गुगलइतक्याच महत्त्वाच्या बनलेल्या यूटय़ूब या माध्यम समुद्रातले वॉचलेले काही कण अर्थात काही मस्ट वॉचव्हिडीओ.

जाहिरातींचे विश्व वैचारिक वेडय़ांनी भरलेले असते. असाधारण कल्पनांचा तिथे तुटवडा नसतो. दररोज टीव्हीवर सिनेमा किंवा टीव्ही मालिका पाहताना या वेडकल्पनांनी भरलेल्या जाहिरातीच सध्या आपल्याला आपण नक्की काय पाहत होतो हे मध्यंतरामध्ये विसरायला लावतात. जाहिरातींचा भूलभुलैया उत्पादनविक्रीसाठी उपयुक्त किती प्रमाणात ठरतो, तो बाजाराच्या अभ्यासाचा भाग आहे. जाहिरातींची क्षणिक भुलावट मात्र आपल्याला खिळवून ठेवते. काही जाहिरातीतील मॉडल्स थेट उत्पादन हाती घेऊन टीव्हीवर पाहणाऱ्यांच्या माथी मारण्यासाठी सज्ज असतात. आपले खेळाडू शीतपेय घेण्याचा आग्रह करतात तर चित्रपट अभिनेते-अभिनेत्री साबणापासून फ्रीजपर्यंत विविध ब्रँड्सनी घर भरून टाकण्याचे आवाहन करतात. काही जाहिराती मात्र टीव्ही पाहणाऱ्यांनी विचारांना साद घालून जाहिरात कसली आहे, याचा शोध घेण्यासाठी तयार केल्या जातात.

पूर्वी एका सिलिंग फॅनची जाहिरात दूरदर्शनवर यायची. त्यात छिन्नी आणि हातोडा घेऊन दगडावर कोरीवकाम करणारी व्यक्ती दाखविली जायची. जाहिरातीच्या एका मिनिटाच्या कालावधीतच त्या कोरीव कामाचे अंतिम स्वरूप हे एका मान्यवर कंपनीचा पंखा असे. आता पंखा किंवा फॅन दगडातून कोरून बनत नाही, पण तसे दाखविले गेल्याने ती गंभीर-गमतीशीर जाहिरात म्हणून लोकप्रिय झाली. आपल्याकडे अलीकडे वैचारिक जाहिराती व्होडाफोनच्या झुझू मालिकांमधून आली. या सगळ्या मालिकांमध्ये समोर येणारी कार्टून्स काय आशय थोडक्यात मांडतायत, हे पाहण्यासाठी प्रत्येक व्यक्ती डोळे आणि टीव्ही पाहताना सहसा बाजूला ठेवले जाणारे डोके शाबूत ठेवत असे.

आपल्याला चॉकलेटच्या कित्येक जाहिराती माहिती असतील.  क्रिकेटवेडय़ा भारतामध्ये पूर्वी या उत्पादनाची एक जाहिरात एकेकाळी आवडीने पाहिली जाई. विशिष्ट चॉकलेट खाऊन आपल्या खेळाडू प्रियकराला मैदानात शिरून चिअरगर्लहून अधिक पाठिंबा देणारी तरुणी हे चॉकलेट खाणे म्हणजे ‘खास बात है’ बिंबवत होती. अलीकडे सासू-सुनेची नृत्यओढ दाखविणारी जाहिरातही गाजली होती. याच उत्पादनाची ऑस्ट्रेलियामधील गाजलेली जाहिरात खास पाहावी अशी आहे. त्यातली गोष्ट तुम्ही स्वत: रचायची आहे. दोन लहान मुले शूटिंगसाठी एकत्रित आणली आहेत, त्यातला मुलगा आणि मुलगी दोन्ही सात-आठ वयाची आहेत. वाजणाऱ्या संगीतावर त्यांना सादरीकरण करायचे आहे. ती काय सादर करतात, तर त्यांच्या भुवयांच्या एकसमान हालचाली आणि मुलीच्या हातात असणाऱ्या फुग्याला वाद्य करून तयार केलेला विचित्र आवाज. याच उत्पादनाच्या कॅनडाच्या जाहिरातीमध्ये काल्पनिक परग्रहवासी दाखविले आहेत. पृथ्वीवर परतण्यासाठी मानवी यान निघते आणि परग्रहवासी यानातील लोकांकडून चुकीने राहून गेलेले चॉकलेट पाहतात. ते खाल्ल्यानंतर तेथील एका परग्रह मानवाचे उन्मादी नर्तन सुरू होते. यातले अ‍ॅनिमेशन आणि गाणी लोकांच्या मनात खास बिंबून जातात.

मायकेल गॉण्ड्री या जाहिरातकाराची एक लोकप्रिय जाहिरात आहे. या जाहिरातीत एका सोहळ्यामधील गर्दीतून वैतागून बाहेर पडलेली मुलगी एका महालसदृश घराच्या परिसरात एकटी चालताना दिसते. अचानक अंगात वारे भरल्यासारखी ती नाचू लागते आणि सुपरपॉवर असल्यासारखे एक एक कृत्य करू लागते. पूर्ण तीन मिनिटे चालणारा हा प्रकार, मुलीचा मुद्राभिनय, नृत्यकौशल्य आणि शरीराची लवचिकता यांनी नक्की म्युझिक व्हिडीओ चाललाय की शॉर्ट फिल्म यांचा पत्ता लागत नाही. तीन मिनिटांनंतर आपल्याला ती केंझो वर्ल्ड या कंपनीच्या जगप्रसिद्ध उत्पादनाची जाहिरात असल्याचे दिसते. ते उत्पादन कसले, ते जाऊन पहावे. चकित होण्याची चांगली संधी आहे. ही जाहिरात मॅडपणाचा कळस आहे.

या जाहिरातीची लोकप्रियता इतकी आहे, की तिरपागडय़ा लोकांनी तिचे विडंबन केले आहे. आणि तो प्रकार म्हणजे विडंबनाचेच विडंबन आहे. या जाहिरातीचे विडंबन करणारे हौशी व्हिडीओ मेकर्स आहेत. पण त्यांची व्हर्शन्सही पाहणीय झालेली आहेत. हॉलीवूडचा दुसऱ्या फळीतील अभिनेता सॅम रॉकवेल याचेही गमतीशीर तिनेक मिनिटांचे व्हर्शन या कंपनीने केले आहे. जेसन स्टेथम हा ब्रिटिश अभिनेता त्याच्या हाणामारीच्या सिनेमांसाठी सुप्रसिद्ध आहे. विक्स डॉटकॉम या वेबसाइटसाठी त्याची आणि त्याच्या मैत्रिणीची एक मिनिटभर चालणारी जाहिरात हाणामारी वेडय़ांना आवडून जाईल. त्याच्या वेगवान सिनेमांइतकी ती आवडून जाईल. पुढील काळात दर्शक जसे दृश्यसाक्षर होत जातील, तसे जाहिरातींमधील मॅडपण वाढत जाणार आहे. दूरदर्शनच्या बाळबोध जाहिरातींपासून आत्तापर्यंत त्यात आलेल्या कलात्मकतेतून आपण काय घेतो ते महत्त्वाचे.

काही मस्ट वॉच अ‍ॅड लिंक्स

viva@expressindia.com