Untitled-9कविवर्य विंदा करंदीकर यांच्या वयास ७५ वर्षे पूर्ण झाली तेव्हा प्रसिद्ध केलेला हा लेख. विंदा करंदीकर, मंगेश पाडगांवकर आणि वसंत बापट हे तिघे कवी एकमेकांचे अगदी चांगले मित्र. आपल्या मित्राच्या- विंदांच्या पंचाहत्तरीनिमित्त त्यांच्याविषयी वसंत बापट यांनी मंगेश पाडगांवकर यांना लिहिलेले आगळेवेगळे पत्र..
प्रिय मंगेश,
पाहता पाहता आपला अफलातून मित्र ७५ वर्षांचा झाला. आपले स्नेहबंध जुळले त्याला साडेतीन तपं उलटून गेली. काव्यदर्शन ४२ वर्षांचं झालं. आयुष्यात गंमत नसली की काळ किती कंटाळवाण्या गतीने चालत असतो! पण एखाद्या आनंदयात्रेसारखं आपलं जीवन अधीर आणि नाचऱ्या पावलांचं असलं की काळदेखील भुर्रकन् उडून जात असल्यासारखा वाटतो! आयुष्यात कोणाच्या बैठकी जमतात, कोणाच्या मैफली रंगतात. पण आपल्या तिघांच्या आयुष्याचा तिपेडी गोफ हसतखेळत कसा विणला गेला, हे आपले आपल्यालाच जिथे कळले नाही, तिथे इतरांना ते कसे कळावे? तिघांच्याही जीवनाचे पूर्वरंग वेगळे, दिशा वेगळ्या, राहणीमानाविषयी कल्पना वेगळ्या. अने लाइफस्टाईल तो तद्दन जुदी जुदी! मैत्री गाढ असली की आदराचे बोलणे अशक्यच! त्यातून करंदीकर कोकण्या. वाक्यांचे आरंभ ‘रांडिच्या’ आणि ‘शिंदळीच्या’ असे करावे याचे बाळकडू पहिल्यापासूनच तो प्यालेला! पण कोणाला कोणाविषयी अनादरही नाही. आदर आणि अनादर यांच्या पलीकडची आणि तरीही मुळीच कोरडी नसलेली आपल्यामधील मैत्री ही एक अचंबा करण्याजोगी गोष्ट आहे.
पुण्याच्या साहित्य संमेलनात आपण तिघेही कवी या भूमिकेवरून समाजापुढे आलो. त्यावेळचे आपले अवतार आठवले की आजही गालातल्या गालात हसू येते. मी त्याकाळी धोतर नेसणारा खादीधारी होतो. तुरुंगातून सुटून आलेला असल्यामुळे आपल्या मस्तकामागे सुदर्शन चक्रासारखे एक वलय ऐटीत फिरते आहे अशा भ्रमात होतो. बहुधा त्यामुळेच तू मला शिष्ट ठरवले होतेस. शिवाय घाटे-बोरकर यांचा तू लाडका पोर- कवी होतास. त्यामुळे तूही वेगळ्या तऱ्हेने शेफारला होतास. आता लोकांना खरेही वाटणार नाही, की त्याकाळी तू क्रुसावरून खाली उतरलेल्या येशू ख्रिस्तासारखा कृश होतास. तुझ्या हनुवटीवर ‘बकरीची पूछ’ म्हणावी अशी दाढी होती आणि डोईवर लंबे लंबे बाल होते. मुख्य म्हणजे आपण कवी आहोत, या श्रद्धेने आपले डोळे भलतेच भावुक करण्याची कला तुला साधलेली होती. दोन होतकरू प्रतिभावंतांनी एकमेकांकडे साशंकतेने पाहावे हे साहजिकच होते. विंदा करंदीकर त्यावेळी आपल्या खिजगणतीतही नव्हता. खरे तर तो तेव्हा कोणाच्याच खिजगणतीत नव्हता. सकाळी सकाळीच आपण दोघे अधिवेशनाच्या मंचावर आलो, कविता गायलो आणि लोकांची मने जिंकूनच खाली उतरलो, तेव्हा करंदीकर उमेदवार कवीला शोभेल अशा स्टाईलमध्ये एकीकडे मुद्दाम विस्कटलेले केस आणि दुसरीकडे कवितांचे बाड सावरत सावरत कोणी समानधर्मा