तिने इंटिरिअर डिझायनिंगचं शिक्षण घेतलं आहे, पण घराच्या सजावटीत रमण्याऐवजी ती रमली, सुरांच्या सजावटीत. संगीत हाच ध्यास असलेली आजची कल्लाकार आहे; गायक, संगीतकार, गीतकार समीरा कोप्पीकर.

‘हेट स्टोरी २’मधल्या ‘आज फिर तुमपे प्यार आया है’ या गाण्याची खूप चर्चा झाली. लोकांना ते आवडलंसुद्धा. त्याचप्रमाणे अनुष्का शर्माच्या ‘एनएच १०’मधल्या ‘माटी का पलंग’ या गाण्यालाही समीक्षकांनी गौरवलं. शिवाय ‘बरेली की बर्फी’ या सिनेमातलं ‘बैरागी’ हे गाणं अनेकांनी ऐकलं असेल. तर या तिन्ही गाण्यांतील समान धागा म्हणजे गायिका, संगीतकार, गीतकार समीरा कोप्पीकर.

संगीताची आवड तिला घरातूनच मिळाली. वडील डॉक्टर असूनही सतार वाजवायचे. आई-वडील दोघंही पाश्चिमात्य संगीताचे चाहते. दोन्हीकडच्या आज्यासुद्धा शास्त्रीय संगीत शिकलेल्या. समीरा अगदी ४-५ वर्षांची असतानाच तिच्या आईने तिला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी मीना नागपूरकर यांच्याकडे पाठवलं. सुरांची ओळख झाल्यावर पुढे तिने भवदीप जयपूरवाले, सुनील बोरगावकर आदी गुरुजनांकडेही शिक्षण घेतलं. यानंतर तिला गुरू म्हणून लाभले, पाश्चात्त्य संगीत विश्वातले लुई बँक्स आणि जोई अल्वराज. सुरांसोबतच समीराला शब्दांचीही आवड होती. लहानपणीच ती गाणं शिकताना अनेकदा इंग्रजीत कविता लिहून त्याला चालीही लावत असे. इंटिरिअर डिझायनिंगचं शिक्षण घेताना, तिने कॉलेजमध्ये ‘अंश’ हा बॅण्ड तयार केला. तेव्हा काही गाणी बसवलीही होती पण काही कारणास्तव ती तो बॅण्ड मात्र एकत्र ठेवू शकली नाही. तिचे सहकारी बॅण्ड सोडून गेल्यानंतर तिने लुई बँक्स यांच्यासोबत कार्यक्रम केले.

‘हेट स्टोरी २’मधलं तिने गायलेलं ‘आज फिर तुमपे प्यार आया है’ हे गाणं खूप लोकप्रिय झालं होतं. पण तिला जास्त आनंद होतो, अनुष्का शर्माच्या ‘एनएच १०’मधल्या ‘माटी का पलंग’ या गाण्याची संगीतकार असण्याचा. कारण केवळ गायिका असण्यापेक्षा संगीतकार असणं, तिच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. हे गाणं खरंतर तिने आधीच तयार केलं होतं. मनुष्यप्राणी शेवटी माती आहे, मातीतच मिसळणार, असा त्याचा आशय होता. एका कौटुंबिक कार्यक्रमात विक्रमादित्य मोटवानींच्या आईने म्हणजे दीपा मोटवानी यांनी हे गाणं ऐकलं. त्यांना ते आवडल्याने त्यांनी समीराची ओळख थेट ‘एनएच १०’चे दिग्दर्शक नवदीप सिंग यांच्याशी करून दिली. या गाण्याला समीक्षकांनीही चांगलंच नावाजलं. पाश्र्वसंगीतात वाजणारं गाणं असूनही त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. यानंतर ‘दोबारा’ या सिनेमातील ‘अब रात गुजरनेवाली हैं’ हे गाणं समीराने आणि अरिजितने गायलं होतं. नुकत्याच आलेल्या ‘बरेली की बर्फी’ या सिनेमातलं ‘बैरागी’ हे गाणंही समीरानेच संगीतबद्ध केलं आहे. ते अरिजितने गायलं आहे.

