प्रत्येक पोशाखासोबत त्याचे काही एक्स्ट्राज असतात. जे त्याला किंवा त्या लुकला जास्त प्रभाव देण्यासाठी वापरले जातात. हे असे ‘एक्स्ट्राज’ एकाच लुकमध्ये अनेक ठिकाणी वापरून तो तो भाग हायलाइट केला जात असे. मात्र बदलत चाललेल्या ट्रेंडनुसार या ‘एक्स्ट्राज’नासुद्धा स्वत:चं विशिष्ट असं स्थान मिळू लागलं आहे. एका आउटफिटसोबत एखादाच एक्स्ट्रा पीस किंवा थोडकीच अ‍ॅक्सेसरी वापरायची आणि आउटफिटइतकंच लक्ष त्यांच्याकडेदेखील वेधून घ्यायचं, ही यामागची सोपी ट्रिक आहे. यंदाच्या लॅक्मे फॅशन वीकमध्येही अशाच अनेक स्टेटमेंट अ‍ॅक्सेसरीजचा वापर करून केवळ आउटफिटचं डिझाइन न पोहोचवता एक संपूर्ण ‘लुक’ डिझायनर्सनी सादर केला आहे.

लग्न, कार्य, समारंभ, सण म्हटले की हेवी वर्कचे कपडे आणि त्यावर तितकेच किंवा त्याहीपेक्षा जड दागिने ही गोष्ट आता अगदी ठरलेली आहे. मात्र नुकत्याच पार पडलेल्या  लॅक्मे फॅशन वीक विंटर फेस्टिव्ह सीझनमध्ये याबाबतीत एक नवीन ‘ट्रेंड’ दिसला. एखादाच पण ठळकपणे दिसणारा दागिना, अर्थात अ‍ॅक्सेसरी, ज्याला ‘स्टेटमेंट ज्वेलरी पीस’ म्हटलं जातं त्याचा वापर करून आपल्या कपडय़ांनाही अधिक उठाव देता येतो. सोबतच ती ज्वेलरीही बघणाऱ्याच्या सहज नजरेत भरते. एखादा स्टेटमेंट नेकपीस, ब्रेसलेट, हेड गिअर किंवा हेअर पिन घेऊन आपल्याला आपल्याकडचं दागिन्यांचं ओझं हलकं करता येईल. मात्र स्टेटमेंट पीस हा ठसठशीत उठून दिसणारा असायला हवा, हे त्यात महत्त्वाचं. या स्टेटमेंट पीसेसमध्ये नेकपीस, ब्रेसलेट, ईअर पीस, बोटातली रिंग, बाजुबंद किंवा कडे अशा सगळ्या अ‍ॅक्सेसरीजचा समावेश होतो. मोठे ईअर हँगिंग्ज किंवा मोठे आणि हेवी झुमके हे दोन ईअर पीसेस नवीन ट्रेंडमध्ये आहेत आणि राहतील. मात्र त्यातही जर ईअर पीस ड्रेसच्या वर्क किंवा एम्ब्रॉयडरीपेक्षा हेवी वाटत असेल तर एकाच कानात ईअर पीस घातला जातो. एकाच कानात हेवी ईअर पीस घालणं हा ट्रेंड सध्या सर्व सेलिब्रिटींनी फॉलो केलेला आहे.

सध्या नोज पिन्स अर्थात चमक्यांची फॅशन जोरदार आहे. ऑक्सिडाइज्ड बाजुबंद, कमरपट्टा, मेखला, अँकलेट्स या सगळ्यासोबत येऊ घातलेल्या दोन अ‍ॅक्सेसरीज म्हणजे काफ टाईज किंवा कडे आणि हेड पीसेस किंवा हेअर पीसेस. एकाच पायाच्या पोटरीला बांधायचे बो टाईज किंवा लेसेस किंवा त्या मापाचं कडं या अ‍ॅक्सेसरीज फ्लॅट चप्पल किंवा जूतीसोबत अगदी सहज घालता येतील. त्याला असलेले घुंगरू किंवा टाईजचा ड्रेसला काँट्रास्ट रंग यामुळे ते छान उठून दिसू शकतात. हेअर स्टाइल करताना मुद्दाम दिसतील अशा गडद रंगाच्या किंवा सोनेरी पिना लावल्या तर त्या ड्रेसला छान दिसतात. यामध्ये तुमच्या लुकनुसार मेटॅलिक फिनिश आणि रंगीबेरंगी पिना, हेड पीसेस वापरता येतील.

फक्त काही नेहमीचे दागिनेच नव्हे तर ‘एक्स्ट्राज’सुद्धा ‘मिरवायचा’ हा ट्रेंड आहे. पूर्ण उंचीच्या वन पीसला आणखी उठावदार करणारे बेल्ट्स आता नव्या रूपात अर्थात ‘ओबी बेल्ट्स’ या प्रकारात आले आहेत. केवळ वन पीसच नव्हे तर स्कर्ट-टॉप, पलाझो-टॉप अशा सगळ्यावरही ओबी बेल्ट बांधता येतो. चायनीज किमोनोपासून प्रेरित झालेला ओबी बेल्ट हा बांधणी आणि भारतीय प्रिंटमध्ये अधिकच खुलून दिसतो. लॅक्मे फॅशन वीकमध्ये फॅब्रिकच्या एक्स्ट्राजना विशेष महत्त्व दिलं गेलं. लग्नसराईचा काळ आणि हिवाळ्याचा मौसम पुढे असल्याने शाल, स्कार्फ आणि दुपट्टा यांचा विशेषत्वाने वापर करून डिझाइन्स सादर केली होती. शाल आणि स्कार्फ हे ड्रेपिंगचा भाग असोत किंवा नसोत, पण ते मिरवायचे एक्स्ट्राज मात्र नक्कीच बनले होते. गळ्यात नेकपीसऐवजी फॅब्रिकचा नेकटाय, हाताला ब्रेसलेटऐवजी फॅब्रिकचा बो, पायात अँकलेटऐवजी कापडाचा टाय अशी सगळ्या अ‍ॅक्सेसरीजच्या जागी कपडा येत असताना, कपडय़ाचे हेअर बँड्स पुन्हा चर्चेत आहेत. डोक्याला बंडाना किंवा मुंडासं बांधल्याप्रमाणे रंगीत कापड गुंडाळणंही लॅक्मेमध्ये ट्रेंडी होतं.

एकूणच यंदाच्या लॅक्मेमध्ये केवळ पोशाखच नव्हे तर संपूर्ण लुकच ट्रेंडसेटर ठरला आहे. डिझायनिंगसोबत यंदा स्टायलिंगलाही अनेक नव्या टिप्स ‘लॅक्मे’ने दिल्या आहेत. हॅपी स्टायलिंग!

viva@expressindia.com