अर्थार्जनाची संकल्पना तरुणांसाठी पोटापुरती मर्यादित राहिलेली नाही. त्याचा विस्तार मनापर्यंत पोहोचला आहे. स्वत:च्या मर्यादांचं सीमोल्लंघन करून ते आनंदाच्या आणि त्यातून अर्थप्राप्तीच्या नवनवीन वाटा धुंडाळताना दिसत आहेत.

जीवनाची ‘नऊ  ते पाच’ मर्यादा ओलांडून काही तरी भन्नाट जगण्याचा निर्णय घेण्यासाठी खरोखरीच ‘जिगर’ असावी लागते आणि हे जिगर ज्या तरुणांकडे असते त्यांना कळलेला जीवनाचा आयाम हा काही औरच असतो. हल्ली गडगंज पगाराची, सर्व सोयीसुविधांनी परिपूर्ण, परंतु जिच्यात आपल्याला रस नाही अशी कंटाळवाणी नोकरी करून शनिवार-रविवारची वाट पाहण्यापेक्षा, या दिवसांसकट संपूर्ण आयुष्यच आपल्या आवडत्या क्षेत्रात व्यतीत करण्याचा निर्णय तरुणांकडून घेण्याचं प्रमाण आज वाढलं आहे. ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा!’ हे तत्त्वज्ञान अवलंबून, ‘आत्ता नाही तर कधीच नाही’ या भावनेचा उद्रेक होऊ न, आपल्या आवडीला स्वत:च्या व्यवसायात परावर्तित करताना तरुणांच्या चेहऱ्यावर जगावेगळं समाधान आज पाहता येत आहे. तेव्हा, कुणी फोटोग्राफीलाच आपल्या व्यवसायाचं रूप दिलं, तर कुणी नट्टापट्टा करणाऱ्या युवतीने हीच आवड वेडिंग मेकप आर्टिस्टच्या रूपातून पूर्ण केली आहे, कुणी गिर्यारोहण करताना त्यातूनच कल्पना चमकून ट्रेक प्लॅनर बनलं, तर कुणी आपल्या मिश्कील स्वभावाला यूटय़ूबसारख्या माध्यमातून लोकांसमोर आणून यूटय़ूब स्टार बनलं आहे. अर्थार्जनाची संकल्पना या जनांसाठी पोटापुरती मर्यादित न राहता तिचा विस्तार मनापर्यंत वाढलेली आहे. स्वत:च्या मर्यादांचं सीमोल्लंघन करून ही मंडळी आनंदाच्या आणि त्यातून अर्थप्राप्तीच्या नवनवीन वाटा धुंडाळताना दिसत आहेत.

तंत्रज्ञानाची मुबलक उपलब्धता, आपल्या आवडीला फाटा देऊ न परिस्थितीमुळे चाकोरीबद्ध आयुष्य जगलेले आणि आपली स्वप्ने मुलांच्या रूपातून बघणारे (काही अपवाद वगळता) आशादायी पालक आणि या मुलांची अफाट जिद्द या त्रिसूत्रीतून या मुलांकडून स्वत:च्या आवडीचं यशस्वीरीत्या व्यवसायात रूपांतरण होत आहे. या अनोख्या वाटेवरून जाणारे फारच कमी जण आपल्याला आढळतात कारण या सर्व प्रवासाचा पाया हा त्यांना गवसलेली ‘आवड’ आहे आणि ती आवड जोपासून त्यातून व्यवसायाची शक्यता निर्माण होण्यासाठी मनातून वाटणारा असाधारण आत्मविश्वास त्यांच्यात जागृत आहे.

