उठता-बसता तुक्याचे अभंग गाणाऱ्यांपैकी अनेकांना त्यातील खरा अर्थ लक्षात आला आहे काय? प्रश्नच आहे. खरा अर्थ टाळून मंडळी तुकारामांना भेटतात याचा अर्थ उघड आहे- त्यात मोठा घोटाळा आहे. तो नेमका काय आहे, हे जाणून घेतानाच तुकारामांच्या अभंगांतील अर्थाला आजच्या काळाच्या संदर्भात भिडण्याचा प्रयत्न म्हणजे हे पाक्षिक सदर..

संत तुकाराम यांच्या दोन प्रतिमा आहेत. एक लोकप्रिय. समाजमनात ठसलेली. त्यातले तुकाराम म्हणजे भोळेभाबडे, व्यवहारशून्य आणि त्यामुळेच परिस्थितीने गांजलेले. तशात बायको कजाग कर्कशा. ती प्रत्यक्ष विठ्ठलालाही शिव्या घालते म्हटल्यावर तुकोबांची काय पत्रास? त्यामुळे घर सोडून रानोमाळ, भंडाऱ्यावर वगैरे जाऊन अभंग म्हणत बसणारे. त्यांच्या कविता मात्र उत्तम. आजही वृत्तपत्रांत अग्रलेखाचे मथळे बनण्याची तिची पात्रता! तर त्यामुळे तुकाराम प्रसिद्धीस पावले. अशा संतांच्या आयुष्यात एक तरी चमत्कार असावाच लागतो. नमस्कारासाठी त्यांना ती अर्हता प्राप्त करावीच लागते. त्यामुळे ‘दाऊ नेणे जडीबुटी। चमत्कार उठाउठी।।’ म्हणणाऱ्या तुकोबांच्या जीवनातही दोन-तीन चमत्कार टाकण्यात आलेच. वह्यंचा, सदेह वैकुंठगमनाचा. ज्ञानोबांनी रेडय़ामुखी वेद वदवून, वेद तर काय रेडाही घोकू शकतो, हे दाखवून दिले. तुकोबांनी गाईचे वळ आपल्या अंगावर घेतले. चित्रपटांत असे चमत्कार नक्कीच टाळ्या घेतात. अशा चित्रपटांनी, कादंबऱ्यांनी आणि गल्लाभरू कथेकऱ्यांनी निर्माण केलेली ही तुकारामांची एक प्रतिमा.
त्यांची दुसरी प्रतिमा आहे, ती मात्र नेमकी याच्या उलट आहे. त्या प्रतिमेतील तुकाराम भोळाभाबडा नाही. परिस्थितीने गांजलेला आहे, खटनाठाळांमुळे त्रासलेला आहे, प्रपंचातून मन उडालेला आहे; पण तो हरलेला नाही. सत्यासाठी हिमतीने उभा राहणारा असा तो उंच सुळका आहे. त्या काळात सामाजिक दंभ आणि छळवादी पुरोहितशाही याविरोधात नैतिक बंड करायचे तर माणूसही तेवढय़ाच ताकदीचा हवा. तुकोबा तसा ताकदीचा पाईक आहे. ‘उजळावया आलो वाटा। खरा खोटा निवाडा।।’ असा आत्मविश्वास पेलणे हे येरागबाळ्यांचे काम नोहे. तुकोबांमध्ये ते आत्मबळ आहे. ‘आम्ही झालों गांवगुंड। अवघ्या पुंड भूतांसी।।’ असा त्यांचा लढाऊ बाणा आहे. आणि ‘मीचि मज व्यालों। पोटा आपुलिया आलों।।’ अशी मुक्तीची स्थिती आहे. ‘शब्दाचीच रत्ने’ आणि ‘शस्त्रे’ असलेल्या गाथेतील अभंगांतून आपल्यासमोर येते ती ही प्रतिमा. तुकोबांच्या कवितांची अनेक वैशिष्टय़े समीक्षक मंडळी सांगतील. पण त्यातील एक वैशिशष्टय़ मोठे वेधक आहे. ते असे की, या सगळ्या कविता एकत्र केल्या, त्यातील बिंदू जोडले की तुकोबांचे एक मोठेच्या मोठे चरित्रचित्र आपल्यासमोर उभे राहते. तुकोबा म्हणतात, ‘अनुभवे आले अंगा। ते या जगा देतसे।।’ तेव्हा गाथा हे तुकोबांचे आत्मचरित्रच जणू. बरे, तुकाराम म्हणजे निवृत्तीनंतर प्रकाशकाकडून भरपूर पैसे घेऊन आत्मचरित्र लिहिणारे सनदी अधिकारी नसल्याने त्यांच्या आत्मचरित्रावर विश्वास ठेवण्यास हरकत असायचे कारण नाही.
