निरनिराळ्या माध्यमांतल्या व्यक्तिरेखांना आपल्या वेशभूषेने अधिकच सुंदर, वास्तववादी बनवणारी सायली सोमण आहे आजची कल्लाकार. कपडय़ांचा आणि व्यक्तिरेखेचा पोत निगुतीनं हाताळणाऱ्या या वेशभूषाकर्तीविषयी..

सध्या ‘रुद्रम’ ही मालिका चर्चेत आहे. निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘बापजन्म’ या सिनेमाचा टीझरही लोक पाहतायत. ‘वर खाली दोन पाय’ हे वेगळं नाटकही लोक समजून घेतायत. या तीनही कलाकृतींतील समान धागा आहे, आजची कल्लाकार म्हणजेच वेशभूषाकार सायली सोमण. सायलीने या तिन्ही कलाकृतींसाठी कपडेपट आणि वेशभूषा सांभाळली आहे.

लहानपणापासूनच सायलीचा कल कलात्मक गोष्टींकडे होता. चित्रकला, रंगकाम, स्केचिंगची आवड होतीच. कपडे आणि त्यांच्या पोताविषयी तिला फार उत्सुकता वाटायची. लहानपणी आरशासमोर उभं राहून आईच्या ओढण्या आणि कपडे निरनिराळ्या प्रकारे ड्रेप करायला तिला भारी आवडायचं. आठवी-नववीत असताना तिने फॅशन डिझायनिंग करायचं ठरवलं. तिने पुण्यात एसएनडीटीतून होम सायन्स घेत बॅचलर ऑफ सायन्स (टेक्स्टाइल सायन्स अ‍ॅण्ड अपॅरल डिझायनिंग) केलं. मग पुणे विद्यापीठात पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा (फॅशन डिझायनिंग अ‍ॅण्ड क्लोदिंग टेक्नॉलॉजी) केलं. या क्षेत्रात येण्यासाठी घरच्यांचा कायमच पाठिंबा होता.

सायली सांगते की, ‘‘पोस्ट ग्रॅज्युएशनला असताना फायनल फॅशन शोच्या वेळी प्रसिद्ध फॅशन डिझायनर हेमंत त्रिवेदी आमचे परीक्षक होते. तेव्हा मोस्ट क्रिएटिव्ह स्टुडंट म्हणून मला पुरस्कार मिळाला. याचबरोबर मला हेमंत त्रिवेदींकडे इंटर्नशिपही करायला मिळणार होती; पण काही कारणामुळे त्यांना परदेशात जावं लागलं आणि ही संधी हुकली. नंतर कॉश्चुम डिझायनर पायल सलुजाकडे मी इंटर्नशिप केली. त्यांनी ‘रांझणा’ या सिनेमाचे कॉश्चुम केले होते, तेव्हा मी त्यांना साहाय्य केलं. नंतर एमएफडीसीच्या वीस म्हणजे वीस या चित्रपटासाठीही मी साहाय्यक वेशभूषाकार म्हणून काम केलं. मग टप्प्याटप्प्याने कामं मिळत गेली आणि मी स्वत: कॉश्चुम डिझायनर झाले.’’

कॉश्चुम डिझायनरच्या विचारप्रक्रियेबद्दल ती सांगते की, ‘‘कथानकात त्या भूमिकेविषयी काय लिहिलंय, ते कसं आकार घेतंय, हे महत्त्वाचं असतं. नेहमीच काही प्रत्येक भूमिकेला ग्लॅमरस, छान कपडय़ांची गरज नसते. भूमिकेची गरज, वय, काम, कुटुंब, शिक्षण या साऱ्या गोष्टी लक्षात घेऊन कपडे ठरवावे लागतात. दिग्दर्शकाशी याबद्दल चर्चा करावी लागते, कारण त्याचा दृष्टिकोन सगळ्यात महत्त्वाचा असतो. रंगसंगती अर्थात कलर पॅलेट ही दिग्दर्शक आणि कलादिग्दर्शक, छायाचित्रकार या सगळ्यांशी चर्चा करून ठरवावी लागते.’’

