मुक्ता परांजपे इंग्लंड/फ्रान्स

फ्रेंच भाषेची लागलेली गोडी, फ्रान्समधल्या वास्तव्याचा अनुभव आणि शिक्षण क्षेत्रात प्रयोग करण्याची लागलेली ओढ. इंग्लंडच्या डर्हम युनिव्‍‌र्हसिटीमध्ये शिक्षणशास्त्राला तंत्रज्ञानाची जोड देणाऱ्या अभ्यासक्रमाविषयी सांगतेय, अलीकडंच पुण्यात परतलेली मुक्ता परांजपे.

challenge to the forest officials to find the tigress dropped radio collar
नागपूर : ‘रेडिओ कॉलर’ निघाली; ‘त्या’ वाघिणीचा शोध घेण्याचे वनाधिकाऱ्यांपुढे आव्हान
haryana school bus accident
हरियाणातील स्कूलबस अपघात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; शाळेच्या मुख्यध्यापिकेसह तिघांना अटक
When will the delayed MPSC exams be held The commission told reason
‘एमपीएससी’च्या लांबलेल्या परीक्षा कधी होणार? आयोगाने सांगितले कारण…
megha engineering 60 percent donation to bjp
Electoral Bonds Data : ‘मेघा इंजीनियरिंग’ची ६० टक्के देणगी भाजपला; रोखे खरेदी केल्यानंतर सरकारी कंत्राटे

हाय फ्रेण्ड्स, इंग्लंडच्या डर्हम युनिव्हर्सिटीतील माझा अभ्यासक्रम नुकताच पूर्ण झालाय. प्रबंधलेखन पूर्ण होऊन अंतिम निकाल लागायचाय. त्यामुळे मी पुण्यात परतले आहे. आपल्याकडेही या फिल्डमध्ये खूप काम होतेय, बऱ्याच संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे पुढची काही र्वष इथेच राहायचा विचार आहे. पुढे काही वर्षांनी परदेशातही अनुभव घेण्याच्या दृष्टीने याच क्षेत्रातली नोकरी शोधण्याचा विचार आहे. सध्या पुण्यात एक जॉब मिळाला आहे. हे सांगताना आठवताहेत, ते या प्रवासातले निरनिराळे टप्पे..

पुण्याच्या ‘अक्षरनंदन’मध्ये माझं शालेय शिक्षण झालं. त्यामुळे शाळेचा माझ्या करिअरवर बऱ्यापैकी प्रभाव आहे. एकूणच शिकण्याकडे कसं बघावं, हा दृष्टिकोन शाळेने दिला. शालेय जीवनात आपल्याला वेगळा अनुभव मिळाला होता आणि तो इतरांपेक्षा चांगला आहे, ही जाणीव सुरुवातीपासून होती. ठरलेल्या वळणवाटांवरूनच जायला हवं, असं काही नसतं. मला वाटतं की, वेगळी वाट चोखाळण्यात काही वाईट नाही. आपल्या आवडीच्या गोष्टी करून बघायला हव्यातच. माझ्या या निर्णयाला घरूनही चांगला पाठिंबा मिळाला. दहावीनंतर फग्र्युसन महाविद्यालयामधून बी.ए. सायकॉलॉजी केलं. ही बऱ्यापैकी पारंपरिक वळणाची गोष्ट होती. त्या अभ्यासाखेरीज मी पुण्याच्या ऑलियॉन्स फ्राँसेमधून फ्रेंच शिकत होते. मुळात भाषा विषयाची आवड आहेच. लिहायला-वाचायला आवडतं. बारावीत असताना मी श्रीनिवास पंडित यांच्याबरोबर व्हिक्टर ड्रॅगुन्स्की या रशियन लेखकाच्या  Adventures of Dennis या मूळ रशियन पुस्तकाच्या इंग्लिशमधल्या अनुवादावरून मराठीत केलेलं भाषांतर ‘डेनिसच्या गोष्टी’ हे पुस्तक ऊर्जा प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. एक वेगळा प्रयोग म्हणून मी ते केलं. खूप मजा आली होती. साधारण याच सुमारास मी पुण्याच्या छात्रप्रबोधिनीच्या इंग्लिश दिवाळी अंकाचं सहसंपादनही केलं होतं. शिवाय दहावीच्या सुट्टीत आम्ही युरोपमध्ये गेलो होतो. तेव्हा तिथल्या एका फ्रेंच भाषिक गावात राहिलो होतो. तिथल्या लोकांना अजिबात इंग्लिश येत नसल्याने त्यांच्याशी आम्हाला बिलकूल संवाद साधता आला नव्हता. आता वाटतं की, त्यांच्याशी आपल्याला बोलता यायला हवं, असं बीज कुठे तरी मनात रुजलं असावं. त्यामुळे फ्रेंच शिकायचं ठरवलं आणि ते खूपच आवडलं. ते शिकायला नि बोलायला खूप मजा यायला लागली. माझं फ्रेंच अधिक चांगलं झालं ते ‘अलियॉन्स’मुळे. तिथली भाषा शिकवण्याची पद्धत, त्यातली तत्त्वं चांगली होती. संभाषणाखेरीज केवळ व्याकरण शिकण्यापेक्षा भाषा आणि संस्कृतीही समजून घ्यायला शिकवलं जाई. त्यामुळं फ्रेंच एकदम क्लिक झालं.

