ज्येष्ठ गायक आणि गाढे संगीत अभ्यासक व समीक्षक पं. सत्यशील देशपांडे यांच्यासोबतच्या स्वरगप्पांचा अनोखा कार्यक्रम ‘लोकसत्ता गप्पा’ उपक्रमात अलीकडेच पार पडला. त्या साक्षात्कारी, स्वर्गीय मैफिलीचं हे शब्दरूप..
शब्दांची मोठी गंमत असते. काही शब्द नकोसे, कंटाळवाणे वाटतात; तर काही शब्दांच्या नुसत्या चाहुलीनेही सुखावल्यासारखे वाटू लागते. ‘मन्थ-एंड’ हा मराठीत रूढ झालेला, पण अनेकांना अप्रिय असलेला शब्द; तर ‘वीकएन्ड’ हा सुखावणारा, हवाहवासा वाटणारा आणि मराठीत प्रचलित झालेला शब्द! दर पाच दिवसांनंतर या शब्दाची जणू ओढ लागते आणि तो ‘साजरा’ करण्याचे बेत आखले जातात. मुंबईतील काही मोजक्या रसिकांचा एक ‘वीकएन्ड’ अशाच सुखावणाऱ्या जाणिवांनी साजरा झाला. गेल्या २३ जुलची.. शनिवारची संध्याकाळ एक अनोखा ‘वीकएन्ड नजराणा’ घेऊन सजली आणि एका अभूतपूर्व, अविस्मरणीय अशा अनुभवात रसिक अक्षरश: चिंब न्हाऊन निघाले. प्रभादेवीच्या
रवींद्र नाटय़मंदिरातील सभागृहाने त्या दिवशी
सुरांमध्ये आकंठ भिजलेल्या शब्दांची एक दिव्य अनुभूती घेतली..
ज्येष्ठ गायक आणि संगीत समीक्षक पं. सत्यशील देशपांडे यांच्यासोबतच्या स्वरगप्पांचा अनोखा कार्यक्रम ‘लोकसत्ता गप्पा’ उपक्रमाच्या दुसऱ्या सत्रात पार पडला. त्यात संगीत क्षेत्रातील निवडक दिग्गज, जाणकार आणि रसिकांच्या उपस्थितीत सुरांची चिंब बरसात झाली आणि गेल्या पिढीपासून वर्तमानापर्यंतच्या भारतीय शास्त्रीय संगीताच्या वाटचालीचे सुरेल पदरही सहजपणे गाते, बोलके झाले. पंडितजींना ‘बोलते’ करण्यासाठी ‘लोकसत्ता’चे साहाय्यक संपादक मुकुंद संगोराम यांनी काही प्रश्नांची जंत्री तयार ठेवली होती, पण प्रश्नांचा पाऊस पाडण्याची वेळच आली नाही. पहिले एक-दोन प्रश्न झाले आणि पंडितजी स्वत:च खुलून बोलू लागले. ते अखंड बोलत होते आणि समोरचे रसिक श्रोते हशा, टाळ्या आणि वाहवा करीत त्यांच्या स्वसंवादाच्या त्या अनोख्या शैलीत न्हाऊन निघत होते. आपसूकच वक्ता आणि श्रोते यांच्यातला ‘स्वर-संवादु’ सुरू झाला, आणि रसिकांच्या मनातले एकेक प्रश्न व्यक्त होण्याआधीच त्यांची उत्तरेही सहजगत्या मिळत गेली. पंडित सत्यशील देशपांडे बोलत राहिले, गात राहिले आणि उपस्थितांपैकी संगीताची जेमतेम जाण असणाऱ्या रसिकालाही तृप्ततेचा आगळावेगळा आनंद मिळत गेला..
