मिस्त्री त्या आळीत एकटाच राहत होता. सर्वाच्या घरातील छोटय़ा-मोठय़ा दुरुस्तीची कामे तो करीत असे. ती स्त्रीदेखील त्याच आळीत राहात होती. ती विधवा होती. एका कसल्याशा घटनेनंतर आळीत नेहमीप्रमाणे संशयाचे वादंग सुरू झाले. काही लोक या बाजूला, काही त्या बाजूला. त्यातून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. मिस्त्री मुस्लीम असल्यामुळे त्याला काही लोक वाचवत असल्याचेही कोणीतरी बोलले. वादाने एकदम वेगळेच वळण घेतले. मिस्त्रीला त्या रात्री झोपच लागली नाही. ती अशी अनेक रात्री नंतर लागलीच नाही. अखेर मिस्त्री ती आळीच सोडून गेला. एखाद्या आपल्याच आळीत तो गेला..
हिंदी साहित्यातील ज्येष्ठ कथालेखक रघुनंदन त्रिवेदी यांच्या ‘आपली माणसं’ या कथेतचा हा आशय.. वरवर साधं वाटणारं हे कथानक, पण त्याच्या अंतरंगात डोकावलं की किडलेल्या समाजमनाचं भयाण वास्तव वाचकांसमोर येतं. विशेष म्हणजे हे कथानक वाचताना वाचकही अस्वस्थ होतो. अत्यंत साधी आणि नेहमीची वाटणारी ही घटना लेखकानेही अगदी साध्या पद्धतीने कथेत मांडली आहे. पण या छोटय़ाशा घटनेतून त्यांनी समाजव्यवस्थेवर मार्मिक भाष्य केले आहे. या कथेतील लोक कसा विचार करतात, त्यांच्या छोटय़ा छोटय़ा संवादातून त्यांनी समाजाची मानसिकता प्रभावीपणे मांडली आहे.
‘रघुनंदन त्रिवेदी यांच्या कथा’ या अनुवादित पुस्तकात एकूण २१ कथा आहेत. मूळ हिंदीतील या कथा जयप्रकाश सावंत यांनी अनुवादित केल्या आहेत. यातील सर्वच कथा वैविध्यपूर्ण असून, समाज मात्र एकच आहे. त्रिवेदींनी या कथांमधून मध्यमवर्गीय समाजाचे प्रश्न, त्यांच्या समस्या, अडचणी मांडताना अनेक सामाजिक मुद्दय़ांना स्पर्श केला आहे. सर्वच कथा वाचकाला काहीतरी सांगू पाहतात.. वाचकाच्या मनात विचारांचे वादळ निर्माण करतात. वाचकाने त्यातून काय घ्यावं, कसा विचार करावा, ही जबाबदारी मात्र ते वाचकावरच सोडून देतात, हा या कथांचा विशेष म्हणावा लागेल. या कथांमधून त्रिवेदी समाजातील अनेक गंभीर मुद्दय़ांना स्पर्श करतात. वरकरणी सहज, सोप्या वाटणाऱ्या या कथा वाचकाला अंतर्मुख करतात.
त्रिवेदींच्या कथांचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे या कथा मध्यमवर्गीय समाजाविषयी असल्या तरी कथांच्या मांडणीत, आशयामध्ये एकारलेपण येत नाही. प्रत्येक कथा मध्यमवर्गीयांच्या विविध गुण-दुर्गुणांना स्पर्श करतात. वास्तवावर नेमके बोट ठेवतात.