सायकॉलॉजीची पदवी घेतल्यानंतर जाणवलं की, मला फ्रेंच भाषा शिकण्यात अधिक रस आहे. मग मी हैदराबादला ‘द इंग्लिश अ‍ॅण्ड फॉरेन लँग्वेज युनिव्हसिर्टी’मध्ये फ्रेंचमध्ये मास्टर्स करायला गेले. फ्रेंच आणखीन सविस्तरपणे शिकायला मिळालं. तिथे ‘शिकवणं’ ही गोष्ट आपल्याला आवडतेय हेही कळलं. केवळ वर्गात जाऊन शिकवलं, एवढंच न करता, कसं शिकवावं, अभ्यासक्रम तयार करण्यामागची तत्त्वं काय असावीत, हे सगळं फारच इंटरेस्टिंग वाटलं. हैदराबादच्या मास्टर्सनंतर करिअरपेक्षा एक अनुभव म्हणून, भाषा सुधारणं आणि थोडासा ब्रेक या उद्देशानं मी फ्रान्समधल्या फ्रेंच शिक्षणखात्याच्या एक कार्यक्रमात सहभागी झाले. फ्रेंच सरकार त्यांच्या ‘असिस्ताना’ या कार्यक्रमाअंतर्गत देशोदेशीच्या विविध भाषिक आणि फ्रेंच भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या युवावर्गाला फ्रान्समधल्या त्या त्या भाषा शिकवणाऱ्या शालेय शिक्षकांचे साहाय्यक (‘असिस्टंटस्’ -असिस्ताना) म्हणून सात महिने फ्रान्समध्ये राहण्यासाठी आमंत्रित करतं. मी बुर्ग आँ ब्रेस या छोटय़ाशा गावात राहिले होते. माझा जॉब होता इंग्लिश भाषा शिक्षकांच्या साहाय्यकाचा. तिथल्या बऱ्याच लोकांना भेटलेली मी पहिली भारतीय होते. मी एका बोर्डिग स्कूलमध्ये शिकवत होते. माझ्यासारख्या इतर भाषा शिकवायला आलेल्या साहाय्यकांत जर्मन, स्पेन, इटली, रशिया, कोलंबिया आणि अमेरिकेतील सहा जणी होत्या. आम्ही एकाच मजल्यावर राहायचो. आमचं किचन सामाईक होतं. त्यातल्या दोघी-तिघींशी माझी चांगली दोस्ती झाली होती. त्यातल्या एका मैत्रिणीकडे मी जर्मनीला गेले होते नि ती माझ्याकडे भारतात येऊन गेली. आम्ही कायम फ्रेंचमध्येच बोलायचो. आमची फ्रेंच पहिली भाषा नव्हती आणि कदाचित दुसऱ्या कोणत्या संदर्भात भेटलो असतो, तर आम्ही इंग्लिशमध्ये बोललो असतो. अजूनही आम्ही एकमेकींच्या संपर्कात आहोत.

