‘कंबोडिया ते कॅनडा – सफर आगळ्यावेगळ्या देशांची’ हे पुष्पा जोशी यांचे नवे पुस्तक. या पुस्तकाच्या शीर्षकात सांगितल्याप्रमाणे हे लेखन खरोखरच आगळ्यावेगळ्या देशांच्या आगळ्यावेगळ्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे आहे. यात कंबोडिया, व्हिएतनाम, भूतान, जॉर्डन, इस्रायल, ग्रीस, रशिया, केनिया, स्पेन, कॅनडा आदी देशांचा समावेश आहे. सोळा लेखांचा अंतर्भाव असलेले हे प्रवासवर्णन या देशांची, तेथील संस्कृती, जीवनपद्धती, कला आदी बाबींची रोचक माहिती देते. यात कंबोडियातील शिल्पकलेबद्दल जशी विस्ताराने माहिती येते तसेच व्हिएतनामच्या युद्धाविषयी, तिथल्या पपेट शोविषयीही वर्णन येते. याशिवाय भूतानमधील बौद्ध संस्कृती, जॉर्डनमधील मृत समुद्र, ग्रीसमधील अ‍ॅक्रोपोलिस टेकडी, टांझानियातील गोरोंगोरो क्रेटर आदींची सुरेख वर्णनंही वाचायला मिळतात. याचबरोबर रशियातील मॉस्को, पीटर्सबर्ग या शहरांविषयी दोन स्वतंत्र प्रकरणे यात आहेत. इस्रायलवरील लेखात एक देश म्हणून झालेली इस्रायलची वाटचाल, जेरुसलेम या शहराचा सामाजिक- सांस्कृतिक इतिहास यांचे साद्यंत वर्णन येते. अशा प्रकारे रूढ प्रवासवर्णनांच्या पलीकडे जात त्या त्या देशांची वैशिष्टय़े, तेथील संस्कृती यांच्या इतिहासाबरोबरच आजच्या काळाचेही संदर्भ ध्यानात घेऊन केलेले हे लेखन वाचकांना अनोखी सफर घडवून आणते.

 ‘कंबोडिया ते कॅनडा –

 सफर आगळ्यावेगळ्या देशांची’

– पुष्पा जोशी,

पृष्ठे – १४८, मूल्य – १७५ रुपये  


लक्ष्मण लोंढे यांना शब्दांजली

विज्ञानकथा लेखक म्हणून लक्ष्मण लोंढे यांचे नाव सर्वाना परिचित आहे. युनिव्हर्सिटी ऑफ कॉमन्सतर्फे प्रकाशित झालेल्या जगातील सवरेत्कृष्ट विज्ञानकथांच्या संग्रहात लोंढे यांच्या ‘दुसरा आइनस्टाइन’ या कथेचा अंतर्भाव झाला होता. या संग्रहात समाविष्ट झालेली ही एकमेव भारतीय कथा होती. याशिवाय ‘देवांसि जिवे मारिले’, ‘असं घडलंच नाही’, ‘लक्ष्मणझुला’ यांसारखी त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. गेल्या वर्षी त्यांचे निधन झाले. यंदा त्यांच्या प्रथम स्मृतिदिनी त्यांना आदरांजली वाहणारे ‘ओंजळभर..’ हे स्वाती लोंढे यांनी संपादित केलेले पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. लक्ष्मण लोंढे यांना आदरांजली वाहणाऱ्या लेखांचा संग्रह असे या पुस्तकाचे स्वरूप आहे. तरीही या लेखांतून लेखक म्हणून लक्ष्मण लोंढे यांचे मोठेपण जसे कळते तसेच त्यांच्यातील माणसाचेही दर्शन होते. यात लोंढे यांच्या सुहृदांनी त्यांच्या आठवणी जागवल्या आहेत. या आठवणींतून लोंढे यांच्या लाघवी व्यक्तिमत्त्वाची ओळख होते. याशिवाय विज्ञानकथा लेखक म्हणून त्यांचे वेगळेपणही अधोरेखित होते. या लेखांबरोबरच या पुस्तकात लोंढे यांच्या कविता, त्यांनी काढलेली काही चित्रे, रेखाचित्रे यांचाही समावेश करण्यात आला आहे. लोंढे यांना शब्दांजली वाहणारा स्मृतिग्रंथ हा अल्पसा प्रयत्न असला तरी तो होणे आवश्यक होता आणि या पुस्तकाने तो यशस्वीरीत्या साध्य झाला आहे.

 ‘ओंजळभर..’ (साहित्यिक लक्ष्मण लोंढे स्मृतीग्रंथ )

संपादन – स्वाती लोंढे

पृष्ठे – १२०