सापडतो का, ते पाहत हिंडत होता. मधूनच कुणाशी तरी तिरमिरीत बोलतही होता. आपण सलामीतच ‘प्रस्थापित’ ठरलो होतो; तो आजन्म आणि आमरण ‘विस्थापित’ असल्यासारखा वागत होता. एका खोलीत नवशिक्या कवींची योग्यायोग्यता ठरवण्यासाठी- म्हणजे त्यांना कविसंमेलनात भाग घेऊ द्यायचा की नाही, ते ठरवण्यासाठी मुलांचे नाना गोपीनाथ तळवलकर बसले होते. केवळ नाइलाजाने करंदीकरने तिथे परीक्षा दिली. सुदैवाने तो उत्तीर्ण झाला. सुदैव त्याचे नव्हे, तळवलकरांचे! त्याला उत्तीर्ण केले नसते तर अँग्री यंग मॅनची भूमिका करंदीकरने जोरदारपणे वठवली असती! संध्याकाळी प्रत्यक्ष कविसंमेलनात मात्र करंदीकरने बऱ्यापैकी बाजी मारली. माझ्या आठवणीप्रमाणे बाकी सर्व कवींनी काव्यगायन केले; फक्त मी आणि विंदा यांनी काव्यवाचनाचा शुभारंभ केला.
संमेलन संपल्यावर जो-तो आपल्या वाटेने निघून गेला. एकमेकांनी कुशल प्रश्नसुद्धा केले नाहीत. कुठे असता? काय करता? असल्या फालतू चौकशा करण्याची कुणालाच गरज भासली नाही. असेच चार-सहा महिने गेले आणि बिलियर्ड्सच्या टेबलावर भिन्न भिन्न रंगांचे चेंडू एकत्र येऊन आदळावेत तसे आपण तिघे कविगोष्टीत एकत्र येऊ लागलो. नियतीचा अदृश्य हात अदृश्य काठीने आपली ढकलाढकल करून ‘कँटर’ साधीत होता. हेदेखील आपल्याला जाणवले ते नागपूरच्या कविसंमेलनात. हे मध्य प्रदेश सरकारने भरवलेले हिंदी-मराठी कवींचे संयुक्त संमेलन होते. यशवंत, गिरीश, अनिल, बोरकर, सोपानदेव, संजीवनी, कांत, भवानीशंकर पंडित अशा बुजुर्गापासून करंदीकर, बापट, पाडगांवकर अशा पोरवयाच्या कवींपर्यंत ‘चुन चुन के’ पंधरा मराठी कवी तिथे मौजूद होते. मंगेश, तुला आठवतंय ना, तिथेच आपल्या मनाच्या तारा विसंवादी असूनही सुरेलपणे झंकारल्या. एका मजेशीर हार्मनीचा अनुभव आपल्याला येऊ लागला.
मुंबईकडे येण्याचा परतीचा प्रवास सुरू झाला. तोपर्यंत जान-पहेचानीचे रूपांतर दोस्तीत झाले होते. विंदा तर इतका आनंदात होता, की मध्यरात्री गाडीच्या डब्यात तुला जागे करून तो म्हणाला, ‘अरे, आपल्याला जास्त तकलीफ न देणारा ईश्वर फारच दयाळू आहे याची आज मला खात्री वाटते आहे रे!’ आपली झोपमोड करून हे सांगायचे काही कारण नव्हते म्हणून तू त्याला गप्प बसायला फर्मावलेस. त्याचा वचपा त्याने जाग आल्यावर काढला. अखंड बडबडण्याची आपली शक्ती किती प्रचंड आहे याचा साक्षात्कारच त्याने घडवला. आपण कोणकोणत्या विषयांवर काय काय बोललो याचे तपशील आता महत्त्वाचे नाहीत. त्या संभाषणातील एकच गोष्ट महत्त्वाची ठरली- आपण तिघांनी संयुक्तपणे काव्यवाचनाचे कार्यक्रम केले पाहिजेत, ते मोफत करता कामा नयेत, कलात्मक निर्मितीच्या क्षेत्रातही परिश्रमासाठी पारिश्रमिक (मानधन) द्यायला हवे- हे तत्त्व आपण समाजात रुजवले पाहिजे, असे क्रांतिकारक निर्णय आपण या प्रवासात घेतले.
