एखादी व्यक्ती फिट आहे हे सांगण्यासाठी वजन हा एकमेव निकष असू शकत नाही. काही बारीक व्यक्तींचा, शिडशिडीत दिसणाऱ्या मुलींचा फिटनेस खूप कमी असू शकतो . कधी कधी मी बारीक आहे म्हणून काही लोक व्यायाम करत नाहीत. माझं वाढलेलं वजन मी कमी केलं की मी फिट होईन अशी मानसिकता लोकांमध्ये बघायला मिळते. पण वजनाबरोबरीनीच मानसिक फिटनेस किती आहे हेसुद्धा महत्त्वाचं असतं. सकाळी उठल्यावर तुम्हाला प्रसन्न वाटतं का, व्यायाम करावासा वाटतो का यावरही फिटनेस अवलंबून आहे. बीएमआय अर्थात बॉडी मास इंडेक्सच्या माध्यमातून उंचीच्या मानाने व्यक्ती अंडरवेट आहे, ओव्हरवेट आहे की लठ्ठ (ओबेस) आहे याबद्दलचं मोजमाप होतं.

हल्लीची तरुण पिढी आपल्या दिसण्याबद्दल खूपच कॉन्शस झाली आहे. उंची आणि वजन प्रमाणात असेल तरी काही जण दिसायला जाड दिसतं म्हणून बारीक होण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांना ती जाडी कमी करायची असते. त्यासाठी अगदी काहीही करायला ते तयार असतात. पण हे चुकीचं आहे. दोन- चार किलो ओव्हरवेट असाल तरीही त्यानं शारीरिक हानी होत नाही. काही जण जाडी कमी करण्यासाठी व्यवस्थित डाएट फॉलो करण्याऐवजी, इंटरनेटवरून किंवा मैत्रीण करते म्हणून चुकीचं डाएट फॉलो करतात. त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो. चुकीच्या डाएटनं फिटनेसऐवजी अशक्तपणा वाढतो. अंगात शक्ती न राहणं, प्रतिकारशक्ती कमी होणं, सतत आजारी पडणं ही लक्षणं दिसायला लागतात. त्यामुळे बारीक होण्यापेक्षा निरोगी होण्यावर भर असावा. फिटनेस चांगला असेल तर प्लस साइझ असणं गैर नाही. ‘प्लस साइझ’ ब्रॅण्ड्स स्थूल व्यक्तींच्या मनातला न्यूनगंड काढून टाकण्यासाठी मदत करतात असं मला वाटतं. त्यांचा प्रयत्न खूपच चांगला आहे.

(लेखिका आहारतज्ज्ञ आहेत.)

फिट अ‍ॅण्ड फाइन राहण्याच्या काही टिप्स

* बाहेरील पदार्थ कमी आणि घरातील अन्न जास्त खावं. दररोज थेडयिी प्रमाणात सुकामेवा अवश्य खावा.

* रोजच्या जेवणात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असू द्यावा.

* अँटीऑक्सिडंट म्हणून दररोज एक फळ खावं.

* विशेषत: मुलींनी भरपूर पाणी प्यावं.

* आपल्या प्रत्येक खाण्यामध्ये थोडय़ा प्रमाणात तरी प्रथिने असतील याचा विचार करावा. ब्रेकफास्टमध्ये एग व्हाइट, जेवणात डाळी, संध्याकाळच्या खाण्यात कधी शेंगदाणे, फुटाणे असा प्रोटीन इनटेक सतत असला पाहिजे.

दीपाली आठवले