स्कॉटलंडमधील युनिव्हर्सिटीमध्ये वास्तुकला जतन-संवर्धनासंदर्भातील पदव्युत्तर शिक्षणासाठी सोळा महिने एडिंबराला राहिलेली आणि सध्या मुंबईत प्रोजेक्ट असिस्टंट असणारी प्रियांका लेले सांगतेय तिचे स्कॉटिश अनुभव.

हाय फ्रेण्ड्स, या सदराच्या निमित्तानं थोडंसं भूतकाळात डोकावायला मला आवडेल. माझा अरुणकाका आíकटेक्ट होता. त्याचा हरहुन्नरीपणा आणि आíकटेक्चरवरच्या प्रेमाविषयीच्या गोष्टी माझ्या लहानपणी बाबा सांगायचे. त्या ऐकून मला या क्षेत्रात रस वाटायला लागला. तेव्हा माझा समज होता की, इमारतींचं डिझाइन काढायचं नि त्या उभारायच्या. पुढं हळूहळू त्यातल्या विषयांची माहिती आणि वैशिष्टय़ं कळू लागली. तेव्हा इमारतींचं जतन आणि संवर्धन करणं वगैरे माहिती नव्हतं. वाटलं की, हे क्षेत्र वेगळं असून कलेशी निगडित आहे. घरच्यांचं सांगणं होतं, ‘ड्रॉइंग-पेंटिंगमध्ये रस असेल तर तू त्याकडं वळ’. पण त्या ‘सीईटी’च्या परीक्षा आधीच होऊन गेलेल्या. बारावीनंतर ठरवलं की, इंजिनीअरिंग किंवा मेडिकलला नव्हे, तर मला आर्किटेक्चरला किंवा हॉटेल मॅनेजमेंटला जायचंय. मग फक्त त्यासाठीच्याच परीक्षा दिल्या. नेमका त्या वर्षी रिझल्ट उशिरा लागून, जाम धावपळ होऊन, मला ‘रिझवी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर’मध्ये प्रवेश मिळाला.

‘रिझवी’मधलं पाच वर्षांचं शिक्षण पूर्ण केलं. मग एका सीनिअरकडे थोडे दिवस इंटर्नशिप केली. त्याआधी कॉलेजमध्ये असताना प्रसिद्ध कॉन्झव्‍‌र्हेशन आर्किटेक्ट आभा नारायण लांबा यांच्याकडे इंटर्नशिप केली. त्यावेळी खूप चांगली संधी मिळाली. एका महिन्यात नैनितालच्या राजभवनाचं डॉक्युमेंटेशन करायचं होतं. तिथं काम करताना खूप मज्जा आली. तिथल्या रूम्सचे डायमेन्शन्स, दिवसभर ड्रॉइंग्ज काढणं, साइटवर प्रत्येकानं प्रत्येक मेजरमेंट घ्यायचं वगैरे वगैरे. दरम्यान मला लॅण्डस्केपिंगमध्येही खूप रस वाटू लागला होता. पण कॉन्झव्‍‌र्हेशन आणि लॅण्डस्केपिंगपैकी एकाच पर्यायाची निवड करायची होती. त्यात कॉन्झव्‍‌र्हेशनशी सरशी झाली. आम्हा मैत्रिणींना खूप मनापासून वाटत होतं की, पुढचं शिक्षण परदेशात जाऊन घ्यावं. त्या अनुषंगानं प्रयत्न सुरू केले. मधल्या काळात अहमदाबादमधल्या उएढळ(उील्ल३ी१ ऋ१ एल्ल५्र१ल्लेील्ल३ं’ ढ’ंल्लल्ल्रल्लॠ ंल्ल िळीूँल्ल’ॠ८) युनिव्हर्सटिीत लॅण्डस्केपिंगसाठी प्रवेश घेतला. तीन आठवडे त्या कॉलेजमध्ये गेले. फार छान वाटत होतं, आवडीचा विषय शिकताना. एकीकडं उत्सुकतेनं वाट बघत होते की, ‘यूके’मधल्या एखाद्या तरी युनिव्हर्सटिीत अ‍ॅडमिशन मिळेल.. आणि अखेर युनिव्हर्सटिी ऑफ एडिंबरा ‘एमएससी इन आर्किटेक्चर कॉन्झव्‍‌र्हेशन’साठी माझी निवड झाल्याचं पत्र आलं. त्यावेळी थोडी द्विधा परिस्थिती झाली होती की, जाऊ का नको.. पण शेवटी मैत्रीण श्रद्धासोबत एडिंबराला जायचा निश्चय झाला.

