कपाट व्यवस्थित लावून ठेवणं ही चांगली सवय. पण काही लोकांना कपाट सारखं आवरायचा ओसीडीअसतो. इकडची घडी तिकडे चालत नाही आणि मग कपाटातल्या त्या सुखवस्तू पसाऱ्याची गंमतच जाते. हे कपाट म्हणजे आपल्या मनाचं आणि विचारांचं प्रतिबिंब असतं. एखाद्याला आपलं खरं आणि बदलतं रूप पाहण्याची इच्छा असेल तर त्या व्यक्तीने आरशात पाहता कपाटात डोकावून पाहावं.

‘किती दिवस झाले मी तुला सांगतेय कपाट आवर, किती पसारा!’ अशी आईची बोलणी निदान ७-८ वेळा ऐकल्यानंतरच कधी तरी आपण कपाट आवरायला घेतो. साधारण प्रत्येकाचं लहानपणापासून एकच कपाट वर्षांनुर्वष त्याच्या सगळ्या गोष्टी सामावत आलेलं असतं. त्याच्या किंवा तिच्या. त्यात कसला भेद नाही आणि कपाटाचा इगोही नाही. आपण जे त्यात टाकू ते त्यात सामावून घेतं. हे कपाट म्हणजे आपल्या मनाचं आणि विचारांचं प्रतिबिंब असतं आणि वयपरत्वे बदलत गेलेले सगळे विचार, सगळ्या फेजेस आपल्याला त्यातून स्पष्टपणे दिसून येतात. म्हणून एखाद्याला आपलं खरं आणि बदलतं रूप पाहण्याची इच्छा असेल तर त्या व्यक्तीने आरशात न पाहता कपाटात डोकावून पाहावं.

हे कपाट म्हणजे डोरेमॉनच्या टाइम मशीनमधील सत्य जीवनातील एक उपकरण. आपल्याला हव्या त्या काळात आपण जाऊ  शकतो.. रमू शकतो. साधारण कपाट आवरण्याच्या व्यक्तिपरत्वे दोन पद्धती असतात. ज्यांना फार पसारा करून बसायला आवडतो ते एकदम सगळं कपाट अक्षरश: ओततात आणि बसतात, पण काही जण आधी सगळं नीट काढून घेतात, मग व्यवस्थित लावतात आणि मग काही गोष्टींमध्ये लक्ष घालायला लागतात. कपाटात अचानक एक डायरी सापडते. त्या डायरीत अनेक गुपितं असतात. त्या अर्धवट डायरीच्या पुढे रोजनिशी लिहिलेली असते. बहुतेक वेळा पहिली स्वेच्छेने लिहिलेली रोजनिशी पहिल्यांदा प्रेमात पडल्यावरच लिहिलेली असते. ‘आज तिने मला पाहिलं. हसली माझ्याकडे पाहून. कदाचित आवडत असेन मी तिला.’ सुरुवातीची वाक्य ही काहीशी सारखीच असतात. त्या डायरीमध्ये फक्त घटना सापडत नाहीत, तर गोष्टीही सापडतात. मधल्या पानावर मोरपीस सापडतं. शेवटच्या काही पानांमध्ये जाळीदार पिंपळपान सापडतं आणि मध्येच कुठे तरी कॅडबरीची चांदी! त्या कॅडबरीच्या चांदीचा आपण काय उपयोग करणार असतो देव जाणे.. पण आपण ती ठेवतो.. अगदी जपून. त्या सोनेरी चंदेरी कागदाचा खूप वर्षांनी सापडल्याचा मोह आणि आनंद हा खऱ्या सोन्याहून अधिक असतो.

