मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्याइतकंच महत्त्वाचं आहे. म्हणूनच शरीराला इजा होणार नाही याची काळजी घेत असतानाच मनही दुखावलं जाणार नाही हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. अनेकदा लोक नैराश्याची चिन्हे दुर्लक्षित करतात किंवा त्याचा संबंध इतर गोष्टींशी जोडून मोकळे होतात. पण वेळीच त्यावर उपचार केले नाहीत तर गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं. नैराश्य हे कोणत्याही वयाच्या स्त्री-पुरुषाला, समाजातील कोणत्याही स्तरातील व्यक्तीला येऊ  शकतं याची जाणीव असणं आवश्यक आहे. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक चांगल्या-वाईट अनुभवांना खंबीरपणे सामोरे जाणे, कुटुंबातील आणि समाजातील इतर लोकांशी निरोगी नातं जपणं अशी चांगल्या मानसिक आरोग्याची सर्वसाधारण व्याख्या होऊ  शकते. ज्याप्रमाणे एखाद्याच्या पोटात दुखतं त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती मनातूनही दुखावली जाऊ  शकते. त्यामुळे ज्याप्रमाणे आपण पोटाच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करीत नाही त्याचप्रमाणे मनाचं दुखणंही गंभीरपणे घ्यायला हवं. शारीरिक आजार निदान डोळ्यांना दिसतात पण मानसिक आजार हे कधी कधी त्यापेक्षा गंभीर असू शकतात. एखादी व्यक्ती यामध्ये स्वत:ला पूर्णपणे गमावून बसू शकते, एवढंच नव्हे तर समाजही एका संवेदनशील मनाला मुकू शकतो.

अमेरिकेतील आयोवा येथील हेअर ड्रेसर केली ओलसन हिने अलीकडेच आपल्या फेसबुक पेजवर एक पोस्ट टाकली. आपल्या सलूनमध्ये आलेल्या एका सोळा वर्षीय विद्यार्थिनीबाबतचा तो अनुभव होता. मात्र, त्याला असलेली भावनिक किनार अनेकांच्या मनाचा ठाव घेऊन गेली. सोळाव्या वर्षी जेव्हा अनेक मुली एक तर जास्तीत जास्त वेळ आरशासमोर व्यतित करीत असतात किंवा हातात मोबाइल घेऊन तोंड वेडंवाकडं करून, मान प्रत्येक कोनातून फिरवून आणि ओठांचा चंबू करून दिवसाला अगणित सेल्फी काढत असतात त्याच वेळी केलीच्या सलूनमध्ये आलेली ही विद्यार्थिनी वेगळ्याच मानसिक अवस्थेत दिसली. गेल्या अनेक दिवसांमध्ये ती आपल्या बिछान्यातून फक्त शारीरिक विधींसाठी उठली होती. ना वेळेवर जेवण, ना नटणं-मुरडणं, ना मित्र-मैत्रिणींसोबत बाहेर जाणं. अलीकडच्या काही दिवसांमध्ये तिने स्वत:कडे इतकं दुर्लक्ष केलं होतं की तिला आपल्या केसांतून फणी फिरवणंही त्रासदायक वाटत होतं. पूर्णपणे हताश झालेल्या विद्यार्थिनीला शाळेच्या ओळखपत्रासाठी फोटो काढायचा होता. तिने आपल्या विखुरलेल्या आणि निर्जीव झालेल्या केसांकडे पाहिले आणि थेट सलून गाठले. ती केलीला म्हणाली, हे केस विंचरणंही वेदनादायी आहे. माझे सर्व केस कापून टाक, याचा काहीही उपयोग नाही.

खरं तर केलीला त्या विद्यार्थिनीची सूचना ऐकायला काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण तिच्या शब्दांनी केलीला फार वाईट वाटलं. तिने मनाशी निश्चय केला की आपल्या परीने, शक्य तितकी मदत आपण करायची. त्यानंतर आयोवाच्या या हेअर ड्रेसर्सने पुढील दोन दिवस तब्बल तेरा तास या विद्यार्थिनीच्या केसांवर खर्च केले. तिला मुंडन करावं लागणार नाही, अशी किमया केल्यानंतरच ती स्वस्थ बसली. तिने केवळ केसांनाच ठीक केलं असं नव्हे तर मुलीच्या चेहऱ्यावरही अनेक दिवसांपासून लुप्त झालेलं हसू परत आणलं. त्या किशोरवयीन मुलीने जेव्हा १३ तासांनंतर स्वतला आरशात पाहिलं तेव्हा ती केलीला म्हणाली, ‘‘माझ्या शाळेच्या छायाचित्रासाठी माझ्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू उमटलंय. तू पुन्हा एकदा माझीच माझ्याशी नव्याने ओळख करून दिलीस. तुझे खूप खूप आभार.’’ केलीसाठी ही दोन वाक्यं खूप मोलाची होती. अशा घटना आवडीने निवडलेल्या व्यवसायाचं खरं चीज करून जातात. आपला हा संपूर्ण अनुभव केलीने फोटोसकट आपल्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे. त्यामध्ये विद्यार्थिनीची ओळख मात्र गुप्त ठेवली आहे.

दोन लाख लाइक्स, दहा हजारांहून अधिक प्रतिक्रिया आणि पंचाहत्तर हजारांहून अधिक लोकांनी ही पोस्ट गेल्या आठवडाभरात शेअर केलेली आहे. पण हे सर्व एवढय़ावरच थांबलेलं नाही. केलीवर ऑनलाइनच नव्हे तर ऑफलाइनही कौतुकाचा वर्षांव होतो आहे. अनेक जण तिच्या घरी पुष्पगुच्छ आणि पत्रं पाठवून तिचं कौतुक करतायत.

विविध कारणांमुळे एखादी व्यक्ती स्वत:चा तोल गमावून बसू शकते. तिचं मानसिक संतुलन बिघडलेलं असताना समाजातील इतर मंडळींनी अशा लोकांसाठी मदतीचा हात पुढे करायला हवा. केलीच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना अनेकांनी त्या विद्यार्थिनीच्या पालकांना तिच्या अवस्थेसाठी जबाबदार धरलं आहे. पण कुणाला दोष देत राहण्यापेक्षा कुणासाठी काही करणं, महत्त्वाचं असतं. केलीने आपल्या वागणुकीतून हे सिद्ध करून दाखवलं आहे. बदलती जीवनशैलीमुळे आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मानवी संवेदना कधी कधी बोथट झालेल्या पाहायला मिळतात. पण अशा काही प्रसंगामुळे मानवी संवेदनशीलतेचे नव्याने दर्शन घडते. शेवटी मुंडन करण्याचा सोपा पर्याय निवडायचा की संयम आणि एकाग्रतेची कसोटी पाहायला लावणारी केसांची देखणी वेणी घालायची, हे आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे.

viva@expressindia.com