एडिंबरामध्ये प्रवेश परीक्षा नसली, तरी आपला पोर्टफोलियो पाठवायचा असतो. शिवाय कॉन्झव्‍‌र्हेशन फिल्ड आणि एडिंबरा युनिव्हर्सटिीचीच का निवड केलीत, याविषयी सविस्तर निबंध लिहून पाठवायचा. या कोर्सला माझ्यासोबत वेगवेगळ्या फिल्डमधले विद्यार्थी होते. आम्ही पाचजण भारतीय होतो. आम्ही खूप एन्जॉय केलं. तिथं पोहोचल्यावर वावरणं फारसं जड गेलं नाही, कारण इथं असताना गुगल मॅपच्या सोईमुळं सगळं प्लॅनिंग करत व्हच्र्युअली मी फिरून घेतलं होतं. मी शुगर हाऊस क्लोज या प्रायव्हेट हॉस्टेलमध्ये राहात होते. माझे फ्लॅटमेट्स खूप छान होते. तिथून दहा मिनिटांच्या अंतरावरच्या युनिव्हर्सटिी हॉस्टेलमध्ये श्रद्धा राहात होती. माझ्या हॉस्टेलचं लीज आधी संपलं आणि आठवडय़ाभरानं श्रद्धाचं लीज संपणार होतं. त्यामुळं मी तिच्या हॉस्टेलवर गेले. कारण हा वर्षभराचा कोर्स संपल्यावर एक्स्ट्रा चार महिने तिथं राहायला मिळणार होतं. त्यादरम्यान जॉब मिळवण्यासाठी चाचपणी करायची होती. राहण्याची सोय होण्यासाठी जाहिराती देत राहिलो. त्याला प्रतिसाद देणाऱ्या कुटुंबाचं मोठ्ठं घर होतं. घरमालक पॉल डोनाल्ड स्कॉटिश आणि त्याची बायको हुडा इस्रायली होती. ती भारतात येऊन गेलेली असल्यानं तिला भारताविषयी माहिती असल्यानं ते आमच्या पथ्यावर पडलं.

आम्हाला शिकवायला होते ग्रीक प्रोफेसर दिमित्रिस थिओडोसोपॉलोस. तिकडं अशा ग्रीक प्रोफेसर्सची संख्या जास्त आहे. तिकडचे पॅलेस, चर्च वगैरे दाखवायचे. बांधकामात कोणत्या पद्धतीचा दगड वापरला गेलाय, उंचीचं प्रमाण कसं आहे, त्याची डागडुजी कशी केलेय, हे बघायला फार मजा आली. प्रत्येक ठिकाणाचं फार चांगल्या प्रकारे जतन आणि संवर्धन केलेलं दिसत होतं. मी भारतात परतल्यावर प्रोफेसरांचा ई-मेल आला होता. ते मला गाइड करू शकतील, असा विषय मी तिथं असताना निवडला होता. विषय होता- डिफरंट टाइप्स ऑफ स्ट्रक्चरशी निगडित होता. या कोर्स दरम्यान हॅमर बीम रुफ ट्रसचा उपयोग कसा करता येईल, यावर आमच्या ग्रुपला प्रबंध लिहायचा होता. तो प्रबंध मेलविल हाऊसिंग असोसिएशन बोर्डासमोर सादर करायची संधी मला मिळाली. काही निवडक प्रबंध इतर युनिव्हर्सटिीजमध्ये पाठवायचे असतात, त्यात माझ्या निबंधाचा समावेश होता. ए ग्रेड मिळाल्यापेक्षा त्यांनी तो पाठवल्यानं मी खूप खूश झाले होते.

तिकडचे प्रोफेसर्स विद्यार्थ्यांच्या शंकांचं पटकन निरसन करतात. विचारलेल्या शंकेला ठाम उत्तर देताना त्यात ‘मे बी’ शब्दांचा समावेश करतात. त्याचा अर्थ ‘मी सांगतोय, त्याखेरीज काही शक्यता असू शकतात, त्यांचा विचार करा’, असा असतो. आपल्याकडं बरेचदा चौकटीबाहेर विचार केला जात नाही. आपल्याकडं टायलेंट जास्त असूनही त्याला योग्य तो वाव मिळत नाही. तिथं तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि लायब्ररीची सुविधा लगेच उपलब्ध होते. त्यामुळं आमच्या विचारशक्तीला अधिक चालना मिळाली.

