वरवर पाहिलं तर त्यांच्याकडे सगळं आहे. पैसा आहे, गाडय़ा आहेत, हव्या त्या कॉलेजला प्रवेश घेऊन देणारे पालक आहेत. मित्रपरिवार आहे. पण तरीही त्यांच्या मनात अस्वस्थतेचे ढग दाटलेत. याचं नेमकं कारण काय? कुठला असा ताण आहे, की जो तरुणांना थेट आत्महत्येकडे नेऊ पाहतोय.. गेल्या काही महिन्यांतील उच्चवर्गीय तरुणांनी केलेल्या आत्महत्यांच्या निमित्ताने व्हिवाने या अस्वस्थतेमागची कारणं शोधायचा प्रयत्न केला आहे..

कॉलेज सुरु होऊन आता महिनाभर झालाय. कॅम्पस उत्साहाने ओसंडून वाहतायत. आता काहीच दिवसांत कॉलेज फेस्टचीही लहर येईल. एकूण काय सगळीकडे आनंदी आनंद आहे, असं आपल्याला वाटतंय. पण खरंच तसं आहे का? आजचा शहरी तरुण खरोखरच आनंदी आहे का? तसं असेल तर नुकतीच एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या मुलाने केलेली आत्महत्या की अपघात (हे अजून सिद्ध व्हायचं आहे.) प्रेयसीचं दुसऱ्या कुणासोबत लग्न जुळलं म्हणून वांद्रे वरळी सागरी सेतूवरून आत्महत्या केलेला तरुण, रीतसर फेसबुक स्टेट्स टाकून हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी टाकून आत्महत्या करणारा विद्यार्थी हे सगळं काय आहे? ही सगळी मुलं तुमच्या आमच्यातलीच होती. आपल्याचसारखी कॉलेजला जात येत होती. कॅम्पसमध्ये धम्माल करत होती. मग अचानक असं काय झालं की त्यांनी थेट हेच पाऊल उचललं?

आत्महत्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. डिप्रेशन ही एक सर्रास येणारी गोष्ट होत चालली आहे. हे सगळं भयंकर नक्कीच आहे, पण मग यामागची कारणं काय आहेत. या विषयावर मानसोपचारतज्ज्ञ डॉ हरीश शेट्टींशी बोलल्यावर ते म्हणाले, आत्महत्या ही काही एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी नाही. मध्यमवर्गातला, कष्टकरी वर्गातला, अतिश्रीमंत अशा कोणत्याही वर्गातला तरुण आत्महत्या करताना दिसतो. पण उच्चवर्गातल्या तरुणांनी आत्महत्या केल्यानंतर आपलं त्याकडे प्रकर्षांने लक्ष वेधलं जातं. या आत्महत्यांमागचं कारण आहे, नैराश्य. जे आज एड्सपेक्षाही कॉमन झालंय. एखाद्या व्यक्तिला नेमका कशाप्रकारचा ताण असेल ते सांगता येत नाही. ते त्याच्या आसपासच्या लोकांना समजून घ्यावं लागतं. महत्त्वाचं म्हणजे डिप्रेशन अर्थात नैराश्यावर लोकं उपचार करून घेत नाहीत. कधीकधी उपचार घ्यायला सुरुवात केल्यानंतर ते अर्धवट सोडून दिले जातात. यामुळे आणखी समस्या निर्माण होतात.

डॉक्टरांचं म्हणणं एकाअर्थी खरंच आहे. उच्चवर्गातल्या, श्रीमंत, चांगल्या घरातल्या तरुणांनी आत्महत्या केल्यानंतर आपल्याला हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा वाटू लागतो. कारण आपण सगळेचजण यश, पैसा आणि किर्ती मिळवण्यासाठी झगडत असतो. पण ज्यांच्याकडे हे सगळं काही आहे त्या उच्चवर्गीय तरुणांमध्येही आत्महत्येचं प्रमाण वाढल्यावर आपल्याला वाटतं, यार यांना काय अडचण असणार आहे. यांचं तर सगळं बरं चाललंय की! पण खरंच असं असतं?