आपल्या आवडीच्या क्षेत्रात भटकंती करत त्याला व्यवसायात बदलण्याची किमया करणाऱ्या या आधुनिक जिप्सींसाठी वळणवाटेने जाण्याचा हा प्रवास खचितच सोपा नसणार. शिक्षण क्षेत्र हे भारताने तसं फारसं मनावर न घेतलेलं क्षेत्र आहे. याच अस्वस्थतेतून, मानशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या सूनृता सहस्रबुद्धे हिने या शिक्षण क्षेत्राला गंभीरपणे घेण्याचा निर्णय घेतला आणि तिच्या ध्यासाचा अनोखा प्रवास सुरू झाला. लहान मुलांसोबत आपला वेळ मनासारखा जातोय ही आपली आवड ओळखल्यानंतर आपण याच मुलांसाठी शिक्षण क्षेत्रात काही कार्य करावं अशी इच्छा सूनृताच्या मनात निर्माण झाली. आज ती तान्ह्य़ा बाळापासून सहा र्वष वयोगटातील मुलांच्या विकासासाठी ‘अर्ली चाइल्डहुड डेव्हलपमेंट स्पेशालिस्ट’ म्हणून कार्यरत आहे. मुळात जीवनातील बहुतांश भाग हा व्यवसायात जातो आणि म्हणूनच सकाळी उठल्यावर जिथे जावंसं वाटलं पाहिजे अशा ठिकाणीच नोकरी करायची आणि केवळ विकेण्डपुरतं जगायचं नाही हे मनातून ठरवल्यामुळे तिच्या दोन्ही आवडी म्हणजे, मानशास्त्र आणि मुलांसाठीचं काम या दोघांचा सुवर्णमध्य तिला या व्यवसायात गाठता आला. भारतात या विषयासंबंधित वर म्हटलं त्याप्रमाणे गांभीर्य नसल्यामुळे स्कॉलरशिप मिळवून परदेशातून तिने शिक्षण घेतलं आणि परदेशातील अनेक चांगल्या संधींना नाकारून भारतात या शिक्षणाचा अवलंब करण्याचं यशस्वी धाडस तिने केलं. ‘द फर्स्ट थ्री’ या संस्थेची स्थापना करून तिच्या आवडीच्या व्यवसायाचा वटवृक्ष आज दिवसेंदिवस बहरत आहे. आपलं शिक्षण त्यातून निघालेली आपल्या आवडीची वाट आणि त्याचं आज झालेलं व्यवसायातील परिवर्तन हा प्रवास खरोखरीच मोहात पडणारा असतो.

परंतु अनेकांच्या बाबतीत असंही घडतं की, आई-वडिलांच्या व्यावहारिक समाधानाकरिता आपण एका क्षेत्रातील पदवी प्राप्त करतो, आणि नंतर आपली स्वत:ची वाट धुंडाळायला सुरुवात करतो.

सर्जनशील व्यक्तीला कधीही एका ठरावीक चौकटीत जगता येत नाही. त्याला त्याचे पंख पसरता येतील इतकं भव्य आकाश हवं असतं आणि म्हणूनच तो नावीन्याच्या शोधात भटकतो. ती गोष्ट सापडली की अलगद त्यात रुजतो आणि हळूहळू दाही दिशांतून फुलून येतो. असेच डबिंग आणि व्हॉईस ओव्हर क्षेत्रातील अवकाश गवसलं संकेत म्हात्रे या आपल्या मित्राला. इंजिनीअरिंगची पदवी प्राप्त करून काही काळ नोकरी केल्यानंतर मनात असणारी रंगभूमी संकेतला कुठे तरी साद घालत होती. यातूनच एक स्टुडिओ सुरू केला. याच स्टुडिओमध्ये एके दिवशी एक कलाकार उपस्थित न राहू शकल्यामुळे संकेतने तो आवाज द्यायचा प्रयत्न केला, निर्मात्यांना तो आवडला आणि यातूनच या क्षेत्राची त्याची सफर सुरू झाली. आज शेकडो इंग्रजी चित्रपटांसाठी, कार्टून्ससाठी, जाहिरातींसाठी संकेत डबिंग करतो. घरून असणारा सकारात्मक पाठिंबा आणि मनाला असणारी सर्जनशीलतेची ओढ, सातत्याने काम करत राहण्याची किमया संकेतला ‘कुछ तो अलग करना है!’ या वाक्यातील जिद्द देत राहते, असं तो सांगतो.