भारतातून आलेली मुलगी एवढं बरं फ्रेंच बोलेल, अशी स्थानिकांची अजिबात अपेक्षा नव्हती. त्यामुळं सगळ्यांनी माझं कौतुक नि लाड केले. काही टीचर्ससोबत खूप चांगला ऋणानुबंध जुळला. तिथून यायच्या आधी त्यांनी घरी बोलावलं होतं. त्यांना काही तरी भारतीय पदार्थ खायचा असल्यानं मी त्यांना पोळ्या करून दाखवल्या. एकूणच खाण्याच्याबाबतीत ‘माझ्या पुढय़ातला पदार्थ कोणता आहे, हे कळलं नाही, तर मी ते नक्की ट्राय करून बघेन,’ अशी माझी मानसिकता आहे. लंच शाळेच्या कॅन्टीनमध्ये मिळायचं. त्यामुळे टिपिकल फ्रेंच पदार्थ अनायासे खायला मिळाले. बऱ्याच गोष्टींची चव पहिल्यांदा घेतली नि त्या आवडल्या. बुर्गमधलं चिकन एकदम प्रसिद्ध आहे. त्याची खासियत म्हणजे ते क्रिमी व्हाइट सॉसमध्ये करतात. टीचर्सनी घरी बोलावून खिलवलेल्या घरगुती चिकनची चव अधिकच लाजवाब होती.

मला ‘शेंगेन व्हिसा’ मिळाल्यानं युरोपमध्ये फिरायला मिळणार होतं. तिथं शिक्षकांना असणाऱ्या भरपूर सुट्टय़ांचा पुरेपूर वापर मी फिरण्यासाठी करून घेतला. ख्रिसमसला स्लोव्हाकियामध्ये एका मैत्रिणीच्या घरी गेले होते. तिच्या पालकांना इंग्लिशचं अक्षरही येत नव्हतं. मला स्लोव्हाक भाषेचा गंध नव्हता. पण ख्रिसमसच्या निमित्तानं त्यांनी दिलेले पदार्थ चविष्ट आहेत, हे मी फक्त चविष्ट या शब्दाला ‘स्लोव्हाकी’ शब्द विचारून घेऊन तिच्या आईला सांगितलं. तिनं समाधानानं मान डोलावली.. इथल्या भटकंतीत सगळीकडेच खूप चांगला अनुभव आला. कधी असुरक्षित वगैरे वाटलं नाही. बूर्गमधले लोक फ्रेण्डली होते, त्यामुळे तिथल्या वातावरणात मीही रुळले होते. फ्रान्समध्ये आपण परिचित माणसांना भेटतो, तेव्हा ‘फेअर ला बीझ’ (faire la bise – to do the bises (kiss) म्हणजे गालाला गाल लावून ग्रीट करण्याची फ्रेंच पद्धत अवलंबली जाते. ही सांस्कृतिक पद्धत माहिती होती. प्रत्येक ठिकाणच्या या ग्रीटमध्ये किंचितसा फरकही असतो, हेही माहिती होतं, पण सुरुवातीला त्यात थोडं गोंधळायला व्हायचं, नंतर ते जमलं. पॅरिसमधले लोकं आपापल्या उद्योगांत मग्न असतात. इतरांच्या गोष्टींत नाक खुपसत नाहीत. फ्रेंच लोक इंग्लिश बोलायला फारसे राजी नसतात, अशी आपली समजूत असते. त्यात झालेला बदल मला जाणवला. त्यांना इंग्लिशची गरज वाटायला लागली आहे. मी फ्रेंच बोलले तरी त्यांना इंग्लिशचा सराव करायचा होता. फ्रेंचचा अभिमान असला तरी इंग्लिशबद्दलचा आकस थोडा कमी झाल्यासारखा वाटतोय.