बॉलीवूडमध्ये स्त्री संगीतकार तशा कमीच. त्यापैकीच एक आहे, समीरा. या परिस्थितीबद्दल बोलताना ती म्हणते, ‘‘संघर्ष तर सगळीकडेच आहे. पण मुलगी आहे, म्हणून आपण अमुक ते करू शकत नाही, अशी शिकवण मला कधीही मिळाली नाही. त्यामुळेच जिद्द आणि मेहनतीच्या बळावर मी काम मिळवते. सध्या अनेक संगीतकार आहेत. स्पर्धा वाढते आहे. पण त्यामुळे नवीन कलाकारांनाही संधी मिळते आहे. गाणं चांगलं असेल तर नक्कीच त्याचा विचार होतो. विविध विषयांवरील सिनेमे येत असल्याने, विविध प्रकारांतील, भावनांतील संगीतही ऐकायला मिळत आहे.’’

समीरा गायिका आहेच शिवाय गीतकार आणि संगीतकारही आहे. यातील संगीतकार ही भूमिका ती मनापासून एंजॉय करते. अर्थात स्वत: संगीतकार असली तरी आजच्या पिढीतल्या इतर संगीतकारांची गाणीही ती तितक्याच आवडीने ऐकते. दुसऱ्या संगीतकाराकडे गाताना ती त्याच्या कामात अजिबात ढवळाढवळ करत नाही. तर त्या संगीतकाराचा त्या गाण्याबद्दलचा दृष्टिकोन जाणून घेते आणि या सगळ्याचा अभ्यास करून नंतरच गाते. जुन्या पिढीतील एस. डी. बर्मन, सलील चौधरी यांची गाणी तिला आवडतात. तर सध्याचा रहमान, अमित त्रिवेदी, प्रीतम हे तिचे आवडते संगीतकार आहेत. किशोरकुमार आणि आशा भोसले यांचे आवाज तिला भुरळ घालतात. अरिजित सिंग, रेखा भारद्वाज, कविता सेठ, श्रेया घोषाल, सुनिधी चौहान यांचे आवाज तिला वैशिष्टय़पूर्ण वाटतात. शंकर महादेवन आणि विशाल ददलानी या संगीतकारांच्या संगीताइतकेच तिला त्यांचे आवाज आवडतात. तिला विद्या बालन, माधुरी दीक्षित, आलिया भट यांना आवाज द्यायचा आहे. शाहरुख, अक्षयकुमार, रणबीर कपूरसाठी गाणी तयार करायची आहेत. तर ए. आर. रहमान, विशाल भारद्वाज, प्रीतम चक्रवर्ती, अमित त्रिवेदी, विशाल-शेखर यांच्याकडे तिला गायचं आहे. समीरा जेव्हा स्वत: एखाद्या गाण्याला संगीत देते तेव्हा मात्र दिग्दर्शकाशी ती गाण्याविषयी चर्चा करते. गाण्याबद्दलचे त्याचे विचार जाणून घेते. कथेमध्ये केव्हा हे गाणं येणार आहे याचा अंदाज घेते आणि हे मुद्दे लक्षात घेऊन ते गाणं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेईल, या अंदाजाने बांधते. स्वत: गाणं लिहीत असल्याने तिला शब्दांचा आब राखून काम करायला आवडतं. निर्माते आणि म्युझिक कंपनीच्या बाजूनंही विचार करावा लागतो. कोणत्या कलाकारांवर गाणं चित्रित होणार आहे, त्यानुसार गायकांची निवड होते. सध्या सर्वाधिक प्रमाणात यूटय़ूबवर गाणी पाहिली-ऐकली जातात. त्यामुळे त्या व्हिज्युअल्सचाही गाणं तयार करताना विचार करावा लागतो. इम्रान खानची भूमिका असणाऱ्या ‘तडका’ या सिनेमाला समीरा संगीत देते आहे. शिवाय येत्या १-२ वर्षांत तिची तब्बल २० गाणी प्रसिद्ध होणार आहेत.

गाण्यापलीकडे समीराला खिलवण्याची आवड आहे. ती स्वत: उत्तम स्वयंपाक करते. शिवाय तिला चित्रकलेचीही आवड आहे. मुक्या प्राण्यांविषयी तिला विशेष कळवळा असून परिसरातल्या प्राण्यांना खाऊ-पिऊही ती घालत असते. समीराच्या सांगीतिक कारकीर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा!

गाण्यामध्ये फक्त आवाज महत्त्वाचा नाही, तर शब्द आणि स्वर दोन्हीचा संगम हवा. आवाज, स्वर आणि शब्द या तिन्ही गोष्टी एकत्र आल्यावरच उत्तम गाणं तयार होतं. संगीताच्या या क्षेत्रात स्ट्रगल मोठा आहे. आपल्या ध्येयाप्रती निष्ठा राखणं मला महत्त्वाचं वाटतं.

– समीरा कोप्पीकर

viva@expressindia.com