झाले.. साहित्याच्या जगातल्या शांत सागरी आपण जशी काही वादळे उठवली होती. ‘गाऊ दावुन आमुच्याच कविता आम्हीच रस्त्यामध्ये’ अशी प्रतिज्ञा करणाऱ्या कवींच्या मुलखात कवींनी काव्यवाचनासाठी पैसे घ्यायचे? अब्रह्मण्यम! आपला बाणा काही लोकांना आवडला; पण पुष्कळांना त्याचा त्रासच वाटू लागला. गंमत म्हणजे काही कवींनाही आपला हेवा वाटू लागला. किंवा आपल्या धाडसाचे भय वाटू लागले! अर्थात हळूहळू हे वातावरण पालटत गेले. समाजाला आपली भूमिका पटत गेली आणि सुरुवातीला नाममात्र मानधन द्यायला नाराज असणारा रसिक समाज हिंदी-उर्दू कवींच्या एवढी नाही, तरी आपली बऱ्यापैकी संभावना करू लागला. यातही विंदाचे एक वेगळेपण आहेच. उदाहरणार्थ, विंदा मानधन या गोष्टीला तत्त्वाचा प्रश्न मानतो. त्यामुळे कोणाच्याही मुर्वतीसाठी विना-मानधन जाणे त्याला साफ नामंजूर आहे. प्रश्न पैशाचा नसून तत्त्वाचा आहे, असा त्याचा सिद्धांत आहे. कोणाशी मानधनाची चर्चा करणे अवघड आहे, हे भान आल्यास त्यातून मार्ग काढण्याची त्याची पद्धत ठरलेली आहे. वसंत बापट आमचा पुढारी आहे, त्याच्या हुकुमा(!)शिवाय आम्हाला काही करता येत नाही. आणि त्याची तर आम्हाला मानधनाविषयी सक्त ताकीद आहे, असे खुश्शाल सांगून हा मोकळा! वाईटपणा वसंताला किंवा मंगेशला जाऊ दे. आपण सहीसलामत सुटल्याशी कारण. कविसंमेलनाच्या एका चिटणीसाने एकदा त्याला विचारले, ‘काय हो कविराज, तुम्ही संमेलनाला येता, दोन-तीन कविता म्हणता आणि हजारभर रुपये मानधन घेता. ही काय रीत झाली?’ यावर विंदाने शांतपणे काय सांगितले ते आठवते? तो म्हणाला, ‘भलतेच काय बोलता? कविसंमेलनात कविता म्हणण्याबद्दल आम्ही काहीच पैसे घेत नाही. कविता आम्ही मोफतच म्हणतो. पैसे घेतो ती केवळ ऐकणावळ! दुसऱ्यांच्या कविता फार ऐकाव्या लागतात त्याची फी.’
(मंगेश, हे ऐकून तू आणि मीदेखील हसलो. यातून निघणारे एक सत्य तुझ्या लक्षात आले ना? आपल्या कार्यक्रमात करंदीकर मानधन घेतो ते आपल्या कविता तो ऐकतो म्हणून! केवळ ऐकणावळ! त्यामुळे आपल्यालाही आपण ऐकणावळच घेतो असे म्हणणे आवश्यकच आहे!)
