हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी जाणून घेऊ या या नव्या सदरातून.

माणूस प्राण्याची व्याख्या करताना पु.ल. देशपांडे एका ठिकाणी लिहितात की, ‘माणूसपणाच्या सगळ्या व्याख्या रद्द करून काही वेळा खरेदीत आनंद मानणारा प्राणी म्हणजे माणूस, ही व्याख्या रूढ करावीशी वाटते.’ पुलंची ही व्याख्या विशिष्ट काळात जास्तच पटते. सणासुदीच्या दिवसांत हातात पिशवी घेऊन गच्च गर्दीत उतरलेल्या माणसांच्या चेहऱ्यावरील भाव एखाद्या युद्धासाठी निघालेल्या सैनिकांपेक्षा निराळे नसतात. पण जगाच्या पाठीवर साधारणपणे २००५ पासून ही संकल्पना सकारात्मक पद्धतीने बदलण्याचे श्रेय जाते ऑनलाइन खरेदीची सोय देणाऱ्या काही ई-कॉमर्स संकेतस्थळांना.. भारतीय मंडळींसाठी ऑनलाइन शॉपिंगचा मार्ग सहज करणारा ब्रॅण्ड म्हणजे फ्लिपकार्ट. दोन भारतीय तरुणांच्या यशस्वी उड्डाणाची ही कहाणी आहे.

ई-कॉमर्स ही संकल्पना जगभरात हळूहळू आकारत असताना दोन तरुणांना आपलं नशीब या क्षेत्रात आजमावून पाहावसं वाटलं. सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल. दोघेही चंदीगढचे रहिवासी, एकाच शाळेत शिकलेले, आडनावही सारखं आणि दोघांनी आयआयटी दिल्ली येथे शिक्षणासाठी प्रवेश घेतलेला. मात्र इतकी साम्यं असूनही दोघांची एकमेकांशी ओळख झाली नव्हती. आयआयटीच्या शेवटच्या वर्षांला असताना एका प्रकल्पासाठी दोघं एकत्र आले आणि मैत्री जुळली. आयआयटीमधून बाहेर पडल्यावर सचिनला अ‍ॅमेझोन या प्रसिद्ध अमेरिकन ई-कॉमर्स कंपनीत नोकरी लागली. दोन महिन्यांनी बिन्नीसुद्धा त्याच कंपनीत काम करू लागला. सगळं उत्तम चालू असताना या दोन मित्रांचं तरुण सळसळतं रक्त मात्र त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं. भारतीय खंडासाठी अशी ई-कॉमर्स सेवा सुरू झाली पाहिजे या विचाराने दोघा मित्रांनी चक्क अ‍ॅमेझॉनमधील नोकरी सोडली. आणि २००७ साली ४ लाख रुपयांच्या गुंतवणुकीसह स्वत:ची कंपनी सुरू केली. फ्लिपकार्ट ऑनलाईन सव्‍‌र्हिसेस. कंपनीची नोंेदणी सिंगापूर येथे झाली तरी कंपनीचं कार्यालय बंगळुरू इथे होतं. सुरुवातीला फ्लिपकार्टने फक्त पुस्तकविक्रीचा निर्णय घेतला. ई-कॉमर्स म्हणजे काय हे माहीत नसण्याच्या काळात प्रकाशनगृहांनी आपली पुस्तकं कंपनीला देण्यास नकार दिला. पुस्तकांचं दुकान नसताना ही मंडळी विक्री करणार कशी? असा प्रश्न त्या मंडळींना पडला होता. तो कसाबसा सोडवल्यावर पुढचं आव्हान होतं लोकांपर्यंत पोहोचणं. आपला हुद्दा, पद बाजूला ठेवून या बन्सल मित्रांनी चक्क गंगाराम बुकस्टोअरच्या बाहेर उभं राहायला सुरुवात केली. आतून बाहेर येणाऱ्या ज्या ग्राहकाच्या हाती पुस्तक असे, त्याला ही मंडळी फ्लिपकार्टची माहिती असलेले बुकमार्क देत. हळूहळू मागणी वाढत गेली आणि फ्लिपकार्ट हे नाव परिचित झालं.

