राइट टू फॅशन नावाची जाहिरात एका मोठय़ा ई-शॉपिंग वेबसाइटने नुकतीच प्रदर्शित केली. कुणालाही कशीही फॅशन करायचा अधिकार असला, तरी प्रोफेशनल एटिकेट पाळले पाहिजेत का, फॅशनचा हा अधिकार जबाबदारीनं कसा वापरायचा याविषयी तरुण पिढीच्या प्रतिनिधींना आणि फॅशन डिझायनर्सना बोलतं केलं.

‘राइट टू फॅशन’ या नावाने गेल्या आठवडय़ात एक जाहिरात ऑनलाइन माध्यमांवर चांगलीच गाजत होती. मिन्त्रा.कॉम या ई-शॉपिंग पोर्टलने या नावाने सेल सुरू केला होता आणि त्याच नावाने त्यांची जाहिरात मोहीम उघडली होती. रिक्षाचालक, घरकाम करणाऱ्या बाईंपासून ते अगदी मल्टिनॅशनल कंपनीमध्ये काम करणारे मोठे अधिकारी या प्रत्येक प्रोफेशनमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचं एक ठोकळेबाज चित्र आपल्या मनात असतं. पण ठरावीक काम करणाऱ्यांनी अमुकच तऱ्हेने कपडे घातले पाहिजेत असं बंधन आता राहिलेलं नाही. कोणत्याही प्रोफेशनमध्ये तुम्ही असलात तरी फॅशनेबल राहण्याचा तुम्हाला अधिकार आहे, या अर्थाच्या जाहिराती मिन्त्राने दाखवल्या. पण फॅशनचा हा अधिकार कसा वापरावा, राइट टू फॅशन असेल तर मग प्रोफेशनल एटिकेटचं काय, याबाबत तरुण पिढीला काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी काही तरुण प्रोफेशनल्सशी संवाद साधला.

फॅशन ही संज्ञा हल्ली खूपच विस्तारली आहे. व्यक्तिमत्त्वाची छाप पाडण्यासाठी, उठून दिसण्यासाठी आजकाल फॅशन महत्त्वाची असते. भपकेबाज मेक-अप, भडक कपडे, पाश्चिमात्य किंवा आधुनिक कपडे म्हणजेच केवळ फॅशन नाही. प्रत्येकाची फॅशन वेगळी असू शकते. ती वेगळीच असते. फॅशनबाबतच्या गैरसमजुतींमुळे सुरुवातीला फॅशन एका चौकटीत बंदिस्त होती. फॅशन करणं हा ठरावीक वर्गाचा मक्ता होता. ठरावीक विचारणीचे लोक फॅशनच्या वाटेला जात नसत. म्हणूनच अगदी अलीकडच्या काळापर्यंत फॅशनला अनेक घरांमधून प्रतिबंध होत असे. आता परिस्थिती बदलतेय. फॅशन इंडस्ट्री विस्तारतेय आणि त्याबरोबर फॅशनची संकल्पनाही.

लॅक्मे फॅशन वीकसारख्या फॅशन महोत्सवांमधून गेल्या दोन वर्षांत या साचेबद्ध फॅशन संकल्पनांना बदलण्याचा प्रयत्न होतो. फॅशनचा अधिकार हा केवळ त्या चौकटीत बसणाऱ्यांपुरताच मर्यादित नाही तर, तो फॅशनची आवड असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी खुला आहे. लिंग, शरीरयष्टी, वर्ण, उंची या शारीरिक बाबींबरोबरीनेच तुमच्या कामाचं स्वरूप किंवा तुम्ही कुठे काम करता या कशाचाही अडथळा त्यामध्ये येणार नाही.

याबद्दल बोलताना डिझायनर लिट्ल शिल्पा म्हणाली, ‘जागतिकीकरणानंतर सध्या फॅशन ही एका विशिष्ट गटासाठी मर्यादित राहिलेली नसून ती संकल्पना विस्तारली आहे. त्यामुळे त्यात विविध प्रयोग होऊ  शकतात. प्रत्येक जण आपल्याला आवडेल तशा पद्धतीने, व्यक्तिमत्त्वाला साजेशी फॅशन करू शकतो. केवळ रॅम्पवरच्या मॉडेल्सपुरती फॅशन मर्यादित राहिलेली नसून ती सर्वदूर पसरली आहे.’

