रंगीत जिलेटिन पेपरमध्ये गुंडाळलेला, सुंदर रिबीन बांधून सजवलेला ‘डिझायनर हॅण्डमेड सोप’ सध्या गििफ्टग लिस्टमध्ये आघाडीवर आहे. कुणालाही देता येईल अशी ही सुगंधी भेट. पुन्हा इकोफ्रेण्डली आणि म्हणूनच स्किन फ्रेण्डली! ‘लक्झरी सोप’ म्हणून ऑरगॅनिक सोप प्रसिद्ध होताहेत. नैसर्गिक सुगंधानं परिपूर्ण साबण बनवणं ही एक कला आहे. काही हौशी कलाकार आवर्जून हॅण्डमेड सोप मेकिंग शिकत आहेत.  नवउद्योजक यामध्ये प्रयोग करत आहेत आणि त्याच वेळी देशी- विदेशी ब्रॅण्ड्समुळे लक्झरी सोपचं मार्केटदेखील ऐन बहरात आहे. काही कलाप्रेमी आणि प्रयोगशील ‘सोपमेकर’शी बोलून उलगडलेली ही सुगंधी कला.

आपल्या रोजच्या वापरात अशा अनेक छोटय़ा छोटय़ा गोष्टी असतात, ज्याकडे आपण सहज दुर्लक्ष करतो. म्हणजे ते वापरताना फारसा विचार करीत नाही. साधारणपणे शॉम्पू, साबण हे आपल्याकडे महिन्याच्या वाणसामानातूनच येतात. आपण हौसेने शॉपिंगला जातो, तेव्हा त्या यादीत साबण आवर्जून खरेदी करायचा नसतोच कधी. साबणाचे चॉइसही ठरावीक असतात अगदी.. जाहिरातीला भुलून नकळत केले गेलेले चॉइस.. त्यात फार बदल होत नाहीत. कधी कधी वास आवडतो म्हणून अमुक, कधी स्किन कॉन्शियस असल्यामुळे बेबी सोप, हिवाळा म्हणून ठरावीक सोप, दिवाळीसाठी चंदनाचा साबण, तर कधी स्वदेशी म्हणून ठरावीक ब्रॅण्ड इतकाच काय तो चेंज. पण सध्या मात्र लक्झरी सोप खरेदी करण्याचा ट्रेण्ड वाढतो आहे. विशेषत: ‘न्यू गिफ्टिंग आयडियाज’मध्ये लक्झरी सोप आघाडीवर आहेत. कुणी तुम्हाला सुंदर जिलेटिन पेपरमध्ये गुंडाळलेला, सुंदर रिबीन बांधून पॅप केलेला, डिझायनर हॅण्डमेड आकर्षक साबण गिफ्ट केला तर आश्चर्य वाटून घेऊ नका. अशी भेट मिळाल्यावर किती फ्रेश वाटेल नाही? आणि असा होममेड साबण असल्यामुळे त्यात केमिकल्स असण्याचा प्रश्नच नाही. तो इको फ्रेंडली असणार आणि त्यामुळे त्वचेला हानिकारक नसणार हे उघड आहे. सध्या हे साबण फार ट्रेण्डमध्ये आहेत.

नैसर्गिक घटकांचा वापर करून बनवलेले हॅण्डमेड सोप कलात्मकरीत्या सजवलेले असतात. पॅकिंगही आकर्षक असतं आणि या साबणांचा सुगंध अगदी वेगळा, धुंद करणारा असतो. या सुगंधातच या साबणांचं वेगळेपण आहे. त्यामुळेच याची गणना लक्झरी गिफ्टमध्ये केली जाते. असे साबण बनवणे ही कला आहे आणि ती सराव आणि तुमची कलात्मक कल्पनाशक्ती यामुळे वेगळी ठरतेय. हॅण्डमेड सोप बनवणाऱ्या काही जणींशी बोलताना ही साबण बनवण्याची प्रक्रिया फारशी सोपी नाही, हे लक्षात आलं.