भारतीय शास्त्रीय संगीताची भूमिका, संगीताचा स्वभाव (कुणालाही आपल्या पातळीवर सहभागी करून निर्मितीचा आनंद देऊ शकणारा), संगीताची भाषा, संगीतातील प्रवाहीपणा, गाण्याची परंपरा, शास्त्रीय संगीताला दिव्य उंची देणारे कलावंत, त्यांच्या गायकीच्या शैली, हरकती, परंपरा, इतिहास असा एक शोभादर्शकच रसिकांसमोर धरला गेला. कोणत्याही कोनातून पाहिले तरी अद्वितीय असेच मोहक आकार शोभादर्शकात दिसतात. सत्यशीलजींच्या मफिलीत नेमका तोच अनुभव प्रत्येकाला आला. ‘मला संगीतातलं फारसं कळत नाही, तरीही १५-२० मिनिटं बसणार आणि जाणार..’ असं कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगणारे काही ‘कानसेन’ मफल सुरू झाल्यावर असे काही त्यात रंगून गेले, की दर्दी रसिकांच्या ‘टाळीत टाळी’ आणि ‘वाहवा’त ‘वाहवा’ मिसळत अखेरच्या क्षणापर्यंत ते श्रवणानंदात आकंठ डुंबत राहिले. त्यांचे ‘असा अनुभव आधी कधीच, कुठेच आला नाही!’ असे भाव उमटलेले चेहरे पाहणे हा एक वेगळाच आनंद होता. अगोदरच स्वर्गीय सुरावटींच्या साथीने सजलेल्या गाण्यात सुरेल गप्पांचा आनंद मिसळला की जे ‘रसायन’ तयार होईल, तेच नेमके त्या दिवशी प्रत्येकाला गवसले आणि वीकएन्ड ‘साजरा’ झाला..
बाटलीबॉय कंपनी या विख्यात लेखापाल कंपनीचे भागीदार असलेले आणि संगीत क्षेत्रातही तितक्याच सहजपणे वावरणारे तरल लेखनशैलीचे लेखक वामनराव देशपांडे यांचा सत्यशील हा मुलगा खतावण्या आणि जमाखर्चाची आकडेमोड करण्याचे अध्र्यावरच सोडून संगीताचे सूर शोधण्यात गुंतला. सत्यशीलजींच्या या गानप्रवासातील संगीतसाधना, गुरू पं. कुमार गंधर्व यांच्या शिकवणीचे पलू आणि त्या अनुषंगाने संगीतातल्या सूर आणि शब्दांच्या साह्य़ाने घडत गेलेले दागिने.. ‘शब्दांत वर्णन करणे कठीण!’ एवढेच या अनुभवाचे वर्णन करता येईल. एक उत्तम गायक, उत्तम वक्ता, गाण्याबद्दलचा स्वत:चा स्वतंत्र असा विचार असलेला विचारवंत, समीक्षक अशी अनेक रूपे घेत आयुष्याचा आगळा आनंद उपभोगणारा पंडित सत्यशील देशपांडे नावाचा एक मनस्वी कलावंत या शोभादर्शकातून रसिकांसमोर परिपूर्णतेने उलगडला. ‘भारतीय अभिजात संगीतात कलेचे गूढरम्य प्रदेश व्याकरणाच्या सीमेला चिकटूनच असतात..’ असे म्हणणारा हा गायक. त्या गूढरम्य प्रांतातून स्वैर विहार करताना आयुष्यभराच्या प्रवासात गोळा केलेले अगणित स्वरपुंज या कलंदर कलावंताने रसिकांसमोर अक्षरश: उधळून टाकले, त्यावेळी श्रोते ज्या भावनांनी चिंब झाले असतील, त्याचे वर्णन लिखित शब्दांत करणे केवळ अशक्यच! पंडितजींच्याच शब्दांत ते मांडणं उचित..