फ्रान्सहून आल्यावर मुंबईच्या अलियॉन्स फ्रॉन्सेमध्ये ‘लर्निग डिझाइनर’ म्हणून वर्षभर जॉब केला. त्यांना टाटा स्कायसाठी फ्रेंच इंटरॅक्टिव्ह टीव्ही चॅनल सुरू करायचा होता. त्यातलं कण्टेन्ट डेव्हलप करायचं काम मी केलं. पण तो प्रकल्प आकाराला आला नाही. त्यानंतर फ्रेंच भाषा शिकण्यासाठी ई-लर्निग कोर्ससाठी थोडा कण्टेंट केला, काही गेम्स डेव्हलप केले. शिवाय ‘अलियान्स’चा शैक्षणिक दृष्टिकोन अधिक स्पष्ट करणारी अकाऊंट्स टम्बलर, इन्स्टाग्राम आदींवर सुरू केली. हे वेगवेगळे प्रकल्प करताना फार मजा आली. शिवाय फ्रान्सला असताना तिथल्या शाळेत किती तरी मोठय़ा प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्यांच्या अभ्यासक्रमात कसा त्याचा अलगद समावेश करण्यात आलाय. हे मी तिथे प्रत्यक्ष बघितलं आणि तेव्हा वाटलं की, हे आपल्याकडे करायला पाहिजे आणि त्यात किती तरी चांगली अ‍ॅप्लिकेशन्स आहेत. आपल्याकडच्या शैक्षणिक गरजांना ते फार उपयुक्त ठरेल, असं जाणवलं. तिथून परतल्यानंतर ठरवलं की, शिक्षण आणि तंत्रज्ञानाची सांगड घालणारं काही तरी करायचं आहे. त्यासाठीचे कोर्सेस शोधताना डर्हममधल्या कोर्सची माहिती कळली.

Durham University, UK इंग्लंडमधली प्रसिद्ध युनिव्हर्सिटी. तिथून एम. एस्सी. इन टेक्नॉलॉजी एनहान्स्ड लर्निग हा वर्षभराचा कोर्स केला. शैक्षणिकदृष्टय़ा आपल्यापेक्षा निराळी पद्धत असल्याचं जाणवलं. आपल्याकडे क्रिटिकल थिंकिंग- स्वत: गांभीर्यपूर्वक विचार करून मत तयार करणं, खूप कमी असतं. अगदी मी केलेल्या मास्टर्समध्येही हे विचार करायला लावणं, एका मर्यादित कक्षेत होतं. त्यामुळं पहिल्या ट्रायल म्हणून देण्यात आलेल्या असाइन्मेंटमध्ये हा लक्षणीय फरक जाणवला. मग ते जमतंय, असं जाणवलं. मित्रमंडळींचा ग्रुप केवळ एन्जॉय करण्यापुरता नव्हता तर अभ्यासात फीडबॅकही दिला जायचा. आतापर्यंतच्या अभ्यासक्रमांपैकी इथं सर्वाधिक बुद्धीचा कस लागला.

