बावरा मन

माझे वय १८ वष्रे आहे. मी कॉलेजात शिकतो. आमच्या सोसायटीत राहणारी एक मुलगी मला आवडते. ती वयाने मोठी आहे, नोकरी करते. आमच्यात चांगली मत्री आहे. पण माझ्या मनात तिच्याबद्दल एखाद्या मैत्रिणीपेक्षाही जास्त खोल भावना आहेत. माझ्या कॉलेजमधेही मी मुलींशी फारसा बोलत नाही. मला तशा फारशा मैत्रिणी नाहीतच. पण ही अशी एकटीच मुलगी आहे जिच्याशी मी बऱ्याच गोष्टी शेअर करतो. ती माझ्यासाठी खरंच खूप खास आहे. मी काय करू? ती मला आवडते ही माझ्या मनातली गोष्ट तिला सांगू का? हे योग्य आहे का? तिने नकार दिला तर? मला तिच्याशी असलेली मैत्री तर तोडायची नाहीय.
– एक दोस्त

अरे दोस्ता,
यात फार वेगळं काही नाहीय. तुझं वय हीच खरी तुझी अडचण आहे. या वयात मुला-मुलींना एकमेकांबद्दल आकर्षण वाटणं हे साहजिक आहे. ही तर निसर्गाचीच रीत आणि किमया आहे. तुला सोसायटीतील तुझ्यापेक्षा वयाने मोठी मुलगी आवडते, यात काही गडबड- गोंधळ उडण्यासारखं नाही. तुझ्या सांगण्यावरून तरी असं दिसतंय – जसं तुला तिच्यासोबत राहायला आवडतं तसंच तिलाही आवडत असावं. तुम्हा दोघांमध्ये मित्र- मैत्रिणीचं एक सुंदर नातं मला दिसतं आहे. पण या मत्रीच्या नात्याला ‘मैत्री’शिवाय इतर कोणतंही लेबल लावण्याची घाई का करतोयस? त्यापेक्षा या नात्याकडे तू निखळ मैत्रीचंच नातं म्हणून का नाही पाहत? सध्या तू शिकत आहेस. अजून तुला तुला स्वत:च्या पायावर उभं राहायचं आहे. तू म्हणतोस की, कॉलेजमध्ये तू कोणाशी जास्त बोलत नाहीस, पण असं का? कशाचीही भीती बाळगू नकोस, जे काही विचार मनात असतील त्यातून मोकळा हो. एकमेकांना नीट ओळखल्याशिवाय आपण साधी मैत्रीही करत नाही. तू तर थेट प्रपोज करायला निघाला आहेस, तेही कशाच्या जोरावर? निव्वळ आकर्षणाच्या?
परक्याशी मैत्री करताना आपण दहादा विचार करतो, हो ना? तर मग आयुष्यभराच्या मैत्रीसाठी नको का जास्त विचार करायला? आयुष्याच्या या मत्रीमध्ये एकमेकांची आíथक, मानसिक, भावनिक जबाबदारी घेणं अपेक्षित असतं. त्यासाठी तू सक्षम आहेस का? विचार कर. सद्य:परिस्थितीत तुमची ही मत्री (फक्त मत्री) अशीच सुरू ठेव. अभ्यासाकडे लक्ष दे. कॉलेजमध्ये मनमोकळेपणाने मुलींशीही बोलत जा. स्वतंत्रपणे करिअरचा विचार कर. जबाबदार हो. ज्या वेळी तू जबाबदार होशील तेव्हा विचार कर पुढचा. एवढा विचार करून एखाद्या मुलीने जर नकार दिला तर लगेचंच कोलमडून जाण्याची गरज नाही किंवा स्वत:ला कमी लेखू नकोस. हा प्रत्येकाच्या आवडीनिवडीचा प्रश्न आहे. तेव्हा आपण तुझ्या मैत्रीच्या या सुंदर नात्याला म्हणू ‘हमने देखी है इन आखों की महकती खुशबू.. हाथ से छूकर इसे ‘इश्क’ का इल्जाम ना दो’