मन मंदिरा..असो किंवा देवा तुझ्या गाभाऱ्याला.असो.. ही गाणी आजही अनेकांच्या मनात रेंगाळतात आणि त्यातले शब्द आपल्या काळजाचा ठाव घेतात. शब्दांचा लिहिता धनी असणाऱ्या कल्लाकार मंदार चोळकर या कवी-गीतकाराचा हा शब्दमय प्रवास..

आपल्याला एखादं गाणं आवर्जून ऐकायला सांगितलं जातं तेव्हा त्यातले शब्द समोरच्याला आपल्यापर्यंत पोहोचवायचे असतात, असं म्हटलं जातं. गाण्याचे सूर आपलं मन मोहून टाकतात नि शब्द मनात घर करतात. अलीकडच्या मराठी गीतकारांमध्ये एक नाव सातत्यानं पुढे येतं आहे ते म्हणजे मंदार चोळकर. मंदारनं आजपर्यंत अनेक मराठी चित्रपटगीतं, मालिकांची शीर्षकगीतं, जाहिरातींसाठी गीतलेखन केलेलं आहे. प्रेमगीत असो किंवा विरहगीत, मत्रीपूर्ण गाणं असो किंवा गंभीर गीत.. तो अगदी सहज आपल्या शब्दांतून ते ते भाव मांडत असतो. मंदारला त्याच्या प्रवासाबद्दल विचारल्यावर तो सांगतो की, ‘२००६-०७ च्या सुमारास ‘नक्षत्रांचे देणे’ या कार्यक्रमात ग. दि. माडगूळकरांवर एक भाग झाला होता. तो पाहून मी प्रभावित झालो होतो. त्यांचं लेखन फारच अफाट आणि वैविध्यपूर्ण आहे. म्हणजे ते प्रेमगीतही लिहितात, अंगाईही लिहितात, देशभक्तीपर गीतदेखील लिहितात आणि गीतरामायणही लिहितात. त्यांच्या या शब्दकळेनं अजोड झालेल्या साहित्यसंपदेकडे पाहून आपणही लिहावं, असं मला वाटलं. म्हणून मी चारोळ्या लिहायला लागलो. त्यानंतर काही वर्षांनी मी ते लिहिणं थांबवलं कारण मी आधी लिहीत होतो तितक्याच चांगल्या प्रकारे आता आपल्याकडून लिहिलं जात नाहीये हे माझ्या लक्षात आलं. काहीतरी वेगळं करायला हवं, म्हणून मी त्या चारोळींच्या पुढं लिहिण्याचा प्रयत्न करण्याचं ठरवलं आणि तेव्हा मला लक्षात आलं की मी कविताही करू शकतो’.

model code of conduct, code of conduct,
आचारसंहिता समजून घेताना…
model code of conduct, code of conduct,
आचारसंहिता समजून घेताना…
Amruta Khanvilkar slam trollers
“तुम्हाला फक्त स्वतःची लाज वाटायला पाहिजे”, ट्रोलर्सवर संतापली अमृता खानविलकर; म्हणाली, “गप्प राहणं हे…”
lokrang, article, pandit kumar gandharv, singing style, thoughts, indian classical music, book, about to launch, gandharvanche dene pandit kumarjinshi sanvad,
कुमारजींचा सांगीतिक विचार

