डाएट, कॅलरीज, न्यूट्रिशनिस्ट हे गेल्या १० वर्षांत जास्त प्रकाशझोतात आलेले शब्द. याविषयी वाचून, पाहून, दुसऱ्यांचे अनुभव ऐकून प्रत्येकाने आपापल्या गरजेपुरती डाएट या विषयाची माहिती मिळवलेली असते. मुळात डाएटचा अर्थ केवळ वजन कमी-जास्त करण्यासाठीचा आहार असा एक गोड गैरसमज. खरंतर डाएट हे आपल्या रोजच्या जेवणाचं फॅन्सी नाव. लहान बाळापासून वृद्धापर्यंत प्रत्येकाची आहाराची गरज वेगळी असते. प्रत्येकाची लाइफस्टाइल वेगळी, व्यक्तिमत्त्व वेगळं तशा आहार-विहाराच्या सवयी वेगवेगळ्या. आपल्या तब्येतीनुसार रोज कसा आणि किती आहार आवश्यक आहे, याची माहिती प्रत्येकाला हवीच.

लाइफस्टाइल बदलली तशी खाण्या-पिण्याचे पर्याय वाढले आणि म्हणूनच आरोग्यपूर्ण आहारासाठी डाएट करण्याची वेळ आली. आता कॉलेजिअन्स किंवा ऑफिस गोअर्सही हेल्दी खाण्याकडे लक्ष देऊ लागले आहेत. ती गरजच झाली आहे. एखाद्या दिवशी ‘आपण खूपच तेलकट खातो बुवा’ असा विचार करून कॉर्नफ्लेक्सचा बोल ब्रेकफास्टसाठी घेऊ लागलेत तर कधी वडापावऐवजी सॅण्डविचला प्राधान्य देऊ लागलेत. आता यातलं काय बरोबर काय चूक, सध्याची लाइफस्टाइल बदलणं अवघड आहे, पण त्यातल्या त्यात थोडं सोयीचं थोडं आवडीचं असं काही डाएट होऊ शकेल का, असे अनेक प्रश्न मनात असतील. याची उत्तर देण्यासाठीच हे सदर – कॅलरी मीटर.

नवीन वर्षांच्या सुरुवातीला वेट लॉसचे संकल्प  केले जातात. त्यातले किती पूर्ण होतात माहिती नाही. कारण जास्तीच्या कॅलरीची वजाबाकी केली की झालं वजन कमी, हे गणित दिसायला सोपं असलं तरी सोडवताना अवघड वाटतं. वैज्ञानिकदृष्टय़ा सिद्ध झालेले उपाय वजन कमी करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी फॉलो केले तर अपाय होत नाही, पण अन्यथा त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात.

छोटी उद्दीष्टं समोर ठेवून व्यायाम आणि आहाराची सांगड घातली तर डाएटचा संकल्प पूर्ण करणं अवघड नाही. डाएटसाठी सगळ्यात  महत्त्वाचं आहे, ते एखादी गोष्ट मनापासून अ‍ॅक्सेप्ट करणं आणि आहारतज्ज्ञावर विश्वास ठेवणं. आपण एक डाएटविषयीचा संकल्प नक्की करू या.. रोजच्या जेवणाला हेल्दी बनवू या. वाढणाऱ्या वजनाला लावू या आहाराच्या अ‍ॅटिटय़ूडचा लगाम आणि फॅट्सना बनवू काम करून विरघळणारे गुलाम. ठरवू या थोडी स्मार्ट उद्दिष्टं आणि जाऊ या हेल्दी लाइफस्टाइलकडे!

ग्रीन बर्फी

सध्या बाजारात भरपूर मटार दिसताहेत. खव्याच्या पिस्ता बर्फीऐवजी या दिवसांत मटाराची हिरवी बर्फी करून बघा. जास्त पौष्टिक ठरेल.