असे साबण तयार करण्यासाठी दोन घटक सगळ्यात महत्त्वाचे असतात. तेल आणि कॉस्टिक सोडा (सोडियम हायड्रॉक्साइड). खोबरेल तेल, ऑलिव्ह ऑईल, बदामाचं तेल किंवा इतर कुठली लक्झरी इसेन्शिअल ऑइल वापरून साबण तयार करता येतो.  यासोबतच सुगंधासाठी जाई, जुई, गुलाब, पारिजातक अशा फुलांच्या रसाचा आणि त्या गंधाच्या तेलाचा वापर करता येऊ शकतो. तसंच विविध रंग, भाज्या, फळं, वनौषधी आदींचा वापर करूनसुद्धा साबण तयार केला जाऊ शकतो. यामध्ये आपल्या सोईनुसार आणि आवडीनुसार घटक बदलता किंवा वाढवता येऊ शकतात. आपल्या कल्पकतेवर आणि प्रयोगशीलतेवर आपण बनवलेल्या साबणांचा आकर्षकपणा अवलंबून असतो.

सोपमेकिंग ही कला आहे. यात प्रयोगशीलतेला इतका वाव आहे की, वेगळ्या प्रकारचे साबण बनवण्याची पॅशन लागते. आणि त्याचं व्यवसायात रूपांतर करणंही हल्लीच्या ऑनलाइन मार्केटिंगच्या जमान्यात तुलनेनं सोपं आहे. हॅण्डमेड सोप्स तयार करणाऱ्या राधा कुंके सांगतात, ‘भेट देण्यासाठी या साबणांची उपयुक्तता खूप वाढते आहे. हॅण्डमेड सोप गिफ्ट देण्याची क्रेझ सर्व वयोगटांतील स्त्री-पुरुषांमध्ये दिसते आहे. दिसायला आकर्षक असल्यामुळे आणि केमिकल नाही याची खात्री असल्यामुळे लोक सहज हे साबण घेतात. तसंच इतरांपेक्षा आपली भेटवस्तू वेगळी असेल या खात्रीमुळेही हे सोप्स लोकप्रिय होत आहेत.’ कुंके यांनी सोपमेकिंगची सुरुवात आंध्र प्रदेशातील ‘टिंबक  टू’ या स्वयंसेवी संस्थेपासून केली. तिथे शिकल्यानंतर पुण्यात आल्यावर त्यांनी खऱ्या अर्थाने यात प्रयोग करायला सुरुवात केली. त्या सांगतात, ‘साबणामध्ये कडुनिंब, कोरफड, हळद, दूध, मध असं सगळं घातल्यामुळे त्वचा मऊ होते आणि त्वचेवर लकाकीसुद्धा येते. लग्न ठरलेल्या मुलींमध्ये या सोप्सची क्रेझ वाढते आहे, ती या नॅचरल ग्लो देण्याच्या गुणधर्मामुळे.’ राधा कुंके यांच्या मते तुम्ही जे पदार्थ खाऊ शकता ते तुम्ही आपल्या साबणांमध्येही सेफली घालू शकता. सोप मेकिंग इज अ‍ॅन आर्ट. साबण बनवण्याबरोबरच याचं पॅकेजिंगही महत्त्वाचं आहे.

पुण्यातील ‘स्मूदी डू’ या ब्रॅण्डच्या मृणालिनी काकडे सांगतात की, साबण तयार करण्यासाठी मेल्ट अ‍ॅण्ड पोअर अशी पद्धतीसुद्धा असते. मी तीच वापरते. यामध्ये साबण तयार व्हायला कमी वेळ लागतो. साबणाचा आपल्या त्वचेशी थेट संबंध येणार असल्यामुळे त्यासंबंधी पूर्ण काळजी घेणं आवश्यक असतं. होममेड सोपमध्ये पूर्णपणे नैसर्गिक साहित्य असल्यामुळे फायदा होतो. मी बनवत असलेल्या साबणात  कोरफड, केशर, कॉफी या सगळ्याचा वापर करते. बहुतेक सगळे होममेड सोप ग्लिसरीन बेस असल्यामुळे त्वचेसाठी चांगले असतात. या साबणांमध्ये खाण्याचे रंग वापरल्यास कुठल्याच रसायनाविरहित साबण तयार होऊ शकतो.

