संयुक्त राष्ट्रसंघाने ३ डिसेंबर हा इंटरनॅशनल डे ऑफ पर्सन्स विथ डिसेबिलिटी म्हणून घोषित केला आहे. विकलांगतेला शरण न जाता आयुष्य पुरेपूर जगणाऱ्या चार तरुणांची प्रेरक कथा या दिव्यांग दिनानिमित्ताने देत आहोत. सगळ्या नैराश्यग्रस्त धडधाकट तरुणांना लाजवेल अशा आशावाद ‘त्या’ चार तरुणांच्यात दिसला. डॉ. बत्राज पॉझिटिव्ह हेल्थ अ‍ॅवॉर्डनिमित्ताने या चौघांशी बोलायची संधी मिळाली आणि त्यातून उलगडल्या चार प्रेरणागाथा..

आकांक्षांपुढती गगन ठेंगणे

साईप्रसाद मूळचा तेलंगणाचा. जन्मानंतर तेराव्या दिवशीच कमरेखालच्या भागाच्या संवेदना नष्ट झाल्या. डॉक्टरांनी अनेक ऑपरेशन्स केली, पण साईप्रसाद कधीच पायावर उभा राहू शकला नाही, चालू शकला नाही..  हा झाला गोष्टीचा पूर्वार्ध. आता उत्तरार्ध ऐका. इंजिनीअरिंग टॉपर आणि चांगल्या गुणांनी एमबीए पूर्ण केलेला साईप्रसाद हा तरुण. तो सांगतो, ‘‘प्रत्येक माणूस हा पंचमहाभूतांनी बनलेला आहे, असं गीता सांगते. माझीदेखील पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या सगळ्यांचा अनुभव घ्यायची इच्छा आहे.’’ हेलिकॉप्टर राइड, स्कूबा डायव्हिंगचा अनुभव त्याने घेतलेला आहे आणि स्काय डायव्हिंगचा थरारही त्यानं नुकताच अनुभवलाय. १४००० फुटांवरून स्काय डायव्हिंग करणारा पहिला दिव्यांग भारतीय अशी त्याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंददेखील झाली आहे.

साईप्रसाद हा ध्येयाने भारलेल्या प्रवासाविषयी म्हणाला, ‘‘हा खडतर प्रवास आहे. जन्मापासूनच मी हे अपंगत्व घेऊन आलो. आयुष्यात नकार पचवायची सवय तिथूनच लागली. माझ्या डिसॅबिलिटीमुळे प्रत्येक शाळेकडून नकार यायला लागला. शेवटी अ‍ॅडमिशन मिळावी म्हणून आईवडिलांनी अपंगत्व लपवलं आणि प्रवेश घेतला. मजल- दरमजल करत शाळा बदलत मी दहावीची परीक्षा दिली. पुढे बारावीत पहिला आलो तेव्हा इंजिनीअरिंग करायचं ठरवलं. इंजिनीअरिंग एन्ट्रसचा कसून अभ्यास केला आणि अपंगांमध्ये पहिला आलो. हैदराबादच्या सीबीटी कॉलेजमधून इंजिनीअरिंग पूर्ण केलं.’’  साईप्रसाद इंजिनीअरिंग कॉलेजच्या टॉप फाइव्हच्या यादीत होता. नंतर त्यानं एम.बी.ए. केलं. हा प्रवास सांगताना भावुक झालेला साई म्हणाला, ‘‘नो वन शुड सफर लाइक आय डिड. नॉर्मल लाइफ म्हणजे काय ते मला कधी समजलंच नाही. माझं अपंगत्व हा माझ्या आयुष्याचा एक भाग आहे आणि तो राहणार आहे, हे मी स्वीकारलं आहे. आता त्याचं दु:ख नाही.’’ धडधाकट तरुणांना लाजवेल असे धाडसी प्रयोग करणाऱ्या आणि शिक्षणातही बाजी मारणाऱ्या साईप्रसादकडे बघून अक्षरश: आकांक्षांपुढती गगन ठेंगणे हे पटतं.