कॉलेजचं वातावरण खूप छान होतं. माझी वर्गातली बेस्ट फ्रेण्ड चायनीज होती. ग्रीक, अमेरिकन, स्कॉटिश, ऑस्ट्रेलियन, इक्वेडोरचे, बार्बाडोसहून आलेले मित्र-मैत्रिणी होते. सगळ्यांची पाश्र्वभूमी वेगवेगळी होती. आíकटेक्चरखेरीज कला-इतिहास, मास मीडियाचेही काहीजण अभ्यासक होते. त्यामुळं लेक्चरना वेगळीच मजा यायची. वर्गातल्या संवादीपणामुळं प्रोफेसर्सना आमची बॅच बेस्ट वाटली होती. आमचे प्रोफेसर दिमित्रिस यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी एक प्रबंध लिहायचा होता,-डुंटाव्‍‌र्ही कॅसलवर. इथले बॅरल व्हॉल्ट वैशिष्टय़पूर्ण आहेत. त्याचा अभ्यास करायचा होता. त्या साइटवर भरपूर पाऊस होता. तिथं हार्ड हॅट आणि ठरावीक प्रकारचे शूज घालायची सक्तीच आहे. तसं तयार होऊन आम्ही सव्‍‌र्हे करायला गेलो. तिथल्या नागमोडी नक्षीकामाचं- व्हॉएटचं सर्वेक्षण करायचं होतं. कारण तो निखळून थोडासा खाली आला होता. त्याचा आकार विचित्र झाला होता. त्याची डागडुजी कशी करू शकता येईल, ते आम्हाला सांगायचं होतं. त्यावेळी मोजमापाचं साहित्य उपलब्ध नव्हतं. परत गेलो तेव्हा कसं करावं, काय करायचं ते ठरलं नव्हतं. पुन्हा गेल्यावर ते सगळं ठरवून गेलो. पण साहित्य घ्यायला विसरलो. ती जागा आडबाजूला होती. वारा एवढा सुटला होता की, उडून जातोय की काय, अशी भीती वाटत होती.. अखेर तिसऱ्यांदा गेल्यावर काम झालं. हॉस्टेलमध्ये राहाताना जेवणाखाण्याची गैरसोय झाली नाही. प्रसंगी छोटय़ा कुकरमध्ये मी खिचडी वगैरे करायचे. चीज, ब्रेड, सलाडची खूप छान व्हरायटी मिळायची. तिथल्या सगळ्या डिश मी ट्राय केल्या. गंमत म्हणून स्कॉटिश व्हिस्कीही ट्राय केली होती. आपल्या पाणीपुरी-शेवपुरीची फार आठवण यायची. फिल्ड टूरच्या निमित्तानं अनेक साइट व्हिजिटला घेऊन जायचे. त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे कपडे घेऊन जावेत, तिथलं वातावरण कसं असेल, वगैरेचे अचूक अंदाज आमचे कोर्स डिरेक्टर प्रोफेसर माईल्स ग्लेंडनिंग सांगायचे. ते इतके चपळ होते की, त्यांच्यासोबत चालणं म्हणजे शब्दश: मॅरेथॉन असायचा. त्यांना सांगावं लागे की, थोडं हळू चाला. आमची स्टडी टूर जर्मनीत होती. तिथंही हेच मॅरेथॉनचं चित्र होतं. त्यांच्याकडं अफाट माहितीचा खजिना होता. टूरचं त्यांनी अगदी मिनिटामिनिटांचं आयोजन केलं होतं. वेळेच्या बाबतीत ते खूप पर्टिक्युलर होते. त्यांच्याकडची माहिती भराभर आम्हाला देऊ बघायचे. त्या धावपळीनं नि माहितीच्या सातत्यपूर्ण ओघानं आम्ही थकलेलो असायचो, पण ते फ्रेशच असायचे. त्यानंतर युरोपातही आम्ही प्रवास केला. स्टडी टूरमधला ऑíकनी आयलंडमधला अनुभव फारच अमेझिंग होता. तिथं जर्मन प्रोफेसर्स आणि विद्यार्थ्यांसोबत गप्पा मारायला, चर्चा करायला, एकत्र काम करायला फार धमाल आली. जर्मनीत होऊन गेलेल्या दोन युद्धांनंतरच्या जतन-संवर्धन केलेल्या वास्तू, त्यानंतर उभारल्या गेलेल्या वास्तू, त्यासाठीचे प्रयत्न याविषयी बोलणं झालं. स्कॉटलंडबरोबर लंडन, ऑक्सफर्ड, केंब्रीज आदी ठिकाणीही फिरले.

