सिरीन या नावावरून ‘अ‍ॅपल’वाल्यांना ‘सिरी’बिरी असं काही आठवत असेल, तर त्याला आमचा नाइलाज आहे. मात्र सिरीन केवळ अ‍ॅप्लिकेशन नाहीये, तर ती तुम्हाला जगायला शिकवेल, अगदी हसतखेळत. सिरीन या कॅफे टिप्सेरियाची रेग्युलर वीकएण्ड मेंबर. ती सांगेल त्या युक्तीच्या चार गोष्टी असतील अगदी मनापासून.. ऐकायच्या की सोडून द्यायच्या, तुम्हीच ठरवा!

‘‘फिरोऽऽज.. सिरीन के टेबलपर एक ब्रून मस्का और चाय रख..’’ मी ऑर्डर न देताच पावरी आन्टीने रोजच्याच स्टाइलने माझ्या टेबलवर माझा मेन्यू पोहोचवला आहे. सो नाइस ऑफ हर! काय विचारताय.. मी कोण? अरे हो.. हाय फ्रेण्ड्स आवनी, बैसो.. हॅव अ सीट. मी सिरीन व्हिवावाला. तशी तर मी एक फॅशन स्टायलिस्ट आहे. ब्लॉगर आहे. कलाकार आहे.. हो! दुसऱ्यांना उपयोगी पडतील अशा टिप्स देणं ही कलाच आहे ना! इतरांना भन्नाट सजेशन्स आणि टिप्स देणं मला भारी आवडतं. गंमत म्हणजे माझ्या टिप्स लोकांना पटतात, आवडतात. म्हणून मी आता हे ऑफिशिअली टिप्स देण्याचंही काम स्वीकारलंय. इट्स फन. पण लोक्स.. यू शूड ट्रस्ट मी.

तर ही झाली माझी ओळख. आता नमनाला असं घडाभर तेल ओतल्यावर थेट मुद्दय़ाला हात घालते. तुमची-माझी आजची पहिली भेट.. माने फर्स्ट डेट! डेटिंग अ‍ॅप्स, फर्स्ट डेट, रोमॅण्टिक डेट, स्पॉइल्ड डेट हे हल्ली जरा जास्तच कानावर पडतंय. या कॅफेतही किती जण डेटसाठी येतात. विविध पात्रांची, स्वभावांची गोळाबेरीज या डेट्समध्ये मला दिसली. त्या दिवशी कॅफेत पावसाच्या मस्त गारव्यात गरम चहा पिताना माझ्या विचारांना चावी लागली आणि टिप्स देण्यासाठीचा पहिला विषय सापडला. ‘डेटिंग’ नावाच्या या प्रकरणात उत्सुकता, थोडंसं दडपण या दोन्ही गोष्टी असतात; पण डेटदरम्यान काही बाबी या उत्सुकतेची दिशाच बदलून जातात. डेटिंगचेसुद्धा काही एटिकेट असतात. चॅटिंग ते डेटिंगपर्यंतच्या या प्रवासातले असेच काही ‘डेटिंग डोस’ मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. सो हिअर वी गो..
ल्ल कम्फर्ट झोन : डेटवर जाताना कम्फर्टेबल कपडय़ांची निवड करा. उगाचच गडद रंग, लाऊड मेकअप, आवरता येणार नाहीत अशा न झेपणाऱ्या (आणि शोभणाऱ्या) अ‍ॅक्सेसरीज यांचा प्रयोग करू नका. हां.. पण जर एक्सपरिमेन्टल व्हायचंच असेल तर, या बाबतीत कोणा फॅशन एक्स्पर्ट मित्रमैत्रिणीचं ओपिनिअन घेण्यास हरकत नाही.

– समोरच्या व्यक्तीला दिलेली वेळ पाळा : तुम्ही डेट होस्ट करा किंवा करू नका, पण समोरच्या व्यक्तीला दिलेली वेळ पाळा, कारण तुमच्यासाठी वेळात वेळ काढून आलेल्या तिचा किंवा त्याचा वेळही फार महत्त्वाचा आहे. काही कारणाने उशीर होणार असेल, तर तशी पूर्वकल्पना देणं चांगलं, जेणेकरून समोरची व्यक्ती वेटरला चार वेळा ‘आय एम वेटिंग फॉर समवन..’ हे उत्तर देऊन ताटकळत बसणार नाही.

– नो ‘मी’पुराण प्लीज : डेटवर गेल्यावर स्वत:चा इम्प्रेसिव्ह ‘सीव्ही’ सादर करण्याची काहीही गरज नाही. मला हे आवडतं, हे आवडत नाही, माझं हे- माझं ते, माझे मित्र, माझे छंद, शिक्षण हे असं वाट चुकल्यासारखं बोलणं टाळा. तुम्ही इंटरव्ह्य़ूला नाही डेटिंगला आला आहात हे ध्यानात असू द्या. बी अ गुड लिसनर. ‘मी’पुराण लावण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीचंही म्हणणं ऐका. बोलण्यासाठी हलक्याफुलक्या गप्पांतूनच छानसा विषय फुलतो.