फॅशनचा हा अधिकार एकीकडे आणि प्रोफेशनल एटिकेट दुसरीकडे, असं चित्र यामुळे निर्माण होत आहे. फॅशनच्या अधिकाराबद्दल जाहिराती आणि फॅशन वीकच्या माध्यमातून सांगितलं जात असताना तरुणाईची मतं काहीशी वेगळी असल्याचं त्यांच्याशी बोलल्यावर जाणवलं. जापनीज भाषेची ट्रेनर असलेली रेवती कुरुंदवाड याविषयी बोलताना म्हणाली, ‘फॅशनचा अधिकार सर्वाना असायलाच हवा, प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे कपडे घालायची मुभा असली पाहिजे. परंतु कामाच्या ठिकाणी शोभेल अशीच फॅशन असली पाहिजे, यात शंका नाही. तुमच्या कामाच्या स्वरूपानुसार त्यात काही मर्यादा येतात. मी ट्रेनिंगसाठी जाताना मला आवडतात म्हणून भडक रंगाचे कपडे किंवा भडक मेकअप करून जाऊ  शकत नाही. मी स्वत:हूनच या गोष्टी टाळते आणि याबद्दल माझी तक्रार नाही.’

सायकॉलॉजी शिकणारी ईशा घैसास म्हणाली, ‘फॅशनचा अधिकार सर्वाना असला पाहिजे, परंतु हा अधिकार बजावत असताना आपण घालत असलेले कपडे आपल्याला नक्की शोभून दिसतायत का याचा एकदा विचार होणं गरजेचं आहे. कोणाच्याही टिंगल-टवाळीचा, हास्याचा विषय होण्यापेक्षा आपल्याला शोभेल अशाच पद्धतीने अधिकार बजावला गेला पाहिजे.’

इंजिनीयिरग विद्यार्थी असलेला असीम जोशी म्हणाला, ‘फॅशनचा अधिकार असणं ही बाब नक्कीच चांगली आहे,  परंतु आपला अधिकार योग्य पद्धतीने हाताळणं गरजेचं आहे, असं मला वाटतं. आपल्या येण्या-जाण्याच्या ठिकाणावरून आपले कपडे ठरत असतात. ऑफिस, कॉलेज, पार्टीजमध्ये जाताना आपला लुक त्याला साजेसा असावा. त्या त्या लुकप्रमाणे तुम्ही नक्कीच फॅशनचा अधिकार वापरू शकता.

जेन झेडच्या प्रतिक्रिया लक्षात घेतल्या तर, फॅशन ही संज्ञा पूर्णपणे चौकटीबाहेर पडली आहे, असं म्हणता येणार नाही. कामाचं ठिकाण, शरीरयष्टी, कामाचं स्वरूप त्यानुसार कशा प्रकारचे कपडे घातले पाहिजेत, लुक कसा असला पाहिजे याबद्दलची साचेबद्धता दिसून येत आहे. तर ब्रॅण्डेड वस्तूंच्या बरोबरीनेच त्याचे अनुकरण करणाऱ्या अनेक वस्तू शहरातील स्वस्त स्ट्रीट शॉप्समध्ये मिळत आहेत. त्यामुळे फॅशन कोणत्याही विशिष्ट वर्गासाठी त्या अर्थाने मर्यादित राहिलेली नाही. ती मासेसपर्यंत पोहोचली आहे.

फॅशन या संज्ञेला आपलंसं केलं गेलं आहे, परंतु त्याकडे बघण्याचा एकच एक ठरावीक दृष्टिकोन काही पुरता बदललेला नाही. हा दृष्टिकोन बदलेल तेव्हाच खऱ्या अर्थाने फॅशनचा अधिकार वापरता येणं शक्य होईल.

प्रत्येकाला मनाप्रमाणे कपडे घालायची मुभा हवी. मात्र कामाच्या ठिकाणी शोभेल अशीच फॅशन असली पाहिजे. मी ट्रेनिंगसाठी जाताना भडक मेकअप, भडक रंगाचे कपडे घालणं स्वतहूनच टाळते. 

– रेवती कुरुंदवाड

 फॅशनचा अधिकार सर्वाना असला पाहिजे, परंतु हा अधिकार बजावत असताना आपण घालत असलेले कपडे आपल्याला नक्की शोभून दिसतायत का याचा एकदा विचार होणं गरजेचं आहे. दुसऱ्याच्या टिंगलीचा विषय होण्यापेक्षा ते बरं!

– इशा घैसास