प्रभुराम जयराम जोशी अर्थात पीजे सर.. एक विद्यार्थीप्रिय आदर्श शिक्षक म्हणून सर सर्वपरिचित. तेवीस वष्रे मुंबईच्या रामनारायण रुईया कॉलेज आणि पोदार कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते. या अध्यापकी पेशाच्या प्रदीर्घ कालखंडात त्यांचे अनेक विद्यार्थ्यांशी अतिशय जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले. इतके, की आजही त्यांचे अनेक विद्यार्थी ‘पीजे सर’ म्हणून त्यांचा उल्लेख मोठय़ा आदराने आणि प्रेमाने करतात. त्यांच्याविषयी भरभरून बोलतात. अशा पीजे सरांच्या पत्नीने- मृदुला जोशी यांनी त्यांच्यावर ‘प्रभुराम जयराम’ हा स्मरणग्रंथ प्रसिद्ध केला आहे. सरांचे विद्यार्थी, मित्रवर्य, सहकारी या नात्याने अनेक सुहृदांचे लेख या पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यात रामदास भटकळ, अनंत भावे, रत्नाकर मतकरी, राधाकृष्ण नार्वेकर, मुकुंद भागवत आणि स्वत: मृदुला जोशी आदी मान्यवरांच्या लेखांचा समावेश आहे.
या पुस्तकातून प्रभुराम जोशी यांच्या व्य्क्तिमत्त्वातील कुटुंबवत्सल गृहस्थ, आदर्श गुरू, उत्तम सहकारी अशा विविध पैलूंचे दर्शन घडते. शिक्षक कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे पीजेसर असेच म्हणावे लागेल. आपल्या प्रेमळ, सुसंस्कृत व सुस्वभावी वर्तनाने स्वत:भोवती माणसांचा मोठा गोतावळा निर्माण करणारे जोशीसर एक व्यक्ती म्हणूनही वाचकाला भावतात. या पुस्तकात प्रभुराम जोशी यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचं यथार्थ दर्शन घडतं. विशेषत: शिक्षक कसा असावा, याबाबतचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला. त्यांचा आदर्श जर पिढी घडवणाऱ्या शिक्षकांनी आपल्यासमोर ठेवला तर उद्याच्या पिढीबद्दल तक्रार करायला जागा उरणार नाही.
‘प्रभुराम जयराम’, संपादक- मृदुला प्रभुराम जोशी, विश्वसखा प्रकाशन,
पृष्ठे- १९८, किंमत- २०० रुपये. ठ