प्रेरणादायी

१ नोव्हेंबर २००० ला अग्रवाल कुटुंबामध्ये एका सुंदर परीचा जन्म झाला. या परीचं नाव प्रेरणा. सुरुवातीला सुंदर, सुदृढ बाळ असणारी प्रेरणा पाच महिन्यांची असतानाच ग्लुकोमाचं निदान झालं आणि दहा महिन्यांची झाल्यावर तिनं या आजारपणात दृष्टी पूर्णपणे गमावली. अनेक उपचार, शस्त्रक्रिया करूनदेखील तिची दृष्टी परत आली नाही. ऑपरेशनच्या दुखण्यानं तिचं बालपण मात्र पुरतं कोमेजून गेलं. ‘आईवडील हताश झाले आणि शेवटी कुठलीही शस्त्रक्रिया न करण्याचं ठरवलं. लहान असताना मी बोलण्यापेक्षा गाणीच जास्त गायचे असं आई-बाबा सांगतात. चार वर्षांची असताना मी भजन, प्रार्थना सुरात गाऊ लागले. टीव्हीवरच ऐकू येणारी िहदी, इंग्लिश गाणीदेखील मूडप्रमाणे गुणगुणू लागले. शाळेत जायचे. पण अभ्यासापेक्षा गाण्याकडे लक्ष जास्त लागायचं..’ प्रेरणा सांगते. तुमची मुलगी छान गाते, असं लोक सांगायचे, पुढे मोठी गायिका होईल, असं सांगायचे, पण आईवडिलांनी सीरिअसली घेतलं नाही. सहानुभूती दाखवायला लोक तोंडदेखलं बोलतात, असं वाटून त्यांनी दुर्लक्ष केलं. पण २०१२ मध्ये वडिलांच्या एका मित्राने प्रेरणाला एका कार्यक्रमात गायला बोलावलं आणि तिचं गाणं ऐकून प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले, तेव्हा पालकांना तिच्यातील गायकीच्या गुणांची जाणीव झाली. पुढे काही महिन्यांतच तिने ‘इंडियन ऑयडल ज्युनियर’मध्ये भाग घेतला आणि फायनलपर्यंत पोचली. प्रेरणाच्या गाण्याने महानायक अमिताभ बच्चनदेखील भारावून गेले. नंतर मात्र प्रेरणाने कधी मागे वळून पाहिलं नाही. ती सुरेश वाडकर यांच्याकडे रीतसर गायनाचे धडे गिरवू लागली. मुंबई, मँगलोर, दमण, वापी, पाटणा अशा अनेक शहरांत तिचे कार्यक्रम झाले आहेत. गाण्यातच करिअर करायची प्रेरणाची इच्छा आहे.

