हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी जाणून घेऊ या नव्या सदरातून.

अंकांचं आपलं एक गणित असतं. त्याचा माणसाच्या आयुष्यावरही प्रभाव असतो. त्यामुळेच काहींच्या नाकी‘नऊ’ येतात. काहींचे ‘तीन तेरा’ वाजतात आणि काहींशी छत्तीसचा आकडा जुळतो. या अंकांची जोडी माणसाच्या आयुष्याचं गणितही बदलू शकते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे जगभरातील ५० देशांमध्ये चवीनं खाल्ल्या जाणाऱ्या आइस्क्रीमचा जगविख्यात ब्रँड बास्कीन अ‍ॅण्ड रॉबिन्स. बी आणि आर या आद्याक्षरांच्या मधोमध डौलात उभ्या राहिलेल्या ‘३१’च्या आकडय़ाची ही कहाणी.

बर्टन बास्कीन आणि आयर्विन रॉबिन्स या दोन व्यावसायिकांची ही गोष्ट आपण आधी दोन वेगवेगळ्या कहाण्यांतून पाहू. आयर्विन रॉबिन्स हा टाकोमा वॉशिंग्टनमधला उमदा तरुण आपल्या वडिलांच्या आइस्क्रीम पार्लरमध्ये काम करता करता व्यवसायाचे धडे गिरवत होता. दुसऱ्या महायुद्धात लढाईच्या दगदगीच्या आयुष्याचा अनुभव घेऊन आपल्या गावी परतल्यावर त्यानं पुन्हा मूळ व्यवसायाकडे वळायचं ठरवलं. पण त्याचं स्वप्न मोठं होतं. त्याला व्यवसायाचा व्याप वाढवायचा होता. त्यामुळे त्याने आइस्क्रीम रीटेल दुकानातून विकण्याचा प्रयत्न करून पाहिला, जो अयशस्वी झाला. मग वडिलांच्या दुकानात काम करता करता जमा केलेली अनुभव पुंजी कामी आली. लोक दुकानात जातात तशी आइस्क्रीम पार्लरमध्ये येत नाहीत. आइस्क्रीम खाणं हा त्यांच्या रुटीनमधून त्यांना मिळणारा दिलासा असतो. तेव्हा त्यांना तसं पूरक वातावरण दिलं पाहिजे. तेव्हा तसं आइस्क्रीम पार्लर आपण सुरू करायचं या निश्चयाने कॅलिफोर्नियामधील ग्लेनडेल येथे त्याने व्यवसायास सुरुवात केली. आता ही गोष्ट इथेच थांबवून वळू या बर्टन बास्कीनकडे.

बर्टनचं लग्न रॉबिन्सच्या बहिणीशी- शर्ली हिच्याशी- झालं. तोही दुसऱ्या महायुद्धाचा अनुभव घेऊन आइस्क्रीम व्यवसायाकडे वळणार होता. तोपर्यंत रॉबिन्सचं चौथं आईस्क्रीम पार्लर सुरू झालं होतं. भावोजी आणि मेव्हणा दोघेही एकच व्यवसाय करणार तर एकत्रच का करू नये ? हा विचार येणं स्वाभाविक होतं, मात्र रॉबिन्सच्या वडिलांनी दिलेला विचार मोलाचा होता. लगेच एकत्र काम सुरू केलंत आणि पार्टनर झालात तर खूप साऱ्या तडजोडी कराव्या लागतील. त्यामुळे वर्षभर दोघांनी स्वतंत्रपणे आपापली आइस्क्रीम पार्लर्स सांभाळली. यादरम्यान दोघांच्याही लक्षात आलं की, आपलं व्यवसायाचं तत्त्वज्ञान सारखं आहे. आपल्याला फक्त आइस्क्रीम विकायचं आहे. त्यातसुद्धा चॉकलेट, व्हॅनिला, स्ट्रॉबेरी या ठरलेल्या साच्यापलीकडचे फ्लेवर्स आपल्याला शोधायचे आहेत आणि व्यवसाय मोठा करायचा आहे. मग इथे या दोन वेगवेगळ्या कहाण्यांची समीकरणं जुळून ‘बास्कीन अ‍ॅण्ड रॉबिन्स’ या एकत्रित प्रवासाला सुरुवात झाली. हा प्रवास नात्यांच्या अपरिहार्यतेतून नाही तर नीट विचारपूर्वकपणे सुरू झाला होता. १९४५ पासून एकत्रित सुरू झालेल्या या व्यवसायाने १९५३ मध्ये स्वत:च्या खास लोगोतून लोकांच्या मनात स्वत:चं स्थान निर्माण केलं.

महिन्याच्या ३१ दिवसांसाठी ३१ स्वादांचं गणित बास्कीन अ‍ॅण्ड रॉबिन्समधल्या इ व फ च्या मध्ये ३१च्या आकडय़ाच्या रूपात डौलाने झळकलं जे आजतागायत घट्ट आहे. इ मधला ३ आणि फ  मधला १अशी कल्पकता भारी आहे. या ३१ची मोहिनी एवढी विलक्षण आहे की, मलेशियात महिन्याच्या ३१व्या दिवशी ३१ टक्के सूट या आइस्क्रीमवर काही वेळा जाहीर होते आणि लोक वेडय़ासारखी गर्दी करून आइस्क्रीम खरेदी करतात. आजतागायत एक हजार विविध स्वाद बास्कीन अ‍ॅण्ड रॉबिन्सने दिले आहेत. दर वर्षी त्यात भरच पडते आहेत. भरपूर सारे स्वाद लोकांना चाखता यावेत हे बास्कीन व रॉबिन्स दोघांचंही स्वप्न होतं आणि त्यासाठी त्यांनी खास करून तो ‘पिंकस्पून’ आणला. ज्यायोगे लोकांना विविध स्वाद चाखून आपला आवडता स्वाद ठरवता यावा. त्या पिंकस्पूनशीही अनोखं नातं जुळलं आहे. इथल्या आइस्क्रीमच्या नावातही त्यांनी अनोखेपण जपलं. चाचाचा (चेरी, चॉकलेट, चीप्स), प्लमनट (प्लम, व्हॅनिला, वॉलनट) हे त्यातलेच काही.

अशी ही दोन वेगवेगळ्या प्रतलांवर जुळून एकत्र आलेली एक स्वादिष्ट ब्रॅण्ड कहाणी. इथे छत्तीसचा नाही तर ३१चा आकडा जुळला आणि या अंकाने आइस्क्रीमशी एक अनोखे समीकरण जुळवले.

viva@expressindia.com