खाद्यनिर्मितीच्या सर्जनशीलतेला डिजिटल ब्लॉग-यूटय़ूबच्या माध्यमाने असे काही धुमारे फुटले की एक मोठं अर्थकारणाचं चक्र अव्याहत सुरू झालं.

Benefits Of Eating Poha With Lemon Juice And Kothimbir
पोहे बनवताना ‘हा’ पदार्थ वरून टाकायला अजिबात विसरु नका; प्रमाण किती हवं? चव वाढेलच पण हे फायदेही पाहा
British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
Loksatta Lokrang A Journey into Documentary Creation movies dramatist
 आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: ‘मला खूप भूक लागली होती…’
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

खाणारे आणि ते बनवणारे या दोन गटांबरोबरच आपण खाल्लेला पदार्थ कसा होता हे सांगणारे, त्याचे विश्लेषण करणारे आले. त्यांना ‘ब्लॉग’चं व्यासपीठ मिळालं. ते लिहिते झाले, त्यांनी आपल्या लिखाणातून लोकांपर्यंत पदार्थाची चव पोहोचवली, लोकांची पावलं प्रत्येक ब्लॉगबरोबर त्या पदार्थाच्या आणि कर्त्यांच्या शोधात वळली. आपल्या पदार्थाची, रेस्तराँची लोकप्रियता वाढवणारा ब्लॉगर महत्वाचा ठरू लागला. शब्दांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष व्हिडिओतूनही हे पदार्थ क्लिक, क्लिक सरशी जगभरात पोहोचले. शेफ म्हणू नका, गृहिणी म्हणू नका, जंगलात जुन्या टोपांमध्ये पाटय़ावर मसाला वाटत चिकन बनवणारी जख्खड म्हातारी म्हणू नका की चुकतमाकत पदार्थ बनवणारा एखादा तरूण म्हणू नका. सगळेच या ‘अर्थ’पूर्ण प्रवाहात सामील झाले..

साधारणपणे वीसेक वर्षांपूर्वी डिजिटल विश्वात फूडविषयी अर्थात खाद्यपदार्थाविषयी काहीएक लिहिण्याचा विचार पुढे आला. पुढे तो एकेक टप्पे पार करत गेला. कल्पना आणि तंत्रज्ञान यांच्या संयुक्त विद्यमानं ‘फूड ब्लॉग्ज’ अस्तित्वात आले. इथे फक्त ‘मी खाल्लं आणि लिहिलं’ असं होत नाही. तर एखाद्या फुडी व्यक्तीची किंवा एखाद्या रेस्तरॉंची किंवा पाककृतींविषयीची वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणं म्हणजे ‘फूड ब्लॉिगग’ असं म्हणता येईल. सुरुवातीचा काही काळ काही ब्लॉग्जवर केवळ खाण्यासंदर्भातलं लिखाण असे पण आताशा जवळपास सगळ्याच फूड ब्लॉगवर लेखन आणि छायाचित्रं असे दोन्ही मह्त्त्वाचे घटक अस्तित्वात असतात. ही छायाचित्रं ब्लॉगरनं स्वत: किंवा फूड फोटोग्राफरनं काढलेली असतात. या फूड ब्लॉगद्वारे खवय्यांना मिळते ती असंख्य पदार्थाविषयीची माहिती, त्यांच्या पाककृती, त्यामागची संस्कृती आणि बरंच काही..

खाणं आणि लिहिणं..