अचानक एका कोपऱ्यात रंगीबेरंगी खोडरबर आपल्याकडे डोकावून पाहात असतात. पेन्सिलने लिहिलेलं खोडणारे रंगीबेरंगी फॅन्सी खोडरबर, त्यातही फळांचे.. सुगंधी! आणि सगळ्यांनी हट्टाने मागून घेतलेले ते निळे – शाईने लिहिलेले खोडणारे रबर. त्याने शाईचं लिहिलेलं साफ केलं जायचं की नाही हे कोडंच होतं, पण ते आपल्याकडे असावं असं मनापासून वाटायचं. एक गणिती कंपास बॉक्स आता आपला काहीच उपयोग होत नाही या दु:खात लोखंडी पत्र्याचा आवाज करत कोसळतो आणि कर्कटक बाहेर पडतं. त्या कर्कटकवरून मग आपण शाळेत त्याचा बाकांवर लिहिण्यास कसा उपयोग केला हे आठवतं आणि त्याचसोबत एका बाकाचे मध्यभागी कर्कटकने सीमारेषा काढून केलेले दोन भूभागही आठवतात. जणू काय ती आपलीच प्रॉपर्टी असते. जुनी तिकिटंसुद्धा सापडतात. बसची तशी तिकिटं आता मिळेनाशी झालीयेत. भरपूर आकडे असलेली. एखाद्या आकडय़ावर छिद्र असलेली तिकिटं. त्या तिकीट नंबरच्या शेवटी ३ आकडा ज्याला येतो त्याचा दिवस चांगला जातो, अशी बालमनांची श्रद्धा होती. त्या आठवणीचा पसारा म्हणजे जादू वाटू लागते. त्याचप्रमाणे रेल्वे प्लॅटफॉर्मवर वजन काढून देणारं तिकीट पिवळ्या रंगाचं.. तेही सापडतं. त्यावर भविष्यही लिहिलेलं असायचं. वजन मात्र ३०-४० किलो आणि भविष्य, ‘आज धनलाभ होने का संभव’. आता एवढय़ा लहान वयात अचानक धनलाभ म्हणजे कठीणच. असं म्हणता म्हणता अचानक एका आहेराला देतो तशा पाकिटात पैसे सापडतात. ते पैसे पाहून इतका आनंद होतो की, आता पाकिटात कितीही हजार असले तरी त्या काही शे पैशांची मजाच वेगळी. हे काही शे हजारांपेक्षा जास्त महाग वाटू लागतात. आपण कितीही कॅशलेस झालो तरी या अचानक सापडणाऱ्या कॅशची किंमत कधीच लेस होणार नाही. ती नोट चलनात असो वा नसो, ती जेवढी तुम्हाला उशिरा सापडेल तेवढी त्याची किंमत जास्त. हेच हाती असताना अचानक मनी बँक हाती लागते. पैसे खुळखुळतात याचा शब्दश: प्रत्यय या पिगी बँक किंवा मनी बँक्स बघून येतो. आणि त्याच घररूपी बँकेची राखण करणारा पांढरा कुत्रा. तो म्हणजे आपलं एटीएम होता. पैसे आणून काढून द्यायचा मशीनमधून. ते पैसे काढून आपण आपलं आवडतं खाद्य आणायचो. खाद्य म्हणजे फार काही ग्रेट नाही. त्या हवाबंद पाकिटात मिळणारी गिफ्ट्स आपल्याला आकर्षित करायची आणि त्यासाठी ते ५ रुपयांचे समर्पण. ती गिफ्ट्स मात्र भन्नाट होती. त्यापैकीही काही या कपाटातच सापडतात. ते जोडून काही ना काही तरी तयार करण्याचं कसब लहानपणीच आपल्याला जमलं.

चुकून कपाटात कुठे तरी खोलवर हात लागतो आणि ‘छैय्या छैय्या’ गाणं वाजू लागतं. तो असतो मुलींसाठी गुलाबी आणि मुलांसाठी निळ्या रंगाचा मोबाइल. आताच्या हजारो रुपयांच्या मोबाइलला याची सर नाही हे मात्र खरं. एखादं मेडलसुद्धा सापडू शकतं. ते मेडल आपल्याला आठवण करून देतं की, आपण खरे कोण होतो आणि काय करण्यासाठी आपण जन्माला आलोय, पण आता काय करावं लागतंय. एखादी चित्रकलेची वही सापडते, ज्यात ते हमखास दोन डोंगर, एक सूर्य, एक नदी आणि  इंग्रजी ‘आर’ अक्षरासारखे काढलेले पक्षी असतात. एखादी दुरेघी व तिरेघी वही सापडते, ज्यात अक्षर सुधारण्यासाठी बाराखडी अथवा मुळाक्षरे लिहिलेली असतात. मुलांना लहानपणीचा रबरी बॉल मिळतो. फाऊंटन पेन, भोवरा, गोटय़ा, पतंगाची फिरकी असं सगळं असू शकतं. मुलींना लहानपणची बांगडी कम ब्रेसलेट, हरवलेले एकाच कानातले डूल, काजळ, खूपदा शोधूनही न मिळालेला आवडत्या रंगाचा हेअर बॅण्ड अथवा बो, आपली आवडती बाहुली, भातुकलीमधला कुकर असं काहीही मिळू शकतं. बऱ्याचदा मुलींना कपाट आवरताना मिळालेला ज्युलरी बॉक्स बरंच समाधान देऊन जातो किंवा एखादा जुना ड्रेस आपण पूर्वी कसे होतो हे आठवून देतो. घरातील एखादा कोपरा मुलीची हॅप्पी प्लेस असू शकते. त्या कोपऱ्यात आवडत्या टेडी बेअरला घेऊन त्याच्यासोबत मारलेल्या गप्पा आपला मूड छान करू शकतात.

कपाट म्हणजे एक संपूर्ण भावनाविश्व असतं. ज्यांच्याकडे हे आठवणींचं समृद्ध कपाट आहे त्यांना कुठल्याही इतर मूड बूस्टरची आवश्यकता नाही. स्वच्छतेबाबतचा ओसीडी, पसाऱ्याचा तिटकारा असणाऱ्यांना यातली मजा कधी कळणार नाही. पसारा दिसला की अस्वस्थ वाटतं अशांनी एकदा आपली अस्वस्थता त्या कपाटात बंद करून ठेवावी. म्हणजे स्वस्थता लाभेल आणि पुन्हा जेव्हा केव्हा मनाला अस्वस्थता जाणवेल तेव्हा तीच बंद केलेली अस्वस्थता नव्याने स्वस्थ होऊन आनंदाचं दालन म्हणून तुमच्यासमोर उभी राहील.. फक्त गरज आहे ती एकदा मनाचं कपाट उघडण्याची..!

viva@expressindia.com