लिहिणारा कितीही उत्तम लिहीत असला तरी ते योग्य वेळी, योग्य त्या लोकांपर्यत पोहोचण्यासाठीही काही जोड लागते. त्यासाठी तत्कालीन लोकप्रिय समाजमाध्यम असणाऱ्या ‘ऑर्कुट’चा उपयोग मंदारला झाला. त्याच माध्यमातून त्याची संगीतकार नीलेश मोहरीर आणि आणखीन काहीजणांशी ओळख झाली. त्यानं आपलं लिखाण त्यांच्यासमोर मांडलं. त्यानंतर नीलेश मोहरीरनं मंदारला ‘लाइफ इज ब्युटिफुल’ या अल्बममध्ये गीतकार म्हणून काम करण्याची संधी दिली. त्यानंतर काही वर्षांनी चित्रपटांसाठीही लिहायला मंदारनं सुरुवात केली. ‘दुर्गा म्हणतात मला’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने चित्रपट संगीत क्षेत्रात गीतकार म्हणून पहिलं पाऊल टाकलं. त्यासाठी गीतकार रोहिणी निनावेंनी त्याचं नाव सुचवलं होतं, हेही तो आवर्जून सांगतो.

२०१३ मध्ये ‘दुनियादारी’ चित्रपटातलं ‘देवा तुझ्या गाभाऱ्याला’ हे मंदारचं गाणं सुपरहिट झालं आणि त्याच्या कामाची पोचपावती मिळाली. त्यामुळे हे गाणं त्याच्यासाठी खास असल्याचं तो सांगतो. हे गाणं सुपरहिट होण्याआधीच्या काळातच त्याच्याकडे काम यायला सुरुवात झाली होती. त्यानंतर कामाचा ओघ वाढतच गेला. तो सांगतो की, ‘एखादं गाणं हिट झालं की, त्याच प्रकारची गाणी लिहिण्याचा आग्रह धरला जातो. पण सुदैवाने तसं झालं नाही. ‘होणार सून मी या घरची’ मालिकेच्या शीर्षकगीतामुळं मी घराघरांत पोहोचलो. तर ‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटासाठीचं गीतलेखन माझ्या स्वप्नांच्या पलीकडचं होतं. त्या नाटकातील गाणी आधीच लोकप्रिय होती. या चित्रपटासाठी मला गीतकार म्हणून काम करायला मिळणं, ही मोठी गोष्ट होती. या निमित्तानं शंकर महादेवन यांच्यासोबत काम करायची संधी मिळाली. त्यांच्याकडून खूप काही शिकायलाही मिळालं’. केवळ मराठीच नव्हे तर ‘रुस्तुम’ या हिंदी चित्रपटासाठीही मंदारनं गीतलेखन केलं आहे. अलीकडेच आलेल्या ‘सरकार ३’साठीही त्याने गाणी लिहिली आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील गीतलेखनाची त्याची वाटचाल मजलदरमजल करत सुरू आहे.

मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेतील गीतलेखनाबद्दल तो म्हणतो, ‘मराठी भाषा ही जड आहे. आपण बोलतो ते गाण्यात लिहू शकत नाही. तसं हिंदीच्या बाबतीत नाही. आपण बोलतो ते गाण्यातही मांडू शकतो. मराठी गाण्यामध्ये हिंदी-इंग्रजी शब्द आले की टीका होते. पण काही वेळेस ती त्या गाण्याची गरज असते. म्हणजे कव्वाली असेल तर त्यात हिंदी-उर्दू शब्द येणारच, कॉलेजपार्टीचं गाणं असल्यास त्यावेळी त्याला साजेसे हिंदी-इंग्रजी शब्द येतातच. हिंदी ही त्यामानानं गोड भाषा आहे. उर्दू, भोजपुरी, अवधी, बंबईय्या हिंदी या सगळ्याचा वापर  हिंदी गाणी लिहिताना होतो तसं मराठीचं नाहीये. दुसऱ्या भाषेतले शब्द लिहिले तर टीका होते’. याशिवाय, मराठीतील उच्चारांचाही गाणी लिहिताना विचार करावा लागतो, असं तो म्हणतो. म्हणजे मराठीत शब्दाच्या शेवटच्या अक्षराच्या उच्चारावर जोर असतो तर हिंदीत शेवटच्या अक्षराचा पूर्ण उच्चार केला जात नाही. त्यामुळे तमिळ चालीवर लिहिलेली हिंदी गाणी काही वेळेस हास्यास्पद वाटतात. त्यामुळे गाण्याची चाल जशी आहे त्याला योग्य ठरेल अशाच भाषेचा वापर नीट करता आला पाहिजे, असं तो आग्रहाने नमूद करतो. ‘चाल आधी की गाणे?’, हा कुठल्याही गीतकाराला पडणारा चिरंतन प्रश्न आहे. त्यावर मंदारनं आपल्या अनुभवातून उत्तर शोधलं आहे आणि ते तो मोकळेपणाने सांगतो. कित्येकदा संगीतकाराने दिलेल्या चालीनुसार गाणं लिहायला सांगितलं जातं. सुरुवातीला मलाही वाटायचं की आधी आपण गाणं लिहावं आणि मग त्याला चाल लावावी. पण एकेक गाणं लिहिता लिहिता मी आपसूकच घडत गेलो. माझ्याबाबतीत सांगायचं तर मला चाल मिळत गेली आणि त्यावर मी शब्द लिहू शकलो. रोमँटिक गाण्यांच्या बाबतीत तर मी म्हणेन की, आधी चाल असेल तर बरं पडतं. कारण इतकी रोमँटिक गाणी लिहिल्यानंतर तेचतेच उगाळलं जाण्याची शक्यता असते. पण चाल आधी समजल्यावर गाण्याच्या मीटरचा अंदाज येऊन त्यात चपखल बसणारे शब्द पटकन सुचत जातात. चालीवर गाणं लिहिणं हीदेखील एक कला आहे. विरहगीत आणि प्रासंगिक गाण्यांसाठी आधी कविता मग चाल असायला हवी, असं मला वाटतं. कारण काहीही झालं तरी गाणं आधी आणि चाल नंतर हे मूळ तत्त्व आहे ते विसरून चालणार नाही, असं त्याने सांगितलं.