४० वर्षांपूर्वीची एक गोष्ट आठवते तुला? हे तिघे कवी ५१ रुपये मानधन घेतात.. म्हणजे प्रत्येकी १७ रुपये पडले. तर मग पावतीचा एक आणा यांपैकी कोण देतो, असा खवट प्रश्न ‘लोकसत्ता’त उपस्थित केलेला होता. तो महाजनींनी की तळवलकरांनी, हा वाद आता नको! मग काही दिवस सदानंद रेगे आपल्याबरोबर कविता वाचायला येऊ लागला. तेव्हा बिदागी झाली रुपये ७५. त्यावर साहित्यिक वर्तुळात उठलेली वावडी अशी की, पहिले तिघे टोळीवाले प्रत्येकी २४ रुपये घेतात आणि सदानंदला ३ रुपये देतात! पावतीचा प्रश्न मात्र पुन्हा कोणी काढला नाही.
मानधन घेताना आपण संकोचाने म्हणा किंवा सभ्यतेच्या खोटय़ा कल्पनेने; पण मिळालेले पाकीट मुकाटय़ाने खिशात ठेवत असू. पण विंदाला हे साफ नामंजूर असल्याने तो भाजीवालीकडून मोड घ्यावी त्या तत्परतेने पै न् पै मोजून घेई. प्रवासात वाटखर्च एकत्र केला जाई आणि त्याची विभागणी करताना विंदा आपल्या कोकणी बारकाव्याने ज्या गमती करी त्या तर केवळ अद्भुतच.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात आता आपल्या नावे एक श्रेय नमूद व्हायला हरकत नाही, की वक्ते आणि कवी यांना फुकट राबवून घेण्याची प्रथा आपण बंद पाडली. जे कवी कविता नावाची पवित्र वस्तू सादर करण्यासाठी दक्षिणा मागणे पाप समजत असत, ते पुढे आपल्यामार्फत निरोप पाठवून आपली योग्य व्यवस्था लावून घेऊ लागले. आत्माराम रावजी देशपांडे- कवी अनिल- तर मनमोकळा कबुलीजबाब द्यायचे. ‘बरे केले पोट्टेहो तुम्ही. लोकांना चांगली सवय लावली. आता आम्हालाही व्यवस्थित मानधन देतात.’ काव्यदर्शन ज्यांना सुविहितपणे करता येत नाही असे काही जळू कवी आपल्या नावे बोटं मोडीत मोडीत मैफलीत आपला शिरकाव करून घेण्यासाठी उत्सुक असलेले दिसतात.
तिघांच्या यशस्वीतेची चर्चा आज नको. आपल्या या अफलातून मित्राचीच गोष्ट घे. त्याच्या कवितेचा आवाका किती मोठा आहे, हे तरी या जळणाऱ्या मंडळींनी जरा ध्यानात घ्यावं. वैदिक सुक्तांपासून जाझ संगीतापर्यंत लयीची वळणंवाकणं तो जाणतो. प्राचीन काळापासून संभाव्य काळापर्यंत सगळ्या घटना-विघटनांचे दर्शन तो घेऊ शकतो आणि देऊ शकतो. भावनेची इंद्रधनुष्ये आणि बुद्धीचे चक्रव्यूह- दोहोंची चक्रावून टाकणारी अनुभूती त्याच्या कवितेतून मिळू शकते. तो बालगीतांचा खजिनदार आहे. प्रीतीचे मोहक आणि दाहक विभ्रम त्याच्या प्रतिभेला प्रेरणा देतात. मानवी जीवनातील लहान-मोठे कूटप्रश्न तो सूत्रमय भाषेत मांडू शकतो. व्यापक आणि बहुस्तरीय संस्कृतीचा सहजपणे विचार करणारे त्याचे मन त्याच्या कवितेत ठायी ठायी प्रकट होते. त्याची भाषा लवचीक आहे. पण त्याची शब्दकळा त्याच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणेच आडमाप आणि आडदांड आहे. कधी कधी तर मला त्याचा रागच येतो. तुलाही येत असेल. तो गझल वृत्ताची ऐसी की तैसी करायला कचरत नाही. ‘देऊळ’ हा शब्द राजापुरी पद्धतीने ‘देवळ’ असा लिहितो. हेही एक वेळ क्षम्य मानता येईल. पण दिशा हा शब्द ‘दीशा’ अशा अपभ्रंशाने तो भ्रष्ट करतो आणि वर निव्वळ दांडगाईने मलाच सुनावतो- ‘वशा, मेल्या दिशा ऱ्हस्व असतील कशा? त्या दीर्घच असल्या पाहिजेत. तुझं शुद्धलेखन पुस्तकी आहे!’
