ऑकलंड, फ्लोरिडा, मेलबर्नमधल्या हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातल्या करिअरविषयी, ‘डिस्नेलॅण्ड’मध्ये काम करण्याच्या अनुभव आणि न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियातल्या बहुसांस्कृतिक मिश्र जीवनशैलीविषयी सांगतेय, ‘डक्टोरेट’ गायत्री.

मी मूळची पुण्याची. बारावीत असताना ‘रोटरी यूथ एक्सचेंज प्रोग्रॅम’तर्फे ब्राझीलला गेले होते. दोन महिने मी पोर्तुगीज कुटुंबात राहिले आणि मग आमच्या घरी ऑस्ट्रेलियातली मुलगी राहायला आली होती. त्या कुटुंबासोबत अजूनही मी संपर्कात आहे. हा माझा पहिलावहिला परदेश प्रवास. बारावीनंतर मी बाबांचा तिथे जॉब असल्यानं न्यूझीलंडला गेले. मी ऑकलंडला कअळअ (आयटा) आणि ‘एमआयटी’मध्ये ट्रॅव्हल टुरिझमचा डिप्लोमा पूर्ण केला. न्यूझीलंडमध्ये पर्यटन क्षेत्राचा विस्तार मोठा असल्यानं त्यात संधी खूप होती. नवा देश, नवीन माणसं, भाषा फारशी परिचित नव्हती भोवतालची. तिथं माझ्या वयाची मुलं पार्टटाइम जॉब करताहेत, हे पाहिल्यावर मीही तसं करायचं ठरवलं. जवळपास शंभर ठिकाणी रेझ्युमे देऊन आले. सुरुवातीला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. नंतर मिळाला. डिप्लोमा करतानाच मी वेंण्डीज हॅम्बर्गर्समध्ये जॉब पाच वर्षे केला. काऊंटरवर, ‘ड्राईव्ह थ्रू’वर ऑर्डर्स घ्यायचे. पुढं शिफ्ट सुपरव्हायजर म्हणून प्रमोशन मिळालं. मी अनेकांना ट्रेिनगही दिलं.

त्यानंतर ऑकलंड युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीमधून तीन वर्षांचा बॅचलर इन इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटचा कोर्स केला. तो चालू असतानाच ‘स्काय सिटी ग्रँण्ड’ या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये सीटर/ग्रीटर आणि फूड अँण्ड बेव्हरेज अटेंडंट म्हणून जॉब केला. इथं अनेक सेलेब्रेटीज आणि विदेशातील पंतप्रधान वगरे यायचे. एकदा रशियाचे अध्यक्ष व्लादमीर पुतिन आले होते. आम्हाला फक्त सांगण्यात आलं की, अतिशय महत्त्वाचे पाहुणे येणारेत, बेस्ट कस्टमर सíव्हस द्या वगरे. मी नेहमीप्रमाणं सगळ्या टेबल्सशी जाऊन चहा-कॉफीची विचारणा केली. मात्र पुतिन यांच्या चेहऱ्याकडं लक्ष न गेल्यानं ते आल्याचं मला कळलं नव्हतं. त्यांनी ‘कॉफी हवीय’, सांगितल्यावर, त्यांना कॉफी दिली. नंतर मॅनेजरनी विचारलं, ‘टेबल नंबर एकचे कस्टमर काय म्हणताहेत?’ मी म्हटलं, ‘त्यांना कॉफी दिलेय’. ते पुतिन असल्याचं मॅनेजरनी सांगितलं. माझा आधी विश्वासच बसेना. त्यांनी मुद्दामच मला आधी कल्पना दिली नाही, कारण मग टेन्शन आलं असतं. तरीही टेन्शन आलंच. सगळं नीट मिळालंय ना, असं पुन्हा सगळ्या टेबलांपाशी जाऊन विचारताना टेबल नंबर एकपाशी आल्यावर माझा आवाज एकदम घाबरलेला आला. जाम दडपण आलेलं. पण सगळं व्यवस्थित झालं. हॉटेलमध्ये नोकरी असताना अनेक देशांतून येणाऱ्या लोकांशी जुजबी बोलायला लागायचं. एक कुटुंब दुबईहून पहिल्यांदाच न्यूझीलंडमध्ये आलं होतं. त्यांच्याशी गप्पांच्या ओघात मी दुबईला सुंदर देश म्हटलं. त्यांच्या देशाचं कौतुक केल्याचा त्यांना इतका आनंद झाला की, तिकडून निघताना त्यांनी मला थांबवून गिफ्ट दिलं. आपल्या साध्याशा बोलण्यानं एखाद्याला आनंद वाटू शकतो, हे तेव्हा कळलं.