गुडगांवच्या ‘सोपवर्क्स इंडिया’च्या हरिणी शिवकुमार सांगतात, सोपमेकिंग ही क्रिएटिव्ह प्रोसेस आहे. तुम्हाला तुमची स्वतची खास रेसिपी यात शोधावी लागते आणि प्रयोग करता येतात. मी छंद म्हणून साबण बनवण्याची कला विद्यार्थिदशेत शिकले होते. पुढे बँकर म्हणून कार्यरत असताना हा छंद मागे पडला. पण आई झाल्यानंतर आणि मुलगा डाउन सिंड्रोमग्रस्त असल्याचं लक्षात आल्यानंतर मी माझा फुल टाइम जॉब सोडला. दरम्यान, माझा मुख्य आधारस्तंभ असलेली माझी आई कॅन्सरनं गेली, तेव्हाच मी कॅन्सरला कारण ठरणारी केमिकल्स आयुष्यातून हद्दपार करण्याचं ठरवलं. त्या संदर्भात जागृती करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी पुन्हा एकदा हर्बल सोप मेकिंगच्या छंदाकडे वळले. त्यातूनच आज माझा उद्योग सुरू झाला आहे. माझ्यासारख्या छोटय़ा उद्योजकाला आवश्यक प्लॅटफॉर्म मिळाला सोशल मीडियामुळे. फेसबुक आणि ‘सेल्फी’सारख्या माध्यमातून मी बनवलेल्या साबणांची विक्री सुरू केली. सेल्फीमुळे मला फ्री ऑनलाइन स्टोअर सुरू करता आलं आणि ग्राहकांशी थेट संवाद साधणंही शक्य झालं. आत्ता देशात असे मोजून ३ ते ४ ब्रॅण्ड्स आहेत जे पूर्णपणे नैसर्गिक आहेत आणि तरीही लक्झरी ब्रॅण्ड म्हणून नावाजले आहेत. त्यामुळे या उद्योगाला आपल्या देशात भरपूर वाव आहे.

‘मेहेक अरोमा’च्या ब्रॅण्ड ओनर दीप्ती देशपांडे सांगतात, ‘अजून हा ट्रेण्ड नवीन आहे. मी प्रदर्शनांमधून हॅण्डमेड साबण विकायला सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला, ‘साबण काय भेट म्हणून द्यायचा’ किंवा ‘बापरे इतका महाग साबण!’ अशाही प्रतिक्रिया मिळायच्या. मात्र एकदा ही कला आहे आणि तिचं सौंदर्य लोकांना समजलं आणि सुगंध भिनला की, ते तुमच्या कलेची कदर करायला लागतात. जालना, औरंगाबादसारख्या ठिकाणीदेखील होममेड साबणांचं प्रदर्शन भरवलं होतं आणि त्याला उत्तम रिस्पॉन्स मिळाल्यानंतर लोकांना हे आवडतंय, हे पटलं. आता मेहेक अरोमा ब्रॅण्डमध्ये परफ्यूम आणि ब्यूटी प्रॉडक्ट्ससोबतच होममेड सोप्सची संख्याही वाढवली आहे.’ हे साबण कस्टममेड असतात. तुम्हाला आवडतील तसे रंग आणि सुवास यात वापरता येतो. शिवाय बनवणाऱ्याचा स्पेशल टच या साबणाला मिळतो.  दीप्ती सांगतात, ‘केमिकल्स नाहीत, त्यामुळे सेफ चॉइस असतो. वेगवेगळी तेलं आणि वेगळ्या गुणधर्माचे घटकपदार्थ वापरून कोरडय़ा त्वचेसाठी वेगळा तर ऑइली त्वचेसाठी वेगळा असा साबण बनवला जातो. इंटरनेटवरही याबाबत मुबलक माहिती मिळते. तुमच्या आवडीचा सुगंध आणि हवा तसा फिनिश देता येऊ शकतो. इट गिव्ह्ज यू अ फ्रेश स्टार्ट फॉर डे.’

साबण बनतो कसा?

