लग्नसराईला साडी मस्ट. सध्या साडीपेक्षा ब्लाऊजच्या खरेदीला मुलींना वेळ लागतो. का? तर साडीची खरी फॅशन ब्लाऊजमुळे खुलते. एकाच साडीवर वेगवेगळ्या फॅशनची ब्लाऊज घालून एथनिक, फ्यूजन, रेट्रो किंवा बोहेमियन लुक मिळवू शकता. वेगवेगळ्या डिझायनर्सनी सादर केलेल्या ब्लाऊजच्या फॅशनविषयी..

लग्नाला जाताना एथनिक वेअर हवं आणि त्यासाठी साडीसारखा पर्याय नाही. फॅशनेबली क्लासी दिसण्यासाठी साडी कशी नेसताय हे महत्त्वाचं, पण त्याबरोबरच ब्लाऊजची फॅशनही तितकीच महत्त्वाची ठरतेय. साडीला मॅचिंग ब्लाऊजपीस विकत घेण्याचे दिवस आता मागे पडलेत. शहरातील कटपीसची दुकानं एकामागून एक बंद पडत चालली आहेत आणि त्याजागी डिझायनर ब्लाऊजची दुकानं येऊ लागली आहेत. रेडिमेड ब्लाऊजचा हा जमाना असला, तरी ब्लाऊजचं फिटिंग बरोबर हवंच. ब्लाऊजमध्ये इतकं वैविध्य आलंय की, एकाच साडीवर चार वेगवेगळी ब्लाऊज घालून तुम्ही चार वेगळे लुक निश्चित मिळवू शकता.

ब्लाऊजची दरवेळी बदलणारी फॅशन म्हणजे साडीच्या रंगाढंगांप्रमाणे त्या त्या साडीच्या ब्लाऊजची एक परीक्षाच असते. लॅक्मे फॅशन वीकच्या विंटर फेस्टिव्ह कलेक्शनमध्ये यंदा ट्रॅडिशनल वेअर बरीच पाहायला मिळाली. अनेक डिझायनर्सनी साडय़ा रॅम्पवर आणल्या. पण प्रत्येकानं ब्लाऊजच्या बाबतीत फॅशनचे प्रयोग केले होते. पारंपरिक ब्लाऊजऐवजी क्रॉप टॉप सध्या चलतीत आहे. याचा फायदा असा की, तो साडीवर घालता येतोच आणि जीन्स, स्कर्ट अशा वेस्टर्न आउटफिट्ससाठीही अगदी सुटेबल असतो. ब्लॅक, ब्राऊन, गोल्डन, मल्टिकलर डिझायनर ब्लाऊज तुम्ही एकापेक्षा अधिक साडय़ांवरदेखील खुबीने मिरवू शकता.

स्टाइल्स

लग्नासाठी पारंपरिक ब्लाऊज हवं असेल तर तुलसी सिल्क्सच्या कलेक्शनप्रमाणे साध्या आणि पारंपरिक ब्लाऊजची फॅशन मिरवता येईल. दिया मिर्झाने घातलेल्या काळ्या रंगाच्या साडीवरचा पोल्का डॉटचा जरीचा ब्लाऊज लक्षात राहतो साधेपणामुळे. बोट-नेक स्टाइलनं याची रंगत वाढवली आहे. साध्या काळ्या, गोल्डन बॉर्डरच्या किंवा कुठल्याही रंगाच्या एथनिक साडीवर असा ब्लाऊज चांगला दिसेल.

क्रॉप टॉपची गंमत अशी की, पारंपरिक साडीदेखील या ब्लाऊजमुळे आधुनिक वाटू शकते. संजय गर्गच्या कलेक्शनमध्ये ही क्रॉप टॉपची जादू दिसते. रिसेप्शन, मेहंदी, संगीत अशा सोहळ्यांसाठी क्रॉप टॉप नक्कीच ट्राय करता येईल.

ब्लाऊजच्या बाह्य़ांची फॅशन वैविध्यपूर्ण होऊ शकते. बाह्य़ांच्या लांबीत हे वैविध्य आहे, तसं स्टाइल्समध्येही आहे. हॉल्टरपासून फुल स्लीव्हजपर्यंत वेगवेगळी फॅशन ट्राय करता येईल. रफल्स आणि बलून रेट्रो लुक देण्यासाठी मस्त पर्याय आहे. गौरांग शहाचं फॅशन वीकमधलं कलेक्शन हे त्याचं उत्तम उदाहरण ठरलं.

भारतीय पारंपरिक भरतकाम केलेले ब्लाऊज सध्या इन आहेत. मिरर वर्क, कच्छी वर्क केलेले ब्लाऊज किंवा खणाचा, बाटिक प्रिंटचा ब्लाऊज तुम्ही योग्य स्टाइलने कुठल्याही साडीवर मिरवू शकता. जॅकेट किंवा कोटाच्या पद्धतीचं ब्लाऊज हा एक वेगळा प्रयोग म्हणून तुम्ही वापरू शकता. डिझायनर श्रुती संचेती यांनी हा प्रयोग केला होता. तुमच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळा लुक यामुळे नक्की येईल. बिना रावचं कलेक्शन पाहिलं तर लक्षात येईल की, साडीच्या डिझाईनची जादू बाहेरून अजून खुलवण्यासाठी जॅकेटचा वापर तिने केला.