ग्रॅज्युएशननंतर युनिव्हर्सिटीतल्या एका सेमिनारमध्ये डिस्न्लँण्डमधल्या रिक्रूटमेंट ग्रुपनं ‘डिस्ने’ची माहिती सांगितली. मग मी जॉबसाठी अप्लाय केलं. इंटरव्हू’ज होऊन फ्लोरिडाच्या डिस्न्लॅण्डमध्ये वर्षभरासाठी इंटर्नशिपची संधी मिळाली. जगातल्या काही बेस्ट रिसॉर्टपकी एक असणाऱ्या तिथल्या ‘यॉट अ‍ॅण्ड बीच क्लब रिसॉर्ट’ या फाइव्ह स्टार रिसॉर्टमध्ये मी हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटचं प्रशिक्षण घेतलं. मी फ्रण्ट ऑफिसमध्ये आणि थोडे दिवस फूड अ‍ॅण्ड बेव्हरेजमध्ये होते. तिथं न्यूझीलंडमधल्या आम्हां दहा जणांसह काही ऑस्ट्रेलियन विद्यार्थीही होते. हा अनुभव अगदी अवर्णनीय होता. डिस्नेच्या बॅकस्टेजची तयारी, परफॉर्मन्सची मेहनत, कॅरॅक्टर्सची निवड होणं, त्यांना मिळणारं ट्रेिनग आदी गोष्टी तपशीलवार पाहायला मिळाल्या. वेगवेगळ्या देशांतले पर्यटक भेटले. कधीकधी मी एक्स्ट्रा शिफ्ट्स करायचे डिस्ने पार्कमध्ये. तिथं मी संध्याकाळी ऑडियन्स कंट्रोल करायला जायचे. सुरुवातीला वाटलं की, हे कित्ती सोप्पं काम आहे. पण ते करायला लागल्यावर लक्षात आलं की, ते तसं नाहीये. एकाच वेळी ५० ते ७० हजार लोकं तिथं असायची. काही वेळा तर ही गर्दी आवाक्यापलीकडं असायची. निवडक मुलांनाच डिस्नेच्या अध्यक्षांना भेटायची संधी मिळालेली, त्यात मीही होते. मला त्यांना काही प्रश्न विचारता आले. या काळात वेगवेगळ्या देशांतल्या मुलामुलींसोबत मत्री झाली नि आम्ही अजूनही संपर्कात आहोत. पूर्णपणं वेगळ्या संस्कृतीतल्या लोकांसोबत मी राहत होते. महिनोनमहिने भोवताली कुणी भारतीय नव्हते. एकदा पार्कमध्ये गेल्यावर मराठी भाषा कानावर पडली. त्या मुंबईकरांना मदत करताना खूप छान वाटलं. रिसॉर्टमध्ये इंटरनॅशनल, अमेरिकन पर्यटकांसह नॉर्वे, स्वीडन, दक्षिण अमेरिका, आफ्रिकेतले लोक येत. त्यामुळं रोज अनेक लोकांना भेटायचा खूप मोठा अनुभव आणि संधी मला मिळाली. याच सुमारास मी हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून बिझनेस मॅनेजमेंट सर्टििफकेट मिळवलं.

