viva9माझा प्रश्न रिलेशनशिपबाबतचा आहे. मी २४ वर्षांची असून मला एक बहीण आणि मोठा भाऊ आहे. मी एमबीए केलेलं असून नोकरी करते. माझे आई-वडील माझ्या लग्नासाठी मुलं बघायला लागले आहेत. आता प्रश्न असा आहे की, मी एका मुलाबरोबर ऑलरेडी रिलेशनशिपमध्ये आहे. तो इंजिनीअर असून एका चांगल्या कंपनीत नोकरीला आहे. आम्ही एकाच वयाचे आहोत. एकाच शाळेत होतो आणि गेली ९ वर्षे एकत्र आहोत. माझ्या बहीण आणि भावाला माझ्या रिलेशनशिपबद्दल कल्पना आहे. माझे वडील थोडे कडक आहेत. आम्ही घरात अशा प्रेमाबिमाच्या गप्पा मोकळेपणाने मारू शकत नाही. म्हणून मी काही महिन्यांपूर्वी बाबांसाठी एक चिठ्ठी लिहून त्यात माझ्या रिलेशनशिपबद्दल सगळं काही सांगितलं. पण त्यावर ते प्रचंड चिडले आणि माझ्यावर हातदेखील उगारला. त्यांचा राग एवढा अनावर होता की, त्यामुळे त्यांना माइल्ड हार्ट अ‍ॅटॅकही आला. माझी आईदेखील थोडय़ा जुन्या विचारसरणीची आहे. माझा बॉयफ्रेंड परजातीचा आहे, म्हणून त्यांना हे आवडलेलं नाही. खरं तर माझ्या बॉयफ्रेंडच्या घरच्यांना आमच्या रिलेशनशिपबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही, त्यांची आमच्या लग्नाला मान्यता आहे. त्याच्या घरच्यांनीही माझ्या पालकांशी बोलायचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. मला घरातून पळून जाऊन लग्न करायचं नाहीय, पण आता हे सहन करणं अशक्य झालंय.

कधी कधी टोकाचा विचार मनात येतो. प्रचंड फ्रस्ट्रेशन आलंय. मी काय करू?
– पूनम
हॅलो पूनम,
कुठलाही टोकाचा निर्णय घेऊ नकोस, हे पहिलं सांगणं. कारण त्यातूनच कुणाचंच भलं होणार नाही आणि कुणालाच त्यानं समाधान मिळणार नाही. तुझ्या आई-वडिलांनी तुला एवढं शिकवलं, उच्च शिक्षण दिलं, पायावर उभं केलं, स्वतंत्र विचार करण्यास लायक बनवलं. आता तेच पालक आयुष्यातल्या लग्नासारख्या महत्त्वाच्या निर्णयासाठी तुझा विचार महत्त्वाचा मानत नाहीत, तुला स्वातंत्र्य देत नाहीत, हे योग्य नाही. एवढय़ा शिकल्या-सवरल्यानंतरही आणि क्षमता असूनही आपल्याला आयुष्याचा निर्णय घेण्याचा अधिकार का नाही, असा प्रश्न तुला पडणं स्वाभाविक आहे.
