आपल्या समाजात अनेक समस्या आहेत ही गोष्ट आता आपल्या फिल्म स्टार्सनासुद्धा जाणवायला लागली आहे. केवळ जाणवायलाच नव्हे तर त्यासंदर्भाने जनजागृती करण्याचं कामही हे सगळे सेलेब्रिटी करताहेत. त्यात अगदी ‘बिग बी’पासून ‘सनी’ताईंपर्यंत सगळ्यांनी सक्रिय सहभाग घेतलेला आहे. जनहितार्थ प्रकाशिक किंवा प्रदर्शित जाहिरातींमध्ये स्टार मंडळींची उपस्थिती ही काही नवीन बाब नाही. पण सध्या स्टार मंडळींना घेऊन अशा जाहिराती करण्याचा सपाटाच लागला आहे. वेब, टीव्ही, प्रिंट या सगळ्या माध्यमांमध्ये या स्टार्सच्या जाहिराती झळकत आहेत. विशेषत वेबमीडियावर याचा पसारा भराभर पसरतोय. यूटय़ूबवरच्या या जाहिरातींची लिंक व्हायरल झाली आहे.

एक माणूस स्वत:च्या गाडीच्या खिडकीतून कचरा बाहेर टाकतो. दोनच मिनिटांनी त्याची नजर गाडीतल्या लक्ष्मीच्या फोटोफ्रेमकडे जाते.. आणि तो चमकतो. चमकायचं कारण हे की, त्या फोटोमधून लक्ष्मीचा फोटो गायब झालेला असतो. गाडीच्या पुढच्या काचेतून त्याला लक्ष्मी बाहेर निघून जाताना दिसते. तसंच एक दुकानदार सकाळी सकाळी दुकान उघडताना टेबल झटकतो.. सगळी माती, कचरा बाहेर झटकून टाकतो. कचऱ्याचा डबा बाहेर ठेवलेला असताना त्याच्याकडे न बघताच कचरा फेकून देतो. साहजिकच तो कचरा डब्याच्या बाहेरच पडतो. तो देवासमोर उदबत्ती लावायला जातो आणि त्याला लक्ष्मीची फोटोफ्रेम रिकामी दिसते.. या कोणत्या जादूच्या गोष्टींच्या पुस्तकातल्या गोष्टी नाहीत तर स्वच्छ भारत अभियानाच्या जाहिरातीमधील प्रसंग आहेत. यात लक्ष्मी झालेय कंगना रनौट. ‘डोण्ट लेट हर गो’ असा संदेश अमिताभ बच्चन यांच्या आवाजात आपल्याला या जाहिरातींनंतर ऐकू येतो.

हॅशटॅग ‘डोन्ट लेट हर गो’ या नावाने ही जाहिरात प्रदर्शित केली गेली आहे. कंगनाबरोबरच भोजपुरी स्टार रवी किशन तसंच इशा कोप्पीकर हे सेलब्रिटीदेखील जाहिरातपटात दिसतात. जाहिरातीच्या शेवटी ‘स्वच्छ भारत हे केवळ पंतप्रधानांचं नव्हे तर आपल्या सगळ्यांचं स्वप्न असलं पाहिजे’, असं बिग बी सांगतात आणि ‘एकटे पंतप्रधान राबून भारत स्वच्छ होणार नाही तर आपण सगळ्यांनी आपापला वाटा उचलला पाहिजे’ असं ‘क्वीन’ कंगना म्हणते. प्रदीप सरकार यांनी हा जाहिरातपट दिग्दर्शित केला आहे. और दिखाओ या यूटय़ूब चॅनेलवरून ही जाहिरात प्रदर्शित केली गेली.

अशीच आणखी एक सामाजिक संदेश देणारी जाहिरात काही महिन्यांपूर्वी याच यूटय़ूब चॅनेलवरून प्रदर्शित केली गेली होती. त्याला पहिल्या ४८ तासातच दहा लाखांवर व्ह्य़ूज मिळाले होते. केवळ सिगारेटच्या पाकिटांवर ‘याने कर्करोग होतो’ असं लिहून कोणी सिगरेटी सोडत नाही; मात्र हेच जर एखाद्या सेलेब्रिटीने सांगितलं तर त्याचा जास्त परिणाम होतो. भारतात करिअर करायला सुरुवात करतानाच मोठय़ांच्या टीकेची धनी बनलेली आणि तरीही सगळ्यात जास्त गुगल सर्च केली गेलेली सेलेब्रिटी सनी लिओनी सिगरेटच्या विरोधात समाजप्रबोधनात उतरली. विशेष म्हणजे तिने केलेल्या या जाहिरातीमध्ये संपूर्ण बॉलीवूडचे ‘संस्कारी बाबूजी’ अर्थात आलोकनाथदेखील आहेत. कर्करोगाने मरणाऱ्या एका पेशंटला त्याची शेवटची इच्छा विचारली जाते आणि ती पूर्ण करण्यासाठी सनीताई माप ओलांडून त्याच्या घरात येते. मात्र सनीचा नुसता चेहरा बघितला न बघितला तोच त्या बिचाऱ्या पेशंटचा मृत्यू होतो. व्हिडीओच्या शेवटी ‘सनी’ताई आपल्याला सांगते की, एक सिगरेट आपल्या जीवनाची ११ मिनिटं कमी करत. त्यामुळे सिगरेट ओढणं आरोग्याला हानिकारक आहे. ‘११ मिनिट्स’ या नावाने ही जाहिरात सादर झाली. बघू या आता, सनीताईचं आणि क्वीन कंगनाचं, ‘बिग बी’चं तरी ऐकतेय का तरुणाई !