‘फूड ब्लॉग’ असा सर्च दिल्यावर खंडीभर साईटस् आणि नावं डोळ्यांपुढे झळकतात. त्यातून कोणती निवडावी आणि काय करावं, असा प्रश्न उभा राहातो. बाकीच्या भाषा वगळून किमान मराठी आणि इंग्रजी भाषांबद्दल बोलायचं तरी शब्दसंख्येच्या मर्यादेमुळं सगळ्याच ब्लॉगविषयी लिहिणं अवघड काम आहे. त्यामुळं काही प्रसिद्ध आणि गाजलेल्या ब्लॉगचा विचार या लेखात केला आहे. मुळात हे ब्लॉग्ज लिहिण्याची गरज का निर्माण व्हावी आणि कसं असतं फूड ब्लॉगरचं विश्व, याविषयी डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट असणारी अश्विनी खांडेकर सांगते की, ‘‘एके काळी हॉटेल्सची जाहिरात पत्रकांच्या माध्यमांतून केली जायची. आताशा त्याची जागा ऑनलाईन अ‍ॅड्सनी घेतली आहे. फूड ब्लॉग्जच्या माध्यमातून एखाद्या रेस्तरॉंविषयी एक तिऱ्हाईत व्यक्ती लिहिते. ती व्यक्ती तिथं जाते, खाते आणि त्याबद्दल रिव्ह्य़ू लिहिते. लोकांचं बाहेर जाणं, हॉटेिलग अशी लाईफस्टाईल वाढू लागली आहे. त्यामुळे जायचं असेल ते ठिकाण, तिथलं वातावरण वगरे गोष्टी सर्च केल्या जातात. अनेकदा त्यासाठी ‘झोमॅटो’ सारख्या साईट्सचा आधार घेऊन त्यावरचं रेटिंग पाहिलं जातं. ही लिहिणारी व्यक्ती तटस्थ असल्यानं लोकं त्यावर विश्वास ठेवतात. ब्लॉगमध्ये केवळ लिखाणाची भट्टीच नव्हे तर फूड फोटोग्राफीही तितकीच महत्त्वाची ठरते. फूड ब्लॉगला लोक  फॉलो करायला लागतात आणि त्यांना मिळणाऱ्या प्रतिसादावरून रेस्तरॉंजही त्या ब्लॉगरला आपल्याकडे बोलावतात. त्याच्या लिखाणाचा उपयोग त्या रेस्तरॉंला आणि वाचकांनाही होतो’’. काही वेळा ‘ब्लॉगर्स मीट’चं आयोजन करून त्यांना लिहितं केलं जातं.  हे रिव्ह्य़ूज खवय्यांप्रमाणेच रेस्तरॉंकडूनही आवर्जून वाचले जातात. काही सुधारणा सुचवल्या असतील तर त्यानुसार अनुषंगिक बदल केले जातात. काहीजण वैयक्तिक रेस्तरॉंमध्ये जातात आणि स्वतचे ब्लॉग्ज लिहितात. त्यात रेस्तरॉंमध्ये गेल्यापासून अथपासून इतिपर्यंत सगळे बारकावे मांडले जातात, अशा नानाविध प्रकारे ब्लॉगर्सचा उपयोग केला जात असल्याचं तिने सांगितलं.

फूड के लिए..

फूड ब्लॉगर्सचं एक डोळे मिटून सांगण्याजोगं वैशिष्ट्य म्हणजे ते ‘खाद्यप्रेमी‘ असतात. त्यातल्या काहींना फक्त खाणं आणि खाण्याविषयीच सांगायचं असतं तर कुणाला खाणं आणि फिरण्याविषयी भरभरून माहिती द्यायची असते. कुणी फक्त शाकाहारी, कुणी मांसाहारी किंवा कुणी बेकरी प्रॉडक्ट, कुणी चाट फूडविषयी माहिती देतात. सोशल मिडिया िलक होण्याच्या जमान्यात आणि तांत्रिक गोष्टींमुळं माहिती चटकन मिळण्याच्या जमान्यात अनेक ब्लॉगर्सची फेसबुक पेजेसही आहेत. ट्विटर, इन्टाग्राम आदींवर अकाऊंट्सही आहेत. TheHungryMumbaikar हा अर्थात मुंबईकर असून त्याचं फेसबुकपेज ही त्याची ‘खाद्यडायरी’ आहे, असं तो म्हणतो. या फूड ब्लॉगर आणि कन्सल्टण्ट ब्लॉग बेस्ट फूड ब्लॉग ‘कॉस्मोपॉलिटन इंडिया ब्लॉगर्स अ‍ॅवॉर्ड २०१६’ म्हणून नावाजला गेला आहे. तर आदर्श मुंजाल हे नाव अनेकांना माहिती झालं ते The Big Bhookadमिुळे! आदर्शला ‘आयएफबीए २०१३ : बेस्ट ब्लॉग’ आणि ‘आयएफबीए २०१४ : बेस्ट मायक्रो ब्लॉग’ हे पुरस्कार मिळालेत. फूड आणि हॉस्पिटॅलिटीच्या क्षेत्रात फिरताना गाठीशी असलेले अनुभव आणि स्वयंपाकासंदर्भातल्या टिप्ससह रेस्तरॉं रिव्ह्य़ूही तो लिहितो. thatfoodiechick‘ या ब्लॉगरला केवळ खाण्यावर नव्हे तर विविध संस्कृती आणि त्यातले पदार्थ जाणून घेण्यात रस आहे. त्यामुळे छायाचित्रण, प्रवास आणि खऱ्याखुऱ्या जीवनानुभवांविषयी लिहिणं त्याला आवडतं.