हे असे काही त्याने केले की आपली एकमेकांत नेत्रपल्लवी झाल्याशिवाय राहत नाही. खरे म्हणजे तिघांच्या संयुक्त कार्यक्रमात कविता एकजण सादर करीत असतो, तेव्हा बाकीच्या दोघांची प्रतिक्रिया प्रेक्षणीयच काय, पण कधी कधी श्रवणीयही असते. ती भाषिते श्रोत्यांना ऐकू जात नाहीत म्हणून ठीकच आहे. उदाहरणार्थ, तू मनापासून म्हणत असतोस- ‘घर असूनही आता घर उरलेले नाही.’ यावर विंदा मला खवटपणे विचारतो, ‘मंगूअण्णाने आपली बिल्डिंग विकलीन काय रे?’ तू दुसऱ्या एका कवितेत स्वत:वर विनोद करीत म्हणतोस- ‘उघडे पडून बाबा जेव्हा वाचीत असतात, दाढी-लावल्या दुधी भोपळ्यासारखे दिसतात’ यावर विंदाचा उद्गार काय? ‘काय मेल्याची ‘कन्सीट’ पाहा! तेवढय़ात आपण गोरेगोमटे आहोत असं सुचवतोय!’ मी लावणी गात असतो-
‘जरि सांज दूर राहिली तरी उमलली
कशी गुल्बशी, सोन्याची बावनकशी
घडवली अशी कुणी उर्वशी?’
याच वेळी विंदाजी मंगेश तुझ्या कानात म्हणतात- ‘पहा, पहा. वसंतानं काय ‘शी क्रिया’ केली आहे.’ पण आपण दोघं किती क्षमाशील! किती उदार! विंदाला आपण नेहमीच साऱ्या गोष्टी माफ करीत आलो आहोत!
काही गोष्टी मात्र त्याला कशा माफ कराव्यात ते समजत नाही. उदाहरणार्थ, त्याची अविचाराने चालणारी खादाडी! कलकत्ता मेलमधील सकाळची न्याहारी आणि नंतर जेवणही- अलीकडे या गोष्टी का रद्द झाल्या, तुझ्या लक्षात आले आहे ना? न्याहारीसाठी मक्याचे पातळ पोहे, दूध आणि साखर असे एक खाद्य गाडीतील भोजनकक्षात देत. पण टेबलावर ठेवलेले सर्व पोहे, सर्व दूध आणि सर्व साखर आपल्या बशीत घेऊन विंदाने मोठय़ा चमच्याने ते गदागदा ढवळले. (त्याच्या भाषेत गादवले.) त्याचे घट्ट रसायन तयार केले आणि सहज लीलया खाऊन टाकले. जेवतानाही तोच प्रकार! रुचेल तेवढी कोंबडी घ्यावी यासाठी समोर धरलेले कोंबडीच्या रश्शाचे तसराळे आपल्याच बशीत विंदाने विनासंकोच पालथे केले. मंगेश, मला वाटते- त्यानंतरच जेवणाच्या डब्यात या गोष्टी वाढणे बंद झाले असावे! ओळखीच्या आणि बिनओळखीच्या घरीही हा भीमकर्मा वृकोदर झकास पराक्रम करीत असे. आता वयोमानाप्रमाणे त्याचे खाणे कमी झाले आहे, ती गोष्ट निराळी!