मी भारतात येऊन तीन महिने झालेत. आम्ही मित्रमंडळी सोशल साइटच्या माध्यमातून संपर्कात आहेत. आम्ही एकत्र राहणाऱ्या तीन भारतीय मित्रमंडळींनी ग्लास्गो गणपती मंडळात जाऊन गणेशोत्सव सेलिब्रेट केला होता. दिवाळीला आम्ही स्कॉटलंडमध्येच होतो. नंतरच्या आमच्या ग्रॅज्युएशनसाठी आलेल्या एका मित्राच्या पालकांनी आणलेल्या फराळावर आम्ही ताव मारला होता. सध्या मी ग्रासरुट रिसर्च अ‍ॅण्ड कन्सल्टन्सीमध्ये प्रोजेक्ट असिस्टंट म्हणून काम करतेय. मी डेहराडूनमधला आसान बॅराझ, केशोपूर छांबमध्ये पाणथळ जागेचा विकास आणि संवर्धन, पंजाबातल्या पोंग डॅमचा पर्यटन विकास, अमृतसरमधील हेरिटेज यादीतल्या गोबिंदगडावर लॅण्डस्केप, एन्व्हार्मेटल इम्पॅक्ट असेसमेंट, उल्हास नदीचं जलसंपदा आणि संवर्धन व्यवस्थापन या कामांत सहभागी झालेय. या कामांचा अनुभव गाठीशी असल्यानं त्यात आणखी एक्सप्लोर करायला आवडेल. इको टुरिझम आणि इको लॅण्डस्केपिंग ही सध्या काळाची गरज आहे. इको टुरिझमच्या अनुषंगानं पाहिल्यास कॉन्झव्‍‌र्हेशनची गरज वाढतेय. आपल्याकडं साइटस् भरपूर आहेत आणि शैलींमध्ये चिक्कार प्रयोग नि वैविध्य आहे. त्यासंदर्भात लोकांना थोडीफार जाग येतेय नि पावलं उचलली जाताहेत. काही हेरिटेज जागा विचारपूर्वक रिस्टोर करून त्या रियुज करता येऊ शकतात. त्याबरोबरीनं लॅण्डस्केपचाही विचार करता येईल. आणखी काही वर्षांनी पीएच.डी. करायचा विचार आहे. आई-बाबांचा मला कायमच भक्कम पाठिंबा लाभलाय. ‘ग्रासरुट’च्या पल्लवी लाटकर मॅडमचा कायमच मला सपोर्ट आहे. एडिंबरामधल्या वास्तव्यामुळं शिस्त आणि वेळेचं महत्त्व आणखीन कळलंय. चौफेर विचार करून एखादी गोष्टी जाणून घ्यायची पद्धत अंगी बाणवली गेलीय. आजवर अभ्यासलेल्या गोष्टी आणि अनुभवांची सांगड कामात योग्य रीतीनं घालण्याचा प्रयत्न करतेय.. विश मी लक.

– प्रियांका लेले
एडिंबरा
(शब्दांकन- राधिका कुंटे) 

तुम्ही स्वत: किंवा तुमच्या आसपासच्या १८ ते ३० वयोगटातल्या, वेगळ्या प्रांतात, नवख्या देशात, वेगळी वाट निवडून शिक्षण, नोकरीच्या निमित्तानं दुसऱ्या राज्यात किंवा परदेशात राहणाऱ्या मुलींची किमान बेसिक माहिती तिच्या संपर्क क्रमांकासह आम्हाला नक्की पाठवा. ‘विदेशिनी’ कॉलमसाठी असा उल्लेख जरूर करा. त्यासाठी आमचा ई-मेल आहे –