याविषयी बोलताना मनोविकारतज्ज्ञ डॉ राजेंद्र बर्वे म्हणतात, आपल्याला कायम असं वाटतं की आत्महत्या ही परिस्थितीजन्य असते. ढोबळ उदा. घ्यायचं झालं तर शेतकऱ्यांचं घेऊ. पीक नाही, पीकाला भाव नाही म्हणून अनेक शेतकरी आत्महत्या करताना दिसतात. त्यामागे आणखीही काही कारणं नक्कीच दडलेली असतील पण हे झालं परिस्थितीजन्य आत्महत्यांचं उदाहरण. पण शहरी तरुणांना किंवा ज्यांच्याकडे पैसा आहे अशा तरूणांना काही अडचणीच नसतील, असा आपला एक समज असतो. पण असं नसतं. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार, वर्गानुसार, मानसिकतेनुसार  ताण असतो. तरुणांच्या आत्महत्यांकडे आपण दोन प्रकारे बघू शकतो. एक म्हणजे, अपयश, प्रेमभंग आणि दुसरं म्हणजे अनेक वर्षांचा साचत गेलेला ताण. त्याच्याशी आपण जुळवून घेऊच शकत नाही, असं वाटल्यामुळे होणाऱ्या आत्महत्या. प्रत्येक आत्महत्येमागचं कारण व्यक्तिसापेक्ष असतं. पण आजच्या तरुणांच्या आत्महत्येला कारणीभूत असलेली अस्वस्थता कुठून येते? गरज आणि हव्यास यातला फरकच कळत नसल्याने त्यांची अस्वस्थता वाढत राहते. अनेक चांगल्या घरातल्या तरुणांच्या गरजा त्यांचे पालक पूर्ण करत असतात पण त्यांना जेव्हा एखाद्या गोष्टीचा हव्यास वाटू लागतो तेव्हा चांगली दिसणारी परिस्थितीही वैतागवाणी बनते. कंटाळवाणी बनते. मग त्या गोष्टीला नकार मिळाला तर तो पचवण्याची ताकद राहत नाही. आपल्या मुलांना खरंतर समाजातल्या प्रत्येक घटकालाच गरज आणि हव्यास या दोन गोष्टींमधला फरक ओळखण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण गरजा या नेमक्या असतात. त्या पूर्ण होऊ शकतात. पण हव्यास कधीही संपत नाही. तो एकानंतर दुसरं हवं, असं सुरुच राहतो.

तरुणांच्या मनात असलेल्या या गोंधळाबद्दल पनवेलमधील पोलिस इन्स्पेक्टर सुनील बाजरे म्हणतात, आमच्याकडे पळून जाणाऱ्या तरुण मुलांच्या अनेक केसेसे येतात. ही मुलं अनेकदा अत्यंत क्षुल्लक कारणासाठी घरातून पळून जातात. पालकांना काही सांगतच नाहीत. संवादाचा अभाव असल्याने असे प्रकार घडतात. नुकतीच एक केस आम्ही सोडवली. शिर्डीला देवदर्शनासाठी गेलेली  एक दिल्लीची तरुणी आणि पनवेलचा तरुण यांची ओळख झाली. तिचा पडलेला मोबाइल या तरुणाने उचलून दिला. त्यावेळी दोघांचीही कुटुंब त्यांच्यासोबत होती. पुढे या दोघांनी एकमेकांचा नंबर घेतला. फेसबुक-मोबाइलवरून गप्पा सुरु झाल्या. तरुणी इंजिनीअर असून नोकरी करत होती. तर तो मुलगा काहीही करत नव्हता. या गप्पांच्या आधारे एक दिवस ती तरुणी पनवेलला पळून आली. थेट त्या तरुणाच्या घरी गेली. तो तरुण लग्नाला तयार नव्हता. पण तो नाही म्हणतोय, हे तिला पटतच नव्हते. पनवेलचे ते कुटुंब मात्र चांगले होते. त्यांनी तरुणीच्या वडिलांना फोन केला. ते येऊन तिच्याशी बोलले. आणि तिला दिल्लीला घेऊन जाणार तोच रिक्षात बसण्याआधी तिने पालकांच्या हातावर तुरी देऊन पळ काढला. ती पुण्यात पळून गेली.  सात दिवसांनी आम्ही तिला शोधण्यात यशस्वी ठरलो. तिच्याशी बोलल्यावर  जाणवलं की ती त्या मुलाच्या प्रचंड प्रेमात होती. त्याने लग्नाला नकार दिल्याने ती बिथरली होती. तिच्याशी बोलून, समुपदेशन केल्यावर ती सुखरुप तिच्या घरी गेली. यातून इतकंच दिसतं की, तिच्यात आणि तिच्या पालकांमध्ये कदाचित पुरेसा संवाद नसावा. आई-वडिलांनी कितीही व्यग्र दिनक्रम असला तरी आपल्या पाल्यासाठी तासभर काढून गप्पा मारायला हव्यात.  महत्त्वाचे म्हणजे आपले अनुभव पालकांनी मुलांसोबत शेअर केले तर ती पालकांच्या अधिक जवळ येतात. नुसतंच हे करू नको म्हटलं की, मुलांना ते पटत नाही. त्याचे तोटे जर पालकांनी नीट समजावून दिले तर मुलांना ते पटूही शकतं. अनेकदा असे दिसते की, आपल्या मुलांचे मित्र कोण हेसुद्धा पालकांना माहिती नसते. कधी मित्रच वाईट संगत लावतात. कधी मित्रांकडून धमक्या मिळतात, फसवणूक होते तर काही संवेदनशील मुलं मित्राच्या अडचणीलाच आपली मानून त्याचा ताण घेऊ लागतात, असं बाजरे म्हणतात.