नथिंग इज इम्पॉसिबल

‘‘इट डझ नॉट मॅटर व्हॉट हॅपन टू यू, निथग इज इमपॉसिबल.’’ हे शब्द आहेत २७ वर्षांच्या धवल कटारी या तरुण चित्रकाराचे. पतंग उडवताना व्लाइव्ह वायरला हात लागल्याचं निमित्त झालं आणि अहमदाबादमध्ये राहणाऱ्या धवलला चौदाव्या वर्षीच दोन्ही हात गमवावे लागले; पण त्याने आशा सोडली नाही. आईच्या मदतीने पुन्हा एकदा अक्षरं गिरवायचा प्रयत्न केला. हात जिथे तुटला तिथेच पेन पकडून लिहिण्याचा सराव केला. लवकरच त्याला स्वत:मधील चित्रकलेच्या आवडीचा साक्षात्कार झाला. मध्यमवर्गीय घरात जन्मलेल्या धवलची चित्रकला हा केवळ छंद होता तेव्हा, पण या अपघातानंतर या चित्रकलेनंच त्याला हात दिला. तीच त्याची ओळख बनली; पण हात गमावल्यानंतरचं दु:ख पचवणं सोपं नव्हतं. ‘‘अपघातानंतर अडीच महिने हॉस्पिटलच्या बेडवर असताना आईवडील मला वेगवेगळ्या सकारात्मक कथा सांगून प्रेरणा द्यायचे. हॉस्पिटलमधून ठीक होऊन घरी आल्यावर परत शाळेत जाण्याचा निर्णय घेतला, पण प्रिन्सिपलने सरळ लीव्हिंग सर्टिफिकेट टेकवलं. या सगळ्या भानगडीत एक वर्ष वाया गेलं, पण या नराश्यातून बाहेर पडण्यासाठी चित्रकला कामी आली..’’ धवल सांगतो.  ते वर्षभर त्याने चित्र काढण्यात घालवलं. नंतर त्याने विशेष शाळेत प्रवेश घेतला. शाळेतून कॉलेजमध्ये जाताना बघता बघता त्याचं हे टॅलेंट लोकप्रिय होत गेलं. फायनल इअरच्या पहिल्याच दिवशी सकाळी त्याने ‘एंटरटेन्मेंट के लिए कुछ भी करेगा’ या शोसाठी ऑडिशन दिली आणि तो सिलेक्टही झाला. ज्या दिवशी तो शो टेलीकास्ट झाला त्याच दिवशी त्याचा रिझल्ट लागला आणि तो बी.कॉम. झाला. त्यानंतर धवलने कधी मागे वळून बघितलं नाही. नंतर त्याने ‘इंडिया गॉट टॅलेन्ट’ (२०१४) , ‘हिन्दुस्तान का बिग स्टार’ (२०१३) हे शो केले. त्याला आत्तापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

समान अधिकारांची अपेक्षा

उत्तराखंडसारख्या राज्यातून आलेली २६ वर्षीय रेखा कुमारी म्हणजे तडफदार व्यक्तिमत्त्व. ‘विकलांग व्यक्तींना सामान्य माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही का?’ असा प्रश्न ती पोटतिडकीने विचारते. दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांसाठी लढते. अशा व्यक्तींसाठी सार्वजनिक ठिकाणी सुविधा पुरवायला हव्यात, शाळांमध्ये विशेष सोयी हव्यात हे पटवून द्यायचा प्रयत्न करीत आहे. रेखा दोन वर्षांची असताना तिला पोलिओ झाला. पोलिओ म्हणजे काय हे आईवडिलांना माहीतदेखील नव्हतं तिच्या. खूप ताप आला म्हणून मोठय़ा दवाखान्यात नेलं. १० दिवस आयसीयूमध्ये काढल्यानंतर समजलं, रेखाला कधीच स्वतच्या पायावर उभी राहू शकणार नाही, आधाराशिवाय चालू शकणार नाही. आई- वडिलांवर आभाळच कोसळलं. ‘आमच्या गावच्या शाळेत अपंगांसाठी कुठलीही विशेष सोय नव्हती. माझ्या काळजीने आई-बाबांनी पाच वर्षे शाळेतच पाठवलं नाही. आयुष्यातली ती वर्षं वाया गेली. मग शेजारी राहणाऱ्या मित्राने मदतीचा हात दिला. ते आता माझे पती आहेत. त्यांच्यामुळे चार किलोमीटरवर असणाऱ्या शाळेत मी जाऊ-येऊ शकले.. ’ रेखा सांगते. तिने बारावीपर्यंत शिक्षण त्या शाळेत पूर्ण केलं. पुढे वर्ल्ड व्हिजन या स्वयंसेवी संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या एका सभेला तिला पाठवण्यात आलं. तिथे अपंगांच्या परावलंबित्वावर आणि त्यांना मूलभूत अधिकारांपासून कसं वंचित राहावं लागलं यावर ती पोटतिडकीने बोलली. हे सगळं ऐकून त्या संस्थेने तिला अपंगांच्या अधिकारासाठी काम करण्याचा सल्ला दिला. रेखा आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करू लागली. तिने या कामाला वाहून घेतलं. तिने अपंगांमध्ये केलेल्या जागृतीच्या कामातून अनेकांना फायदा झाला. सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोचल्या. रेखाने सोशल वर्कमध्ये पदवी मिळवली असून आता याच विषयात काम करण्यासाठी मास्टर्सची पदवी घेण्याची तिची इच्छा आहे.