मी टिपिकल मराठी संस्कृतीतली मुलगी. त्यामुळं िड्रक्स, डेटिंग, स्मोकिंग पाहिल्यावर सुरुवातीला धक्का बसला. मत्रिणी पार्टी करायच्या, तेव्हा िड्रक्सचा आग्रह करायच्या. मला त्यात रस वाटत नव्हता, तर त्यांच्यासाठी ती नेहमीचीच गोष्ट होती. त्यांची संस्कृती होती. हळूहळू कळायला लागलं की, त्यांच्यात थोडं मिक्स व्हायला पाहिजे. काही वेळा रूममेट्सच्या सवयी अ‍ॅडजस्ट कराव्या लागल्या. उदाहरणार्थ, झिम्बाब्वेच्या रूममेटचे ब्लॅक फ्रेण्ड्स गप्पा मारायला घरी यायचे, तेव्हा सुरुवातीला थोडं बिचकायला झालं. नंतर मीही गप्पांत सामील झाले. न्यूझीलंडला जॉब करताना भाषा कळायला थोडा वेळ लागला. कस्टमर्सची स्लँग किंवा काही शब्द मला कळायचे नाहीत, काही वेळा. नवीन असताना खूप चुकीच्या ऑर्डर्स घ्यायचे. काही वेळा त्यांना पुन्हा विचारायचेही. कारण ऑस्ट्रेलियन नि न्यूझीलंडच्या लोकांचे अ‍ॅक्सेंट स्ट्राँग असून ते कळायला थोडा वेळ लागतो. नंतर त्यांचे अ‍ॅक्सेंट कळायला लागले. यूएसमधल्या लोकांचे अ‍ॅक्सेंट आणखीच वेगळे होते. तिथं एवढे पर्यटक यायचे नि त्यांचे प्रत्येकाचे निराळे अ‍ॅक्सेंट.. एकेक अनुभवांतून शिकत गेले.

मेलबर्नमध्ये येऊन साडेतीन वर्षे झालीत. सध्या इथंच राहायचा विचार आहे. मी हॉस्पिटॅलिटी मार्केटिंगमध्ये जॉब करतेय. नुकताच अर्ली चाइल्डहूड एज्युकेशन अ‍ॅण्ड केअरमध्ये डिप्लोमा पूर्ण केलाय. इथं चाईल्ड केअर सेंटर्सना खूप मागणी आहे. तीन-चार महिने ते पाच वर्षांपर्यंतच्या मुलांसोबत जॉब करू शकते. आपल्याकडं या क्षेत्राविषयी फारशी जागरूकता नाहीये. पण इथले कायदे, नियम आणि कार्यपद्धती खूपच कडक आहे. आता मी अर्ली चाइल्डहूड एज्युकेटर म्हणून जॉब किंवा स्वतचं चाइल्ड केअर सेंटर चालू करण्याचा विचार चाललाय. प्लेसमेंटच्या वेळी हे काम आणखीन आवडायला लागलं. वेगवेगळ्या पाश्र्वभूमीच्या मुलांसोबत त्यांच्या विश्वात वावरताना मजा येते. तितकीच ती जबाबदारीही आहे. एक किस्सा सांगते, मुलांसोबतचा. मुलांना जेवताना त्या आहाराचं महत्त्व समजवायचं असतं. उदाहरणार्थ, फळं का खायची, ते सांगायचं होतं. ३-४  वर्षांच्या मुलींचा ग्रुप होता. त्यांना म्हटलं, ‘तुम्हांला सुंदर डोळे नि स्किन हवी असेल तर फळं खा. बघा, माझे डोळे नि स्किन कशी सिंड्रेलासारखी आहे. कारण लहानपणी मी सगळी फळं खायचे. ‘त्या सगळ्या जणी हसायला लागल्या. म्हणाल्या, ‘तू मुळीच सिंड्रेलासारखी दिसत नाहीस. तुझे केस सोनेरी कुठेत.. तू तशी गोरीपान कुठेएस?’ आता बोला..  ही मुलं मला ‘गाया’ म्हणून हाक मारतात नि प्रश्न विचारून भंडावतात. माझा देश, रंग-केस, वय वगरेंविषयी त्यांना कुतूहल वाटतं. माझीच परीक्षा घेतात जणू.

