कोणत्याही ऋतूत आणि कोणत्याही ट्रेण्डला पुरून उरणारी फॅशन म्हणजे डेनिम्स. जीन्सवर छान टॉप आणि जॅकेट किंवा कुर्ती घातली की प्रसंग साजरा होतो तसा कॅज्युअल टीशर्ट घातला की हँगआउटची तयारी पूर्ण होते. त्या त्या प्रसंगाला शोभेल असा पेहराव जीन्ससोबत सजू शकेल एवढी व्हरायटी आता डेनिम्स फॅशनमध्ये आली आहे. उन्हाळ्याची चाहूल आणि मागे राहिलेली गुलाबी थंडी याच्या मधल्या या वसंत ऋतूमध्ये कॅज्युअल आणि पार्टी वेअरसाठी जीन्स कशी टीमअप करावी याविषयी टिप्स..

ऑफ शोल्डर – ऑफ शोल्डर म्हणजे ड्रेसची नेकलाइन आणि बाही खांद्याच्या बरोबरीने असणे. ऑफ शोल्डर स्टाइलचा लाँग किंवा शॉर्ट टॉप डेनिम्सवर सुंदर दिसतो. ऑफ शोल्डर कुर्ती कॅज्युअल तरीही क्लासी लुक देते.

फ्लेअर स्लीव्ज – घंटेसारख्या त्रिकोणी आकाराचा या बाह्य़ा झालरसारख्या दिसतात. फुल स्लीव्ह्ज किंवा मेगा स्लीव्ह्जमध्येही फ्लेअरने मजा आणता येईल.

रफल्स – रॉ डेनिम किंवा बुटकट डेनिमसोबत रफल्स टॉप ७० च्या दशकातील लुक मिळवून देईल. रफल्स असलेले जॅकेट्ससुध्दा थंडीच्या दिवसात ट्रेण्डमध्ये होती. त्याऐवजी कॉटन श्रगचं लेअरिंगसुद्धा नवीन फॅशन म्हणून ट्राय करता येतील.

चेक्स- मुलांच्या शर्ट डिझाइनमधून प्लेड्स अ‍ॅण्ड चेक्स ही कल्पना आलेली आहे. यात थोडे ढगळे शर्ट्स ट्रेण्डइन आहेत.

शर्ट ड्रेस – लाँग शर्टची फॅशन काही वर्षांपूर्वी खूप चलतीत होती. कॉलर आणि थ्री-फोर्थ स्लीव्ज असलेले लाँग शर्ट वन पीसला पर्याय म्हणून घालायला हरकत नाही. डेनिम्सचे लाँग शर्ट ड्रेस किंवा कॉटन शर्ट ड्रेस आणि कमरेला डेनिम वा लेदरचा बेल्ट असलेले लाँग शर्ट क्लासिक लुक देतात.

जिप्सी डिझाइन्स – बोहेमियन लुक सध्या चलतीत आहे. जिप्सी प्रिंट्सचे छगळ टॉप्स कॅज्युअल लुक देतील. लेअर्ड टय़ुनिक आणि अँटी फिट पँट्स वर साजेशा बोहेमियन अ‍ॅक्सेसरीज कम्प्लीट लुक देतील.

पँट सुट्स- स्लिम आणि स्टाईलिश दिसणारे पँट सुट्स फॅशनची नवी परिभाषा म्हणता येईल. कॅज्युअल ते पार्टी लुक साठी पँट सुट्स फॅशन फॉलो करायला हरकत नाही.

लेअरिंग – येणाऱ्या सीझनमध्ये लेअरिंग हा महत्त्वाचा घटक असणार आहे. तुम्हाला आवश्यक असेल त्याप्रमाणे जॅकेट, श्रग, पातळ केप असं लेअरिंग स्टाइल स्टेटमेंट असू शकतं. सेमी कॅज्युअल लुकसाठी लेअरिंगचा उपयोग होतो. टीशर्टवरून एखादं स्मार्ट जॅकेट घातलं तरी हा लुक पूर्ण होईल. जोडीला स्टायलिश प्लॅटफॉर्म पम्प्स,  हलकी ज्युलरी घातली तर क्लासी लुक मिळेल.

(स्पायकर लाइफस्टाइलचे डिझायनिंग हेड अमित सिंग यांनी दिलेल्या माहितीवर आधारित)