जसे खाणे, तसे बोलणे. दोन्ही वचावचा! ऐकणारा समाज संमिश्र आहे की कसा, याचे भान (मुद्दाम) विसरण्यात स्वारी भलतीच तरबेज. वाद घेण्याची हौसही अशीच जबरदस्त. करंदीकरशी वाद-संवाद होणे नाही. फक्त ऐकणे एवढेच आपल्या कानी. नरहर कुरुंदकरांशी एकदा एवढा वाद पेटला की तो मुद्दय़ावरून गुद्दय़ावर येण्याची चिन्हे दिसू लागली. ‘खिडकीतून बाहेर फेकून देईन,’ असे बोलण्यापर्यंत मजल गेली. प्रभाकर पाध्ये पट्टीचे वादपटू होते ना? पण त्यांचा आवाज बारीक. विंदाच्या मुलुखमैदान तोफेपुढे तो किती चालणार? शेवटी पाध्यांचा आवाज थकला. चिंचोळा आवाज अधिक चोरटा करीत ते विंदाला म्हणाले, ‘I think now I must save my voice.’ आश्चर्य वाटते ते हे, की सॉक्रेटिस, प्लेटो, अ‍ॅरिस्टॉटल हे ज्याचे जानी दोस्त आहेत तो वादविवाद करताना विवेकाची लंगोटी खुंटीला कशी टांगून ठेवतो? ही जरा जास्त थट्टा झाली हे मला कबूल आहे. माझ्या म्हणण्याचा सारांश एवढाच आहे की, कधी शांतपणे, संयमाने, समतोलपणे करंदीकर वाद खेळतो आहे, आपला मुद्दा कोणाला पटवून देतो आहे, हे मी जन्मात कधी पाहिलेले नाही. तो हट्टी आणि हटवादी तर आहेच, पण भरीला आरडाओरडय़ाचे कसबही त्याच्याजवळ आहे.
या कसबाबरोबर दुसरे हुन्नरही त्याने पुष्कळ कमावलेले आहेत. सुतारकामाचे त्याने चक्क शिक्षणच घेतलेले आहे. त्यामुळे तो केव्हा कसले फर्निचर तयार करील याचा नेम नसतो. बेडेकर चाळीत राहायचा तेव्हा स्टुलावर कॅरम पालथा घालून त्याने कुटुंबासाठी जेवणाचे टेबल बनवले होते हे तुझ्या लक्षात असेल. फाटके कपडे शिवणे, कपडय़ाला ठिगळ (त्याचा शब्द ‘पाचेरू’) लावणे, हे तर काहीच नाही. पादत्राण दुरुस्तीचा खटाटोपही तो चर्मकारबंधूला करू देत नाही. स्वत:च खिळ्यांची ठाकठोक करून वहाण दुरूस्त (?) करून टाकतो. असल्या गोष्टींचा घरातल्या मंडळींना त्रास होत असेल असे त्याच्या मनातही येत नाही. बाहेरच्यांची तर तो पर्वाच करीत नाही. उघडेबंब होऊन बसणे हे तर नित्याचेच. भेटीगाठीला कोणी आले तर ‘कपडे घालून या’ असे कोणाला तरी सांगावे लागते. मंगेश, तुला असे वाटत नाही का, की या गोष्टी तो मुद्दाम करतो? आपण विक्षिप्त आहोत, कवडीचुंबक आहोत, हेकट आहोत, फार साधे आहोत- ‘हा रांगडा साधेपणा आपल्याला फार आवडतो,’ असे शब्द त्याने आपल्या नायिकेच्या तोंडीसुद्धा घातले आहेत. यातून जी प्रतिमा जनमानसात तयार झाली आहे ती कितीशी खरी आहे आणि कितीशी भ्रममूलक आहे याचा थांगपत्ता लागत नाही. त्याच्या चिकूपणाच्या खऱ्या-खोटय़ा गोष्टी माणसं तिखटमीठ लावून सांगतात. पण तूच सांग- चिकू माणूस निलरेभी असू शकतो का? विंदाला कबीर पुरस्कार मिळाला, हा त्याचा मोठा सन्मान झाला. पण या सन्मानाबरोबर त्याला दीड लाख रुपयेही मिळाले! या दीड लाखांतला एक पैसाही त्याने स्वत:साठी घेतला नाही. सारे