मात्र अशाप्रकारे मुलांच्या चुकांसाठी सरसकट पालकांना जबाबदार धरणं हेही चुकीचं असल्याचं डॉ. बर्वे सांगतात. आपल्याकडे मानसिक साक्षरता म्हणजे आपला ताण कसा हाताळावा, आपल्या भावना कशा मांडाव्या, याविषयी काही माहिती नसते. स्वसंदाचं, नकार पचवण्याचं प्रशिक्षण आपल्याला मिळत नाही. एखादी गोष्ट करण्यातले फायदे आणि हक्क जर मुलांना दिसत असेल तर त्यातील जबाबदारीही त्यांना समजावून द्यायला हवी. आपल्या मुलांच्या चुकांचं जाहीर प्रदर्शन पालकांनी टाळावं. मुलांना मारून, धाकदपटशा दाखवून कसली उत्तरं मिळणार नाहीत. गरज असल्यास आपल्या मुलांना समुपदेशकाकडे नेऊन त्याच्यावर उपचार करवून घेणं, गरजेचं आहे.

विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणाऱ्या महाविद्यालयात कौन्सेलर म्हणून काम करणाऱ्या मानसी भट यांच्याशी बोलल्यावर त्या म्हणाल्या या वयातील  मुलांचं रॅशनल थिंकिंग अजून विकसितच झालेलं नसतं. आणि ते खूपच नैसर्गिक आहे. त्यामुळे त्यांच्या विचारात दुरदृष्टि नसते. पण पालकांनी मुलांच्या भावनांना आणि विचारांना नाकारू नये. म्हणजे एखाद्या मुलाचं ब्रेकअप झालंय हे ऐकल्यावर पालक त्याचं बोलणं उडवून लावतात.  यातून आपलं बोलणंच समोरचा ऐकून घेत नाही, अशी भावना मुलांमध्ये निर्माण होते. अनेकदा मुलं बोलण्याचा प्रयत्न करतात पण पालक किंवा आसपासच्या व्यक्ती चुकीच्या पध्दतीने त्यावर रिअ‍ॅक्ट होतात आणि बोलणंच खुंटतं. आज मुलांमध्ये प्रत्येक बाबतीत स्पर्धा आहे. करिअरचे प्रश्न आणि त्याबरोबरीने गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड असणं हाही त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न झाला आहे. आपल्याशी बोलायला कुणीतरी असणं केवळ इतक्याच गरजेतू त्यांना जोडीदार हवे असतात. त्यांचे हे विचार पूर्णत: नाकारून चालत नाही. आजकाल मुलांवर एखादी गोष्ट सोशल मीडियावर मिरवण्याचंही मोठं प्रेशर दिसतं. सोशल मीडियावर आपल्या मेसेजला उत्तर न येणं हासुध्दा मुलं एकप्रकारचा नकार समजतात. या गोष्टी आपण टाळू शकत नाही. पण त्यांना योग्य ते वळण देणं मुलांच्या पालकांच्या आणि त्यांच्या सपोर्ट सिस्टिमच्या हातात असतं. त्यासाठी उत्तम संवाद होणं अतिशय गरजेचं आहे.

सर्व तज्ज्ञांच्या चर्चेतून, असं जाणवतं की संवादाचा अभाव हे तरुणांच्या मनातील अस्वस्थतेचं मुख्य कारण असू शकतं. डिप्रेशन अर्थात नैराश्य हा आजार आहे. ज्यावर वेळीच उपचार झाले नाहीत तर व्यक्तीची मानसिक स्थिती बिघडून ती व्यक्ती आत्महत्येचे पाऊल उचलू शकते. त्यामुळे मुख्यत पालक आणि पाल्यांमध्ये सुसंवाद व्हायला हवा. त्यांच्यात मैत्रीचं नातं तयार व्हायला हवं. आत्महत्येचे हे काळे ढग तेव्हाच कुठे दूर जाऊ शकतील.

viva@expressindia.com