महानगरातून शिक्षण घेताना विविध जाती, विविध धर्माची मुलं एकत्र शिकतात. समाज बदलतो आहे आणि तुम्हा नव्या पिढीच्या आवडी-निवडी, विचार या नव्या बदलांना साजेसेच असणार. मुळात तुझी तुझ्या निवडीवर साशंकता नाही ना? तू ठाम आहेस ना? तसं असेल तर तुझा निर्णय, तुझं म्हणणं पटवून देऊ शकशील, याची खात्री बाळग. पूनम, माणूस जेव्हा विचार सोडतो तेव्हा आक्रमक होतो, सैरभैर होतो. तू घेतलेल्या निर्णयाबद्दल तुझ्या मनात जर विश्वास असेल तर तुझ्या आयुष्याचा निर्णय कृतीत आणण्यासाठी लागणारं धाडस तुला दाखवावंच लागेल. तुझा लग्न करण्याचा तडकाफडकी निर्णय हा जरी आततायी असला तरी तुझ्या आई-वडिलांना हा निर्णय मानणं तितकंच आवश्यक आहे. तुझ्या वयामुळे हा निर्णय घेण्याचा हक्क तुला नक्कीच मिळतो. जर बाबांच्या स्वभावामुळे तू तुझा निर्णय बदलायचा विचार करत असशील तर त्या मुलाच्या दृष्टीने ती आता फसवणूक ठरेल. आक्रमकतेला घाबरून काहीच न करणं किंवा स्वत:च्या जिवाला अपाय करून घेणं हेदेखील तितकंच आततायी ठरेल.
खरा प्रश्न आहे पालकांसाठी. त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारं हे उदाहरण आहे. आपल्याच मुलांच्या नव्या स्वप्नांना वाव देणं हे पालकांच्या दृष्टीने एवढं कठीण का जावं? आपल्या मुलांच्या निवडीवर एवढा अविश्वास हा कशापोटी? मुलांनी विचारपूर्वक ठाम निर्णय घ्यायला हवा आणि ते शिकवणं हेच पालकांचं काम. आपला निर्णय लादणं नव्हे. पूनम, तुला धाडस दाखवायलाच हवंय. निर्णय घ्यायलाच हवा. भाकरी का करपली? शेळी का मेली? निर्णय घेतला नाही म्हणून. SO ALL THE BEST.

मोकळं व्हा!
आपलं आयुष्य वेगवान झालंय हे खरंय. पण या वेगाशी जुळवून घेताना बऱ्याचदा आजच्या तरुणाईचीही प्रचंड मानसिक ओढाताण होतेय. बदललेल्या लाइफमध्ये ताणही वेगळे आहेत. मनाची घालमेल तीच आहे, पण कारणं वेगळी आहेत. अभ्यास, परीक्षा, रिलेशनशिप, ब्रेक-अप, एकटेपणा, रॅगिंग.. अशा एक ना दोन असंख्य गोष्टीत नैराश्याचे क्षण येतात. निर्णय घेण्याची वेळ येते, तेव्हा काय करावं सुचत नसतं. याचा मानसिक त्रास होतो आणि कुणाकडे तरी सल्ला मागावासा वाटतो. कुणाबरोबर तरी आपला प्रश्न शेअर करावासा वाटतो. असा कुणी तरी त्या वेळी लागतो, जो आपलं म्हणणं ऐकून घेईल, समजून घेईल आणि योग्य तो सल्ला देईल. द्विधा मन:स्थितीतून, मानसिक गुंत्यातून आपल्याला मोकळं करील, आपल्या मनातली भीती, द्वेष, शंका दूर करील. आपला प्रश्न किती साधा आहे, बाष्कळ आहे, फालतू आहे, असं म्हणून आपल्याला हसणार नाही.. तू किती मूर्ख आहेस, अशी आपली टर उडवणार नाही.. असं कुणी तरी तेव्हा हवं असतं. मनात खोलवर रुतून त्रास देणारे प्रश्न उलगडण्यासाठी असंच कुणी तरी हवं असतं. लोकसत्ता व्हिवामधली ही जागा तुमच्या अशाच बावरलेल्या मनासाठी दिली आहे. ही जागा तुमची आहे. तुम्ही इथे मोकळेपणानं व्यक्त व्हा. मुंबईतील प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आशीष देशपांडे तुमच्या प्रश्नांना उत्तरं देतील. डॉक्टरांपर्यंत पोचण्यासाठी तुमचे प्रश्न viva@expressindia.com या ई-मेल आयडीवर आम्हाला पाठवा. सब्जेक्टलाइनमध्ये ‘बावरा मन’ असं जरूर लिहा.