– भावनांना आवर घाला : कोणासोबतही डेटवर गेल्यावर समोरच्या व्यक्तीच्या ‘शुगरकोटेड’ बोलण्यात वाहवत जाऊ नका. ही फक्त डेट आहे, लग्नाचं प्रपोजल नाही हे लक्षात घ्या. ओव्हरइमोशनल होत उगाचच वेंधळेपणा करू नका. उलट एखाद्याचं बोलणं पटलं नाही. ती किंवा तो कोणत्या एका संवेदनशील विषयावर बोलू लागला तरीही स्वत:च्या भावनांना आवर घाला, वागण्या-बोलण्याचं थोडं भान असू द्या.

– मोबाइलला ब्रेक द्या : डेटवर गेल्यावर मोबाइलमध्ये वारंवार डोकावणं टाळा. ज्या व्यक्तीशी गप्पा मारण्यासाठी तुम्ही भेटलात ती/तो समोर असतानाही तुमचं मोबाइलमध्ये डोकावणं बरं दिसणार नाही. व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टा, एफबी या सगळ्यांचा चिवचिवाट काही क्षणांसाठी बंद ठेवा. त्याऐवजी त्या क्षणाला तुमच्यासाठी वेळात वेळ काढून आलेल्या ‘त्या’ व्यक्तीची कंपनी एन्जॉय करा.

– डोण्ट बीहेव्ह लाइक अ सीआयडी : एकमेकांच्या गतजीवनाचा आढावा घ्यायची गरज नाही. समोरच्याची आधीची रिलेशनशिप्स, ब्रेक-अप्स याबाबत आपणहून विचारणं टाळा.
ल्ल नो एक्स बिझनेस : स्वत:च्या ‘एक्स’बद्दल वारंवार बोलणंही शक्यतो टाळा. भूतकाळात रममाण होण्यापेक्षा वर्तमानात जगा. डेटचे ते मोजके क्षण, गप्पा, एकमेकांची कंपनी एन्जॉय करा. उगाचच ‘माझ्या एक्सला अमुक एक कार फार आवडायची..’ असा सूर छेडूच नका, कारण बीत गइ वो बात गइ!

– अ‍ॅटिटय़ूड सांभाळा: तुमचा अ‍ॅटिटय़ूड कसाही असो, पण राग, चिडचिड, गर्व याला आवर घाला. तुम्ही आयुष्यात स्वतंत्र आहात, प्रत्येक गोष्ट मनासारखी करता.. दॅट्स किंडा कूऽऽल! पण याचा गर्व करत त्याच अ‍ॅटिटय़ूडसह डेटिंगची पायरी चढू नका. समोरच्याशी बोलताना अ‍ॅग्रेसिव्ह होऊ नका. तुमचा हुकमीपणा तर इथे नकोच. हे काही लोकसभेचं सभागृह नाही की डिबेट कॉम्पिटिशन. सो..चिल! कीप काऽम.. इट्स जस्ट अ डेट.

– फ्लर्टिग नको : डेटवर असताना समोरच्याला दाद देणं, एखाद्या विषयावर छान संवाद साधणं यात काहीच वावगं नाही. हलकंफुलकं फ्लìटगही आजकाल चालतंय, पण मर्यादा सांभाळून वागा. डेटवर आलेल्या व्यक्तीसोबत किंवा त्या ठिकाणी इतर कोणासोबत काहीशी अन्कम्फर्टेबल आँखमिचौली स्ट्रिक्ट नो. दुसऱ्याचं अतिकौतुक टाळा.

– खोटेपणा नको : डेटवर असताना उगाचच खोटेपणाचा मुखवटा आणू नका. समोरच्याला इम्प्रेस करण्यासाठी तर हा प्रयोग नकोच. तुम्ही नेहमी असता तसे राहा, माहीत नसलेले विषय चघळत बसू नका. कधीकधी तोंडघशी पडण्याचीही वेळ येऊ शकते. गेल्या वीकएण्डलाच पाहिली अशी एक मुलगी इथे बाजूच्या टेबलावर.. ‘युरो कप’चा विषय निघाला तर म्हणे मी फुटबॉल फॅन आहे आणि ‘युरो’मधला आवडता खेळाडू कोण म्हणून ‘त्या’नं विचारलं तर म्हणे मेस्सी. एकच फुटबॉल प्लेअर माहिती होता तिला. बावली!
तर असो.. डेटिंग हे तसं डोईजडच आहे ना हे प्रकरण? बट.. फिकर नॉट फ्रेण्ड्स. ये सिरीन है ना! तुम्हाला अशा मोलाच्या टिप्स देईल की, तुम्हाला अगदी हुश्श होईल. (थोडा जास्त बडेजाव झाला.. आता आवरतं घेते) आता निघायला हवं. पुढच्या वीकएण्डला या कॅफे टिप्सेरियात भेटूच पुन्हा. बाय! सी यू फ्रेण्ड्स!

– सिरीन व्हिवावाला