दुकानांवरील सेलची पाटी म्हणजे शॉपिंगप्रेमींेसाठी दसरा-दिवाळी. दर वर्षी जून महिन्याच्या अखेरीस आणि डिसेंबर महिन्याला वेगवेगळ्या ब्रॅण्ड्सचे सेल सुरू होतात. पण या काळात विचारपूर्वक खरेदी केली नाही, तर खरंच दिवाळं निघण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे यंदाच्या सेलच्या मुहूर्तावर तुमच्यासाठी काही खास टिप्स.

जून महिन्याचं माहात्म्य फार मोठं आहे. या महिन्यात पावसाच्या पहिल्या सरींचं आगमन होतं आणि शेतकरी सुखावतो. खवय्यांना खाबूगिरीचं नवं कारण मिळतं. प्रेमाचे वारे वाहू लागतात. झाडांना नवी पालवी फुटतेच पण नव्या कवींच्या नव्या कवितांनासुद्धा अंकुर फुटतो. त्यात जून महिना म्हणजे शाळा, कॉलेजची सुरुवात. हे सगळं होतं असताना एकेदिवशी फे सबुकच्या वॉलवर ‘सेल’ नावाचं पिल्लू नाचू लागतं. काय हवंय तुम्हाला? कपडे, दागिने, मोबाइल, टीव्ही, घर सगळीकडे सेलच सेल. १० टक्के, ४० टक्के, ७५ टक्के परीक्षांच्या मार्कामधील टक्केवारीपेक्षा या टक्केवारीची उत्सुकता घराघरात असते. अचानकपणे आपली कपाटं रिकामी दिसू लागतात. किचनमधील ओटय़ावर सहजच नव्या मायक्रोवेव्हसाठी जागा तयार होते. वर्षभर मोबाइलसाठी का-कू  करणारे बाबा स्वत:हून नवा मोबाइल घेण्याचं सुचवतात. एरवी साध्या किराणामालाच्या यादीत सुट्टय़ा पैशांचा गोंधळ घालणाऱ्या घराघरांमध्ये एका महिन्यासाठी का होईना दडून बसलेला गणिततज्ज्ञ प्रकट होतो. जून महिन्यातील हे चित्र थोडय़ाअधिक फरकाने हे असंच असतं.

आज आपण बोलणार आहोत ते फॅशन सेलबद्दल. आगामी गणपती, दिवाळी सणांना डोळ्यासमोर ठेवून बडय़ा ब्रॅण्ड्सची जुने कलेक्शन्स संपविण्याची खटपट सुरू होते. त्यासाठी सेलची पाटी सगळीकडे झळकू लागते. त्यामुळे या दिवसांत केवळ शॉपिंगप्रेमीच नाही, तर लहानथोर सगळेच खरेदीसाठी सज्ज होतात. कित्येक जण यासाठी सहा महिने आधीपासून पैसे साठवायला सुरुवात करतात. खरेदीची यादी तयार होते. पण ऐनवेळी दुकानात शिरल्यावर मात्र सगळं चित्र पालटतं. वेगवेगळे ब्रॅण्ड, त्यांच्या किमती, सूट यांचं गणित बांधताना आपल्याला हवी असलेली गोष्ट मागे पडते आणि गरज नसलेल्या कित्येक गोष्टी आपल्या कपाटात शिरतात. अशा वेळी दुकानांमधील कलेक्शन्स, त्यांच्या किमती आणि आपली गरज यांचं योग्य गणित बांधणं गरजेचं असतं.

त्यामुळे सेलच्या काळात सगळ्यात महत्त्वाचं असतं तुमची गरज काय आहे हे नेमकं माहिती असणं. दुकानांमधील जुने कलेक्शन संपविण्यासाठी सेल ठेवले जातात. त्यामुळे या सेलमध्ये मिळणारे कपडे, अ‍ॅक्सेसरीज हे मागच्या सीझनमधील असतात, हे लक्षात घेणं गरजेचं असतं. अर्थात यामुळे फारसा काय फरक पडतो, असा सर्वसाधारण प्रश्न पडू शकतो. पण उन्हाळ्यामध्ये हिवाळी कपडय़ांची खरेदी करणं हे जसं अर्थहीन असतं, तसचं चुकीच्या सीझनमध्ये चुकीचे कपडे खरेदी केले की पैसे फुकट जाऊ  शकतात. मागच्या सीझनमध्ये जर ब्राइट रंग ट्रेण्डमध्ये असतील तर त्या काळात बाजारात त्याच रंगाचे कपडे दिसतात. तुम्हीही कदाचित त्या कपडय़ांची खरेदी केलेली असते. पुढच्या सीझनमध्येसुद्धा हे कपडे घालता येतील म्हणून सेलच्या काळात पुन्हा त्याच कपडय़ांची खरेदी होते. पण तेच तेच रंग गेले कित्येक महिने बघून कंटाळा आलेला असतो आणि काही आठवडय़ांमध्ये दुसरे रंग ट्रेण्डमध्ये येतात. त्यामुळे साहजिकच हे कपडे कपाटात पडून राहतात. त्यामुळे कपडय़ांचे कोणते प्रिंट्स, रंग, पॅटर्न पुढच्या सीझनमध्येसुद्धा कायम असतील, याची माहिती असणं गरजेचं आहे.