प्रत्येक माध्यमासाठी वेशभूषेचा वेगळा विचार होतो. त्याविषयी सायली म्हणते, ‘‘मालिकेत क्लोज शॉट जास्त असतात. फुल व्ह्य़ू किंवा मास्टर व्ह्य़ू दिसत नाही. त्यामुळे क्लोजमध्ये कलाकार कसे चांगले दिसतील, याचा विचार करावा लागतो. मालिकांमधली पात्रं रोजच्या रोज दिसतात. त्यामुळे प्रेक्षकांना त्यांच्याशी स्वत:ला जोडता येणंही महत्त्वाचं असतं. एखाद्या व्यक्तिरेखेची विशिष्ट वेशभूषा गाजते. मग प्रेक्षकही त्याच नावाने त्याच्याशी जोडले जातात. आपोआप त्या व्यक्तिरेखेचं नाव त्या विशिष्ट कपडय़ाला नाही तर दागिन्याला मिळतं. उदा. ‘देवयानी’मधला संग्राम शर्ट किंवा ‘होणार सून..’मधल्या तेजश्रीचं मंगळसूत्र. त्यामुळे व्यक्तिरेखेचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. चित्रपटासाठी वेशभूषेचा विचार करताना जास्त मजा येते, कारण तो कमी कालावधीचा असतो आणि बहुसंख्य पात्रांचा विचार करण्याची मुभा असते. यात टीमवर्क अधिक असतं. चित्रपटनिर्मितीच्या आधी कामाची तयारी करायला अधिकाधिक वेळ मिळेल तितकी ती पात्रं अधिक उठून दिसतात. मग त्या चित्रपटाचा फील छान येतो. तर नाटक हा लाइव्ह परफॉर्मन्स असतो. त्यात अशी वेशभूषा हवी की, ज्यामुळे कलाकारांना मोकळेपणाने काम करता येईल. अभिनय करताना अवघडलेपण येईल असे कपडे टाळावे लागतात. एखाद्या पात्राच्या वेशभूषेत बदल करताना ते करण्यासाठी त्याला मिळणाऱ्या वेळेचंही भान ठेवावं लागतं. मी स्वत: नृत्यांगना असल्याने लाइव्ह परफॉर्मन्स करताना काय करायला हवं आणि काय नको, हे मला माहिती आहे.’’

‘वर खाली दोन पाय’ हे नाटक ‘पुरुष’ या नाटकावर आधारित आहे. त्यामुळे त्यासाठी कॉश्चुम करताना सायलीला विशेष आनंद मिळाला. पात्रांचा प्रवास उत्तम रीतीने दाखवायचा प्रयत्न तिने केला. प्रकाश कुंटे यांच्या ‘जिप्सी’ या प्रवासावर आधारित सिनेमात हम्पीतील ट्रॅव्हलर लुकचे किंवा गोव्यातील परदेशी प्रवाशाचे इंडो वेस्टर्न-बोहेमियन लुकचे कपडे हवे होते. ते काम करायला सायलीला खूप मजा आली, कारण हम्पीसारख्या ठिकाणी आऊटडोअर करणं, हा छान अनुभव होता. तसंच हम्पीतच लमाणी पद्धतीचे कपडे घ्यावे लागणार होते. मग थोडी शोधाशोध करून सायलीने ते तिथल्याच लमाणी बायकांकडून विकत घेतले. आगामी ‘बापजन्म’ या सिनेमाविषयी ती म्हणते, ‘‘निपुण धर्माधिकारीसोबत काम करताना कल्पनांची खूप छान देवाणघेवाण होते. यातली पात्रं खूप वास्तवदर्शी आहेत.’’ वास्तववादी काम सायलीला आवडतं. म्हणूनच ‘झी युवा’वरच्या ‘रुद्रम’ मालिकेचं काम तिला विशेष आवडतं. या मालिकेत ती आधीपासून नव्हती. मालिकेची आधीची डिझायनर श्वेता बापट हिला काही अपरिहार्य कारणास्तव काम करणं शक्य नव्हतं. त्यामुळे मग सायलीने ते काम हाती घेतलं. सुरुवातीच्या काही भागांचे कॉश्चुम सायली आणि श्वेता यांनी मिळून केले आहेत. मालिकेचे दिग्दर्शक, डीओपी आणि लेखक गिरीश जोशी यांचे इनपुट्स सायलीसाठी फार महत्त्वाचे असतात. या मालिकेचं कलर पॅलेट इंग्लिश आहे. गरजेपलीकडे त्यात भडकपणा नाही. त्यामुळे ते सायलीसाठी आव्हानात्मक आहे. एका दिग्दर्शकाने सायलीला सांगितलं होतं की, कॉश्चुम तेव्हाच चांगले जेव्हा कलाकृतीत त्यांच्याकडे वेगळं लक्ष जात नाही. ‘झी युवा’वरच्याच ‘अंजली’ या मालिकेसाठीही सायली कॉश्चुम करतेय. यातील अंजली डॉक्टर असल्याने तिला साधे, प्लेन कुर्ते आणि कमीत कमी दागिने दिलेत. वैद्यकीय क्षेत्र असल्याने वेशभूषा साधी, सौम्य रंग ठेवलेत.

