परीक्षा, अभ्यास, रिलेशनशिप, मैत्री, करिअर, लुक्स.. तरुणाईच्या आयुष्यात यातलं काहीही हल्ली तणाव निर्माण करतं. असुरक्षितता, घाई, धावपळ, स्पर्धा आणि तणाव.. यातून सुटका नाही का? हे सगळं नसेल तर आयुष्यात मजा काय? यातली खुमारी तर राहिली पाहिजे पण तोलही जायला नको. करता येईल असं?

 स्ट्रेस मॅनेजमेंटच्या टिप्स देणाऱ्या गोष्टी दर आठवडय़ाला..

यूथ क्लब ही मुलांची हक्काची जागा. इथे विषयाचं बंधन नाही. आपलं मत बिनधास्त मांडण्याची प्रत्येकाला मुभा. दरवेळी युवकांच्या जिव्हाळ्याचा एखादा मुद्दा घ्यायचा आणि त्यावर मोकळेपणानं चर्चा करायची. आज नवीन वर्षांतली पहिली मीटिंग यूथ क्लबची.

‘हॅपी न्यू इयर!’ मी म्हटलं.

‘कसलं हॅपी? झालं एकदाचं न्यू इयर सुरू इतकंच.’ सिमरनच्या शब्दांशब्दांतून वैताग दिसत होता. ‘एवढी मजेची, सेलिब्रेशनची वेळ अन् हे काय?’ ‘तुला काय वाटलं, न्यू इयर म्हणजे नुसती गंमत असते? म्हणजे, असते थोडीफार, पण जी काही मजा येते, ती काही फुकट मिळत नाही. अक्षरश: लढावं लागतं त्यासाठी. सगळ्यांच्या याच प्रश्नाला उत्तर द्यावं लागतं आम्हाला – ‘काय मज्जा केली?’.. हसतेस काय? किती प्रॉब्लेम्स असतात माहितेय? पार्टीला कुणी बोलावलं नाही तर? बोलावलं तर कुठल्या पार्टीला जायचं? आणि बरोबर कोण? कुठले कपडे घालू? माझ्या बजेटचं काय? तिथे कुणी भावच नाही दिला तर? सगळं नुसतं राजकारण आणि दुष्टपणा. तीच चर्चा करत होतो आम्ही तू येण्याआधी.’ सिमरन

‘ए, एवढं पण वाईट नसतं हं. तुला नेमके आले असतील तसे अनुभव.’- मिहीर

‘खरा प्रॉब्लेम आहे सोशल मीडिया. नको वाटतं अगदी ऑनलाइन जायला.’ – काव्या

‘ऑनलाइन जायला नको वाटतं? आय कान्ट बिलिव्ह इट! का पण?’- मी

‘जळजळ होते गं अगदी. सगळ्यांचे कसले भारी फोटोज असतात त्यावर. ते कुठेकुठे जातात, कायकाय करतात! आणि मग त्याला ढीगभर लाइक्स. तुला माहितेय, रियाला तिचा मित्र सरप्राइज म्हणून गोव्याला घेऊन गेला. मिस वर्ल्ड जिंकल्यासारखा आश्चर्यानं आवासलेला तिचा फोटो. आणि स्टेटस काय, तर फीलिंग लकी!!’

‘तिचं जाऊ दे. तुम्ही काय केलं न्यू इयरच्या रात्री?’ ‘कसलं काय? एकतर आमच्या ग्रुपमधे सगळी कपल्स आहेत. मला आधीच ऑकवर्ड होतं त्यांच्यात. सगळे काहीतरी ठरवत होते, पण नेहमीप्रमाणे ते फिसकटलं. शेवटी सगळ्यांनी एका लांबच्या फार्महाऊसवर पार्टी होती, तिकडे जायचं ठरवलं. माझे आईबाबा तुला माहितियेत. त्यांनी अजिबात मला जाऊ दिलं नाही. घरी मावशी, काका आले होते. मग पावभाजी केली आणि आईस्क्रीम आणलं. एक वाजता सगळे झोपलेसुद्धा.’

‘तुला मजा नाही आली?’

