं तत्त्वज्ञान तयार होत जातं. आयुष्य एका सरळ रेषेत कधीच जगता येत नाही. वळणं येत राहतातच. पहिलं, दुसरं, तिसरं..’’
वामनरावांच्या नव्या बायकोनं तिचं तिसरं आयुष्य सुरू केलं असलं तरी वामनराव अजून पहिल्याच वळणावर उभे आहेत. तिसऱ्या प्रहरातली उन्हाची तिरीप खोलीत येत होती. वामनरावांनी पडदा सरकवून घेतला आणि डोळे मिटून शांत बसून राहिले.
दोन्ही लघुकादंबऱ्यांची ही कथाबीजं. दोन्ही कादंबऱ्या मुंबईत घडतात. मध्यमवर्गीय घरांत घडतात. पण दोन्ही मुख्यत्वेकरून फिरतात त्या प्रमुख पात्रांभोवतीच. यात उपकथानकं नाहीत. विशिष्ट काळाचे उल्लेख नाहीत. एखाद्या सिनेमाचं नाव टाकल्यामुळे थोडा अंदाज बांधता येतो, एवढंच. विजयाबाईंच्या कथेतही हे प्रकर्षांनं जाणवतं. विशिष्ट कालखंडांतल्या प्रश्नांपेक्षा जन्म आणि मृत्यू या टोकातल्या जीवनाचं प्रयोजन, स्त्री-पुरुष, आई-मूल, पती-पत्नी अशी कौटुंबिक नाती आणि त्यांनी आयुष्याला दिलेला अर्थ यांचा परोपरीनं वेध घेणारी त्यांची कथा विशिष्ट मूल्यभाव व्यक्त करते. कादंबरीतही त्यांची तीच शैली डोकावत राहते.
‘तीन प्रहर’- विजया राजाध्यक्ष,
राजेंद्र प्रकाशन, पृष्ठे- १७३, किंमत- १७० रुपये.
नीलिमा बोरवणकर  – Borwankar.neelima@gmail.com