‘मला जर काही थोडं लिहिणं, गाणं साधलं असेल आणि त्यात इतरांना काही उपयुक्त वाटलं असेल तर त्याचं सारं श्रेय माझे वडील, माझे गुरू आणि मी प्रयत्नपूर्वक जोपासलेली माझी विद्यार्थीदशा यांना आहे. ‘घरंदाज गायकी’ या वामनराव देशपांडे लिखित ग्रंथापूर्वी एक तर संगीताचं व्याकरण सांगणारी पुस्तकं होती, किंवा कलाकारांच्या गुणविशेषांनी पुरेपूर भरलेले असे साहित्य तेवढे होते. अशा काळात ‘संगीतातली घराणी हे संगीतासंबंधीचे वेगवेगळे शास्त्रीय दृष्टिकोन आहेत; कुणाची वतनं नव्हेत,’ असा संदेश वामनरावांनी आपल्या संगीतविषयक लेखनातून दिला होता. या ग्रंथाची निर्मिती होताना झडणाऱ्या साहित्यिक चर्चा, संगीत क्षेत्रातील गायकांचे गाऊन व्यक्त होणारे सांगीतिक वादविवाद यांतून माझं बालमन सुसंस्कृत झालं. मुख्य परिणाम असा झाला, की एक बंदिश मालकंसमध्ये असते, पण समग्र मालकंस त्या एकाच बंदिशीत किंवा घराण्यात नसतो. कारण हे संगीत भारताच्या दोन-तृतीयांश भागात गायले जाते आणि प्रत्येक ठिकाणची सामाजिक, सांस्कृतिक वैशिष्टय़े कलाकाराचा मिजाज होतात. त्यानुसार गाणं फुलवण्याची कलावंताची शैलीही विकसित होते. म्हणूनच पंजाबात गाणं जवान होतं,
ग्वालियरमध्ये ते म्हातारं झालं, आणि महाराष्ट्रात गाण्याचा सांगाडा झाला, असं तेव्हा म्हटलं जायचं. वामनरावांनी अनेक गायकांना आत्मशोधासाठी प्रवृत्त केलं, मोठं व्हायला मदत केली. अनेकांना त्यांनी आपल्या कुटुंबाचा सदस्यच करून घेतलं. वामनरावांमुळे माझ्यातही ती सहिष्णुता रुजली. वेगवेगळ्या घराण्यांच्या गायकांबद्दल व त्यांच्या गायकीविषयी आपुलकी वाटू लागली.
‘रागतालाच्या चौकटीत राहूनही आवर्तनाच्या बांधणीत होणाऱ्या ‘इथे-तिथेपणा’मुळे बांधणीचा डौल निरनिराळा होतो आणि गाणं फुलतच जातं.. गायक मुखडा घेऊन समेवर आल्यावर आवर्तनातल्या उरलेल्या जागेत जे ‘इकडचे तिकडे’ काही करू शकतो ते आपल्या तालक्रियेमुळे. (फक्त या तालक्रियेतच आवर्तनाचा पहिला आणि दुसरा असे दोन भाग असतात. त्यांना ‘खाली’ आणि ‘भरी’ असं संबोधलं जातं.) यामुळेच या संगीतात कुणालाही आपल्या वैयक्तिक संवेदना अभिव्यक्त करण्याची सोय आहे. ओघात आले म्हणून सांगतो- ज्या वैदिक ऋचांना आजही आद्य संगीत मानतात, ते निसर्गातल्या दिव्य आणि अनाकलनीय अशा शक्तींना केलेले सामूहिक वंदन आहे अशी माझी धारणा आहे. सामूहिक वंदनेपासून आताच्या ख्यालगायकीत वैयक्तिक संवेदनांच्या अभिव्यक्तीची परिसीमा गाठली गेली आहे असे मला वाटते.
