या जमातीचं कूळ, मूळ अजून तरी कुणालाच उलगडलेलं नाही. ते कुठून आले, कधी आले, कसे आले याबद्दल अनेक तर्कवितर्क कित्येक दशकं लावले जातायेत. आपल्याकडे ज्या गोष्टीबाबत आपल्याला पूर्ण माहिती नसते, ती गोष्ट ‘वाईट’ असं म्हणण्याची पूर्वापार पद्धत आहे. त्याला अनुसरून कधी यांना हुल्लडबाज म्हटलं गेलं, तर कधी नशाबाजीची लेबलं लावली गेली. एक काळ होता जेव्हा त्यांच्यामुळे जगात नव्या विचारांना, कलेला, जीवनशैलीला दिशा मिळाली. पण ते तेव्हढय़ापुरतंच होतं. त्यानंतर ही जमात पुन्हा दुर्लक्षित राहिली. आपल्याकडे ‘वाया गेलेली पोरं’ विभाग असतो ना तशी. अर्थात हा विभाग आणि ही जमात यांच्यात एक छोटा फरक आहे. ही जमात अतिशय हुशार आहे. जगात घडणाऱ्या घटना, वेगवेगळ्या चर्चा यांचं त्यांना पूर्ण ज्ञान आहे. त्यांच्या हातातला महागडा आयफोन आणि कानाला लावलेले हेडफोन त्यांनी स्वत:च्या मेहनतीच्या पशांनी घेतलेले आहेत. पण अंगावर घातलेला चार दिवसांपूर्वीचा मळका टी-शर्ट सध्या त्यांच्याकडे पशांची टंचाई आहे, हे स्पष्ट सांगतो. किंवा हातातले पसे कपडय़ांवर खर्च करायची गरजही त्यांना वाटत नाही. कोण आहे ही जमात? हे आहेत, ‘हिप्स्टर’. गुगलबाबांकडेही या जमातीची नेमकी व्याख्या सापडणार नाही. पण एक आगाऊ सूचना देते या जमातीमधला कोणीही अवलिया तुम्हाला भेटला तर चुकूनही त्याला ‘हिप्स्टर’ म्हणून हाक मारू नका. का माहीत नाही.. पण तो या जमातीचा अपमान ठरतो.

मित्रांच्या घोळक्यात, सिनेमा किंवा पुस्तकात कुठेतरी एखादा अवलिया इसम तुम्हाला भेटला असेलच. त्याच्या पायाला कायम िभगरी लागलेली असते आणि डोक्यात कुतूहलाचे असंख्य किडे. कधीतरी तो एखाद्या छोटय़ाशा गोष्टीमागे भुणभुणत कित्येक दिवस काढतो. तर कधी हातातली दहा कामं काही तासांमध्ये चुटकीसरशी संपवतो. टपरीवरच्या चहा बिस्किटांवर दिवस काढणाऱ्या या इसमाकडे गरज असल्यास पशांचा जुगाड नेहमीच असतो. पुस्तकं, सिनेमा, संगीत, नाच, पेंटिंग, कलेच्या प्रत्येक अंगाचा त्यांना व्यासंग असतो. त्यावर ते भरभरून बोलू शकतात. सततच्या फिरतीमुळे बहुतेकदा कॅमेरा त्यांचा जवळचा मित्र. बरं माणसांचा प्रचंड खजिना यांच्याकडे असतो, जाऊ तिथे ओळखी मिळतात यांना. ही आहे या हिप्स्टर लोकांची छोटी ओळख. यांच्या या अनिश्चित, मनस्वी स्वभावाचा परिणाम साहजिकच त्यांच्या कपडे, लुक्सवर पडलेला दिसून येतो. थोडय़ा हटक्या स्टाइलने कापलेले केस, डोळ्यात काजळ, टापटीप चेहरा, डोळ्यावर सनग्लास हवाच. कपडय़ांचं बोलाल तर यांच्याकडील सगळेच कपडे ब्रँडेड दुकानात सापडणार नाहीत. टी-शर्ट महागडय़ा दुकानातला असेल तर जीन्स बाबाआदमच्या काळातली. एखाद्या स्थानिक दुकानातून गरजेपुरत्या घेतलेल्या श्रगवर नुकत्याच राजस्थानच्या टूरवरून आणलेला लेहरीया दुपट्टा मस्त गुरफटलेला असतो. कितीही प्रयत्न करा हा लुक एरवी कोणालाच इतका सहजतेने कॅरी करता येणारच नाही. कारण त्यासाठी त्यांच्या स्वभावातील बेधडकपणा, बिनधास्तपणा आणि स्वच्छंदी वृत्ती अंगात भिनायला हवी.

