साडी पहिली की गाऊन? हा वाद कोंबडी आधी की अंडं? या वादाइतकाच जुना आहे. या वादात कोणीही जिंको, पण त्याच्यामुळे जगाच्या पाठीवरचे दोन सुंदर कपडय़ांचे प्रकार आपल्याला लाभले आहेत हे नक्की. आणि कितीही वाद झाले तरी ते दोघेही एकमेकांना पूरक आहेत. या दोघांना जोडणारा समान धागा म्हणजे ड्रेपिंग किंवा मराठीत सांगायचं झाल्यास नेसवण्याची पद्धत. सध्याच्या कित्येक ड्रेसेसच्या मागे ड्रेपिंगची ही किमया पाहायला मिळते आहे.

कपडे घालण्याची सुरुवात हीच नेमकी पाने, प्राण्यांची कातडी एकमेकांना जोडून झाली. त्यानंतर कापडाचा शोध लागला. पण या शोधानंतर ड्रेस किंवा कपडे शिवण्याआधी कापड अंगभर नेसवणं किंवा गुरफटण्याची पद्धत होती. अर्थात त्यातही वेगवेगळे प्रकार होते. कोणी बेल्टने कापड बांधायचे, तर कोणी गाठ मारायचे. आपल्याकडे त्यातून साडी, धोती नेसविण्याची पद्धत उदयाला आली. कापड विशिष्ट पद्धतीने गुंडाळून त्याचे पदर पाडून खोचण्याची पद्धत. नंतर शिवणकलेच्या पद्धतीनुसार ड्रेसमेकिंग किंवा कपडे शिवण्याच्या पद्धती सुरू झाल्या. पण म्हणून ड्रेपिंग फक्त आपल्याकडेच होतं हा साडी आणि लुंगीच्या आधारावर केलेला दावा खरंतर चुकीचा आहे. रोमन, ग्रीक, पर्शियन संस्कृतीतसुद्धा कपडे ड्रेपिंग करायची पद्धती होती. त्याचे दाखले इतिहासात मिळतात. फक्त साडी, लुंगी, धोती, दुपट्टा या निवडक प्रकारच्या माध्यमातून त्यांचं आधुनिकीकरण झालं. ड्रेपिंगच्या मदतीने विकसित झालेला एक ड्रेसचा प्रकार म्हणजे गाऊन. आपल्याकडे पहिल्या साडीचं जे आकर्षण प्रत्येक मुलीला असतं, तसंच आकर्षण पाश्चात्त्य देशांमध्ये मुलींना गाऊ नचं असतं. शाळा संपताना आयोजित केल्या जाणाऱ्या प्रॉम नाइटला घालायला मिळणारा पहिला गाऊन हा म्हणूनच तेथील मुलींसाठी कौतुकाचा विषय असतो. रेड कार्पेट इव्हेंट आणि त्यातून प्रसिद्धीस आलेला गाऊन हे आपल्याकडेही दिवास्वप्न आहे. एल्सासाब, अरमानी असे कित्येक डिझायनर्स त्यांच्या गाऊनसाठी ओळखले जातात. पण आज आपला विषय ना साडी आहे ना गाऊन. गेल्या काही वर्षांमध्ये या ड्रेपिंगबद्दल डिझायनर्समध्ये कमालीचं आकर्षण वाढतंय त्याविषयी आज आपण बोलणार आहोत.