‘मी कुमारजींना गुरू करण्याचं कारण म्हणजे तेव्हाच्या त्यांच्या समकालीनांचं गाणं मला समजत होतं. घोर साधनेनं ते आत्मसातही करता येईल असं वाटायचं. पण कुमारजींच्या गाण्याचं गूढ काही उलगडत नव्हतं. हे गाणं मला कळत कसं नाही, हे त्यांना गुरू करून एक प्रकारचं भांडणच मी सुरू केलं होतं. कुमारजींचा गुरुमंत्र होता.. गाण्यातली अष्टांगं क्रमबद्ध पेश करणं म्हणजे गाणं नव्हे, तर ख्याल कसा फुलवायचा, बंदिश कशी उलगडायची, याकरता अष्टांगांतली काही अंगं कलात्मकतेनं वापरणं म्हणजेच गाणं. कुमारजींच्या शिकवण्याचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे शिकवताना त्यांच्या अंगात पूर्वसुरींचे- म्हणजेच राजाभैया पूँछवाले, फैयाज खाँ, भेंडीबझारवाले यांचे ‘स्पिरीट’ अवतरत असे. एकच राग विविध घराणी आणि गवयी कसे गातात याचं प्रात्यक्षिक देऊन ते म्हणत, तुमचा रस्ता आता तुम्हीच शोधा..’
सत्यशीलजींनी हे सांगत असताना या सगळ्या कलावंतांच्या गायकीचे गाऊन दर्शन घडवायला सुरुवात केली आणि गप्पांची ही मैफल उत्तरोत्तर रंगत जाणार, याची खात्री पटून रसिक श्रोते सुखावले.. सैलावले.
सभागृहात ते स्वर्गीय सूर घुमू लागले.. गप्पांनी लय पकडली. मग आठवणींचा अलिबाबाचा खजिनाही उघडला गेला.. अब्दुल करीमखाँसाहेबांच्या तोडी आणि रिषभ यांच्यातील नात्याचा शोधाची आठवण जिवंत झाली.. तब्बल दीड दिवस चाललेल्या तोडीच्या मफिलीचे किस्से ऐकता ऐकता सभागृहात हास्याची कारंजीही फुलत गेली. गुरूला अनन्यभावे शरण जावे, ही गुरू लोकांनीच लढविलेली शक्कल असावी, असे सांगत सत्यशीलजींनी पु. ल. देशपांडेंच्या आठवणींचा एक हळवा कप्पाही नकळत उघडला. विषय होता- गुरूला अनन्यभावे शरण जाण्याचा! पुलंनी त्यांना पाठविलेल्या एका पत्रातील संदेशाचा मनावर कोरलेला भाग तरलतेने उलगडताना रवींद्र नाटय़मंदिरातील पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या सभागृहातच आपण बसलो असल्याची जाणीव होताक्षणी सत्यशीलजी विनम्र झाले. पुलंच्या आठवणीने क्षणभरासाठी भारावले आणि पुन्हा त्यांची रसवंती सूरमय झाली.. ‘परिप्रश्नेन सेवया’ असं भगवंतांनी गीतेत म्हटलंय. ‘गुरूचे पाय चेपून सेवा करण्यापेक्षा प्रश्न विचारून सेवा कर..’ असं पुलंनी सांगितलं होतं.
‘ख्यालाची धून ही कुमारजींकडून मिळालेली शिदोरी होती. जिथे रागाची धून मिळत नाही, तिथे चांगला गायक धुनेची कल्पना करतो, त्याभोवती रुंजी घालत तो धुनेभोवती शास्त्र रचतो.. गायक म्हणून एका गायकाला अनेक गायकांच्या भूमिकेत जाता येतं, हे माझ्या ध्वनिमुद्रण प्रकल्पामुळे मला कळलं..’