‘अनपेक्षित’ या कथेत त्यांनी गरीब-श्रीमंत याविषयी माध्यमवर्गीय समाजमन कसं कोत्या वृत्तीने विचार करतं, हे नेमकेपणानं सांगितलं आहे. या कथेत मोलकरणीचा मुलगा जगदीश कथानायकाच्याच शाळेत असतो. तो मोलकरणीचा मुलगा म्हणून शाळेतील मुलं त्याला आपल्यापासून दूर ठेवतात. त्यामुळे कथानायकही त्याला आपल्यापासून लांब ठेवतो. मधल्या काळात जगदीश आणि त्याची आई यांचा कथानायकाशी कोणताच संपर्क राहात नाही. कालांतराने तो जेव्हा कथानायकाला भेटतो तेव्हा जगदीश टेलिफोन निगमचा अधिकारी झालेला असतो. त्या भेटीत त्याने समकक्ष व्यक्तीसारखे हात मिळवणे कथानायकाला अस्वस्थ करते. तो आपला मित्र होता का? त्याने असा हात का मिळवला, की ते हात मिळवणेच त्याला अस्वस्थ करून गेले.. समाजाच्या अनेक स्तरांतील हा एक प्रश्न त्रिवेदींनी अगदी लहानशा कथेतूनही उत्तम मांडला आहे. कधी ना कधी अनेकांच्या मनात येणारी ही भावना त्यांनी अचूक टिपली आहे.
चेतरामची कथाही असेच काहीतरी सांगते. चेतराम हा शिपाई साहेबांची सर्वच कामे करतो. त्यांच्या घरच्या लग्नात वरातीपासून सगळ्याच कामात चेतराम आहे. आपल्या आजारी मुलाचं आजारपण विसरून तो कामं करतोय. पण शेवटी वरात निघण्याच्या वेळीच साहेब त्याला त्याच्या जातीची आठवण करून देतो. तुझी जात कोणाला कळली तर लग्नात गोंधळ व्हायला नको म्हणून तू येऊ नकोस, असे साहेब त्याला समजावून सांगतो. तेव्हा मात्र चेतराम विषण्ण होऊन वरातीच्या बसकडे पाहत रहातो.
‘रामराव झाडी पार करतील एक दिवस’ या कथेत झाडी हे एक पात्र आहे. ते परिस्थितीनुसार बदलते आणि कथाविषयाला पुढे नेते. ‘वर्गचरित्र’मध्ये माधवकांतांना पावलोपावली भीती जाणवते. स्वत:ची, कुटुंबाची.. अगदी प्रत्येक सामान्य माणसाला जाणवणारी ही भीती त्रिवेदी प्रभावीपणे मांडतात. ‘ती मुलगी अजुनी जिवंत आहे’ या कथेत एका तरुणाच्या मनातील मुलीचे वर्णन केले आहे. ही कथा एकदम वेगळ्याच धाटणीची आहे. तरुणपणीच्या तरल भावना ते निवृत्तीपर्यंत मनात जपलेली ‘ती’ची प्रतिमा.. अखेर आपल्या मुलाच्या खोलीत त्याला ‘ती’ दिसते- हा शेवट खूपच सुंदर!
त्रिवेदींच्या सर्वच कथा वाचकाला खोलवर विचार करायला प्रवृत्त करतात. त्रिवेदींच्या कथांमध्ये माणसांच्या विविध स्वभावांचे दर्शन घडते. समाजातील प्रत्येकाच्या मनातील प्रश्न या कथांमधून डोकावतात. समाजातील अनेक अनुत्तरीत प्रश्नांची मांडणी ते करतात. माणसांचे हे स्वभाव, घटना प्रमुख पात्रांची भूमिका वठवतात. या कथांना कोणतीही ठरावीक चौकट नाही. प्रत्येक कथा सहजपणे समाजातील वास्तव सांगून जाते.
‘रघुनंद त्रिवेदी हे एक अद्भुत कथालेखक आहेत,’ असा त्रिवेदी यांचा उल्लेख हिंदूीतील ज्येष्ठ लेखक
उदय प्रकाश करतात. यापूर्वी त्रिवेदींच्या कथा कन्नड, उर्दू, इंग्रजीत अनुवादित झाल्या आहेत. जयप्रकाश सावंत यांचा अनुवादही वाचकांना गुंतवून ठेवतो. त्यामुळे त्या स्वतंत्र कलाकृतीसारख्या वाटतात.

‘रघुनंदन त्रिवेदी यांच्या कथा’
अनुवाद – जयप्रकाश सावंत
प्रकाशक – लोकवाङ्मयगृह
पृष्ठे- १७५, किंमत – २०० रुपये.

जयवंत चव्हाण
jaywant.chavan@expressindia.com