खुसखुशीत पोहे, त्यात थोडासा तळलेला कांदा आणि त्यावर चिकन.. वर्णन ऐकलं तरी कोणत्याही खवय्याच्या तोंडाला पाणी सुटावं. भुजिंग हा प्रकारच असा आहे. मुंबईच्या वेशीलगत वसई-विरार पट्टय़ात मिळणारा हा पदार्थ मुंबईच्या हृदयात असलेल्या दादरलाही मिळाला तर..

खाबू मोशायचे संकल्प २१ दिवसांपेक्षा जास्त टिकत नाहीत, असे खाबू तुम्हाला म्हणाला होता. यंदा खाबूने केलेला संकल्प त्याच्या अत्यंत जिव्हाळ्याचा असल्याने यंदा तरी तो तुटणार नाही, अशी खाबूला अपेक्षा आहे. मुंबईच्या जवळ असलेल्या काही गावांमध्ये मिळणाऱ्या काही पदार्थाची ओळख खाबू यंदा तुम्हाला करून देणार आहेच, पण त्याचबरोबर अशा जवळच्या गावांमध्येच मिळणारे खास पदार्थ मुंबईत कुठे मिळतात का, याची माहितीही करून देण्याचा खाबूचा प्रयत्न आहे. असाच एक पदार्थ म्हणजे भुजिंग!

मुंबईच्या उत्तरेकडे असलेला आणि गुजरात राज्याच्या सीमेशी लगट करणारा भाग म्हणजे वसई-विरार! हा भागही अलिबाग-चौलसारखाच समुद्रकिनाऱ्याजवळ आहे. नारळी-पोफळीच्या बागा, समुद्रावरून येणारी वाऱ्याची शांत मंद झुळूक आणि सोबतीला मासळीचा भन्नाट गंध.. जगायला आणखी काय हवं, असे विचारणारा हा प्रदेश. कोकण किनारपट्टीचाच भाग असलेल्या आणि तळ कोकणाप्रमाणे नसली, तरी निसर्गाची उधळण लाभलेल्या या भागातही खाबूने मुशाफिरी केली आहे. या भागाची खासियत असलेला आणि फक्त याच भागात बनणारा पदार्थ म्हणजे भुजिंग. खुसखुशीत पोहे, त्यामध्ये तळलेला कांदा आणि चिकनचे मसालेदार तुकडे यांच्या एकत्रिकरणातून तयार होणारा हा पदार्थ भन्नाट असतो.

खाबूने गेली अनेक वर्षे या पदार्थाबद्दल खूप ऐकलं होतं. वसई-विरार भागात मुशाफिरी करताना ताज्या मासळीच्या गंधापुढे खाबूला बाकी सगळं झूट वाटलं होतं. त्यामुळे भुजिंगच्या उगमस्थानी जाऊनही खाबू भुजिंग चाखल्याशिवाय परतला होता. आता हे ऐकल्यानंतर अनेक खवय्ये खाबूची अक्कल काढतील. काढोत बिचारे! पण मासळीवर खाबू नितनितांत मुहब्बत करतो, त्याला तो तरी काय करणार! पण बाबू खवय्याने खाबूला गेल्या काही दिवसांपासून भुजिंगवरून हिणवायला सुरुवात केली. खाबूपेक्षा बाबूच्या पायाला जास्त चाकं असल्याने बाबू नेहमीच फिरतीवर असतो. त्यामुळे वसई-विरार भागांत जाऊन भुजिंग खायला बाबूचं काहीच गेलं नाही. खाबूला एवढी मोकळीक न मिळाल्याने खाबू बाबूवर खार खात फिरत होता.

याच भटकंतीमध्ये अचानक कोणतीही पूर्वकल्पना न देता खाबूला दादरसारख्या मुंबईच्या मध्यवर्ती भागात भुजिंग गवसलं. मध्यवर्ती म्हणजे किती मध्यवर्ती असावं, तर दादरच्या गोखले रोडला भारत पेट्रोल पंपाच्या बाजूलाच. रस्त्यातून चालता चालता दुकानांच्याच नाही, वाटेत दिसतील त्या सगळ्या पाटय़ा वाचायची खोड खाबूला आहे. त्यामुळे खादाड बुचकी अनेकदा खाबूला वेंधळाही म्हणते. पण खाबूच्या याच सवयीमुळे अचानक खाबूला या भुजिंगबद्दल माहिती मिळाली आणि खाबू खूश झाला.

दादर पश्चिमेला गोखले रोडवर भारत पेट्रोल पंप आहे. सेनाभवन आणि पोर्तुगीज चर्च यांच्या मधोमध असलेल्या या पेट्रोल पंपाच्या बाजूलाच ‘मन:भर’ नावाचं एक छोटंसं हॉटेलवजा ज्यूस सेंटर आहे. या हॉटेलमध्येच भुजिंग मिळतं. एका इमारतीत मिळालेल्या छोटय़ाशा गाळ्यात मानसी खानोलकर यांनी हे हॉटेल सुरू केलं. या मूळच्या वसईच्या, पण सध्या कामाच्या निमित्ताने दादरमध्ये राहणाऱ्या. वसईतलं हे भुजिंग वसईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मुंबईत अजिबातच मिळू नये, ही भुजिंगची उपेक्षा सहन न होऊन खानोलकर यांनी हॉटेल उघडल्यावर त्यात भुजिंगचा समावेश आवर्जून करून घेतला. त्यासाठी हॉटेलमधल्या बल्लवाचार्याना खास तालीम दिली. या हॉटेलमध्ये भुजिंगव्यतिरिक्त मासे, शाकाहारी पदार्थही मिळतात, पण मुख्य आकर्षण आहे ते भुजिंग!