यांच्याबद्दल आज बोलायचं कारण म्हणजे हल्ली असे अवलिया हिप्स्टर्स आपल्या आजूबाजूला आवर्जून पाहायला मिळतात. सत्तरीच्या दशकात ‘हिप्पी’ बिरूद लागलेली ढगाळ, फ्लोरल ब्राइट रंगाचे कपडे घातलेली तरुणाई सगळ्यांच्या परिचयाची आहेच. तत्कालीन सामाजिक, राजकीय परिस्थितीला झुगारून स्वत:च्या विश्वात ही पिढी रममाण होती. संगीत, नृत्य, कलाविश्वात आपलं अस्तित्व शोधत ही पिढी धडपडत होती. त्यांना त्यांचं नवं विश्व, संस्कृती घडवायची होती. आजच्या पिढीतील हिप्स्टर्सचं मूळ हे हिप्पींच्या पिढीतील आहे. त्यांना सतत काहीतरी नवीन हवंय. वेगवेगळे प्रयोग करायचे आहेत. पुस्तकी मतांपेक्षा स्वतचे अनुभव तयार करायचे आहेत. त्यामुळे त्यांचं मन कधीच एका नोकरीत टिकत नाही. बॅगपॅक ट्रिप्स, वर्कशॉप्स यांच्यातून मिळणारे अनुभव त्यांना आकर्षति करत असतात. पण हे सगळं करण्यापुरता पसा हाताशी जोडण्याची धडपडसुद्धा ते स्वत: प्रामाणिकपणे करतात. साहजिकच त्यांच्या जीवनशैलीतील धडपडीतील शिस्त त्यांच्या लुकमध्येही दिसून येते. वाढलेली दाढी व्यवस्थित आकारात कापलेली असते. नखं, कपडे, बॅग टापटीप असतात. कित्येकदा काही महागडे गॅजेट्स त्यांच्या कामासाठी विकत घेतात. त्यांची व्यवस्थित काळजीही ते घेतात. त्यांना ट्रेंड्स, फॅशन यांचं फारसं घेणदेणं नसतं. पण सुटसुटीतपणा हा त्यांच्या लुकचा महत्त्वाचा भाग. त्याचबरोबर बाजारातून आयतं मिळालेलं घालण्यापेक्षा लुकमध्ये प्रयोग करायला त्यांना आवडतं. त्यामुळे भन्नाट िपट्र्स, ड्रेसेस, ज्वेलरी, शूज यांच्या कपाटात तुम्हाला आवर्जून पाहायला मिळतील. एकूणच कलाप्रेमी असल्यामुळे त्यांचं ड्रेसिंगसुद्धा कलात्मक असतं. त्यामुळे तुमच्या गँगमध्ये एखादा हिप्स्टर असेल, तर त्याला एकदा शॉिपगला घेऊन जाच. कोणास ठाऊक तुमच्या पोतडीसुद्धा नवीन खजिन्याची भर पडेल.

हिप्स्टरचा आव आणता येणार नाही, पण त्यांच्याकडून काही स्टाइल टिप्स घेऊन आपला लुक अजून देखणा नक्कीच करू शकतो.

  • फ्लोरल इज मस्ट. फ्लोरल ड्रेस, शर्ट, स्कार्फ, जॅकेट काहीही असो, पण फ्लोरल िपट्रची एखादी वस्तू तुमच्याकडे असायलाच हवी. अर्थात नखशिखांत फ्लोरल िपट्रचा प्रयोग करू नका. आपल्याला फुलांची बाग बनायचं नाही आहे.
  • प्रयोग करायला घाबरू नका. एखादी हटके हेअरस्टाइल, फंकी ज्वेलरी ट्राय करावीशी वाटली तर नक्की करा. अर्थात ते आपल्यावर चांगलं दिसेल हेही बघा. उगाच ट्रेंडच्या मागे पळू नका. पण कपाटातला जुना टी-शर्ट, स्कर्ट नव्या पद्धतीने वापरता येत असेल, तर हा प्रयोग आवर्जून करून बघा.
  • फंकी ज्वेलरी, अ‍ॅक्सेसरी ही हिप्स्टरची ओळख असते. तुमच्या लुकमध्ये एखादा तरी लक्ष वेधून घेणारा घटक असू द्यात. पण कमी तितकं उत्तम हेही लक्षात असू द्यात. कमीतकमी अ‍ॅक्सेसरी वापरून लुक पूर्ण करा.

viva@expressindia.com