परंतु समाजात वावरत असताना, समाजाचे काही ठरावीक नियम पाळत असताना ‘लोक काय म्हणतील?’ हा उद्गारचिन्हाचे सोंग घेतलेला प्रश्न आई-वडिलांना पडणं काही गैर नाही. मुलाने शिक्षण घेतलं नाही तर नोकरी कोण देणार आणि नोकरी नाही केली तर.. या तीन टिंबांपुढचे सगळे तेच, जे आपल्याला ठाऊ क आहेत ते, प्रश्न त्यांच्या मनात पिंगा घालत असतात. अशा वेळी आपल्या आवडीचं आपण व्यवसायात रूपांतर करण्याएवढी क्षमता आपल्यात आहे हे त्यांना पटवून देण्यासाठी या जिप्सींचा कस लागतो. अशा वेळी कधी कधी पालकांच्या, समाजाच्या विरुद्ध जाऊन किंवा त्यांच्या आवडीप्रमाणे शिक्षण घेऊनही आपल्या मनातला व्यवसाय घडवणं हे आव्हान अनेकांना पेलावं लागतंच. फोटोग्राफीच्या छंदातून आज ‘रानवाटा’ सारख्या संस्थेमार्फत फोटोग्राफीचं वर्कशॉप्स आयोजित करण्यापासून ते कॉर्पोरेट व्हिडीओजपर्यंत सारे यशस्वीपणे हाताळणाऱ्या स्वप्निल पवारचे उदाहरण देता येईल. पाच-सहा वर्षांचा त्याचा सलग संघर्षांचा काळ सुरू होता. त्यात घरच्यांचा या क्षेत्राच्या निवडी वरून  प्रचंड विरोध होता. यातूनही मार्ग काढून, आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याची जिद्द आपल्याला हवं ते मिळवण्याचं कसब निर्माण करते, असं स्वप्निल स्वानुभवावरून सांगतो. त्या वेळी फोटोग्राफीसाठी गावोगाव फिरताना एस.टी.देखील परवडत नसल्याने अगदी एका गावातून दुसऱ्या गावात जाणाऱ्या दुधाच्या गाडय़ांमधून केलेला प्रवास असेल किंवा जेवणावर कुठलीही मर्यादा नसलेल्या खानावळीत दिवसातून एकदाच तुडुंब जेवून काढलेले दिवस असतील; ‘आज ते सारे आठवताना गंमत वाटते’ असं स्वप्निल म्हणतो, परंतु तो काळ अपेक्षित दिवसांकरिता पुढे ढकलणे आणि एक स्वप्न घेऊ न चालत राहणे ही नक्कीच सोपी गोष्ट नाही. ‘आता सकारात्मक परिणाम दिसायला लागल्यानंतर घरचे ‘त्रास’ देत नाहीत, परंतु आता योग्य वय झाल्यामुळे वेगळ्या कारणासाठी मात्र तो आवर्जून देतात’, असे मिश्कीलपणे स्वप्निल बोलून जातो. परंतु त्या काळात एका हातात कमेरा आणि दुसऱ्या हातात मनगटातील जिद्द असल्यामुळे सारे ठरावीक काळानंतर साध्य झाले हेदेखील तो नम्रपणे मान्य करतो.

असे शेकडो जिप्सी आज महाराष्ट्रात, देशभरात क्षणोक्षणी निर्माण होत आहेत. सुरुवातीला म्हटले ती अस्वस्थताच या साऱ्याला कारणीभूत आहे. ‘अगर किसी चीज को सच्चे दिल से चाहो तो पुरी कायनात उसे तुम से मिलाने में लग जाती है!’ हा ‘ओम शांती ओम’मधला संवाद शाहरुख खानच्या स्वानुभवातून आल्याचे प्रतीत होते. आपली आवड, ती पूर्ण करण्यासाठी आजूबाजूला उपलब्ध तंत्रज्ञान या सगळ्याचा योग्य तो फायदा घेत आजची तरुणाई वेगवेगळ्या वाटा धुंडाळते आहे. वकील, डॉक्टर, इंजिनीअर, सरकारी कर्मचारी, संशोधक अशा नेहमीच्या प्रस्थापित क्षेत्रांची जाण ठेवूनही आपला छंद केवळ छंद म्हणून न जपता त्यातून ‘अर्थ’मय जीवन घडवण्याची कला या तरुणाईने आत्मसात केली आहे. स्वत:ला घडवून ते थांबलेले नाहीत तर आपल्याबरोबर अनेकांना चाकोरीच्या मार्गावरून जाण्यापेक्षा या वळणवाटांनी सीमोल्लंघन करत आपली नवी वाट निर्माण करण्याची जिद्द ते इतरांमध्येही निर्माण करत आहेत हे विशेष!

viva@expressindia.com