गेल्या महिन्याभरात सोशल मीडियावर एका तरुण मुलीचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. ओपन माईक माध्यमातून आपले विचार लोकांसमोर निर्भीडपणे मांडणाऱ्या नि स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार करत, लोकांची मानसिकता बदलली पाहिजे असं तळमळीनं सांगणाऱ्या एका तरुणीविषयी.

आजच्या डिजिटल आणि त्यामुळे इन्स्टंट जमान्यात अनेक गोष्टी पापणी लवण्याच्या वेगाने येतात, समजतात आणि नाहीशा होतात किंवा आपल्या न राहता त्या सगळ्यांच्या झालेल्या असतात. सुख, दु:ख अशा भावनासुद्धा ‘लोकांना हे कळायला हवं’ या अपेक्षेनं व्हायरल होतात. आपणच त्या व्हायरल करतो. आणि एका शेअरसरशी त्या भावना केवळ तुमच्यापुरत्या मर्यादित न राहता सगळ्यांच्या झालेल्या असतात. ‘खूप छान’ किंवा ‘अगदी वाईट’ असं अंगठे उंचावर किंवा खाली करत म्हणण्यापलीकडे जाऊन हे असं असायला हवं, तसं नको, हे झालं पाहिजे यासाठी आपण काय करतो? आजूबाजूला दिसतं, जाणवतं, दुखतं, खुपतं किंवा आवडतं ते जगासमोर मांडायला आवडणारी आजची जनरेशन आहे. नुसताच टाइमपास म्हणून उगीच पोकळ काही तरी न मांडता आपल्याला विचार करायला लावणारंही काही ही जनरेशन सोशल मीडियावर शेअर करीत असते. अशाच या नव्या पिढीतील एका मुलीचा व्हिडीओ गेल्या महिन्यापासून सोशल मीडियावर फिरत होता. स्त्रियांना हिणकस वागणूक देणाऱ्या समाजाबद्दल ही मुलगी आपल्या कवितांमधून ओरखडे ओढते. तिचा मोनोलॉग ऐकणाऱ्याला थेट जाऊन भिडतो आणि ती पोस्ट शेअर करावीशी वाटते, यातच तिच्या मांडणीची ताकद आहे. या मुलीचं नाव अरण्या ओपन माईक माध्यमाचा आधार घेत आपले विचार लोकांसमोर निर्भीडपणे मांडणारी अरण्या केवळ अठरा वर्षांची आहे.जोहर.

ओपन माईक माध्यमाचा आधार घेत आपले विचार लोकांसमोर निर्भीडपणे मांडणारी अरण्या केवळ अठरा वर्षांची आहे. सध्या मुंबईकर असलेली मूळच्या गोव्याच्या अरण्याने ‘ब्राऊन गर्ल्स गाईड टू जेंडर’ नावाची एक कविता एका ओपन माइक इव्हेंटमध्ये सादर केली. स्त्रियांना कायम दबावाखाली वावरायला लावणाऱ्या समाजावर या कवितेतून तिने ताशेरे ओढले होते. तिची ही कविता व्हायरल झाली आणि अरण्या सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली. ही कविता ऐकून अनेकांनी अरण्याला शुभेच्छा दिल्या, अभिनंदन केलं पण अनेकांनी तिला केवळ स्त्रीच्या भावनांचा विचार करणारी, एकतर्फी फेमिनिस्ट म्हणून टीका केली. याविषयी अरण्या सांगते, ‘फेमिनिझम म्हणजे स्त्री-पुरुष समानता. स्त्रियांना आणि पुरुषांना ज्या ज्या क्षेत्रात किंवा रोजच्या जीवनात केवळ त्यांच्या जेंडरमुळे कमी लेखलं जातं, त्याच्या मी विरोधात आहे. फेमिनिझम अर्थात पुरुषांनाही लागू आहे. उदाहरणार्थ एखाद्या बाळाचा ताबा देण्याची वेळ येते तेव्हा बाबा बाळास वाढविण्यास योग्य असूनही केवळ बाई म्हणून आईलाच बालसंगोपनासाठी लायक ठरवलं जातं. अशा किती तरी गोष्टी आहेत. समाजात समानता नाही, हे एक भीषण सत्य आहे ज्याबद्दल आपण कोणीच बोलत नाही.’