साबण तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. कोल्ड प्रेस ही पद्धत सध्या लोकप्रिय होते आहे. होम मेड हर्बल सोप बनविण्यासाठी खोबरेल तेल, ऑलिव्ह ऑइल, इतर सुगंधी तेल, सोडियम हायड्रॉक्साइड आणि थंड पाणी हे लागतं. याशिवाय तुम्हाला आवडेल अशी सुगंधी द्रव्य आणि केशर,  कोरफड, दूध अशी औषधी द्रव्यही वापरता येतात.

हॅण्डमेड साबणाची ‘लक्झरी’

हॅण्डमेड किंवा ऑरगॅनिक साबणांचे अनेक ब्रॅण्ड्स उपलब्ध आहेत. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टपासून अनेक ऑनलाइन शॉिपग वेबसाइट्सवरून हे साबण मागवता येऊ शकतात. त्यातील काही प्रमुख ब्रॅण्ड्स

खादी : खादी ब्रॅण्डच्या साबणांची बरीच व्हरायटी उपलब्ध आहे. या साबणांमध्ये चॉकलेट, मध, दूध, केवडा यांचा वापर जास्त असतो. किंमत  ७० ते १३० रुपयांपर्यंत

सोलफ्लॉवर : १०० टक्के फळं आणि भाज्यांपासून बनलेले साबण हे वैशिष्टय़. यामध्ये गाजर, संत्र, केळं, िलबू याचा वापर असतो.  किंमत १५० ते ५०० रुपयांपर्यंत.

फॉरेस्ट इसेन्शियल : लक्झरी आयुर्वेद या नावानं लोकप्रिय होत असलेला हा ब्रॅण्ड पारंपरिक ‘कोल्ड प्रेसिंग’ पद्धतीने साबण बनवतो. केशर, दालचिनी, ग्रीन टी असे वेगळे घटक वापरून बनवलेले साबण, हॅण्डमेड लक्झरी बटर सोपचेही पर्याय आहेत. किंमत ३५० ते १००० रुपयांपर्यंत.

बॉडी शॉप : स्किन फ्रेण्डली आणि ऑरगॅनिक ब्युटी प्रॉडक्ट्ससाठी प्रसिद्ध  बॉडी शॉप मोजके ऑरगॅनिक सोपदेखील देतो. याची किंमत साधारण २०० रुपये आहे. व्हाइट फ्लॉवरसारखे वेगळे सुगंध इथे मिळू शकतात.

कामा आयुर्वेद : आयुर्वेदिक साहित्यासाठी हा एक प्रसिद्ध ब्रॅण्ड आहे. यांची किंमत साधारणपणे १९५ ते ४७५ रुपये आहे.

इराया : सुंदर कलात्मक पॅकिंग हे या ब्रॅण्डचं वैशिष्टय़ आहे. त्यामुळे गिफ्ट देण्यासाठी याला पसंती असते. साबणामध्ये व्हॅनिला, मध, दूध, डािळब आदी घटकांचा वापर केला जातो. किंमत १७५ रुपये.

याशिवाय न्यासा, डिअर अर्थ, गुलनार, वर्ट, सॅण्ड फॉर सोपाहोलिक, दो बंदर, लास नॅचरल्स, सॉईल अ‍ॅण्ड अर्थ, वाडी हर्बल्स असे अनेक ब्रॅण्ड्स आहेस.

सोपमेकिंग ही क्रिएटिव्ह प्रोसेस आहे. तुम्हाला तुमची स्वतची खास रेसिपी यात शोधावी लागते आणि प्रयोग करता येतात. मी छंद म्हणून ही कला शिकले. पुढे बँकर म्हणून काम करताना छंद मागे पडला. कॅन्सरमुळे आईचं निधन झालं, तेव्हा आयुष्यातून केमिकल्स हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आणि ऑरगॅनिक प्रॉडक्ट्सबाबत जागृतीसाठी पुन्हा एकदा हर्बल सोपमेकिंगकडे वळले. माझ्यासारख्या छोटय़ा उद्योजकाला आवश्यक प्लॅटफॉर्म मिळाला सोशल मीडियामुळे. फेसबुक आणि ‘सेल्फी’सारख्या माध्यमातून मी बनवलेल्या साबणांची विक्री सुरू केली.   – हरिणी शिवकुमार

-निहारिका पोळ