गुगलइतक्याच महत्त्वाच्या बनलेल्या यूटय़ूब या माध्यम समुद्रातले वॉचलेले काही कण अर्थात काही मस्ट वॉचव्हिडीओ.

अन्न किंवा अन्नपदार्थ ही सर्वाधिक रंग, चव आणि गंधाशी निगडित गोष्ट आहे. यूटय़ूबवर चटणीपासून कोशिंबिरीपर्यंत जगातील कोणत्याही व्यंजनाची पाककृती पाहायला मिळते, तेव्हा त्या पदार्थाची चव आणि गंध हा भाग आपोआप वजा होतो. मग उरलेल्या रंग आणि मांडणीच्या बळावर अन्नपदार्थ बनवताना पाहण्याचीदेखील चटक लावण्याचे कौशल्य निपुण बल्लवाचार्य दाखविताना दिसतात. गेल्या दहा-पंधरा वर्षांमध्ये भारतीयांना शेफ संस्कृतीचा जास्त परिचय झाला, कारण आपल्याकडे दरएक वाहिनीवर सुरुवातीला शेफ बनवून दाखवत असलेल्या नावीन्यपूर्ण पाककृतींचा कार्यक्रम होताच होता. प्रारंभी हॉटेलमधील पदार्थ घरात कसे बनवावे, यावर त्यांचा भर होता, कारण हॉटेलिंगच्या मध्यवर्गीय संकल्पना फार वेगळ्या होत्या. मात्र आता राज्यातील सर्वच शहरगावांत कॉण्टिनेण्टल फूड्स जॉइण्ट्स तयार झाली आहेत आणि चायनीज स्टॉल्स, खाऊगल्ल्या यांचे स्वरूप बदललले आहे. त्यामुळे भारतीय पदार्थाना वेगवेगळ्या पद्धतींनी सादर करणाऱ्या जगभरातील शेफ्सची कमतरता नाही.

निर्धारित वेळेमध्ये एखादा पदार्थ बनवून तो चव किंवा गंधही न घेणाऱ्या प्रेक्षकांना आवडेलशा पद्धतीने सादर करण्याची कला ज्युलिआ चाइल्ड या अमेरिकी शेफनी १९६०च्या दशकामध्ये सर्वप्रथम सादर केली. फ्रेन्च पाककृतीवरील त्यांचे पुस्तक गाजले होते. त्यानंतर टीव्हीवर त्यांनी त्यांच्या पाककृती दाखविण्यास सुरुवात केली. आजच्या जवळ जवळ सर्वच मास्टरशेफ्स कार्यक्रमांचे प्रेरणास्थान या ज्युलिआ चाइल्ड आहेत. गंमत म्हणजे त्यांचे टीव्हीवरील ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट काळातील कार्यक्रमांचे शोजदेखील आज यूटय़ूबवर लोकप्रिय आहेत. लाखोंच्या संख्येने त्यांचे अनुयायी आहेत. पन्नास-साठ वर्षांपूर्वी कूकिंग शोजचे स्वरूप कसे होते, याचा तपशील या व्हिडीओमध्ये मिळू शकेल. जगभरातील व्यंजनांमध्ये कोणत्या देशातील आहार सवरेत्कृष्ट याचा शोध घेतला, तर कुणी इटालियन कुणी फ्रेन्च तर कुणी थायलंडमधील जेवण पहिल्या क्रमांकावर नेलेले दिसेल. इटालियन फूड जगामध्ये सर्वाधिक खाल्ले जाते. चिनी आणि भारतीय खाद्यपदार्थाचा अमेरिकेत अलीकडच्या दशकांत सुळसुळाट झाला. दरेक देशातील प्रत्येक मोठय़ा शहरामध्ये चायना टाऊनचे अस्तित्व असल्यामुळे वेगळी खाद्यसंस्कृती निर्माण झाली आहे. अमेरिकी टीव्ही आणि सिने सेलेब्रिटी, जगभरातील क्रीडापटू यांना भारतीय खाद्यपदार्थाचा परिचय आहे. ब्रिटनमध्ये इंडियन करी आणि चिकन टिक्का हे हॉटेलमधील महागडे खाणे आहे. येथे सवरेत्कृष्ट इंडियन करी शोधणाऱ्या हौशी खवय्यांचे अनेक व्हिडीओ यूटय़ूबवर पाहायला मिळू शकतील. त्याचसोबत ब्रिटिश न्याहारी भारतीय पद्धतीने करून देण्यात आलेल्या ठिकाणी आपल्याला पांढऱ्या वाटाण्याची उसळ-पाव उत्तम पद्धतीने मांडल्याचे पाहायला मिळते. गॉर्डन रामसे याचे आडनाव भारतीय वाटत असले तरी हा प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ब्रिटिश शेफ भारतामधील विविध ठिकाणी मांसाहारी आणि शाकाहारी पदार्थाच्या पद्धती शिकून स्वत: त्यात आपले पदार्थविज्ञान ज्ञान ओतताना दिसतो. बटाटय़ाच्या भाजीपासून त्याच्या चिकन तिखा बनविण्याच्या पद्धतीचे व्हिडीओज यूटय़ूबवर उपलब्ध आहेत. विनित भाटिया या ब्रिटिश रेस्तराँ शेफचे टीव्हीवरील कार्यक्रमदेखील लोकप्रिय आहेत. प्रत्येक भारतीय व्यंजनामध्ये काही तरी चमत्कृती करून दाखविण्याचा त्याचा कार्यक्रम लोकप्रिय होता. त्याचे उपमा-कांदेपोहे करण्यापासून ते कडधान्यांपासून वैशिष्टय़पूर्ण सूप बनविण्याचे व्हिडीओज पाहणे म्हणजे आपण दररोज करत असलेल्या जेवणामध्ये किती प्रकारे चवबदल करू शकतो याचे धडे घेणे आहे. अमेरिकी शेफ अँथनी बोरडेनपासून ऑस्ट्रेलियामधील शेफ जॉर्ज कलोंबारिस यांच्या भारतीय व्यंजनातील हातखंडा आणि त्यावरील मतांची बैठक यूटय़ूबवर पाहायला मिळतील. याशिवाय, स्ट्रीटफूडचा शोध घ्यायला गेलात तर प्रत्येक देशामध्ये बाहेर उघडय़ावर तयार केल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थाच्या नाना तऱ्हा पाहायला मिळतील. अत्यंत कमी वेळेत थोडय़ाशा साधनांसह तयार करता येणाऱ्या रेसिपीज मेक्सिकोपासून कंबोडियापर्यंत कुठल्याही ठिकाणचे बल्लवाचार्य बनवताना दिसतील. व्यक्ती तितक्या प्रकृती आणि प्रवृत्ती असतात, त्याप्रमाणेच इथे शेफ व्यक्तीगणिक बदलत जाणाऱ्या पदार्थ पद्धती पाहताना तुमच्यात असलेला पण आजवर कार्यरत नसलेला स्वयंपाकी जागा झाल्याखेरीज राहणार नाही. या आंतरराष्ट्रीय स्वयंपाक्यांची लोकप्रियता कोणत्या गुणधर्मामुळे ठरविली गेली आहे. त्यांची जगण्याची बाजू ही त्यांच्या स्वयंपाक बनविण्याच्या वेडात कशी आहे, हे शोध घेतल्यास इथल्या अनेक व्हिडीओजमधून कळू शकेल. त्याशिवाय देशोदेशीच्या खाद्यपदार्थ बनविण्याच्या आणि पदार्थाच्या देखण्या पद्धतींनी डोळे तृप्त होतील, ते वेगळेच.

viva@expressindia.com