मधल्या काही वर्षांमधील रनवे कलेक्शन्स पाहिल्यावर आवर्जून लक्षात येणारी गोष्ट म्हणजे ड्रेपिंगचा ड्रेसवर झालेला परिणाम. एरवी ड्रेस शिवताना पॅटर्न किंवा खाका तयार केला जातो. त्यानुसार कापडाचे तुकडे कापून ते शिवले जातात. ड्रेपिंगमध्ये याआधी एका डमी किंवा बाहुल्यावर कापड चढवून ते  शरीरावर कसं दिसणं अपेक्षित आहे, हे पाहिलं जातं. याचा फायदा म्हणजे ड्रेसला घेरा मिळतो. सुटसुटीतपणा मिळतो. ड्रेसला नेहमीच्या पॅटर्नपेक्षा वेगळा आकार देता येतो. कापडाच्या नैसर्गिक गुणधर्माचा वापर करून जास्त प्रयोग करता येतात. त्यामुळे वेगळी स्टाइल, लुक मिळतो. ड्रेपिंगमध्ये पॅटर्नपेक्षा कापड अंगावर कसं फॉल होतंय किंवा शरीरानुसार कसा आकार घेतंय यानुसार ड्रेसचा आकार ठरवला जातो. त्यामुळे प्रत्येक देहयष्टीनुसार ड्रेसमध्ये विविधता येते. अर्थात हे त्याचे फायदे असले तरी ही प्रक्रिया तितकीच किचकट आहे. त्यामुळे खूप कमी डिझायनर्स या पद्धतीकडे वळण्याचं धाडस करतात. गाऊनमधील घेरा, फ्लेअर हा ड्रेपिंगमुळेच मिळतो. गेल्या काही वर्षांमध्ये कित्येक डिझायनर्सनी ड्रेपिंगसोबत प्रयोग करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे वेगवेगळे ड्रेसेसचे प्रकार समोर येऊ  लागले आहेत. सोप्पं उदाहरण घायचं झाल्यास अनारकली, धोती पँट, रॅप अराउंड स्कर्ट, घागरा. पण याहीपलीकडे शर्ट, स्लीव्ह, पँट, ड्रेसेसमध्येही त्यांनी ड्रेपिंग करण्यास सुरुवात केली आहे. मॅक्सी ड्रेस हे याचं उत्तम उदाहरण आहे. याशिवाय ए-सिमेट्रिकल ड्रेस, प्लंप टॉप, फ्लेअर शर्ट, केप्स, कुर्ती यामध्ये ड्रेपिंगची स्टाइल आवर्जून पाहायला मिळतेय. एका बाजूला गाठ मारलेला क्नॉटेड स्कर्ट, फिं्रज स्कर्ट, मल्टी लेअर ड्रेस, पॅनल ड्रेस हीदेखील याचीच उदाहरणं. स्टीच साडी, साडी गाऊन, किंवा साडी पलॅझो यांमध्ये साडी ड्रेपिंगचा वापर केला जातो. स्लीव्ह्समध्येही घेरा वाढविण्यासाठी ड्रेपिंगचा वापर होतो.

एरवी घेरेदार ड्रेस म्हटल्यावर शिफॉन, जॉर्जेट अशा सुळसुळीत कापडांचा उल्लेख पहिल्यांदा येतो. पण ड्रेपिंगच्या वेगवेगळ्या पदरांची खरी मजा मलमल, लिनिन, सिल्क या कापडांमध्ये येते. त्यामुळे सध्याच्या नैसर्गिक कापडांच्या ट्रेंडमध्ये ड्रेपिंग अजूनच उठून दिसतं. एकाच कापडाचा वापर करण्याऐवजी दोन-तीन वेगवेगळ्या प्रिंट किंवा पॅटर्नचे कापड एकत्र करून वेगळा प्रयोग करायची संधी ड्रेपिंगमध्ये मिळते. अर्थात आपण असं करताना कापड एकाच वजनाचं असेल याची खात्री करा. रोजच्या सेमी-फॉर्मल ड्रेसिंगमध्ये ड्रेपिंगमुळे पर्याय मिळतातच, पण पारंपरिक ड्रेसिंगमध्येही वेगळेपणा दिसून येतो. तसेच या ड्रेसेससोबत स्टायलिंगचे बरेच पर्याय मिळतात. केप, दुपट्टा स्टाइल, पदर स्टाइल, श्रग हे प्रकारसुद्धा ड्रेपिंगची देणगी आहेत. त्यामुळे तात्पुरता का होईना साडी की गाऊन हा वाद बाजूला ठेवूयात आणि ड्रेपिंगची मजा अनुभवूया.

viva@expressindia.com