त्यानंतरची मोठी उडी होती इलेक्ट्रॉनिक, स्टेशनरी, फॅशन आणि लाइफस्टाइलशी निगडित वस्तूंच्या विक्रीकडे वळण्याची. योग्य गुंतवणूकदारांच्या मदतीने तेही शक्य झालं आणि ऑनलाइन शॉपिंग विश्वात दखल घेण्याजोगी भारतीय ई-कॉमर्स कंपनी म्हणून फ्लिपकार्टकडे पाहिलं जाऊ  लागलं. हा प्रवास अडथळ्यांचाच होता. मुळात ऑनलाइन शॉपिंग ही संकल्पनाच भारतात फारशी परिचित नव्हती. त्यात भारतासारख्या अवाढव्य देशात प्रत्येक भागातील संस्कृती वेगळी, आवडी निवडी निराळ्या. त्या सगळ्याला एक ठोस रूप देणं आव्हानात्मक होतं. दुसरी महत्त्वाची समस्या म्हणजे ऑनलाइन पेमेंट ही संकल्पनासुद्धा रुजलेली नव्हती. त्यावर सचिन आणि बिन्नी यांनी पेमेंट ऑन डिलिव्हरीचा पर्याय शोधला. हाच आज अन्य ई-कॉमर्स कंपन्यांकडूनदेखील उपलब्ध करून दिला जातो. पण त्याचे विचारजनक मात्र फ्लिपकार्ट आहेत. मागवलेल्या वस्तू वेळेवर पोहचणंसुद्धा तितकंच आवश्यक होतं. वेगवेगळ्या चुकांमधून शिकत सचिन आणि बिन्नी यांनी हा व्यवसाय उत्तम मार्गी लावला.

४ लाख रुपयांच्या गुंतवणुकीने सुरू झालेला हा ब्रॅण्ड एप्रिल २०१७ मध्ये ११.६ अब्ज डॉलरच्या उलाढालीपर्यंत पोहोचला आहे. महिन्याला २५ लाख वस्तू इथून विकल्या जातात. तेहतीस हजार लोकांना या ब्रॅण्डने रोजगार दिला आहे. अनेक तगडय़ा ऑनलाइन शॉपिंग कंपन्यांना टक्कर देत फ्लिपकार्टने काही कंपन्या विकतही घेतल्या. मिंत्रा ही प्रसिद्ध फॅशन कंपनी त्यांपैकीच एक. २०१४ साली फ्लिपकार्टने भरवलेल्या बिग बिलियन सेलला न भूतो न भविष्यती असा प्रतिसाद मिळाला. तेव्हापासून ऑनलाइन शॉपर्स फ्लिपकार्ट सेलची वाट पाहू लागले

फ्लिपकार्टच्या लोगोमध्ये दिसणारी ट्रॉली शॉपिंगचा अनुभव देते. फ्लिपकार्टमधलं एफ अक्षर जाणीवपूर्वक गतिमानतेचा फास्टनेसचा अनुभव देतं. फ्लिपकार्टचं ब्रीद आहे, ‘अब हर विश होगी पुरी’. खूप साऱ्या जाहिरातबाजीच्या मागे न लागता सेवेवर भर देत फ्लिपकार्टने भारतीय ऑनलाइन शॉपिंग विश्वात स्वत:चं ठाम अस्तित्व निश्चितच निर्माण केलं आहे. अर्थात प्रत्येक ई-कॉमर्स कंपनीतल्या त्रुटी, मर्यादा, चढ-उतार इथेही आहेतच.

तरीही परदेशी ऑनलाइन शॉपिंग कंपन्यांच्या जंजाळात फ्लिपकार्टच्या अस्सल भारतीयत्वाचं कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. दोन तरुणांची धाडसी स्वप्नपूर्ती, चार लाखांच्या भांडवलापासून अब्जावधीपर्यंतची प्रचंड मोठी उडी आणि भारतीय जनतेच्या खरेदीची ओळखलेली नस.. या साऱ्या गोष्टींमुळे फ्लिपकार्टचं एक वेगळं स्थान आहे. खरेदीचं जटिल काम शब्दश: चुटकीसरशी करून टाकणारा हा ब्रॅण्ड म्हणूनच खास आहे.

viva@expressindia.com