मागच्याच आठवडय़ात आपण तुंबई अनुभवली. सगळीकडेच पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. या सगळ्या धामधुमीत आपल्या अनेकांच्या कपडय़ांनी डाग अनुभवले आहेत. चिखलाचे चिकट, चिवट डाग एखाद्या देखण्या कपडय़ाला अगदी विद्रूप बनवून टाकतात. महागडय़ा कपडय़ांवर तर डाग पडल्यावर रडू आवरेनासं होतं. कधी कधी तर खास लग्नासाठी ठेवलेला पंजाबी ड्रेस समोर पडलेला असतो, पण धो धो पाऊस बघून तो निमूटपणे कपाटात जाऊन बसतो. पावसाळ्यातही डिझायनर कपडे वापरणारे सेलिब्रिटी या डागांचं काय बरं करत असतील, असा एक वेडा विचारही मनात डोकावून जातो. पण नेहमीच काही आपण आपले कपडे ड्रायक्लीन करू शकत नाही. त्यासाठीचा खर्च सतत करणं शक्य नसतं, शिवाय खिसाही चांगलाच खाली करावा लागतो. मग घरच्या आजीपासून ते थेट गुगलपर्यंत सगळ्यांना या डागांवरचा उपाय विचारला जातो. कुणी म्हणतं बटाटा लाव, कुणी म्हणतं रॉकेल, कुणी म्हणतं अमुक तो डिर्टजट लाव. पण जाहिरातीतल्यासारखे आपल्या कपडय़ावरचे डाग मात्र कधीच पटकन जात नाहीत. मग करायचं तरी काय? हा मोठा प्रश्न पडलेला असतो. त्यासाठीच काही खास टिप्स.. डाग पडूच नयेत म्हणून..

  • पावसाळ्यात शक्यतो सिन्थेटिक कपडय़ांचा वापर करावा. यात रसायनांचा वापर जास्त असतो, डाग पटकन जाऊ शकतात. पॉलिस्टर, नायलॉन अशा प्रकारचे कपडे पार्टी वेअरमध्येही मिळतात. यात फ्लोरल,प्रिंटेड असे प्रयोग करता येतील. मॅक्सी, मिडी ड्रेसचाही देखणा पर्याय असतो.
  • नायलॉनमध्येही पँट, टीशर्ट आणि टँक टॉप्सही असतात. खासकरून तरुण मुलींसाठी स्टायलिश दिसण्याचा हा खासा उपाय आहे. या फॅब्रिकचे कपडे लवकर वाळतात. डागही सहज जातो. यात साडी तसेच ट्रॅडिशनल किमोनोसुद्धा उपलब्ध आहेत.
  • एखाद्या कोरडय़ा दिवशी कॉटनही चालू शकतं. त्यामुळे घाम चांगला शोषला जातो.
  • सिल्कमध्ये पारंपरिक कपडे वापरता येतील. पण सलवार-कमीज शक्यतो टाळावे. त्याऐवजी केप्री, लेगिन्स, लाँग कुर्ती, स्टोल घेता येईल. कॉटन सिल्कचा पर्यायही चांगला आहे. हा कपडा लवकर वाळतो.
  • डेनिमने हल्ली बरेच स्टेन व वॉटरप्रूफ कपडे आणले आहेत. केप्रीजचा पर्याय झक्कास. डेनिम डाग घालवण्यासाठी मदत करते.

डाग लागल्यावर ..

पावसाळ्यात कपडे कितीही वाळवले तरी ते दमसर राहतातच. डाग पडलेल्या कपडय़ाला आपण धुतल्यावर तसाच वाळत टाकतो. तो डाग ओला असल्यास तसाच पूर्णपणे कमीत कमी वेळात वाळू द्यावा. तो आपोआप सुकल्यावर चमच्याने हलके काढावा. त्यामुळे डागाचा रंग उतरतो. कपडे ब्रँडेड असतील तर ते खराब होऊ शकतात, त्यामुळे अगदी हळुवार हाताने चमचा फिरवावा. डागावरची माती बाहेर येईल, नंतर ब्रशने तो साफ करता येईल. कपडे घासण्यापेक्षा त्यांना हळुवार हाताने असा मसाज केला तर कापडही टिकेल आणि डागही जाईल. जीन्ससाठी हा उपाय करून बघा.

पांढऱ्या कपडय़ांच्या बाबतीत योग्य डिर्टजटने मसाज करण्यापूर्वी फक्त पाचच मिनिटे डिर्टजट त्या डागावर सुकू द्यावा. त्यानंतर धुतल्यावर तो डाग नाहीसा होण्यास मदत होते. डाग पडला म्हणून लगेच कपडा ड्रायक्लीनिंगला देण्याआधी तो डाग नक्की जाणार आहे ना, याची खात्री करून घ्या. नाही तर कधी कधी या ड्रायक्लीनिंगचा तोटाच होतो.

बरेच जण कपडे ब्लीचही करतात. त्याऐवजी लिंबू वापरणं सोयीस्कर ठरतं. लिंबातले सायट्रिक अ‍ॅसिड डाग गडद होऊ देत नाही. सोडय़ानेसुद्धा डाग जातात. त्यातला कार्बन डाय ऑक्साइड डागांना पळवतो. अगदी बॉडी लोशन, बेबी पावडरसुद्धा डाग घालवायला मदत करतात. अ‍ॅसिटोनही चांगला उपाय आहे. पण नेल पॉलिश रिमूव्हर कधीच वापरू नका. त्यामुळे डाग गडद होतो.

डाग पडलेल्या कपडय़ांसाठी नेहमी लिक्विड डिर्टजटच वापरावं.

डागविरहित आणि वॉटरप्रूफ कपडे देणाऱ्या काही ऑनलाइन साइट्स

१) नाइके ब्रँडचे अ‍ॅक्रालिक फॅब्रिकचे सगळे कपडे स्टेन आणि वॉटरप्रूफ असतात.

२) स्टोकबायलव्ह डॉट कॉमवरही कॉटन, लेदरचे कपडे उपलब्ध आहेत.

३) अ‍ॅमेझॉनवरही यातील कित्येक पर्याय दिसतील आणि कपडय़ांतील विविधता दिसेल.

४) लेवीज आणि पेप जीन्सच्या जीन्सही स्टेनप्रूफ मिळतात.