मला मुळातच फिरायला खूप आवडतं. न्यूझीलंड सगळं फिरलेय. यूएसमधल्या काही सिटीज फिरलेय. इथं सिडनेखेरीज अजून फार फिरून नाही झालेलं. यूएसला असताना कॅनडाला गेले होते फिरायला. माझ्याकडं ओपन तिकीट होतं. आय कॅन ट्रॅव्हल एनीव्हेअर. आता जायचं कुठं हा प्रश्न उभा राहिला. कारण याच बजेटमध्ये कुठलं तिकीट मिळेल, माहिती नव्हतं. मिळेल, तिथं एकटी जाईन आणि मग परतेन, अशी परिस्थिती होती. त्या किमतीचं कॅनडातलं तिकीट मिळालं. फक्त माझं डेस्टिनेशन बदललं ते ओटावा केलं. माझ्या हातात खूप कमी दिवस होते नि म्हटलं की, सकाळी जाऊन रात्री परतायचं. त्यामुळं सामान फारसं नव्हतं. एअरपोर्टवर मला विचारणा झाली की, एकाच दिवसासाठी कशी काय आलीस. त्यांना ते संशयास्पद वाटू लागलं. मी तिकिटाची गोष्ट त्यांना सांगितली. त्यांनी मला थांबवून ठेवलं. तेव्हा वाटलं, का हा वेडेपणा मी केलाय.. दरम्यान आईचा फोन आल्यानं तिला सगळं सांगितलं. इमिग्रेशनवाल्यांच्या चौकशीत डिस्न्ोतल्या कामाविषयी सांगून सगळी माहिती त्यांना दिली. इथं कुठं फिरणार, विचाल्यावर पार्लमेंटची बििल्डग खूप सुंदर असल्याचं कळल्यानं ती बघणार’, असं मी सांगितल्यावर त्यांचा संशय आणखी वाढला. त्यांनी माझे फोन, मेसेजेस, ई-मेल्स चेक केले. अखेरीस मी पर्यटकच असल्याचं पटल्यावर त्यांनी व्हिसा स्टॅम्प केला. मग फिरले नि परतले..

इथे ऑस्ट्रेलियात मराठी मंडळाच्या कार्यक्रमांना बरेचदा जाते. इतकी र्वष बाहेर राहिल्यानं सवय झाल्येय, पण होमसिक व्हायला होतं कधीतरी. परदेशी राहायला लागल्यापासून माझ्यात खूप फरक पडलाय. आपल्याकडं खूपच स्पर्धा आहे. हुशारांना संधी मिळतेय, बाकीच्यांनी काय करायचं? देशाबाहेर पडल्यावर अनुभवलेलं जग वेगळं होतं. कितीतरी गोष्टी होत्या करण्यासारख्या, शिकण्यासारख्या. आपल्याला अनेक लोकं भेटतात, वेगवेगळे अनुभव येतात. अनेक संस्कृती कळतात, त्यातून चांगलं ते घेऊन स्वतत बदल घडवता येतो. मी नम्रपणा, आदर दर्शवणं, संयम ठेवणं, अ‍ॅडजस्ट होणं, पूर्वग्रह न ठेवणं आदी गोष्टी शिकलेय. भारतीय संस्कृतीतल्या चांगल्या गोष्टीही आचरतेय. आत्मविश्वास वाढलाय. लोक ओळखता येऊ लागलेत. अधिक समजूतदार झालेय. कोणतीही परिस्थिती समर्थपणं हाताळू शकतेय. करिअरसाठी खूप मेहनत घेतेय. ध्येयांचा प्राधान्यक्रम ठरवून ते गाठण्यासाठी वाटचाल सुरू आहे.

गायत्री कुलकर्णी (मेलबर्न)

(शब्दांकन : राधिका कुंटे)