या ब्लॉगर्सपकीच एक आहे चेतन भाटिया. तो गेली दीड वर्ष ‘वीकएण्ड मसाला’ हा ब्लॉग लिहितो आहे. चेतन ‘झोमॅटो’नं प्रमाणित केलेला ब्लॉगर असून त्यांच्यासाठीही रेस्तरॉं रिव्ह्य़ूज लिहितो. चेतन सांगतो की, ‘‘मी इंडियन फूड, स्ट्रीट फूड आणि चाट व्हरायटीवर असणाऱ्या रेस्तरॉंमध्ये किंवा फूड स्टॉल्सवर जाऊन तिथल्या पदार्थाची चव घेऊन लिहितो. अलीकडे वीकएण्डला हॉटेिलग करण्याचा ट्रेण्ड वाढलाय. त्यासाठी प्लॅिनग केलं जातं. मी स्वत: खवय्या असल्यानं खाण्याविषयी अपडेट राहायचा प्रयत्न करायचो. पूर्वीही लोकं खाण्याविषयी लिहायचे, पण बहुतांशी वेळा त्यात फक्त नोंदी असायच्या. अमूक पदार्थ खाल्ले..तमूक खाल्ले.. ते वाचल्यावर मलाही लिहावंसं वाटलं. हे लिखाण थोडं सविस्तर करत त्यात किंचितशी कल्पकता नि रंजकता मिसळून लिहायचा प्रयत्न केला. फॉलोअर्सना ते आवडू लागलं. माझ्या ब्लॉगला महिन्याभरात अंदाजे 75 व्हयूवर्स असून  झोमॅटोवर अंदाजे ४०० फॉलोअर्स आहेत.’’

स्वयंपाक करून पाहाच..

रेस्तरॉंमध्ये खाण्याइतकंच अनेकांना स्वत: करून खालेल्या किंवा खिलवलेल्या पाककृतीही आवडतात. भावतात. त्यांच्यासाठीही अनेक ब्लॉग्ज, पेजेस उपलब्ध आहेत. मराठीतल्या काही प्रसिद्ध फूड ब्लॉगरपकी एक असणारी फूड ब्लॉगर आहे वैदेही भावे! तिच्या दहा वर्षांपूर्वी सुरु झालेल्या ‘चकली‘ ब्लॉगचे फेसबुक फॉलोअर्स १५ हजारहून अधिक, ईमेल फॉलोअर्स ५ हजारहून अधिक आणि गुगल+चे २ हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत. लग्नानंतर अमेरिकेत गेल्यावर स्वयंपाकघरात वेगवेगळे पदार्थ करून पाहायला तिला बऱ्यापकी वेळ मिळायला लागला. मित्रमत्रिणींना आग्रहानं खिलवणं झालं. तिच्या रेसिपीजची संख्या वाढायला लागली तशी रेसिपीजची मागणीही वाढत गेली. मग या सगळ्या पाककृतींचं संकलन करावंसं वाटलं आणि ती ब्लॉग लिहू लागली. वैदेही सांगते की, ‘‘सुरुवातीला फक्त मराठीत असणारा हा ब्लॉग अनेक अमराठी लोकांच्या आग्रहास्तव इंग्रजी भाषेतही लिहिला जाऊ लागला. मुळात मराठी प्रामुख्यानं लिहिण्याचं कारण म्हणजे तेव्हा मराठीत या विषयाशी निगडित फारशा साईटस् नव्हत्या. यात महाराष्ट्रीय पदार्थावर अधिक भर दिला जातो. घरगुती पदार्थ परगावी किंवा परदेशात राहाताना सोप्या पद्धतीनं कसे करता येतील, ते लिहिते. चकलीवर सगळ्या प्रकारचे शाकाहारी पदार्थ उपलब्ध असले तरीही महाराष्ट्रीय पदार्थ, नॉर्थ इंडियन आणि इंडो-चायनीज पदार्थाना वाचकांची सर्वाधिक पसंती मिळालेली दिसते. बाहेर राहाणाऱ्यांना प्रत्येकवेळी घरी फोन करून आई-आजीकडून रेसिपी घेणं जमत नाही. मग वेबसाईट किंवा ब्लॉग्जचा आधार घेतला जातो. अशा वेळी कोणकोणत्या अडअडचणी येऊ शकतात, ते लक्षात घेऊन पाककृती लिहिल्या आहेत. कारण मी या परिस्थितीतून गेलेली आहे. कॉलेजमध्ये जाणारे किंवा नुकत्याच लग्न झालेल्या मुलामुलींनाज्यांना स्वयंपाकाची आणि इतरांना खिलवायची आवड आहे, त्यांचा या रेसिपीजना अधिक प्रतिसाद मिळतो.’’

