मोठय़ा शहरात आल्यानंतर मॉडर्न होण्याची अनेकांची धडपड आपण पाहत असतो. या धडपडीचे वेगळे कंगोरे दाखवायचा प्रयत्न ‘बैल मेलाय’ या नाटकातून केला गेलाय. त्याच मॉडर्न होण्याच्या गोष्टीविषयी सांगताहेत नाटकाचे लेखक- दिग्दर्शक..   

मुंबईबद्दल लिहिताना, वाचताना आपण कायमच स्वप्ननगरी, मायानगरी म्हणून आवर्जून उल्लेख केलेला आपल्याला आढळतो. अनेक तरुण-तरुणी आपली स्वप्न घेऊन मुंबई, पुणे अशा शहरांची वाट धरताना आपल्याला दिसतात. त्यामुळे स्वप्ननगरी, मायानगरी असा उल्लेख तितकाच योग्य. पण जशा नाण्याला दोन बाजू असतात, तसंच एका लहानशा गावातून कोणत्याही शहरात स्थायिक होताना मायानगरी त्या व्यक्तीला जितकं आपलंसं करते, तितकंच ते आपलंसं करून घेण्यासाठी तगमग, स्पर्धेत टिकून राहण्यासाठीचा संघर्ष तरुण मंडळीदेखील करत असतात. शहरी राहणीमान, जीवनशैली, स्वातंत्र्य, बिनधास्तपणा भुरळ घालत असतो. मग या नादात इतरांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न यात बहुतेकदा केला जातो. त्याला मग ‘मॉडर्न होणं’ असं लेबल लावलं जातं. मॉडर्न होण्यासाठी मग आपलं मूळ रूप, भाषा, राहणीमान यात बदल करताना दिसतात. ते आपल्या गरजेचं, आपल्याला झेपणार आहे का याचा विचार बरेचदा त्यामागे नसतो.

अनेक मालिका, चित्रपटातून आपण स्मॉल टाउन गर्ल्सच्या गोष्टी पहिल्या आहेत. हाच संघर्ष ‘बैल मेलाय’ या नाटकाच्या माध्यमातून लेखक युगंधर देशपांडे याने मांडला आहे. ‘आविष्कार’ संस्थेनं तरुण लेखकांसाठी घेतलेल्या नाटय़लेखन कार्यशाळेतून वर आलेलं हे नाटक. नाटकाविषयी सांगताना युगंधर म्हणाला, ‘मुंबई किंवा तत्सम शहरात स्मॉल टाऊनमधून बरेच तरुण करिअरसाठी येतात. महानगरात आल्यावर इथल्या अनेक गोष्टी पाहून आपण यात आपण मागे पडायला नको, या सगळ्यात आपण फिट व्हायला हवं यासाठी त्याचे प्रयत्न चालू असतात. त्यांना जे समोर वेगळं दिसतं त्याला बरेचदा ते मॉडर्न म्हणून आत्मसात करतात. त्या नवीन गोष्टीत काय चांगलं काय वाईट याची शहानिशा ते करून पाहतातच असं नाही. मग बरेचदा फास्ट आणि लाउड लाइफस्टाइल त्यांना मॉडर्न वाटू लागते. ते या मॉडर्निटीमागे धावतात. ज्या बाहय़ गोष्टींना मॉडर्न म्हणायचं का? त्यांचे विचार मॉडर्न होतात का? ते या गोष्टींचा विचार करतात का, हा प्रश्न मला पडायचा. यातूनच नाटकाच्या संहितेचं बीज आलं आहे.’

शहरात येण्याचा, शहरी गोष्टी आत्मसात करण्याचा ट्रेण्ड बनतो. आताच्या घडीला बहुतेक तरुणाई या अशा मॉडर्न होण्याच्या प्रेमात पडलेली दिसते. ‘माझं बालपण पंढरपूरमध्ये गेलं आहे. मी माझ्या आजूबाजूला अशी अनेक उदाहरणं पाहिली आहेत. त्यातूनच हा विषय मला हाताळावासा वाटला’, युगंधर सांगतो.

नाटकाचा विषय केवळ ग्रामीण भागातल्या तरुणाईला अपील करील, असा किंवा विशिष्ट वर्गापुरता मर्यादित आहे, असं वरकरणी वाटत असलं तरी तसं नाहीये. नाटकाच्या विषयाच्या अ‍ॅक्सेप्टन्सविषयी सांगताना युगंधर म्हणाला, ‘काही लोकांना हा आमचा विषय नाही, असं वाटतं. मुंबईत राहणाऱ्या व्यक्तीला कदाचित असं वाटू शकतं, पण मला असं वाटतं की, हा शहर-गाव स्पेसिफिक विषय नाही. कारण मुंबईतली व्यक्ती अमेरिकेत जाते तेव्हा कदाचित त्यांना तिथल्या गोष्टी मॉडर्न वाटू शकतात. त्यामुळे कोणालाही रिलेट होऊ  शकेल, असा हा विषय आहे.’

एका सलग गोष्टीतून अर्थात दीर्घाकातून मॉडर्न होण्याची एका तरुण दाम्पत्याची इच्छा आणि त्यातून निर्माण होणारी भीती, चिंता, असुरक्षितता, इगो, खेद, पश्चात्ताप, त्यातून निर्माण होणारा गोंधळ असे वेगवेगळे पैलू मांडण्याचा प्रयत्न या नाटकातून केला गेलाय. त्यामुळे मॉडर्न म्हणजे नक्की काय? यावर हे नाटक विचार करायला लावतं. नाटकाचा दिग्दर्शक ललित प्रभाकर म्हणतो, ‘नाटकात कुठेही आम्ही मॉडर्निटी म्हणजे काय हे सांगण्याचा प्रयत्न केला नाहीये. आपण मॉडर्न होणं खूप मटेरिअलिस्टिक गोष्टींशी रिलेट करतो. आपण ते वैचारिक पातळीवर कधीच नेत नाही. त्यामुळे मॉडर्न होण्यासोबतच्या चांगल्या गोष्टी तेवढय़ा आपण घेतो आणि वाईट गोष्टी, दुष्परिणाम बाजूला सारायचा प्रयत्न करत असतो. सतत असंतुष्ट असणं, वरच्या वर्गात जाण्यासाठी चाललेली धडपड या नाटकात दाखवली आहे. माझ्या मते, मॉडर्न होणं म्हणजे काय याला व्याख्येत बसवण्यापेक्षा आपण आहे ते आयुष्य पुरेपूर जगायला हवं. ते मॉडर्न होईल की नाही, हा विचार जरा दूर ठेवायला हवा.’

 

नाटकात कुठेही आम्ही मॉडर्निटी म्हणजे काय हे सांगण्याचा प्रयत्न केला नाहीये. आपण मॉडर्न होणं खूप मटेरिअलिस्टिक गोष्टींशी रिलेट करतो. आपण ते वैचारिक पातळीवर कधीच नेत नाही. – ललित प्रभाकर, दिग्दर्शक lalit

yugandharमहानगरात येणाऱ्या अनेकांना इथली फास्ट आणि लाऊड लाइफस्टाइल मॉडर्न वाटू लागते. ते या मॉडर्निटीच्या मागे धावतात. मी अशी अनेक उदाहरणं पाहिली आहेत. त्यातूनच मला हा विषय हाताळावासा वाटला.  – युगंधर देशपांडे, लेखक

 

कोमल आचरेकर