आजपर्यंत अनेक नामवंत गायकांनी मंदारच्या शब्दांना आपले सूर बहाल केले आहेत. गदिमा, शांता शेळके, सुधीर मोघे व गुरू ठाकूर हे त्याचे आवडते गीतकार तर नीलेश मोहरीर, हृदयनाथ मंगेशकर, श्रीनिवास खळे, शंकर महादेवन हे आवडते संगीतकार आहेत. एखाद्यानं व्यक्त केलेले विचार आपल्याला आवडतात तेव्हा तो आपल्याला आवडतो. कला आवडली की आपल्याला तो कलाकार आवडू लागतो, असं मंदारला वाटतं. चित्रपटासाठी गाणी लिहिण्याचा अनुभव वेगळा तसा मालिकेचाही असं तो म्हणतो. ‘संपूर्ण मालिकेच्या कथानकाचं सारांश सांगणारं, एका मिनिटात बसेल असं शीर्षकगीत लिहावं लागतं. चित्रपटगीतासाठी एक-दोन अंतरे मिळतात. जिंगल्समध्ये काही सेकंद ते एक मिनिटामध्ये संबंधित प्रॉडक्ट किती चांगलं आहे हे दर्शवणारे त्याचे गुणधर्म सांगायचे असतात. तसंच ते गाणं रंजक असणं आवश्यक असतं जेणेकरून ते लोकांच्या लक्षात राहील. ते गुणगुणतीलही आणि प्रॉडक्टही खरेदी करतील. ठरावीक अवधीत लोकांना अधिकाधिक आशय सांगायचा असतो’. त्या त्या माध्यमानुसार गाणी लिहिणं हे आव्हान पेलणाऱ्या मंदारला ‘रेडिओ म्युझिक मिरची पुरस्कार’सोहळ्यात ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटासाठी ‘अल्बम ऑफ द इयर’ हा पुरस्कार मिळाला. पण काही व्यवस्थापकीय अडचणीमुळं मंदार आणि शंकर महादेवन यांना एकच ट्रॉफी देण्यात आली. शंकरजींसोबत ही ट्रॉफी शेअर केली होती तो क्षण, तसंच ‘कट्यार.’च्या शंभराव्या दिवसानिमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं तो क्षण.. आपल्यासाठी अविस्मरणीय असल्याचं त्याने सांगितलं.  एखादं गाणं जितकं गायकाचं, संगीतकाराचं असतं तितकंच ते गीतकाराचंही असतं. मात्र संगीतकार आणि गायक हे कायम प्रेक्षकांसमोर येतात. गीतकार तसा फारसा दिसण्यात येत नाही. त्यासाठी रसिकांना त्याचा शोध घ्यावा लागतो. त्याबद्दल मंदार सांगतो, पडद्यामागे असणं हे गीतकाराचं दुर्दैव आहे. पण मी आणि माझे काही मित्र ‘वी-चार’हा कवितांचा कार्यक्रम करतो. गीतकारांनी स्वत:च स्वत:ची ओळख लोकांना कार्यक्रमांच्या माध्यमातून करून द्यायला हवी. पण गीतकाराला लोकं शोधत येतात हेही मला कौतुकास्पदच वाटतं’, असं म्हणत त्याला आलेल्या अनुभवाविषयीही तो बोलतो. ‘मन मंदिरा’ हे मूळ नाटकातीलच एक पद आहे असं लोकांना वाटायचं. पण ते मी लिहिलंय असं लोकांना समजल्यावर आवर्जून कौतुकाचे फोन आले. असा अनुभव खरंच सुखावणारा असतो. गीतकार म्हणून ओळख असलेला मंदार ‘सरगम’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून सध्या लेखकाच्याही भूमिकेत दिसतो आहे. या अनुभवाविषयी तो सांगतो, ‘सरगम’चं लेखन हा वेगळाच अनुभव आहे. मी यापूर्वी एपिसोड लिहिलेच नव्हते. फक्त शंकर महादेवन आणि आदर्श िशदे यांच्या दोन भागांचं मी एपिसोडिक लेखन करणार होतो. पण त्या दोन कार्यक्रमांनंतर मलाही त्यात रस वाटू लागला आणि मला पुढं लिहिशील का? अशी विचारणाही झाली. मग मीही लिहिणं सुरूच ठेवलं. मी हे ठरवून केलं नाही, पण हा अनुभव छान आहे. एका वेगळ्या भूमिकेत गेल्यानंतर लोकांकडून त्याचंही कौतुक होत असल्याबद्दल तो खूश आहे.

‘शब्द’ म्हणजे काय?, या प्रश्नावर एका दमात मंदार उत्तरतो ‘श्वास‘! यावरूनच त्याचं शब्दांविषयीचं प्रेम, आदर आणि त्याच्या आयुष्यात असणारं महत्त्व स्पष्ट होतं. आगामी ‘हृदयांतर‘ चित्रपटासाठी त्यानं गाणी लिहिली आहेत. ‘हृदयांतर’ची कथा वेगळी असल्यानं वेगळया प्रकारची गाणी करायला मिळाली. नेहमीच्या पठडीतली गाणी सोडून वेगळं काम करायला मिळालं, असं तो सांगतो. तसंच ‘ती आणि इतर’ या चित्रपटासाठी त्यानं बंदिश लिहिली आहे. ‘शुभमंगल’, ‘अगडबंब २’ आदी अनेक चित्रपटांमधून मंदारची गाणी आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. शब्दसख्याच्या शब्दकलेला अधिकाधिक बहर येवो, या शुभेच्छा.

कटय़ार काळजात घुसली या चित्रपटासाठी मला गीतकार म्हणून काम करायला मिळणं, ही मोठी गोष्ट होती. या निमित्तानं शंकर महादेवन यांच्यासोबत काम करायची संधी मिळाली. त्यांच्याकडून खूप काही शिकायलाही मिळालं’.

मंदार चोळकर

viva@expressindia.com