एकच बंदिश वसंतराव, कुमारजी कसं गात असत, हे सत्यशीलजींनी सप्रयोग दाखवलं. त्यानंतर लगेचच ग्वाल्हेर, पंजाब आणि भेंडीबझार या घराण्यांची गायकीही त्यांनी गाऊन दाखविली. संगीताच्या सुरावटीसोबत येणाऱ्या तृप्तीचा अनुभव कसा असतो, आणि अभिजात संगीत हे मानवी भावभावनांच्या, संवेदनांच्या अभिव्यक्तीचे ‘वाहन’ आहे, कोणतीही कला कधी रुक्ष होऊच शकत नाही, या साक्षात्काराने जणू ती संध्याकाळ भारावून गेली होती..

संगीताचा स्वभाव सांगताना तर सत्यशीलजींनी श्रोत्यांना सुरांच्या हिंदोळ्यावर बसवून चौफेर झोके दिले. उत्तर हिंदुस्थानी आणि दाक्षिणात्य संगीतातील तालक्रियेतील वेगळेपणामुळे गायकीवर होणारा परिणाम त्यांनी गाऊन दाखवला. दाक्षिणात्य संगीतात समेवर येत नाहीत, तर समेपासून गाणं सुरू करतात. त्यांची संध्याकाळची जी वेळ आहे, ती आपली परवचा म्हणण्याची वेळ आहे. त्यामुळे ते त्याच भावनेने गायला बसतात. लहानपणापासूनचे वडिलांचे संस्कार, कुमारजींच्या सहवासातले संस्कार आणि फोर्ड फौंडेशनच्या अनुदानातून साकार झालेल्या ध्वनिमुद्रण प्रकल्पातून मिळालेले संस्कार याची एक सहजसुंदर आणि खुसखुशीत सूरमयी सफरही सत्यशीलजींनी श्रोत्यांना घडविली.. आणि वेगवेगळ्या बंदिशींच्या सुरांची जादू सभागृहात उधळत ही आगळी स्वरमय गप्पांची मफल आटोपती घेतली. भारावलेल्या रसिकांनी दोन मिनिटे उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात या आगळ्या मफिलीच्या जादूगाराला मानवंदना दिली.
उपस्थित रसिकांचा आठवडय़ाचा अखेरचा दिवस अशा तऱ्हेनं अनेक सुखद क्षणांनी बहरून गेला.. एका सांगीतिक प्रवासाचे साक्षीदार होण्याचे भाग्य त्यांना लाभले.. त्यामुळे नव्या दमाने पुढच्या आठवडय़ाला सामोरे जाण्यातही नवे सुख असणार, हे त्यांना वेगळं सांगायची गरजच उरली नाही!

पं. सत्यशीलजी उवाच..
* स्वरसागर म्हटलं तरी त्या सागरालाही वेगवेगळी रूपं असतात. तेथे वावरणारे काहीजण किनाऱ्यावरच भेळ खात बसणं पसंत करतात, काहीजण पाण्यात हात-पाय मारतात. काहीजण खोल समुद्रात जातात, काही खारं पाणी गोडं कसं करायचं, याचा विचार करू लागतात, तर काहीजण कविता करू लागतात. तसंच गाण्याचं असतं. स्वरसागर झाला तरी सगळेच एका रूपाचे असतील असं नाही..
* ज्याला आजकाल ‘तालीम’ म्हणतात, त्याचा अर्थ मूड नावाच्या इंद्रियाचे संपूर्ण खच्चीकरण करून यांत्रिक पद्धतीने गात राहण्यात शिष्याला सक्षम करणे, असा चुकीचा लावला गेला आहे.
* मध्य प्रदेशातील देवास येथे कुमारजींकडे संगीत शिकत असताना रेडियो केंद्रात एका ऑडिशनसाठी फॉर्म भरायचा होता. फॉर्मवरचे ‘सतीश देशपांडे’ हे नाव अधिक भारदस्त हवे, असे कुमारजींनी सांगितले, अन् त्यांनी ‘सतीश’ देशपांडेंचे नवे नामकरण करून टाकले.. ‘सत्यशील’ देशपांडे!
दिनेश गुणे dinesh.gune@expressindia.com