डर्हम हे युनिव्हर्सिटी असणारं शहर असल्यानं देशविदेशातले विद्यार्थी वावरताना बघणं स्थानिकांच्या सवयीचं झालंय. मलाही या आंतरराष्ट्रीय स्तराच्या वातावरणामुळं एक मनाचं क्षितिज विस्तारणारा दृष्टिकोन मिळाला. आमच्या एकमेकांच्या देशांतल्या संस्कृती-राजकारणासह अनेक विषयांवर चर्चा व्हायच्या. उदाहरणार्थ – आम्ही ब्रेग्झिटच्या निर्णयावर भरभरून चर्चा केली होती. तिथं कम्युनिटी कॉलेज ही संकल्पना आहे. एक कॉलेज आपल्याला असाइन करतात. त्यांच्या इव्हेंटना हजेरी लावायची असते. माझं कॉलेज होतं ‘युस्टिनॉव्ह कॉलेज’. आमच्या महाविद्यालयात पदव्युत्तर विद्यर्थी असल्यानं एकूण वातावरणात गंभीरपणा असायचा. पेरू, कोस्टारिका, कॅनडा आदी देशांतल्या मित्रमैत्रिणी होत्या. तिथं ‘ग्लोबल सिटिझनशिप प्रोग्रॅम’तर्फे अनेक कार्यक्रम आयोजले जातात. त्यांच्या मीडिया टीममध्ये स्वयंसेवक म्हणून काम करायची संधी मला मिळाली. छायाचित्रकार म्हणून हक्काची जागा मिळाली होती. त्यांच्या इव्हेंट फोटोग्राफीच्या वर्कशॉपमध्ये सामील होता आलं. आम्ही विद्यार्थ्यांनी युस्टिनॉव्ह कॉलेजचा प्रमोशनल व्हिडीओ तयार केला होता. त्यामुळे छान सर्जनशील अनुभव घ्यायला मिळाला. त्या सगळ्या टीमशी चांगला रॅपो तयार झाला होता.

मला शालेय शिक्षणक्षेत्रात अधिक रस आहे. मुलांना तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं शिकवण्याच्या दृष्टीने खूप काही गोष्टी करता येऊ  शकतात. माझ्या प्रबंधाच्या विषयासाठी मी मुंबईत आले होते. त्याचा विषय होता- ‘मुंबईतल्या शाळांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर कसा होतो आहे आणि शिक्षकांचा त्याबद्दलचा दृष्टिकोन’. माझ्या अपेक्षेहून अधिक तंत्रज्ञानाचा वापर होता, पण तो वापर कसा होतोय, तेही महत्त्वाचं आहे. तंत्रज्ञान चांगल्या रीतीने वापरून त्याची अ‍ॅप्लिकेशन्स कशी तयार करता येतील, याचा विचार मी करत असते. ते जमलं तर शिक्षणाची संधी आणि त्यासाठीचा खर्च यांची योग्य सांगड घालता येईल.

फ्रेंच लोकांसोबत माझी सांस्कृतिक देवाणघेवाण जास्त झाली. पण मी ‘यूके’त गेले, तेव्हा तिथलं आंतरराष्ट्रीय वातावरण, क्रिटिकल थिंकिंग या सगळ्यांच्या कॉम्बिनेशनमुळे मी अधिक जाणीवपूर्वक विचार करायला लागले. पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन बदलून तो टाळायला लागले. समोरच्या व्यक्तीचं मत आदरपूर्वक ऐकून घेऊन आपलंही मत मांडायचा प्रयत्न करायला लागले. हैदराबादला जाण्याआधी मी कधी बाहेरगावी एकटी राहिले नव्हते. आता कुठेही जाऊन मी राहू शकते, रुळू शकते, हा आत्मविश्वास वाटतोय. तिथल्या लोकांसोबत मिळूनमिसळून आपली माणसं आपण त्यांच्यात शोधू शकतो. दोन्ही ठिकाणी माझ्या लाइफलाँग फ्रेण्डशिप झाल्या आहेत.. या सगळ्या अनुभवांनी समृद्ध होऊन नवनवीन गोष्टी शिकायला आणि सर्जनशील गोष्टींची सांगड तंत्रज्ञानाशी घालायला मी सज्ज झाले आहे. विश मी लक.