कुठल्या प्रकारचं जेवण कसं घ्यावं? कटलरी कुठली, कशी वापरावी? चांगला होस्ट किंवा गेस्ट बनण्यासाठीचे डायनिंग एटीकेट
मागच्या सदरात आपण ‘आ ला कार्ट’ मेन्यूचं सेटिंग जाणून घेतलं. ते करणं अगदी सोपं असतं, आपण जे ऑर्डर करू त्याप्रमाणे कटलरी टेबलावर ठेवली जाते. याच्या अगदी उलट असतं सेट मेन्यूचं टेबल सेटिंग. किती आणि कोणते कोस्रेस असतील हे जेवायच्या आधीच ठरवलं असल्याने, सगळी कटलरी आधीच टेबलवर ठेवली जाते. थ्री-कोर्स मीलमध्ये साधारणत: सूप, मेन कोर्स (मुख्यत: एक मांसाहारी पदार्थ यात असतोच) आणि डिझर्ट असतं. चार कोस्रेस असले तर सूप आणि मेन कोर्सच्या मध्ये पास्ता किंवा फिश असतं.
सेट मेन्यू असेल तर त्याचं सेटिंग कसं असतं, हे सोबतच्या छायाचित्रावरून स्पष्ट होईल.
उजव्या बाजूला, बाहेरून आत या क्रमाने, सूपचा चमचा (याचा वरचा भाग गोल असतो), फिश नाईफ (फिश खायची वेगळी सुरी), लार्ज नाईफ (मेन कोर्स खायची मोठी सुरी). डाव्या बाजूला, बाहेरून आत या क्रमाने, फिश फोर्क (फिश खायचा काटा) आणि लार्ज फोर्क (मेन कोर्स खायचा मोठा काटा). पास्ता असल्यास सेटिंग थोडं बदलतं आणि हे पास्ता कोणत्या प्रकारचा आहे यावर अवलंबून असतं. स्पगेत्ती सोडून बाकीच्या सगळ्या पास्तासाठी उजव्या बाजूला चमचा आणि डाव्या बाजूला काटा ठेवला जातो. स्पगेत्तीसाठी काटा उजव्या बाजूला आणि चमचा डाव्या बाजूला ठेवला जातो.
या सगळ्याच्या मधोमध, वरच्या बाजूला, आडवे ठेवलेले, डिझर्ट खायचे काटा आणि चमचा. (जेव्हा हे डिझर्ट प्लेटमध्ये सव्‍‌र्ह केलं जातं.) स्वीट डिश जर बोल/ कपमध्ये सव्‍‌र्ह होत असेल तर हे काटा चमचा ठेवले जात नाहीत.
बाकीची सामग्री- नॅपकिन, सेंटर पीस, क्रुएट सेट, बेरस-बटर प्लेट, पाण्याचा ग्लास, तशीच सेट केली असते. या सगळ्याच्या सोबत त्या दिवसाच्या सेट मेन्यूचे कार्डपण टेबलवर असतं.
पाश्चात्त्य पद्धतीत प्रत्येक पदार्थासाठी वेगळी क्रॉकरी आणि कटलरी वापरली जाते. त्यामुळे टेबलावर हे सगळं व्यवस्थित मांडायला लागतं.