रेसिपी माझी लाडाची गं..

फूड ब्लॉग्ज फॉलो करणाऱ्यांमध्ये दिवसातला बराच काळ घराबाहेर आणि डिजिटली अ‍ॅक्टिव्ह किंवा कनेक्टेड राहण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणाईची संख्या अधिक दिसते. त्यात मुला-मुलींचं प्रमाण सारखंच आहे हे विशेष. काही ब्लॉगर्स फूड व्ल्हॉिगगही करतात. यात http://www.cooktube.in/blog/ ,hebbarks kitchen, Swaad AnusaarRecipes, POPxo Food, tasty, food mate, awesome souce india आदी ब्लॉग्ज येतात. निशामधुलिका, कवितासिंग आदींचेही ब्लॉग्ज फॉलो केले जातात. जयंती कुमारन, शगुफ्ता जाफरी, रिचा गुप्ता, शर्मिला दास, स्मिता चंद्रा, आशू वधवा, निमी सुनीलकुमार अशी अनेक नावं या ब्लॉग पाककृती लेखकांच्या मांदियाळीत आहेत. त्यांचे ब्लॉग्ज आवर्जून वाचले जातात.

ब्लॉगप्रमाणे फेसबुक पेजेसही अनेक आहेत. त्यापकी सायली राजाध्यक्ष यांचा अन्न हेच पूर्णब्रह्म – Mumbai Masala हा खूप प्रसिद्ध आहे. सोप्या, सुटसुटीत, रोजच्या जेवणातल्या साध्या पाककृतींबद्दलचं पेज असं त्याचं वर्णन असलं तरी केवळ पाककृतींपुरतं मर्यादित न राहाता त्याचा परीघ स्वयंपाकघरापासून ते वैविध्यपूर्ण सांस्कृतिक संदर्भातपर्यंत आणि देश-विदेशांतील भटकंतीदरम्यान अनुभवाला आलेला खाना-खजाना असा विस्तारलेला दिसतो. Angat Pangat: Rediscovering Traditional Maharashtrian Cuisine या फेसबुक ग्रुपपेजवर महाराष्ट्रीय पदार्थाची समृद्ध खाद्यपरंपरा शेअर करून ती जपण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पदार्थाच्या पारंपरिक कृतींसह त्यात कालानुरुप केल्या गेलेल्या बदलांसह त्यातील वैविध्य जपण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. त्याखेरीज अनेक खाद्यप्रेमी फेसबुक ग्रुप्सची पेजेस अ‍ॅक्टिव्ह असून त्यात मराठी पदार्थ, शाकाहारी, मांसाहारी, व्हेगन डाएट, बेकरी प्रॉडक्टस् आदी प्रकार दिसून येतात. इन्स्टाग्रामवरही फुडवर लिहिणाऱ्यांचा हा प्रवाहो वाढतो आहे. Mumbaifoodie, Mumbai_munch, Foodsofmumbai, Mumbaiveggie, Indian foodiye, thecrazyindianfoodie आदी अनेक इन्स्टाग्राम अकाउंटस् फॉलो केले जातात.

लेखात सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे फूड ब्लॉग्ज हा जगभरात सगळ्यात जास्त सर्च केलेला टॉपिक दिसून येतो. त्याचे व्हिजिटर्स आणि ब्लॉगर्सही संख्येत सांगणं कठीण आहे. ब्लॉगर्स आणि फॉलोअर्स ही संख्या वाढतीच राहिल, असा अंदाज आहे. कारण बदलती जीवनशैली आणि सुपरसॉनिक वेगानं जाणारा दिवस असला तरी पोटोबाची काळजी सगळ्यांनाच आहे. म्हणूनच पदार्थाचं उपयोजन केवळ खाणं हे नसतं आताशा.  बरीच तरुण मुलं-मुली फूड ब्लॉिगग करत आहेत. अनेकदा लिखाण-फोटोचा छंद म्हणून सुरू केलेला हा फूड ब्लॉगचा उद्योग आता कमाईचं साधनंही ठरू लागला आहे. गुगल अ‍ॅड्सच्या माध्यमातून ब्लॉगर्सना जाहिरातींच्या उत्पन्नातील अंशदेखील मिळतो. या सगळ्याचा नक्की विचार करा.. खा, प्या, लिहा आणि क्लिका..

viva@expressindia.com