खाबू या हॉटेलात गेला त्या वेळी बॅण्ड वाजू लागले आणि चक्क फटाक्यांची माळही फुटली. हे काही खाबूचे स्वागत नव्हते, तर बाजूच्या गल्लीत कोण्या भाग्यवंताचे लग्न लागले होते. पण खाबूने तो सगळा सरंजाम आपल्याच स्वागतासाठी असल्याच्या थाटात हॉटेलातल्या खुर्चीवर आपली तश्रीफ ठेवली आणि परिसराचे अवलोकन करायला सुरुवात केली. हॉटेलमध्ये काम करणारे काका खाबूला सामोरे आले आणि केवळ दोन सेकंदांत एक प्लेट भुजिंग अशी ऑर्डर घेऊन माघारी गेले. खाबूने आपलं अवलोकन चालूच ठेवलं. जेमतेम दोन टेबलांचं हे हॉटेल. ती टेबलेही हॉटेलसमोर ऐसपैस फुटपाथवर टाकलेली. अर्थात रहदारीला कोणताही अडथळा होणार नाही, या बेतानं. दर्शनी भागात मेन्यूचा परिचय करून देणारे बोर्ड टांगलेले. त्यात ‘उद्या केळफुलाची भाजी मिळेल’ असा फलक बघून खाबू आज्जीच्या आठवणीने गहिवरला. फणस, केळफुल वगैरे स्कीलफुल भाज्या करणाऱ्या आज्या एकामागोमाग एक अनंतात विलीन व्हायला लागल्या आहेत.

बराच वेळ खाबूसमोर कोणतीही डिश न आल्याने खाबुची चुळबुळ वाढली. हे लक्षात घेऊन हॉटेलातले ते काका परत आले आणि त्यांनी खाबूशी ‘मन की बात’ करायला सुरुवात केली. हॉटेल चार महिन्यांपूर्वीच उघडले आहे, अस्सल मालवणी पदार्थ मिळतात, खास ठेवणीतल्या भाज्या केल्या जातात वगैरे कॅनव्हासिंग करून ते पुन्हा आत चालते झाले आणि बाहेर येताना एका प्लेटमध्ये भुजिंग घेऊन परतले. खाबूसमोर प्लेट ठेवल्यानंतर खाबूने काही काळ प्लेटचा दीदार केला. प्लेटमध्ये काही चिकनचे तुकडे, त्यावर बटाटय़ाचे पातळ काप, तळलेला कांदा असा सरंजाम होता. या सगळ्या सरंजामाखाली पोहे दडपून ठेवले होते. वर कांद्याच्या रिंगा आणि लिंबाची फोड! खाबूने लिंबू पिळून ते सगळे पदार्थ एकजीव केले आणि चिकनच्या एका तुकडय़ासोबत हे पोहे मुखात सारले. आहाहाहाहा.. एवढेच शब्द या पदार्थाचे वर्णन करण्यासाठी समर्पक आहेत. छान कडक आणि खुसखुशीत पोह्य़ांना चिकनचा तिखटपणा आणि त्यावर पिळलेल्या लिंबाचा आंबटपणा वेगळेच परिमाण देतो. पण एक सांगायला हवं, भुजिंग खाणं ही दातांची परीक्षा आहे. इथे चिकन आणि पोहे दोन्ही दातांची परीक्षा घेतात. पण अशा परीक्षा किती सहजपणे उत्तीर्ण होता येतात, हे खवय्यांना वेगळं सांगायला नको.

काही मिनिटांमध्ये खाबूने भुजिंगचा फडशा पाडला आणि प्लेटमध्ये शिल्लक राहिलेल्या हाडांकडे पाहात मस्त पाणी पिऊन ढेकर दिली (ढेकर दिला की दिली, असा एक वाद होऊ  शकतो. पण ढेकर खूप मोठय़ाने दिली जात असल्याने ती स्त्रीलिंगीच असावी, असा एक प्रवाद आहे. हे खाबूचे वैयक्तिक मत नसले, तरी ढेकर स्त्रीलिंगी आहे, या मताचा खाबू आहे.). एक चांगला, वेगळा आणि मूळ मुंबईचा नसलेला पदार्थ खाऊन खाबू बाहेर पडला. बाहेर रस्त्यावर गोखले रोडची नेहमीची वर्दळ नसती, तर काही क्षण खाबू वसई-विरारमध्ये असल्याच्या धुंदीत भटकला असता. पण त्यासाठी मात्र खाबूला विरार फास्टचे धक्के खातच जावे लागणार. किमान भुजिंगसाठी तरी असे धक्के  खाणे टळले, या आनंदात खाबू तो सदा गजबजलेला रानडे रोड तुडवत दादर स्टेशनची वाट चालू लागला.

कुठे – मन:भर हॉटेल, दादर पश्चिम

कसे जाल – दादर पश्चिमेला उतरल्यावर रानडे रोडवरून सरळ शिवाजी पार्कच्या दिशेने चालायला सुरुवात करा. रानडे रोड जेथे गोखले रोडला छेदतो, तिथून डावीकडे वळल्यावर १०० मीटर अंतराच्या आतच उजव्या बाजूला भारत पेट्रोलपंप आहे. या पेट्रोल पंपाकडे तोंड करून उभे राहिलात, तर डाव्या बाजूला पोर्तुगीज चर्चच्या दिशेला लगेचच हे हॉटेल आहे.

viva@expressindia.com