21 October 2017

News Flash

Watchलेले काही : अतिशयोक्त बॉलीवूड गाणी

तत्कालीन टीव्ही-रेडिओवर त्यातले ‘गरम गरम चाय’ नावाचे गाणे लोकांच्या माथी मारले जाई.

पंकज भोसले | Updated: October 13, 2017 12:34 AM

गुगलइतक्याच महत्त्वाच्या बनलेल्या यूटय़ूब या माध्यम समुद्रातले वॉचलेले काही कण अर्थात काही मस्ट वॉचव्हिडीओ.

बॉलीवूडच्या सार्वकालिक चित्रपटांत कहाणी आणि त्यांच्या गाण्यातील वास्तवाशी संबंध तुटल्यासारखा वाटतो. तरीही गंमत म्हणजे आपला सोशीक आणि सहनशील प्रेक्षकवर्ग बॉलीवूडच्या प्रत्येक घटकाला खपवून घेतो. कलाकारांना डोक्यावर बसवतो. त्यांना देव्हाऱ्यात ठेवतो आणि अलीकडे तर त्यांच्यासोबत सेल्फी घेऊन फेसबुकवर मिरविण्यात आनंद मानतो. बॉलीवूडमध्ये भलं-बुरं काम करणारा प्रत्येक जण लोकांसाठी सेलेब्रिटी असतो. त्यातही बरी-वाईट अशी कुठलीही गाणी कुठल्या तरी वर्गाला आवडणारीच असतात. गाणी प्रेक्षकाला सोदाहरण समजावून सांगावी लागण्याइतपत वाईट काहीच नसेल. म्हणजे १९९५ साली ‘डान्स पार्टी’ नावाचा एक चित्रपट होता. हे आज जसे कुणाला लक्षात नसेल, तसेच त्या वर्षीही कुणाच्या खिजगणतीत नव्हते. मात्र तत्कालीन टीव्ही-रेडिओवर त्यातले ‘गरम गरम चाय’ नावाचे गाणे लोकांच्या माथी मारले जाई. या गाण्याची गंमत म्हणजे त्यातला डान्स, त्यातल्या अभिनेते-अभिनेत्रीचा डान्स आणि आजूबाजूला असलेल्या सहनर्तकांची साथ यांच्या खोलीबद्दल कुणीही काहीही बोलायची गरज नाही. त्यातील कल्पकता ही डोंगराएवढी मोठी आहे. म्हणजे गाणं सुरू होतं तेव्हा एका कोळशाच्या इंजिनातून प्रचंड धूर निघतो. गाणं नायिकेविषयी नाही, नायकाविषयीही नाही. त्या काळाअनुरूप प्रेमाविषयी आहे; पण हे प्रेम चहावरचे आहे. या गाण्यामध्ये लोक रेल्वे फलाटावरच्या टपरीवरचा चहा पितात. त्या चहाच्या कपामधून निघणारी वाफ ही रेल्वे इंजिनाहून अधिक दिसते. म्हणजेच भारतातील लोक किती गरम चहा बनवू शकतात आणि किती गरम चहा पिऊ शकतात, याचा जगाला चकवून सोडणारे उदाहरणच या गाण्यामधून तयार झाले आहे. बाबा सेहगल या त्या काळामध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या गायकाने हे गाणे त्याच्या आत्ता असह्य़ वाटणाऱ्या शैलीत गायले आहे. चहाच्या कपात इतकी वाफ तयार होणारी गरम चहा बनविणाऱ्या चहावाल्याला खरे तर मोठा पुरस्कारच द्यायला हवा. वाफेवरचे इंजिन तो चहा उकळूनच चालवू शकेल.

या काळामध्ये आणखी एक गान प्रकार चित्रपटामध्ये बोकाळला होता. ज्यामुळे तत्कालीन लहान मुलांना मोठे होऊच नये अशी दहशत बसली होती. कॉलेजच्या आवारामध्ये नायक नायिकेला बजावूून सांगणारी, तिच्यावर हक्क सांगणारी गाणी. यातले एक अक्षयकुमारचे ‘खुद को क्या समझती है’ हे ‘खिलाडी’ चित्रपटातील गाणे पाहाच. नायक-उपनायक आणि नायिका-उपनायिका यांच्यावर कॅमेरा फिरत राहतो. इतर आजूबाजूला नाचणारे बिचारे उत्तम नृत्य आणि चेहऱ्यावरच्या हालचाली करत गाणे संपण्याची वाट पाहताना दिसतात. या गाण्यामध्ये गोष्ट आहे. नायिकेने नायकाला खिजविण्याची आणि तरीही खिजवताना त्या गाण्याच्या ठेक्याला चुकवू न देण्याची. सारखेच गाणे साक्षात बाबा सेहगल नायक असलेल्या ‘मिस फोर ट्वेंटी’ नावाच्या चित्रपटात आहे. ज्यात अख्खी मुंबई कुणी आपल्याला आंदण दिली असल्यासारख्या थाटात नायक नायिकेला ‘आजा मेरी गाडीमें बैठ जा’ असा आदेश देतो. वर आपण मुंबई दर्शन या पर्यटन कंपनीचे प्रतिनिधी असल्याच्या थाटात तिच्यासमोर गाडीवर बसल्यानंतर काय काय करायचे याचे तपशील सांगतो. या गाण्यात मराठी, गुजराती आणि विविध भाषा गमतीसाठी आणल्या आहेत. वास्तवाशी बॉलीवूडने कधीच नाते सांगितले नव्हते; पण ही गाणी पाहिली की बॉलीवूडमधल्या सर्वात वाईट कालावधीत लोकांवर होणाऱ्या मानसिक अत्याचाराची कल्पना येऊ शकेल.

डॉ. अल्बन नावाच्या नायजेरिअन कलाकाराने १९९२ साली ‘इट्स माय लाइफ’ नावाचे गाणे तयार केले होते. त्या वर्षांत ते इतके गाजले, की जगभरामध्ये त्याची कॅसेट लोकप्रिय होती. शाहरूख खानच्या १९९३ सालच्या चित्रपटामध्ये कुठल्याशा प्रसंगात ते वाजविले गेले; पण त्याहून कहर हा होता की, ‘इट्स माय लाइफ’चे बॉलीवूडच्या ‘निशाना’ नावाच्या चित्रपटात हिंदी भाषांतरच आले. ‘बलीहारी’ नावाच्या या गाण्यामध्ये रेखा आणि परेश रावल यांचे नृत्य आज अभिजात म्हणूनच ओळखले जाईल. ‘इट्स माय लाइफ’ची नंतर अनेक व्हर्शन्स आलीत. त्यातले सर्वात गाजलेले बॉन जोव्हीचे व्हर्शनही पाहा आणि एका रशियन टीव्हीवर चालणाऱ्या ‘टॅलेण्ट हण्ट’ कार्यक्रमामधील गाणेदेखील पाहा. आपल्याकडच्या ‘बलीहारी’च्या तुलनेमध्ये ती कुठे आहेत, ते लगेचच कळेल. या काळातच सर्वात लोकप्रिय असलेल्या संगीतकार अन्नू मलीक यांच्यामुळे राज्यावर अनेक वर्षे अवर्षण आले का, याची चौकशी गेली काही वर्षे सुरू आहे. ‘देखो बारिश हो रही है’ या गाण्यासाठी त्यांनी आपल्या आवाजाला जो आयाम आणि व्यायाम दिला आहे आणि त्याचे चित्रीकरण ज्या पद्धतीने झाले आहे, ते पाहून पाऊस लाजला अशी वदंता आहे. बॉलीवूडच्या अतिशयोक्त गाण्यांवर अनेक ग्रंथही कमी पडावेत इतके लिहिता येऊ शकेल; पण या गाण्यांना पाहून काय काय आणि कसं (कसंसं) वाटतं, ते एकदा अनुभवाच!

viva@expressindia.com

First Published on October 13, 2017 12:34 am

Web Title: exaggerated bollywood songs bollywood songs video