सायलीने जाहिरात क्षेत्रातही काम केलं आहे. निवडणुकीची प्रचार मोहीम, स्टार प्रवाह वाहिनीसाठी प्रो कबड्डी इव्हेंट आणि कॉर्पोरेट जाहिरात केली. ती म्हणते, ‘‘जाहिरातीसाठी नेमकेपणा महत्त्वाचा असतो. काही सेकंदांत एखादी गोष्ट सांगितली जाते. उत्पादनाच्या रंगाचा विचार करणंही महत्त्वाचं असतं. उदा. ‘जिप्सी’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी पाँड्सचे काही जाहिरातपट चित्रित केले आहेत. त्या वेळी पाँड्सच्या गुलाबी रंगाला प्राधान्य दिलं गेलं. जाहिरात करताना आपल्याकडे पटकन निर्णय घेण्याची क्षमता हवी. एखाद्या गोष्टीचे विविध पर्याय तयार ठेवावे लागतात. उपलब्ध साहित्यांत निभावून न्यावं लागतं.’’ सायलीने पर्सनल फोटोशूटचं कामही केलंय. रोहन गुर्जरच्या फोटोशूटमध्ये तिने त्याला मदत केली होती.

वेशभूषेच्या पलीकडे तिला नृत्याचीही आवड आहे. ती कथ्थक शिकली आहे. तसेच शामक दावरच्या डान्स अ‍ॅकॅडमीतही ती जात होती. कॉलेजला असताना अभ्यास आणि नृत्य ही कसरत ती सहज करत असे, पण आता काम आणि नृत्य हे समीकरण जुळवणं तिला अंमळ जड जातं आहे.

मनीष मल्होत्रांचं डिझायनर वेअर सायलीने बरंच फॉलो केलं होतं. पायल सलुजांकडूनही ती अनेक गोष्टी शिकली आहे. भानू अथय्या यांच्या कामातून तिला कायमच प्रेरणा मिळते. डॉली अहुवालिया यांचं स्टायलिंग सायलीला आवडतं. या सगळ्यांकडून काही ना काही शिकत ती आपलं काम करत असते. इम्तियाज अली, राजकुमार हिरानी, गुलजार आणि विशाल भारद्वाज यांच्यासोबत तिला काम करायचं आहे. नसीरुद्दीन शाह, माधुरी दीक्षित यांच्यासाठी कॉश्चुम करणं तिचं स्वप्न आहे. मराठीतही तिला विजय केंकरे, चंद्रकांत कुलकर्णी, समीर विद्वांस यांच्यासोबत काम करायचं आहे. तिला ऐतिहासिक कलाकृतीसाठी वेशभूषा करण्याची इच्छा आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिला स्वत:चं फॅशन लेबल किंवा डिझाईन स्टुडिओ सुरू करायचा आहे.

viva@expressindia.com