आपल्या शब्दांमधून, छायाचित्रांमधून लोकांच्या मानसिकतेला हात घालण्याचा अरण्याचा हा प्रवास तिच्या वयाच्या तेराव्या वर्षीच सुरू झाला. इन्स्टाग्राम, ओपन माईक स्टेज, ओपन स्काय स्लॅम अशा वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करत अरण्या आपल्या कविता आणि त्यामधून आपले विचार समाजापर्यंत पोचवायला प्रयत्न करत आहे. पुढे इंग्रजीची पदवी घेण्याची इच्छा असणारी अरण्या अनेक किरकोळ वाटणाऱ्या पण महत्त्वाच्या असणाऱ्या सामाजिक विषयांवर फार प्रगल्भपणे बोलून जाते.

‘आज आपल्या समाजात, सामाजिक विचारसरणीत अनेक त्रुटी आहेत. त्या केवळ बोलण्याने नाही तर कृतीतूनच नाहीशा होऊ  शकतात. आजही स्त्री-पुरुष समानता केवळ बोलण्यापुरती दिसते. स्त्रीला अनेक बाबतीत कमी लेखलं जातं, कमी महत्त्वाचं स्थान दिलं जातं आणि असेही कित्येक प्रसंग येतात जिथे पुरुषांनाही अत्याचाराला तोंड द्यावं लागतं. तो काय पुरुषासारखा पुरुष.. असं म्हणत पुरुषांना गृहीत धरलं जातं. त्यांच्या भावनांचा विचार होत नाही. या विषमतेवरच व्यक्त होणं मला आवश्यक वाटतं. यातूनच फेमिनिझमची संकल्पना आपलीशी वाटते. पण काही जण याचा विपर्यास करत आपल्या सोयीप्रमाणे याचा वापर करतात,’ असं ती म्हणते.

समाजात असे अनेक गहन विषय आहेत ज्याबद्दल आपल्याला माहीत असूनही आपण त्याबद्दल अनभिज्ञ असल्यासारखं दुर्लक्ष करत राहतो. आपल्या मित्रमंडळीत, कुटुंबात, खासगी आयुष्यातही तणावाखाली जगणारे अनेक जण आहेत. केवळ आपल्यापुरतं न जगता दुसऱ्यांचं दु:ख समजून त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी किंवा जगण्याची नवी उमेद देण्यासाठी जगता येणं जास्त महत्त्वाचं आहे. अरण्यासारखं ते आपल्यालाही जमेल की नाही माहीत नाही पण प्रयत्न करायला हरकत नाही. ‘साथी हात बढाना’ हे ब्रीदवाक्य महत्त्वाचं. अर्थात आपलं काम सोडून लोकांच्या सेवेसाठी पळावं असं काही माझं म्हणणं नाही, पण जमेल तेव्हा आपल्या संपर्कात असण्याऱ्यांना ‘सगळं बरंय ना?’ असं विचारलं तर त्यांनाही बरं वाटेल. आपले प्रश्न, समस्या या फार मोठय़ा होतात जेव्हा आपण त्यांना मोठं बनवून कुरवाळत बसतो, त्यामुळे जिथे आहोत तिथून उठणं महत्त्वाचं. प्रॉब्लेम्स तर आहेत पण त्यांच्याशी दोन हात करता यायला हवं. ‘आखिर एक बार यह जिंदगी मिलती है, मुस्कुराके जीना सिख ले फिर देख हर मुश्कील छोटी लागती है।’

viva@expressindia.com