पैसे त्याने त्याला पसंत असलेल्या सामाजिक कार्याला देऊन टाकले. हे काय चिकूपणाचे लक्षण झाले? दोन हजार रुपयांची तिघांत वाटणी करताना सारखे भाग झाल्यावर उरणारे दोन रुपये कसे वाटायचे, याच्यावर तो दोन तास वाद घालील. कारण तो तत्त्वाचा प्रश्न आहे. पण म्हणून काय कबीराच्या नावाने मिळालेली दक्षिणा स्वत:साठी ठेवण्याइतका तो खुळा आहे की काय? याचे हाडपेर दणकट. छाताड म्हणजे भिंताड. लहानपणी झालेल्या जखमांना पाच-पंचवीस तरी टाके पडलेले. पण एखाद्या प्रचंड वडाच्या झाडावर चुकून एखादे जाईजुईचे फूल पडावे तशी याच्या अंगाखांद्यावर नातवंडे मजेत खेळतात. तेव्हा हा किती हळुवार होतो! त्यांच्याशी बोबडं बोलताना हा ब्रह्मसूत्रं कशी विसरून जातो? मित्रमंडळी घरी आल्यावर हा करवादेल, शिव्या घालील. पण त्यांना भाकरी खाऊ घातल्याशिवाय जाऊ देईल की काय? धिप्पाड देहामुळे आणि आडदांड वागण्यामुळे याचा गण राक्षसगण असेल असे वाटते. पण आतून हा नको एवढा कोवळा आहे. धाकटय़ा मुलाच्या- एटूच्या आजारपणात त्याने ज्या तऱ्हेने त्याला सांभाळला त्याला तोड नाही. नातवंडं सांभाळण्यासाठी आजोबा-आजी दिवसाचे तास कसे वाटून घेतात हे मी पाहिले आहे. ज्ञानाने आणि गुणवत्तेने उत्तुंग असणारा विंदा किती मातृहृदयी आहे हे त्याला जवळून पाहणाऱ्यालाच फक्त समजेल.
करंदीकरचा सर्व हपाप ज्ञान-विज्ञानाचा आहे. घरगुती औषधयोजना करण्यापासून क्वांटमची कूटे सोडवण्यापर्यंत अकुंठितपणे त्याची बुद्धी अज्ञाताशी टक्कर घेत असते. केवळ साहित्याचा विचार केला तर त्याच्या चौरस प्रज्ञेचा अचंबा वाटतो. सर्व इंग्रजीचे अध्यापक ज्या विषयाचे अध्यापन करण्याचे टाळत, तो विषय याच्या आवडीचा असे- प्लेटो! प्रसिद्ध अभिनेता डेव्हिड त्याच्या एम. ए.च्या वर्गात गंमत म्हणून दाखल झाला. मुळं रत्नागिरीच्या मातीतली आणि बुंधा-फांद्या कोल्हापूरच्या हवेत वाढलेल्या. तेव्हा इंग्रजी उच्चारांवर मुंबैकर साहेबांचे पाणी थोडेच चमकणार? डेव्हिडलाही प्रथम गंमत वाटली. पण नंतर त्याच्या लक्षात आले की, सर्वात खरे नाणे आहे ते प्रो. करंदीकरांचेच! विंदाने अनुवाद केले ते वैश्विक मान्यता असलेल्या ग्रंथांचे. अ‍ॅरिस्टॉटलचे काव्यशास्त्र, ज्ञानेश्वरांचा अमृतानुभव, गटेचे फाऊस्ट, शेक्सपियरचे किंग लियर.. एकेक आव्हान त्याने रामाने शिवधनुष्य पेलावे त्या सहजनेते पेलले. स्वतंत्र लेखनातही स्वतंत्र चमक दाखवली. भल्याभल्यांना स्तंभित करणाऱ्या कविता, प्रौढांनाही तोंडात बोटे घालायला लावणारी बालगीते, जे शब्दांच्या पलीकडले आहे त्याच्या स्पर्शाची पालवी फुटलेले ललित- लेखन, आकाशाचा अर्थ उजळ करणारे निबंध आणि परंपरा आणि नवता यांतले नाते आकलनाच्या टप्प्यात आणून ठेवणारी समीक्षा अशी साहित्याची चतुर्विध रूपे त्याने पुरुषार्थी वृत्तीने श्रीमंत करून टाकली.