साहित्य : मटार – २ वाटय़ा , १/२ वाटी साखर, १ वाटी दूध पावडर, १/२ वाटी दूध, जायफळ, वेलदोडा पूड, बदाम / काजू- सजावटीसाठी, खाण्याचा हिरवा रंग (गरजेनुसार)

कृती : मटाराचे दाणे उकळत्या पाण्यात किंचित सोडा घालून शिजवावेत. दाणे शिजून मऊ  झाल्यावर चाळणीत ओतून पाणी काढून टाकावे. गार झाल्यानंतर मिक्सरमध्ये दूध घालून वाटून घ्यावेत. वाटलेल्या गोळ्यात साखर, दूध पावडर घालून गोळा आटवण्यास ठेवावा. आटल्यावर भांडे खाली उतरवून मिश्रण घोटावे. घोटताना जायफळ, वेलदोडय़ाची पूड घालावी. खाण्याचा रंग असल्यास त्याचे दोन थेंब घालावे. एका भांडय़ाला किंवा परातीला तुपाचा हात लावून त्यावर मिश्रण ओतावे. सारख्या जाडीचे पसरवून त्यावर काजू किंवा बदामाचे काप पसरवावेत. वडय़ा कापून सव्‍‌र्ह कराव्या. हीच रेसिपी साखरेऐवजी शुगर फ्री पावडर घालून करू शकता. मटारऐवजी गाजर, बीट, हिरवा हरभरा वापरूनही वडय़ा करता येतात. हेल्दी स्वीट म्हणून नक्कीच आवडतील.

संक्रांतीचं डाएट

संक्रांत- इंग्रजी वर्षांतला पहिला मराठी सण. न्यू इयरच्या पाटर्य़ा संपतायत ना संपतायत तोच खादाडी करण्याची नवीन सुसंधी संक्रांत देते. गुळपोळी, तिळगूळ, रेवडी, तिळाचे लाडू, वडय़ा वाढवू तेवढी यादी. थंडीच्या पाश्र्वभूमीवर आपल्या पूर्वजांनी उष्ण आणि पौष्टिक पदार्थाची सणाशी केलेली ही जुळणी आपल्याला काही जमली नसती बुवा! जोडीला या दिवसांत हुर्डा, बाजरीची भाकरी, पोपटी या गोष्टीही असतातच. आता डाएटचा संकल्प केलेल्यांनी हे पदार्थ टाळायला हवेत का? मुळीच नाही. थंडीच्या दिवसात हे आवश्यकच आहे. फक्त कॅलरी मीटर हलू द्यायचा नाही.

ते साधण्यासाठी या टिप्स

  • भोगीची भाजी कमी तेलात करता येते. यामुळे चव कमी होत नाही.
  • बाजरीच्या भाकरीवर एक चमचा लोणी घ्यावं. लोण्यात तेलापेक्षा थोडे कमी फॅट्स असतात. जोडीला सीझनल भाज्या, पालेभाज्या भरपूर खायला हव्यात.
  • बाजरीची भाकरी नेहमीच्या ज्वारी भाकरीपेक्षा रक्तातील साखर कमी वाढवते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांसाठी बाजरीची भाकरी हा चांगला पर्याय ठरतो. बाकीच्यांनी थोडा गूळ घालून भाकरी केल्यास त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स नेहमीच्या भाकरीएवढा होतो. शिवाय त्यावर तीळ घातल्याने प्रथिने आणि फायबर्ससुद्धा मिळतात.
  • संक्रांतीला वडय़ा किंवा चिक्की वाटताना मोठा वाटा आपल्या पोटी जायची शक्यता असते. हे येता-जाता जास्तीचे गोड खाणे टाळायला हवे.
  • तीळ आरोग्यासाठी चांगले. त्यातून बरीच खनिजं मिळत असल्याने हाडांच्या बळकटीपासून मधुमेह, हृदयविकारापर्यंतही उपयुक्त ठरतात. पण दिवसभरात फक्त एक-दोन चमचे तीळ वेगवेगळ्या पदार्थात घालून खावेत.
  • पूर्वी संक्रांतीच्या दिवसांत पतंग उडवण्याची प्रथा होती. त्यामुळे थंडीच्या दिवसात उन्हात उभे राहून खेळ होत असे. सकाळच्या उन्हात ड जीवनसत्त्व मिळतं. हल्ली ती परिस्थिती नाही, पण खाणं मात्र वाढलंय. यंदाच्या संक्रांतीपासून सूर्यप्रकाशात एखादा खेळ खेळणं किंवा व्यायाम करणं ही संकल्पना राबवू शकता, जेणेकरून शारीरिक व्यायाम होईल आणि खाल्लेल्या पदार्थाचं नीट पचन होईल.
  • सॅलड किंवा कोशिंबिरीचा जेवणात समावेश करायला हवा.
  • थंडीच्या दिवसात तहान कमी लागते, पण तरीही भरपूर पाणी प्या.

(लेखिका आहारशास्त्राच्या अभ्यासक आहेत.)

viva@expressindia.com