‘आली गं. मावशी एकदम कूल आहे. काका इतके जोक्स सांगतात की हसून हसून पोट दुखायला लागलं. पण ही मजा काय फेसबुकवर टाकू का? किती बोअर दिसेल ते!’

‘काव्या, तू कुठे होतीस न्यू इयरला? तुला तर किती आवडतं गर्दीत डीजेवर नाचायला.’

‘यू वोन्ट बिलिव्ह, मला या वर्षी इन्व्हाईटच केलं नाही कुणी. काहीतरी कारणं द्यायला लागले मला. अभिमन्यू, तुमची कशी झाली फार्महाऊस पार्टी?’

‘अं, ओकेओके! खूप अनोळखी मुलंमुली आली होती. ड्रिंक्सही होती. थोडय़ा वेळानं त्यातला एक ग्रुप काहीच्या काहीच वागायला लागला. एके ठिकाणी मारामारीपण सुरू झाली. आम्ही मग लवकरच निघालो तिथून. मला नाही वाटत मी परत जाईन तिथे.’ -अभिमन्यू

‘मला कधीकधी खूप बोअर होतं थर्टी-फर्स्टला. उगीच काहीतरी विचार यायला लागतात. ती रात्र म्हणजे नवीन वर्षांची सुरुवात असतेच, पण जुन्या वर्षांचा शेवटही असतो. मग आठवतं, मागच्या वर्षभरात काय केलं मी? नुसता वाया घालवला वेळ. आणि आता संपलंसुद्धा ते. आता या वर्षी नवीन रिझोल्यूशन्स करून काय फायदा. मी काही फॉलो तर करत नाही.’ – मिहीर

‘मला पटतंय तू म्हणतोयस ते मिहीर. हे सगळं किती थिअरॉटिकल आहे. आपण ना, उगीच काहीतरी निमित्त शोधत असतो गिफ्ट्स आणि सेलिब्रेशनसाठी. आणि जितक्या उत्साहानं आपण सगळं ठरवतो त्यामानानं बहुतेक वेळा जरा फुसका बारच निघतो. सगळा मजा करण्याचा केविलवाणा प्रयत्न वाटतो. इतकं ओढूनताणून होतं सगळं की वाटतं, काय करतेय मी हे? आणि का?’ -शची

‘यावर संशोधन करायला हवं खरं तर’- मिहीर

‘झालीयेत काही संशोधनं यावर. खरं तर वेस्टर्न जगात इयर एन्ड म्हणजे जल्लोशाचा काळ. पण सगळ्यात जास्त ब्रेक अप्स या काळात होतात. डिप्रेशनमधे जाण्याचं प्रमाण वाढतं. एकटेपणा वाटतो. नवीन वर्ष सुरू झालं की प्रत्येकाच्या मनात वेगवेगळे विचार, प्रत्येकाचा मूड वेगळा. पण सोशल मीडियाचा, पिअर प्रेशरचा दट्टय़ा असतोच पाठीशी. ‘आपण मजा करतो का’ याहूनही ‘इतरांना माझी मजा दिसते का’ याचीच काळजी वाटत राहाते जास्त. मी जे करतेय ते मला आवडतंय म्हणून की लोकांना आवडेल, फेसबुकवर छान दिसेल, म्हणून? मला एक सांगा, तुम्हाला काय करायला आवडेल? अगदी मनापासून हं.’- मी

‘मला ना, एक मस्त पुस्तक वाचत, कॉफी पीत, लोळत पडायला आवडेल.’-मिहीर ‘मला माझ्या आवडत्या दोस्तांबरोबर रात्रभर धम्माल करत जागायला आवडेल.’-काव्या ‘शचीला काय आवडेल मी सांगते. मंद म्यूझिक आणि कँडल लाइट डिनर. बरोबर ना गं?’ -सिमरन

‘मग ठरलं तर. पुढच्या वर्षीचं न्यू इयर सेलिब्रेशन मला हवं तसं करणार. शेवटी मला कशात मजा येते हे मी ठरवणार, फेसबुक किंवा इतर कुणी नव्हे.’

(लेखिका वैद्यकीय व्यावसायिक असून किशोरवयीन मुलांच्या समस्यांविषयीच्या तज्ज्ञ आहेत.)