पण ‘तुका आकाशाएवढा’ म्हणता म्हणता आपण त्यांची ही प्रतिमा नेहमीच डोळ्यांआड केली. तुकोबा नावाचे हे आकाश दिठीच्या चिमटीत न मावणारे आहे हे खरे. पण त्याचा जो तुकडा आपणास दिसला तोही नेमका असा वेडावाकुडाच का असावा? तुकोबाला भोळाभाबडा, रंजलेला, गांजलेला संत म्हणून उभा करण्यातून आपण त्यांच्या गाथेवरच अन्याय करीत आहोत, हे आपल्या लक्षात कसे आले नाही? की जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले? बहुधा तसेच असावे. अन्यथा उठता-बसता तुक्याचे अभंग गाणाऱ्यांतील अनेकांना त्यातील खरा अर्थ लक्षात आल्याशिवाय राहिला असता काय? तो टाळून मंडळी तुकारामांना भेटतात, याचा अर्थ उघड आहे. त्यात मोठा घोटाळा आहे. तो नेमका काय आहे, हे जाणून घेतानाच तुकारामांच्या अभंगांतील अर्थाला आजच्या काळाच्या संदर्भात भिडण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणजे हे सदर. आता प्रश्न असा येतो की, हे करण्याची आवश्यकता काय? तुकारामांनी त्यांच्या अभंगांतून त्यांचे जे चरित्र मांडले, त्यातून जे पाठ दिले, त्याच्या अर्थाशी भिडून आजच्या काळात आपण काय कमावणार आहोत? याचे उत्तर तुकारामांचे आपल्या समाजातील जे स्थान आहे त्यामध्ये दडलेले आहे.
पंढरीच्या वारीचा ‘इव्हेन्ट’ आणि तुकारामांच्या वा अन्य सर्वच संतांच्या पालख्यांचा ‘सोहळा’ करण्याच्या नादात आपण हे विसरूनच गेलो आहोत, की गेल्या सुमारे आठशे वर्षांपासून महाराष्ट्र समाज-संस्कृतीची पालखी हे संत वाहत आहेत. ‘संताळ्यां’नी परमार्थाच्या नादी लागून महाराष्ट्राला पंगू करून टाकले, असे इतिहासाचार्य राजवाडे यांनी कितीही म्हटले असले तरी एक गोष्ट आता सर्वानाच समजून चुकली आहे. ती ही, की तेराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून महाराष्ट्राच्या पाचवीला पुजलेल्या अंदाधुंदीतून समाजाची व्यवस्था लावून देणे, या महत्त्वाच्या सामाजिक कार्यात संतांचा थोरला वाटा आहे. महाराष्ट्रातील भागवत धर्मातील संतांच्या या इमारतीचा कळस म्हणजे तुकाराम. त्यांनी त्यांच्या सुमारे साडेचार हजार अभंगांतून, कवितांतून सामाजिक नैतिकतेचा, बंडखोरीचा जो आदर्श घालून दिला आहे त्यावर आजही मराठी समाज-संस्कृतीचा गाडा चाललेला आहे. साध्या रोजच्या व्यवहारातील बोलीभाषेचा वापर करून त्यांनी रचलेले हे काव्य. ते आजही सर्वसामान्यांच्या नैतिक आधाराच्या कामी येते. एक चांगला माणूस म्हणून जगण्यासाठी कसे वागावे, कसे बोलावे, हे ते सांगते. ही शिकवण जेवढी पारमार्थिक आहे, ‘धर्माचा व्यवहार’ उलगडून दाखविणारी आहे, तेवढीच ती रोकडी व्यावहारिकही आहे. आणि म्हणूनच तिच्या मूल्यात कणमात्र घसारा झालेला नाही. ते सतराव्या शतकात जेवढे होते, तेवढेच आजही आहे.
‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग।
अंतर्बा जग आणि मन।।’
हा त्याच काळातील संघर्ष होता असे नव्हे, तर तो आजही आहे.
‘वर्ण अभिमाने कोण जाले पावन।
ऐसे द्या सांगून मजपाशी।।’
हा प्रश्न त्याच काळातील होता असे नव्हे. तो आजही आहे. फरक असेल तर कदाचित एवढाच, की आजच्या काळात हे असे प्रश्न अधिक गडद झाले आहेत. संत तुकारामांचे ‘गाथाकृत चरित्र’ समजून घेत त्यांच्या या शिकवणीचा ऊहापोह आपण येथे करणार आहोत. त्याने ‘जेथे जातो तेथे पडतो मतोळा’ (घोटाळा) ही माहिती-तंत्रज्ञानयुगजन्य समस्या दूर होण्यासही कदाचित सा होईल. तुकाराम तेवढे ‘अप् टू डेट’ नक्कीच आहेत.
तुलसी आंबिले – tulsi.ambile@gmail.com

Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Why MHADA will not build houses in high income group
म्हाडाकडून यापुढे उच्च उत्पन्न गटातील घरांची निर्मिती नाही?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Tipeshwar Sanctuary
VIDEO : टिपेश्वर अभयारण्यात वाघच नाही, तर रानकुत्र्यांसह ‘या’ वन्यप्राण्यांना पर्यटकांची पसंती