जंपसूट, ड्रेसेस, कोल्ड शोल्डर टय़ुनिक असे कित्येक कपडय़ांचे प्रकार पुढच्या सीझनमध्ये पाहायला मिळणार नाहीत. त्यामुळे त्यांची खरेदी करणं टाळा. जून महिन्यामध्ये लागणाऱ्या सेलमध्ये शक्यतो ‘समर कलेक्शन’चे कपडे असतात. पण यापुढे सणांचा मोसम लक्षात घेता, आपल्याला इंडियन, फ्युजन ड्रेसेसची जास्त गरज असते. मग आता खरेदी करूनही पुन्हा पुढच्या महिन्यात खरेदीसाठी पैशांची जुळवाजुळव करावी लागते. अशा वेळी, आताच खरेदीला जाताना येत्या सणांची तयारीही करून ठेवा. एथनिक कुर्ते, स्कर्ट्स, प्रिंटेड जॅकेट्स, दुपट्टे, ज्वेलरी, धोती पँट अशा कपडय़ांची खरेदी आवर्जून करा. फ्युजनचे प्रयोग करून कुर्ते, टय़ुनिक, डेनिम कसे घालता येतील, हेही या वेळी पाहता येईल. यामुळे सेलचा पुरेपूर फायदा करून घेता येईल आणि सणांच्या दिवसांतही इतरांपेक्षा तुमची स्टाईल हटके आणि वेगळी ठरेल.

सेलच्या काळात खरेदीसाठी कोणत्या वेळी दुकानात जाता, हेही तितकंच महत्त्वाचं असतं. सेलची घोषणा झाल्यावर लगेच दुकानात जाण्यापेक्षा काही दिवस वाट बघून मग खरेदीला सुरुवात करा. महिनाभराच्या या सेलमध्ये शेवटच्या दिवसांमध्ये अधिक सूट असते. पण तोपर्यंत कपडय़ांच्या साईज संपण्याची शक्यता असते ते वेगळं.. त्यामुळे अति उशीर करू नका. रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी शक्यतो सगळे खरेदीला जातात. त्यामुळे दुकानात, ट्रायल रूममध्ये गर्दी असते. म्हणून शक्यतो मधल्या दिवसांमध्ये खरेदीला जा. दुपारची वेळ यासाठी उत्तम. वेगवेगळ्या ब्रॅण्ड्सच्या दुकानात जाण्यापेक्षा अनेक ब्रॅण्ड्स असलेल्या दुकानात जाऊन खरेदी केल्यास कपडय़ांचे पर्याय अधिक मिळतात आणि सूटही अधिक मिळते. दुकानात शिरल्यावर आधी कलेक्शन्सचा अंदाज घ्या. मगच कपडे खरेदी करा. ट्रायल रूममध्ये साईज, फिटिंग तपासण्यात आळशीपणा करू नका. सेलदरम्यान कपडे शक्यतो बदलून दिले जात नाहीत. त्यामुळे पैसे आणि वेळ दोन्ही फुकट जाऊ  शकतो. दुकानात जाण्याआधी ऑनलाइन साइटवर ब्रॅण्ड्सवर किती सूट आहे हे आवर्जून पाहून घ्या. कित्येक कपडे ऑनलाइन स्वस्त मिळतात. मैत्रिणी कितीही प्रिय असल्या तरी खरेदीला एकटय़ानेच जा. गटामध्ये गोंधळ होऊन आपल्याला मनाजोगी खरेदी करता येत नाही आणि सेलमध्येही आपला शॉपिंग धर्म आवर्जून पाळा.

viva@expressindia.com