मंगेश, तुला आणि मला यात अधिक सोयरसुतक आहे ते त्याच्या कवितेच्या क्षेत्रातील कामगिरीचे. त्याच्या कवितेच्या विकासाचे आणि विस्ताराचे आपण सर्वात निकटचे साक्षीदार आहोत. त्याच्या कवितेबद्दल अधूनमधून आपल्या चर्चाही झालेल्या आहेत. तू तर त्याच्या निवडक कवितांचा ‘संहिता’ हा संग्रह सिद्ध केलास आणि त्याला विवेचक उपोद्घातही लिहिलास. मित्र झाला म्हणून काय झाले? त्याच्या कवितेवर कधी कधी का होईना, प्रतिकूल टीकाही आपण करावी हे क्रमप्राप्तच होते. या कवितेत प्रज्ञा प्रतिभेवर कुरघोडी करते आहे याचा प्रत्यय आपणा दोघांनाही कधी कधी आला आहे. कधी कधी कवितेची मांडणी तो खुशाल सदोष राहू देतो याबद्दलही आपण टीका केली आहे. क्वचित त्याची कविता शब्दबंबाळ होते. पण कवितेपेक्षा तिची प्रस्तावना महाबंबाळ करण्यात त्याचा हातखंडा आहे म्हणून आपण धुसफुसही केलेली आहे. पण या सर्व उणिवा त्याच्या गुणसंभारात किती सहजपणे लपून जातात!
विंदा करंदीकर ‘ज्ञाता दशसहस्र्ोषु’ नव्हे ‘दशलक्षेषु’ आहे. महाराष्ट्रभूमीतील उत्तुंग शिखरांत त्याच्या कर्तृत्वाचा कळस ‘गड कळसूबाई’सारखा आहे. आपल्या जीवनात तो कधी सरपटला नाही, बुळबुळीत अंगाने निसटला नाही, स्वार्थाने चळला नाही आणि भयाने थरथरला नाही. त्याने कधी महापराक्रमाचा आव आणला नाही. पण तो आपला आब राखून जगला. बलवंतांच्या बलदंड मेळाव्यात, कोणाही माणसांची खरेदी-विक्री करू पाहणाऱ्या धनवंतांच्या मंडईत आणि सत्तेच्या चुंबकीय शक्तीने आपण कोणालाही आपल्या नागमंडलात खेचू शकतो असे मानणाऱ्या सत्ताधीशांच्या गारुडात महाराष्ट्रात जी थोडी माणसे अडगपणे स्वत्त्व न हरवता उभी राहिली आणि आपल्या तपश्चर्येच्या सौम्य तेजाने समाजाच्या मानसन्मानाचे अधिष्ठान होऊन बसली, त्यात आपला मित्र विंदा करंदीकर निश्चित आहे, अग्रगण्य आहे.
मंगेश, आपण तिघे महाराष्ट्रीय. ४० वर्षांहून अधिक काळ न भांडता कसे आपले काम प्रेमाने करीत राहिलो याचा लोक अचंबा करतात. पण तुला त्याहून मोठा अचंबा हा वाटत नाही का, की आपण आपल्या मित्राच्या थोरवीला दिलखुलासपणे दाद देऊ शकतो!
– वसंत
(लोकरंग- २२ ऑगस्ट १९९३)

Accused kidnap minor girl
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला बिहारमध्ये अटक
34 Year Old Marries 80 Year Old Reel Star
८० वर्षांच्या रीलस्टारच्या प्रेमात महाराष्ट्रातील ३४ वर्षीय शीला झाली ‘दिवानी’; लग्नासाठी पार केले ६०० किमी अन् आता..
Punjab Girl, 10, Dies After Eating Cake Ordered Online On Her Birthday
वाढदिवसाला ऑनलाईन मागवलेला केक खाल्ल्याने दहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू, कुठे घडली घटना?
Sam Bankman Fried
 ‘क्रिप्टो सम्राट’ सॅम बँकमन-फ्राइडला २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा