सिनेमातील नायिका तयार होताना ‘सजना है मुझे’ गुणगुणत असते, तेव्हा ‘सजना के लिए’ या निमित्ताची जोड द्यावी लागतेच. आजही ‘स्वत:साठी सजणं’ ही संकल्पना पचनी पडत नाही. दोन दिवसांपूर्वी मुंबईमध्ये ‘लॅक्मे फॅशन वीक’ची सुरुवात झाली. त्यानिमित्त फॅशन जगतातील काही नामवंत व्यक्तींकडून आजच्या फॅशनची संकल्पना उलगडून घेण्याचा केलेला हा प्रयत्न.

पारंपरिक साडी किंवा सलवार कमीज (व्यवस्थित ओढणी पिनअप केलेली), कमीत कमी दागिने, कानामागे सारलेले सरळसोट केस किंवा अंबाडा, लाइट मेकअप अशी आपल्या मालिकांमधल्या नायिकेची छबी. ती साधी-सरळ म्हणून हा असा ‘नो मेकअप लुक’. तिच्याविरुद्ध स्टायलिश साडी किंवा वेस्टर्न वेअर, मेकअप, हायलाइट्स वगैरे हेअरस्टाइल केलेली तरुणी म्हणजे खलनायिका अशी सरळसोट विभागणी केलेली असते. ‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ ही संकल्पना कित्येक काळ आपल्या संस्कृतीमध्ये तग धरून राहिलेली आहे. अर्थात त्यात गैर काहीच नाही, पण त्यामुळे एखादी व्यक्ती मेकअप करणारी, स्वत:च्या ग्रुमिंगवर लक्ष देणारी असेल, तर तिच्या म्हणण्याकडे, तिच्या विचारांकडे गांभीर्याने पाहिलं जात नाही. तिला उच्छृंखल म्हणून लेबल लावलं जातं.ऑफिसमध्ये एखादी तरुणी तिच्या कपडय़ांकडे, लुककडे किंचित जास्त लक्ष देत असेल, तर ‘तिला सुंदर दिसण्याशिवाय दुसरं काही जमतच नाही,’ असं म्हटलं जातं. बॉलीवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीमध्ये गंभीर काम करणाऱ्या ‘अभिनेत्री’ साध्या राहतात तर नट्टापट्टा करणं हे ‘नटय़ां’चं काम, हा फरक अगदी आतापर्यंत होता. पुरुषांच्या बाबतीत तर मॉडेल्स, नट यांच्याशिवाय ग्रुमिंग, पार्लर ट्रीटमेंट करण्याची इतरांना गरज नसते, हा समज अजूनही आहे. त्यामुळे ‘पार्लर आणि आमचा संबंध केवळ केस कापण्यापुरता’ हे अभिमानानं सांगण्यात अनेक जण धन्यता मानतात. त्यात मुलगी सावळी, बुटकी, जाडी असेल, तर ‘कितीही केलंस तरी सुंदर दिसणार नाहीस,’ हीच भावना तिच्या मनात बिंबवली जाते. मेक-अप करणारी मुलगी ‘खोटी’ ठरवली जाते. सौंदर्याची व्याख्या नक्की कोणती? आपल्या नैसर्गिक दिसण्याला साजरं करणं की समाजाने मांडलेल्या ठोकळ्यात स्वत:ला बसविणं?

सामाजिक कार्यकर्त्यां आणि ‘दस्तकार’च्या संस्थापिका लैला तैब्जी सांगतात, ‘एकदा कामानिमित्त एका बाईला भेटले असता, तू पायाला नेलपेंट लावतेस. मग मी तुझं म्हणणं गांभीर्याने कसं घेऊ? असा थेट प्रश्न विचारला.’ सामाजिक क्षेत्र, शिक्षिका, पत्रकार अशा क्षेत्रांत करिअर करणारी स्त्री म्हणजे कॉटनची साडी, खांद्यावर झोला, डोळ्यावर चष्मा आणि केसांची वेणी असं चित्र डोळ्यासमोर येतं. त्यामुळे या क्षेत्रातील स्त्रीने मेकअप केल्यास कित्येकांचे डोळे मोठे होतात. कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये विशिष्ट पेहरावाला महत्त्व दिलं जातं. पण त्यातही ब्राईट रेड लीप कलर लावणाऱ्या, आय मेकअप करणाऱ्या, डीप नेक किंवा शॉर्ट स्कर्ट घालणाऱ्या म्हणजे वाईट चालीच्या मुली असं मानलं जातं. किंवा दुसऱ्या टोकाला ‘मेकअप करणं म्हणजे गोरं दिसायची धडपड’ अशी समजूत करतात. पण एखादी मुलगी केवळ स्वत:ला आवडतं, आपण छान दिसतो म्हणून मेकअप करते, हे मान्यच होत नाही. मलिका दुआचे विनोदी ‘मेकअप व्हिडीयोज’ सध्या इंटरनेटवर ट्रेंडमध्ये आहेत. त्याविषयी बोलताना ती सांगते, ‘कित्येकदा लोक मला विचारतात, की या मेकअप व्हिडीयोमधून तुम्हाला कोणता सोशल संदेश द्यायचा आहे? पण प्रत्यक्ष आयुष्यात एक मुलगी म्हणून मला मेकअप करायला आवडतं आणि त्यातून प्रेरणा घेत मी विनोदी व्हिडीयो बनविते. हे इतकं सोप्पं आहे. प्रत्येक वेळी सोशल मेसेज हवाच आहे का?’

डिझायनर अनिता डोंगरे सांगतात, ‘मुळात एक स्त्रीच स्त्रीची मोठी समीक्षक असते. बीचवर एखादी लठ्ठ मुलगी बिकिनी घालून आली, तरी पुरुषांना काही फारसा फरक पडणार नाही. पण स्त्रियांमध्ये मात्र नक्कीच चर्चा सुरू होईल.’ भारतात सर्व साइजमध्ये कपडे तयार करण्याची सुरुवात डिझायनर अनिता डोंगरे यांनी केली. मुळात एखादा ड्रेस तुमच्यावर कसा दिसतो, हे तपासण्यापेक्षा तुम्ही तो कसा कॅरी करता हे महत्त्वाचं असतं. एखाद्या ड्रेसमध्ये तुम्ही मासिकातील मॉडेलप्रमाणे दिसण्यापेक्षा त्यातून तुमचं व्यक्तिमत्त्व उठून येणं गरजेचं असतं. त्यासाठी लोक काय म्हणतील हा विचार न करता, तुम्ही तुमचा विचार करणं गरजेचं आहे, असं अनिता सांगतात. काही महिन्यांपूर्वी इंग्लंडच्या प्रिन्सेस केट मिडल्टन भारतात आल्या होत्या. त्या वेळी सचिन तेंडुलकरसोबत क्रिकेट खेळताना त्यांनी घातलेल्या ‘अनिता डोंगरे’ लेबलच्या ड्रेसची बरीच चर्चा झाली. रातोरात या ड्रेसची मागणी वाढली. ‘ग्राहकांनी पाठवलेल्या फोटोंमधून एकच ड्रेस भारतातील विविध शरीरयष्टीच्या, व्यक्तिमत्त्वाच्या स्त्रियांवर किती वेगळा दिसू शकतो, हे दिसलं. आम्ही थक्क झालो,’ असं त्या सांगतात.

कपडय़ांच्या बाबतीत निवडीचं स्वातंत्र्यसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तीन महिन्यांत बदलणाऱ्या ट्रेण्डनुसार बदलावं किंवा आपली स्टाइल जपावी हा, प्रत्येकीचा वैयक्तिक अधिकार असू शकतो. ‘आपल्याकडे आतापर्यंत स्त्रिया समाजाने मांडलेल्या साच्यानुसार ड्रेसिंग करायच्या. ‘फॅशन’च्या संकल्पनेने तुम्हाला स्वत:साठी ड्रेसिंग करायला भाग पाडलं,’ असं लैला तैब्जी नमूद करतात. उद्या गावातल्या स्त्रीने घागऱ्याऐवजी साडी नेसायचं ठरवलं किंवा शहरातील तरुणीने सलवार कमीजपेक्षा शॉर्ट स्कर्टला पसंती दिली, तर ‘आपली संस्कृती संपतेय’ असं म्हणण्यापेक्षा तिच्या निवडीच्या स्वातंत्र्याचा मान राखला पाहिजे, हेही त्या आवर्जून सांगतात.

आपल्याकडे अजूनही पाश्चात्त्य ड्रेसिंगकडे तिरकस नजरेने पाहिलं जातं. एरवी कसं तरी चालून जातं, पण मंदिरात, लग्न-समारंभात एखादी तरुणी जीन्स, वन-पीस ड्रेसमध्ये आली तर लगेच डोळे मोठे होतात. लग्नापूर्वी जीन्स घालणारी तरुणी केवळ ‘घरच्यांच्या आग्रहाखातर’ लग्नानंतर पंजाबी ड्रेस, साडी वापरू लागते. तेव्हा तिची इच्छा विचारायची तसदी घेतली जात नाही. एखादीचे ‘क्लोदिंग एथिक’ तिला स्वतला पटणारे असले पाहिजेत, हे नमूद करताना ‘लेडीज फिंगर’ या महिलांसाठीच्या ब्लॉगच्या संस्थापिका निशा सुझान  सांगतात, ‘तिरुपूरच्या कारखान्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात टी-शर्ट बनविताना मजुरांचे होणारे हाल मी काही वर्षांपूर्वी पाहिले. त्यानंतर आठ र्वष मी टी-शर्ट वापरणे सोडले.’ यालाच जोड देत अभिनेत्री मलिका दुआ सांगते, ‘नव्या स्टाइलचे सिंथेटिक कपडे मिरविणे मला पूर्वी आवडायचं. आईच्या कॉटन कपडय़ांकडे मी ओल्ड फॅशन म्हणून पाहायचे. पण तेच कपडे दिल्लीच्या वातावरणाशी जुळून येत नाहीत, हे लक्षात आल्यावर मी वेस्टर्न कपडेसुद्धा कॉटनचे वापरू लागले.’ वैचारिक, आर्थिक, सामाजिक स्वातंत्र्याइतकंच एखादीचं कपडे निवडीचं, स्टाइलच स्वातंत्र्यसुद्धा तितकंच  महत्त्वाचं असतं, हे स्वीकारल्यास हे कोडं उलगडू शकतं. मग फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीतील टय़ुबलाइटपेक्षा उजळ मॉडेल, रॅम्पवरच्या सडपातळ मॉडेल्स, मासिकांच्या कव्हरपेजवरील फोटोशॉप नायिका यांच्या पलीकडे जाऊन ‘मी’पणाची फॅशन साजरी करण्यास सुरुवात होईल.

 एखादा ड्रेस तुमच्यावर कसा दिसतो, हे तपासण्यापेक्षा तुम्ही तो कसा कॅरी करताय हे महत्त्वाचं असतं. मुळात एक स्त्रीच स्त्रीची मोठी समीक्षक असते. बीचवर एखादी लठ्ठ मुलगी बिकिनी घालून आली, तरी पुरुषांना काही फारसा फरक पडणार नाही. पण स्त्रियांमध्ये मात्र नक्कीच चर्चा सुरू होईल.

– अनिता डोंगरे (फॅशन डिझायनर)

 

 आपल्याकडे आतापर्यंत स्त्रिया समाजाने मांडलेल्या साच्यानुसार ड्रेसिंग करायच्या. आता फॅशनची संकल्पना बदलत असताना तुम्हाला स्वतसाठी ड्रेसिंग करायला मिळतंय. तू पायाच्या नखांना नेलपेंट लावतेस, मग तुझं म्हणणं आम्ही कसं गंभीरपणाने घेणार.. हे मला ऐकावं लागलं होतं. फॅशन स्टिरीओटाइप इतके प्रभावी होते.  – लैला तैब्जी (सामाजिक कार्यकर्त्यां)