आपली मुलं काय खात आहेत, याच्याकडे प्रत्येक आईचं बारकाईनं लक्ष असतं. मुलांनी काय खावं काय खाऊ  नये, त्यांना कोणत्या गोष्टी आवडतात, कोणत्या गोष्टींची अ‍ॅलर्जी आहे याची खडान्खडा माहिती सर्व पालकांना असते. पण जी मुलं आई-वडिलांशिवाय राहतात त्यांचं काय? ज्यांच्या डोक्यावर छप्परच नाही अशा मुलांची फक्त खाण्याचीच नाही तर प्रत्येक गोष्टीची आबाळ होत असते. आजही देशात, जगात अशी करोडो मुलं आहेत, ज्यांचं वर्तमान आणि भविष्य अंधारलेलं आहे. आई-वडिलांचं छत्र हरवलेली, घरच्यांनाच नकोशी झालेली, जाचाला कंटाळून घरातून पळून गेलेली, परिस्थितीने गांजलेल्या, फसवलेल्या कोवळ्या जिवांना आपण नेमकं कशासाठी जगतोय याची कल्पनाच नसते. आला दिवस ढकलणं एवढंच त्यांच्या हाती असतं. मुलांच्या विविध प्रश्नांबाबत जागरूकता वाढली असली तरी आजही अनेक लहान मुलं आपल्या डोळ्यादेखत नको ते जिणं जगत असतात. आभाळंच फाटलंय तर ठिगळ कुठवर लावणार अशी परिस्थिती आहे. पण तरीही आपापल्यापरीने मदत करण्याचा प्रयत्न अनेक जण करतात. व्यक्ती, संस्था, सरकार यांच्या बरोबरीने समाज माध्यमातून मुलांसंबंधीच्या प्रश्नांना वाचा फुटत आहे. काहीतरी सनसनाटी किंवा संवेदनशील मजकूर अपलोड करायचा आणि हिट्स मिळवायचे हा सोशल मीडियाचा फंडा असला तरी अनेक वेळा त्यातूनच त्या विषयाला प्रसिद्धी मिळून प्रश्न सुटण्यास मदत झाल्याचेही समोर आलं आहे. पण प्रश्न मुळातून सुटत नाहीत हे देखील कटू सत्य आहे.

भंगार सामान गोळा करणाऱ्या एका तेरा वर्षांच्या मुलाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. कमलेश नावाचा भोपाळचा हा मुलगा व्हिडीओमध्ये मोकळेपणाने सर्व प्रश्नांची उत्तरं देताना दिसतोय. पण मुलाखत घेणारा आणि कमलेश यांच्यातील संवादांतून एक भयंकर वास्तव समोर येतं आणि आपण हादरून जातो. हा तेरा वर्षांचा मुलगा बीडी, सिगारेट, चरस, गांजा, दारू यांच्या आहारी गेल्याची बिनधास्त कबुली कॅमेऱ्यासमोर देतो आहे. इतकंच नव्हे तर अतिशय हानिकारक समजली जाणारी ‘सोल्यूशन’ची नवीन नशा कशी करायची याचं प्रत्यक्षिकही करून दाखवतो. घरून पळून आल्याचं आणि पुन्हा घरी जायचं नाही असंही तो सांगतो. कारण आई ही ‘सोल्यूशन’ची नशा करू देत नाही. गेल्या दोन-तीन वर्षांपासून तो ही नशा करतोय. दिवसाला अंदाजे सव्वाशे रुपये तो कमावतो. त्यातले वीस-तीस रुपये खायला आणि बाकी सर्व पैसे या नशेसाठी खर्च करतो. ही नशा म्हणजे आपल्यासाठी सर्व काही आहे, घरच्यांपेक्षाही मोठी अशी कबुली देताना त्याच्या चेहऱ्यावर कसलेच भाव दिसत नाहीत. नशेमुळे रक्ताच्या उलटय़ा झाल्या पण पुन्हा ‘सोल्यूशन’ प्यायल्यानेच बरा झालो हा त्याचा युक्तिवाद डोक्याला झिणझिण्या आणणारा आहे. एवढंच काय तर तो मरणालाही घाबरत नाही. जेव्हा वेळ येईल तेव्हा मृत्यू आपल्याला घेऊन जाईल असं हे कोवळं पोर बिनधास्तपणे म्हणतं.

मागच्या वर्षी आलेल्या ‘उडता पंजाब’ या चित्रपटात पंजाबमध्ये ‘ड्रग्ज’च्या आहारी गेलेल्या तरुणाईचं चित्रण अतिशय प्रभावीपणे करण्यात आलं होतं. पडद्यावर मांडलेलं वास्तव खरं असलं तरी जाहीरपणे ते मान्य करण्याची कुणाचीच हिम्मत नाही. खरंतर अमुक एका समस्येवर तमुक हे उत्तम आहे असं होत नाही. कारण प्रश्नांची गुंतागुंत न सुटणारी आहे. या मुलाच्या बाबतीतही त्याचं पालकत्व कुणी घेतलं तरी प्रश्न फक्त त्या मुलापुरताच सुटेल. पण ज्या सामाजिक परिस्थितीमुळे त्याची ही अवस्था झाली आहे ती कोण सुधारणार? त्यावर काहीतरी तोडगा काढावाच लागेल. कारण ती सुधारली तरच भविष्यात आणखीन ‘कमलेश’ तयार होणार नाहीत. म्हणूनच आपली सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी पहिल्यांदा ‘सोल्यूशन’ शोधून काढलं पाहिजे.

viva@expressindia.com